सिनेमा हा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची मजा काही वेगळीच ! सिनेमा बरोबर आठवणीही असतात. सिनेमा कधी कुठे कसा पाहिला गेलो होतो, कुणाबरोबर गेलो, बघून झाल्यावर चर्चा झाली का, असे अनेक किस्से या सिनेमा पहाण्याच्या कार्यक्रमात असतात. पूर्वी पुण्यात अनेक चित्रपटगृहे होती ती अनुक्रमे विजय, भानुविलास, मिनर्व्हा, प्रभात, श्रीनाथ, अल्का, राहूल, अलंकार , निलायम, नटराज, डेक्कन वगैरे. तीन सहा नऊ बारा हे नेहमीचे शोज आणि याव्यतिरिक्त मॉर्निंग शो आणि मॅटीनीज असायचे. मॉर्निंग शो १० ला सुरू व्हायचे. मॅटीनी १२ वाजता. सिनेमाला जाण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या. कुणाला ऍडव्हान्स बुकींग केल्याशिवाय सिनेमाला जायचे पसंत नाही तर कुणाला आयत्यावेळी तिकिटे काढून सिनेमा पहाण्यात मजा वाटते.
पूर्वी वर्तमानपत्रातून सिनेमांच्या जाहिराती यायच्या. त्या बघून मग ठरवायचे कोणता पिक्चर पहायचा ते. सिनेमांची तिकिटे खूप पातळ कागदावर छापत असत. ते कागद रंगीत असायचे. पिवळे, लाल, हिरवे, शेंदरी, व काही वेळेला पांढरे. नटराज चित्रपटगृहामध्ये मध्ये शोले दुसऱ्यांना पाहिला होता ७० एम एम पडद्यावर. जय-विरूचे नाणे पडल्याचा आवाज अगदी जवळ ऐकू यायचा, म्हणजे ते नाणे आपल्या पायापाशी पडले की काय असा भास झाला होता. विनयाताई व तिच्या मैत्रिणी ठाण्यावरून आईकडे आल्या तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून शानदार नावाचा संजीवकुमारचा सिनेमा पाहिला होता. त्यात संजीवकुमारच्या खांद्यावर कबुतर येऊन बसते हेच फक्त लक्षात राहिले होते. राहुल टॉकीजला नेहमीच इंग्रजी सिनेमे लागायचे. तेव्हा Towering inferno पाहिला होता. हा सिनेमा पहाताना तर खूप भारावून गेलो होतो इतका आवडला.
निलायम टॉकीज मला खूप आवडायचे. प्रशस्त होते. तिथे आम्ही सर्व भावंडांनी मिळून गोलमाल पाहिला होता. एका मामेबहिणीचे डोहाळेजेवण आमच्या घरी झाले. आईने बरेच बटाटेवडे तळले होते. डोहाळेजेवण झाल्यावर गोलमाल पहायचे ठरले. आईला सिनेमा सुरू झाल्यावर मळमळायला लागले म्हणून आईबाबा घरी परतले. आई खूपच दमली होती. घरी आल्यावर आईला उलटी झाली. आमचा साखरपुडा झाल्यावर मी व विनुने बरेच पिक्चर पाहिले. गंगा जमुना, मधुमती, मेरा नाम जोकर, संगम, बीस साल बाद, आयायटीवरून विनु शुक्रवारी पुण्यात यायचा. शनिवारी आईच्या घरी. वर्तमानपत्रात कोणते सिनेमे लागले आहेत ते पाहून त्याप्रमाणे ठरवायचो कोणता पाहायचा ते.
एका रविवारी अचानक मॅटीनी पहायचा ठरला. मी व आईने वर्तमानपत्र बघितले तर उपहार लागलेला दिसला अलंकार टॉकीजवर. रंजना एनसीसीच्या क्लासला गेली होती. ती घरी आली आणि तिला घेऊनच लगेच रिक्शात बसलो. मी व आई जेवलो होतो. रंजनाचे जेवण डब्यात भरले व सिनेमा पहाता पहाता जेवली. पिक्चर हाऊसफुल्ल होता. ब्लॅकची तिकिटे घेऊन हा सिनेमा पाहीला. आम्ही दोघी बहिणी व आमच्या मैत्रिणी यांना अमिताभ खूप आवडायचा, अजूनही आवडतो. आमच्या घरी एक मैत्रिण तर अगदी रोजच्या रोज यायची. एकदा मिनर्व्हा टॉकीजला अमिताभचा 'अदालत' लागला होता. ती म्हणाली जायचे का आपण? तीनचा शो होता म्हणून लवकरच निघालो. तिकीट काढून मंडईतच थोडा वेळ काढायचा व पिक्चर पहायचा असे ठरवले होते. बसस्टॉपवर गेलो तर एक बस नुकतीच गेली होती. दुसऱ्या बसची वाट पाहतोय तर आलीच नाही. मैत्रिण म्हणाली आपण चालायला लागू. पुढच्या स्टॉपवर गेलो तरीही बस अजून आलेली नव्हती. चालत चालत गेलो तर बसचा पत्ता नाहीच आणि चालता चालता गणेशखिंड रोड ते मिनर्व्हा टॉकीजपर्यंत चालत गेलो होतो! तिकीटे काढली आणि चित्रपट सिनेमा सुरू होऊन काही वेळ झाला होता तरीही उरलेला पाहिला. नंतर मात्र पाय प्रचंड दुखायला लागले. बसचा संप होता त्यादिवशी म्हणून एकही बस जाताना-येताना दिसत नव्हती.
पनवेलला मामाकडे मामेबहीणीच्या लग्नाला जमलो होतो. सर्व भावंडे जमल्यावर तर आमचे पिक्चर पाहणे व्हायचेच. नेहमीप्रमाणे कोणता चित्रपट बघायचा यावर चर्चा सुरू झाली. पनवेलमध्ये गावाबाहेर एक चित्रपटगृह होते. बहुतेक त्याचे नाव ग्यान होते, आणि म्हणे तिथे एक भूत होते म्हणून तिथे जास्त कोणी जायचे नाही. तेव्हा खेलखेलमें लागला होता. मामी ओरडत होती त्या थिएटरमध्ये जाऊ नका, तिथे भूत आहे. आम्ही मामीला म्हणालो अगं मामी भूत वगैरे काहीही नसते गं आणि आम्ही १२-१५ जण आहोत. आम्हाला सर्वांना पाहून भूतच घाबरून जाईल. रात्री ९ ते १२ चा शो होता. खेलखेलमें मध्ये ३-४ खून आहेत. चित्रपट संपला आणि बाहेर पडलो तर काळाकूट्ट अंधार! त्यावेळेला बस वगैरे नव्हती. चालतच गेलो होतो. चित्रपटात नुकतेच खून पाहिले होते आणि मामीचे शब्द आठवले. तिथे जाऊ नका त्या चित्रपटगृहात भूत आहे आणि जाम टरकायला झाले. रस्त्यावरही म्युनिसिपाल्टीचे मिणमिणते पिवळे दिवे. ते सुद्धा जास्त नव्हते. अंधारच अंधार सगळीकडे. चालत पळत एकदाचे घर गाठले आणि सुटकेचा निश्वाः स टाकला.
अमर आकबर अँथनी एकदा पाहिला. दुसऱ्यांना मैत्रिणीला कंपनी म्हणून पाहिला, त्यानंतर तिसऱ्यांनाही तोच! अमर अकबर ऍथनी पाहिल्यानंतर बरेच दिवसांनी मामेबहिणीकडे गेले होते. तिच्याकडे गेले तर तीच कुलूप लावून सर्व मंडळी बाहेर पडत होती. मला म्हणाली अगं बरे झाले तू आलीस. चल आता आम्च्याबरोबर अमर अकबरला. मी म्हणाले काय? अगं नको गं तो पिक्चर मी दोनदा पाहिला आहे. तर म्हणाली की आमच्याबरोबर तिसऱ्यांना पाहा. हीच कथा हम आपके है कौनची. असाच तिसऱ्यांना जबरदस्तीने पाहिला लागला. पुणे स्टेशनच्या रेल्वे क्वार्टर मध्ये एक मामेबहीण रहायची. तिला पण सिनेमा पहाण्याची खूपच आवड. आम्ही सर्व भावंडे मिळून असेच लागोपाट २ पिक्चर पाहिले. रात्रीचा ९ ते १२ तेरे मेरे सपने पाहिला आणि दुसऱ्या दिवशी मॅटीनी शो पाहिला तो होता 'बंबईला बाबू' हा चित्रपट आम्हाला खूप आवडला आणि बाहेर पडल्यावर एकच चर्चा. हे काय? देवानंद सुचित्रासेनचे लग्न दाखवायला हवे होते. सुचित्रा सेन व देवानंदची जोडी किती छान दिसत होती ना! आणि त्या दोघांना कळाले होतेच की आपण भावंडे नाहीत ते. मग काहीतरी करून त्या दोघांचेच लग्न लावायला पाहिजे होते. पूर्ण निराशा झाली. इतका छान चित्रपट आणि शेवट हा असा. दुसऱ्याशी लग्न. त्या नवऱ्यामुलाला कोणीतरी किडनॅप करायला हवे होते अशी आमची चर्चा!
गोखले नगरला रहात असताना आम्ही मैत्रिणींनी 'संगम' पाहिला होता. आयत्यावेळी ठरले. बस करून टॉकीजवर गेलो तर चित्रपट हाऊसफुल्ल होता. पहिल्या रांगेतली काही तिकिटे बाकी होती. विचार केला इतक्या लांबून आलो तर पाहू या. पहिल्या रांगेत बसून पिक्चर पाहणे म्हणजे किती त्रासदायक असते ते त्यावेळी कळाले. मान उंच करून पाहिला लागले. चित्रपटातिल चित्र तर अंगावर धावून आल्यासारखी वाटत होती, पण पिक्चर पहायची हौस केवढी! मी व वंदना गरवार कॉलेजला होतो. इकोनोमिक्सचे महाबोअर २ तासाचे तास बंक केले. कोल्हे बाई शिकवायला होत्या. त्या खूपच बोअर शिकवायच्या. गरवारे कॉलेजच्या एका कॉर्नरला एक दुकान होते तिथे बरेच काही मिळायचे. तिथे आम्ही गरमागरम बटाटेवडे खाल्ले. त्यावर चहा प्यायला. झिमझिम पाऊस पडत होता. त्या पावसात छत्री घेऊन गेलो सिनेमा पहायला प्यार का मौसम. मॉर्निंग शो होता.
काही काळानंतर बरेच वर्षांनी 'दिल तो पागल है' हा असाच बघितला गेला. खरे तर मला शाहरूख खान अजिबात आवडत नाही. डोंबिवलीत आमच्या सोसायटीत रहाणारे श्री नेर्लेकर एकदा आम्हाला म्हणाले चला येताय का पिक्चरला. मी म्हणाले कोणता? दिल तो पागल है. अहो तुमची माधुरी दिक्षित आहे त्यात. पारखी काका-काकू यांनाही विचारले येताय का? लगेच तयार झालो. श्री नेर्लेकर यांनी आमच्या सहा जणांची तिकिटे काढली. जाताना-येताना रिक्शा. रिक्शाचे पैसेही त्यांनीच दिले. इतकेच नव्हे तर मध्यंतरात चहा-सामोसेही खायला दिले. मी व सुषमा नेर्लेकर आम्ही दोघी खूप हासत होतो. नेर्लेकर म्हणाले हासू नका हो. पिक्चर बघा. आम्ही दोघी एकीकडे कुजबुजत होतो आणि हासत होतो. पारखी काकू मात्र मन लावून पिक्चर बघत होत्या. पारखी काका चक्क झोपले होते. सगळ्या सिनेमात मला व सुषमाला ले गई ले गई हा नाच आणि गाणेही आवडले. तरुणीला लाजवले असा आवाज लागला आहे आशा भोसलेचा या गाण्यात !
अकेले हम अकेले तुम हा पिक्चर डोंबिवलीत टिळकला पाहिला. मी विनु अर्चना अपर्णा, अदिती असे गेलो होतो. सर्वांनाच आवडला. ९ ते १२ पिक्चर पाहिल्यावर आम्ही चालत आमच्या घरी आलो आणि नंतर २ वाजेपर्यंत चर्चा करत होतो. कोण चुकले आमिर खान की मनिषा कोईराला. असाच एक पिक्चर आम्ही चौघांनी म्हणजे पारखी काका-काकू व आम्ही दोघे बघितला तो म्हणजे माधुरी दिक्षीत व संजय दत्तचा थानेदार.गर्दी अजिबातच नव्हती. कोणीही कुठेही बसा. तिकिटे पण अगदी आयत्यावेळी काढली. आमच्या घरासमोरच रामचंद्र टॉकीज असल्याने जेवून निघालो ९ ते १२ चा पहायला. यातले गाणे आणि नाच दोन्ही मला आवडले. तम्मा तम्मा दोगे.
डर हा सिनेमा लक्षात राहिला याचे कारण त्या दिवशी खूप उन होते. मॅटीनी होता. येताना खूपच रणरणते उन होते आणि माझे डोके खूपच दुखायला लागले. मळमळायला लागले आणि घरी आल्यावर उलटी झाली. तो सिनेमा डोक्यातून जाता जात नव्हता इतके टेंशन आले होते. सिनेमा बघून खरच खूप घाबरायला झाले होते. गरवारे शाळेत जाता-येता डेक्कन टॉकीज वर बदललेल्या सिनेमाचे मोठे बॅनर दिसायचे. शाळेत असताना आम्ही दोघी आणि आईबाबा दादर मध्ये रहाणाऱ्या मामाकडे गेलो होतो. तेव्हा प्लाझा चित्रपटगृहात सिंहासन पाहिल्याचे आठवते. मामेबहीण व आम्ही दोघी बहिणी मिळून मनोजकुमारचा पूरब और पश्चिम पाहिला. आम्हाला कोणालाच आवडला नाही. सिनेमा अर्धवट पाहिला आणि बाहेरच हॉटेल मध्ये डोसा, इडली खाऊन घरी परतलो.
