Friday, December 27, 2024

२७ डिसेंबर २०२४

 

पाणी आलं रे आलं
काल सकाळपासून ते अगदी या क्षणापर्यंत खूप बारीक सतत धार पाणी येत आहे. नळाला पाणी कोणत्याही रूपात का होईना येतय हे महत्वाचे ना ! पाण्याचा ठणठणाट नाहीये ना! आमच्या शहरात काही ठिकाणी पाण्याचा टिपूसही नाहीये. पाईपलाईन फुटल्याने बऱ्याच भागात पाणी नाही. अमेरिकेत वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात आणि कधी नाही असे होतच नाही. एखाद वेळेस क्वचित असे होते. मोठमोठाली वादळे आली तरीही वीज आणि पाणी असतेच. वीज नाही असे पूर्वी अनुभवले आहे. फटकन वीज गेल्याने होणारी पंचाईत अनुभवली आणि लिहीली पण आहे. पाण्याची खूप कमी धार पहिल्यांदाच !


प्रत्येक बाईच्या अंगी एक उपजतच गुण आहे तो म्हणजे थोडक्यात कसे भागवायचे? कमी पैशात संसार कसा करायचा, कमी पाण्यात धुणेभांडी कशी करायची? दत्त म्हणून हजर आलेल्या पाहुण्यांच्या समोरच घरातला पसारा कसा आवरायचा? तर थोडक्यात काल आणि आज सतत खूप कमी धार असलेल्या पाण्यात मी काल रात्री भांडी घासली. काल शॉवरला पण पाणी होते. पण आज पाण्याची धार खूपच कमी झालेली आहे. काल पातेल्यातून, कूकरमधून पाणी भरून ठेवले होते. एक वेळ अंघोळ झाली नाही तरी चालेल पण बाकीच्या गोष्टीना खूप पाणी लागते ना ! तर आज विनायकने भारतात करतो तशी छोट्या बादलीत पाणी घेऊन अंघोळ केली आणि ऑफीसला गेला. मी म्हणाले मी धो धो पाणी आले की करेन अंघोळ. मी घरातच आहे. आमच्याकडे एक छोटी बादली आहे. ती आज उपयोगी पडली. पाणी बंद न करता ती बादली भरली आणि बादली भरली तरीही नळ बंद केला नाही. त्यामुळे बादली सतत भरलेली राहिली आणि मी अंघोळ केली. न जाणो पाणी बंद झाले तर ! आज अंघोळीची मजा काही औरच होती. भारतातल्या अंघोळीची आठवण करून देणारी.


वीज नाही पाणी नाही असे असले की अगदी हात मोडल्यासारखा होतो ना ! आणि आता तर मोबाईल डेटा नसला किंवा नेट गेले की पण अगदी तसेच होते ! आज मला पूर्वीची अंघोळ आठवली. आईकडे तांब्याचा भला मोठा बंब होता. हा बंब अंगणात पेटवला जायचा. पूर्वी पुण्यात शून्य अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जायचे. बंबातले कढत पाणी बादलीत काढून अंघोळ करायचो. नंतर हा बंब बाथरूम मध्ये आला. बंबाला कॉईल बसवून घेतली. अंघोळ म्हणजे आम्ही सर्व पाण्यात डुंबायचो. कढत पाणि एका बादलीत असायचे पण त्यात विसावण घालण्याकरता बाजूला दोन गार पाण्याच्या बादल्या असायच्या. सकाळी नळाला पाणी असे पर्यंत सर्व काही उरकायला लागायचे. नंतर दिवस भराकरता ड्रमातून पाणी भरून ठेवायला लागायचे.


सकाळी स्टीलच्या पिंपात, कळशीत, व माठात पिण्याचे पाणी भरून ठेवायचो. बंबाला कॉईल बसवण्याच्या आधी स्टोव्ह आणि नंतर गॅस वर अंघोळीकरता पाणी तापवत ठेवायचो. गॅसवर शक्यतो फक्त स्वैपाक आणि अंघोळीचे पाणि स्टोव्ह वर तापवायचो. त्याकरता एक गोलाकार पण खालून सपाट असलेले मोठे पातेले होते. पाणि तापले की फडक्याने दोन्ही हाताने ते पाणी उचलून बादलीत पाणी ओतायचे. अशा प्रकारे एकेकाच्या अंघोळी उरकायच्या. लग्न झाल्यावर सासरी पण असेच पाणी भरून ठेवायला लागत होते. पाणी तापवायला लागत होते. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर आधी आयायटी व नंतर डोंबिवलीत रहायला आलो. डोंबिवलीत आमच्या सोसायटीत २४ तास पाणी होते. याचे कारण खालच्या टाकीत २ वेळा धो धो पाणी यायचे ते आम्ही वरच्या टाकीत पंपाद्वारे सोडायचो. टाकी वाहिली की निश्चिंत व्हायचो. सोसायटीत बिऱ्हाडे कमी होती त्यामुळे पाणी पुरायचे. आम्ही कोणीही कधिही जास्तीचे पाणि भरून ठेवलेले नाही.


जेव्हा पाणी अचानक जायचे तेव्हा ते का गेले , पंप चालवण्याची टर्न कोणाकडे होती, दिवसातून २ वेळा तरी पंप चालवायला हवा, टाकी वहायला हवी, अशी चर्चा व्हायची. जेव्हा म्युनिसिपाल्टीचे पाणी यायचे नाही तेव्हा मात्र भरून ठेवायचो. मी वॉशिंग मशिन मध्येही पाणी भरून ठेवायचे. बादल्या, पातेली, वाट्या, वाडगेही भरायचे. एक प्लॅस्टीकचा ड्रम आणून ठेवला होता तोही भरायचो. पाण्याचा पाईप फुटला की टॅंकरचे पाणी वरच्या टाकीत भरायचो. सर्व काही मुबलक प्रमाणात आहे असे आपण जेव्हा म्हणतो ना तर ते चांगलेच आहे पण त्यात नाविन्य रहात नाही. हल्ली कोणत्याच बाबतीत नाविन्य नसल्याने एकूणच कोणत्याही गोष्टीची गोडी कमी झाली आहे. अजूनही नळाला धो धो पाणी आलेले नाही. जेव्हा येईल तेव्हा म्हणीन पाणी आलं रे आलं ! गोंद्या आला रे आला सारख.
rohinigore

No comments: