लक्षात राहिलेले पहिले खाणे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी (Prav Electrospark pvt. Ltd) दुपारच्या जेवणात खाल्लेला डबा. १९८३-८४ साली लागलेली माझी पहिली नोकरी. तिथे दुपारच्या जेवणात सर्व डिपार्टमेंटच्या मुली-बायका एकत्र येऊन डबा खायचो. हा डबा आम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसून खायचो. गोलाकार बसायच्या सर्व जणी आणि भाज्या-आमट्या-दही साखर-ताक हे सर्व डबे मधोमध ठेवायचो आणि पोळ्या आपापल्या खायच्या. प्रत्येक पोळीच्या घासाबरोबर इतरांनी आणलेली भाजी (कोरडी-पातळ) खायचो. आमच्या सगळ्यांचे चौरस जेवण होत असे. जेवणाच्या डब्यात पातळ-सुकी भाजी, दही साखर, चटणी, कोशिंबीर, माझे बाटलीतले ताक, दही भात, चटण्या, मोरंबे गुळंबे असे आलटून पालटून सर्वच खायला मिळायचे. जेवणानंतर खायला सुपारी-बडीशेपही काहीजणी आणायच्या. मी वरच्या मजल्यावर पर्चेस डिपार्टमेंटला होते तर खाली असलेले पर्सोनेल डिपार्टमेंट मध्ये माणिक ताई होती. तिनेच मला ही नोकरी सुचवली होती. या डिपार्टमेंटला दोघेच होते. माणिक ताई आणि अजून एक होता. ते बाहेरून खायला आणायचे म्हणजे इडली-डोसे बटाटेवडे. त्यावेळेला कंपनीत शिपाई होते. तो शिपाई मला सांगायचा तुम्हाला खाली बोलावले आहे. मला लगेच ते कळायचे. खाली जायचे खरी पण मनात धाकधूक. माणिक ताई म्हणायची अगं सावकाश खा. एखादी इडली, एखादा बटाटावडा खाऊन मी परत माझ्या जागेवर येऊन बसायचे.
डोंबिवलीत Avery India Ltd. मध्ये नोकरी लागली तेव्हा तर खाण्यापिण्याची खूपच धमाल केली. BM (Branch Manager ) आम्हाला कामे देऊन कधी एकदाचे बाहेर जातात असे आम्हाला होऊन जायचे. कंपनीतर्फे त्यांची कार काळ्या रंगाची होती. ते बाहेर पडले रे पडले आणि कार वळवून रस्त्याला लागले रे लागले की आम्हा तिघींना (मी दिप्ती लक्ष्मी) सामोश्याची भूक लागायची. भुकेने व्याकुळ व्हायचो अगदी. बापट आमच्यासाठी सामोसे घेऊन यायचे व चहाची ऑर्डर पण देऊन यायचे. गरमागरम सामोश्यांसोबत तळलेली मिरची आणि कच्चा कांदा असायचा. दुपारच्या जेवणाचा डबा ३ वाजता खायचो. मी असेच एकदा सुचवले होते की तिघींपैकी एकीनेच सर्वांचा डबा आणायचा. त्यात मी एकदा बटाटेवडे आणि साबुदाणा खिचडी आणली होती. दिप्तीने ओली भेळ करून आणली होती आणि लक्ष्मीने शेवई कढी. आमचे ऑफीस M.I.D.C मध्ये होते. ऑफीसच्या समोरच्या रस्त्यावरून फळ विक्रेते जायचे. एकदा १ किलो दाक्षे जेवणानंतर आम्ही तिघींनी फस्त केली होती. एकदा संत्रीही अशीच खाल्ली होती. घरी घेऊन घेण्यासाठी मी त्या विक्रेत्याकडून अनेक संत्री घेतली होती. ऑफीसमध्ये क्लायंट आले की देवधर नावाचे BM चहा बिस्कीटे किंवा कधी कधी cold drink मागवायचे. ते आमच्या करताही ऑर्डर करायचे. त्यात मी नेहमि Thumps up घ्यायचे. दिप्ती व लक्ष्मी mangola घ्यायच्या. krackjack (थोडी मीठी थोडी नमकीन) बिस्किटे मला खूप आवडायची. जेव्हा आमच्या Sales Representative ला बरेच कमिशन मिळायचे तेव्हा ते आम्हा तिघींनाही बाहेर उपाहारगृहात पार्टी द्यायचे. पंजाबी नान, नवरतन कुर्मा, टोमॅटो सूप, फ्राईड राईस, आईस्क्रीम असायचे. कोल्ड ड्रिंक पण आमच्या तिघींचे नेहमीचे ठरलेले घ्यायचो. शनिवारी हाफ डे असायचा. त्यानंतर आम्हा तिघींना घेऊन सर्व जण उपाहारगृहात पार्टी द्यायचे. डोंबिवलीत रस्त्यावर एक माणूस सॅंडविच बनवून द्यायचा. ब्रेडच्या बाजूच्या चकत्या काढायचा. एका ब्रेडवर अमूल बटर लावायचा तर एका ब्रेड वर चटणी. त्यावर उकडलेल्या बीटाचे व बटाट्याचे काप, लाल कांद्याचे काप, टोमॅटो व काकडीचे काप ठेवून धारदार सुरीने त्याचे ४ स्लाईस करायचा व त्यावर टोमॅटो केच अप घालायचा. खूपच चविष्ट होते हे सॅंडविच ! एक खाल्ले की तोंड खवळायचे व लगेच दुसरेही ऑर्डर करायचो.
