१३ फेब्रुवारी २०२५
या वर्षी दर आठवड्यात २ ते ३ इंच स्नो पडत आहे. कधी भुसभुशीत तर कधी खरखरीत. काही वेळा तापमान खूप कमी गेले की स्नो दगडाचा सारखा घट्ट होउन बसत आहे. तापमान बघून जर बोचरे वारे नसेल आणि चालणे झेपेल असे वाटले तर मी १ मैल चालून येते. थंडीत गोठायला झाले तरी मूड बदलून जातो. आजचा दिवस वेगळा होता म्हणून रोजनिशीत लिहावासा वाटत आहे. सकाळी उठले तर स्नो वितळत होता. काही ठिकाणी स्नो होता तर काही ठिकाणी त्याचे पाणी झाले होते. आज बरेच पक्षी होते मैदानावर. सर्व द्रुश्य स्वयंपाकघराला लागून असलेल्या खिडकीतूनच दिसत होते म्हणून आज मी थोड्या विडिओ क्लिप्स घेतल्या. इथे सीगल्स जास्त दिसत नाही पण आज थोडे दिसले. बदके, सीगल्स, चिमणा-चिमणी, कबुतरे, कावळे, खूप छोटे पक्षी दिसत होते आज. बाल्कनीतल्या कठड्यावर बसून खारू ताई बर्फ खात होती. कालचा उरलेला भात पक्षांना खायला घातला. पक्षी बर्फाचे गार पाणी पीत होते. बर्फातूनच काही मिळेल ते खात होते.
संध्याकाळी आकाशात सीगल्स पक्षांचे थवे दिसले. आज असे वाटत होते की वसंत ऋतूचे आगमन यावर्षी लवकर होईल. आज बरेच वर्षानंतर संध्याकाळी खायला कोरडी भेळ केली आणि रात्रिच्या जेवणाला मुग-तांदुळ खिचडी, भोपळ्याचे भरीत आणि पालकाची पीठ पेरून भाजी केली. आजचा दिवस जसा खास होता तसाच मागच्या वर्षीचा पण आजचा म्हणजे १३ फेब्रुवारीचा 2024 दिवस असाच स्नो डे होता. आज दुपारी रेडिओ वर किशोर कुमारची गाणी लागली होती. rohinigore
No comments:
Post a Comment