अमेरिकेतल्या क्लेम्सन शहरात एक सिनेमा पाहिला तो म्हणजे लॉर्ड ऑफ द रिंग. सुधीर जोशी आणि आम्ही दोघे गेलो होतो. ऍस्ट्रो नावाचे थिएटर होते. आम्हाला दोघांना हा सिनेमा अजिबातच आवडला नाही पण लक्षात राहिला तो एका कारणाने. सुधीर व राजेश हे दोघे रूममेट होते. राजेश नेहमी पास्ताचे कौतुक करायचा. मी त्याला सांगितले की मला एकदा दाखव ना पास्ता कसा बनवायचा ते. तर म्हणाला तुम्ही सिनेमा बघून या तोवर मी पास्ता बनवून ठेवतो. त्याने इंडियन स्टाईल फोडणीत भाज्या घालून तिखट, मसाला, घालून पास्ता बनवला होता आणि तो मला खूपच आवडून गेला. नंतर मी बरेच वेळा वन डिश मील पास्ता करायचे. सिनेमा व त्यानंतर आयता पास्ता व नंतर बनाना स्प्लिट आईसक्रीम खाल्याने खूप बरे वाटले होते.
डोंबिवलीत असताना बरेच सिनेमे पाहिले. अर्चना, तिच्या बहिणी, अर्चनाची आई, शेजारी रहाणाऱ्या पारखी काकू सर्व मिळून जायचो. उन्हाळ्यात वाळवणे करायचो. ती झाली की जेवून ३ चा किंवा कधी कधी ९ ते १२ रात्रीचा बघायचो. साजन, बेटा, बाँबे, रोझा, हम आपके है कौन, मैने प्यार किया असे अनेक पाहिले.लग्नानंतर १० वर्षाने जेव्हा रंगीत ओनिडा घेतला तेव्हा घरच्या घरी सोनी चॅनल वर सिनेमा पहाण्याचा सपाटाच लावला होता. अभिमान, चुपके चुपके, गोलमाल, खूबसूरत, बावर्ची इत्यादी. जेव्हा न्यु जर्सीत राहायला आलो तेव्हा चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर हिंदी/मराठी सिनेमा पहाण्याचा आनंद घेतला पण बरोबर मित्रमंडळ/नातेवाईक नाहीत त्यामुळे मजा नाही. काश्मीर फाईल हा सिनेमा पहायचा ठरवला पण आपण तो पाहू शकू का ही भिती मनात होती. चित्रपट आवडला पण घरी आल्यावर डोके सून्न झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, सॅम बहादूर, कलम ३७० पहाताना मात्र खूप मजा आली आणि आनंद वाटला. मराठी बाई पण भारी देवा आवडून गेला.
मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा.... या गाण्याची व नटरंग या चित्रपटाची जाहिरात ऑनलाईन झी मराठीवर पाहिली होती आणि तेव्हाच ठरवले की पुण्यात टॉकीजवर जाऊन नटरंग पाहायचा. हे ठसकेबाज गाणे मला खूप आवडते. एकदा ऐकले की दिवसभर तेच डोक्यात राहते. चित्रपटाची सुरवात याच गाण्याने होते त्यामुळे मला सुरवात अजिबात चुकवायची नव्हती. पुण्यात कुठेही जायला रिक्षा हवीच. नेमका रस्ता काही कारणाने अडला होता. रिक्षावाल्याने मागे वळवून वेळेवर प्रभातवर पोहोचते केले. २०१० सालच्या भारतभेटीत हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पहायचा योग आला. मी, वसुधा, सायली गेलो होतो रिक्शाने. त्यानंतरच्या एका भारतभेटीत विनुचा मित्र हरीश, त्याची बायको ऋजुता व आम्ही दोघे अल्काला दुपारी ३ च्या शोला गेलो होतो हरिश्चंद्राची फॅक्टरी पहायला. वेगळाच आहे हा चित्रपट. त्यामुळे आवडला.
तर अशी ही चित्रपटगृहात जा ऊन मोठ्या पडद्यावर सिनेमा पहाण्याची मजा काही न्यारीच ना ! प्रत्येकानेच अनुभवलेली आहे. तुमच्या काही खास आठवणी असतील तर कमेंट मध्ये लिहून शेअर करा.
rohinigore
2 comments:
khup chan lihala aahe lekh
Thank you so much for the comment !!
Post a Comment