जेव्हा मला हेंडरसनविल इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा पण खाण्यापिण्याची खूप चंगळ केली. तिथे मी दुपारच्या जेवणात आठवड्यातून एकदा Vegetable lo mein घ्यायचे किंवा कधी कधी सब वे स्टाईल सॅन्डविच मी स्वत: बनवून घ्यायचे. त्यात मी माझ्या आवडीचे सर्व घालायचे. 6 " Italian bread त्यावर मेयोनिज लावायचे. त्यावर चिरलेला लेट्युस, चीझ ( पेपर जॅक/ स्विस )काकडी,टोमॅटो सिमला मिरची, कांदा या सर्वांचे काप ठेवायचे. शिवाय किसलेले गाजर घालायचे. त्यावर हनी मस्टर्ड घालून तो रॅप करून घ्यायचे.सोबत डाएट कोक kettle पोटॅटो चिप्स घ्यायचे. जेव्हा मी ४ वाजता घरी जायला निघायचे तेव्हा chocolate croissant खायचे व नंतर स्टार बक्स ची कॉफी पिऊन निघाले की घरी चालत जायला मला ४५ मिनिटे लागायची. नंतर जेव्हा इंगल्स मध्ये आईस्क्रीम विक्रीला ठेवले ते खूपच छान होते. Gelato pumpkin ice-cream मला खूपच आवडून गेले. शिवाय काम करता करता एकीकडे आम्ही जे बनवायचो त्यात जे घटक घालायचो तेही खायचे. ( goldfish baby tomato, baby carrot, dried fruits.) बनाना व चॉकलेट पूडिंग बनवताना त्यात लागणारे घटक म्हणजे केळीचे काप, Oreo cookies chocolate syrup मध्ये बुडवून खायचे. तिथे काम करणाऱ्या सर्वजणी खायच्या. लपून छपून. काम करता करता कुणाचे लक्ष नाही ना ते पाहून पटकन एखादे तोंडात टाकायचो. किंवा कोल्ड रूम मध्ये जा ऊन खायचो. hot bar मध्ये काही वेळेला fried okhra, french fries असायचे तेही खायचो. डेली सेक्शनला ज्या काम करणाऱ्या होत्या त्या सर्वजणी नॉन व्हेज पदार्थ खायच्या. शिवाय आमच्या मागे फ्रुट बार साठी फळे कापली जायची ती पण खायचो. म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस. काही वेळेला बेकरीतून ताजी बेक केलेली बिस्किटे टेस्ट साठी आम्हाला तिथली एक मुलगी घेऊन यायची. ताजी बिस्किटे खायला खूपच छान वाटायचे.
आम्हा दोघांना पिझ्झा जास्त आवडत नाहीच. आधी जेव्हा पिझ्झा खाल्ला तेव्हा तो घशाखाली नीट उतरला नव्हता. प्रत्येक घासागणिक चीझ येत होते. नंतर पिझ्झा आवडायला लागला. पिझ्झ्या सोबत ब्रेड स्टिक्स किंवा गार्लिक ब्रेड घेत होतो. प्यायला भरपूर कोकाकोला. लक्षात राहिलेला पिझ्झा होता हेंडरसनविल मधला . Flat Rock गावात एक इटालियन पिझ्झाचे उपाहारगृह होते. ते आम्हाला अचानक सापडले आणि त्या दिवशी पिझ्झा खाल्ला तेव्हा अगदी समाधान झाले होते. हेंडरसनविल मध्ये अपार्टमेंट बघण्यासाठी आलो होतो आणि खूप त्रास झाला होता. दुपारची वेळ. प्रचंड भूक लागली होती. हायवे ला लागलो आणि पिझ्झाचे हे उपहारगृह दिसले. इथले सलाड तर खूपच छान होते ( grated carrot, baby tomato, shredded lettuce, bell pepper, corn, cucumber slices, shredded cheese, bread crumbs ) आणि त्यावर dressing ( ranch, honey mustard, thousand island) आणि भरपूर टॉपिंग असलेला व्हेजिटेरियन पिझ्झा ( bell pepper, spinach, black olive, onion, tomato, pineapple, broccoli, mushroom ) अगदी वेळेवर मिळाला होता. इथली काउंटर वर जी बाई होती तिला आमच्या आवडीची पिझ्झावरची टॉपिंग्ज माहीत झाली होती. एकदा आम्ही मेक्सिकन उपाहारगृहात गेलो असता तिथे ती बाई पण आली होती. तिने हाय ! केले. तीचे खाणे झाल्यावर ती बिल देऊन निघून गेली. आम्ही बिल द्यायला गेलो तर तिथला माणूस म्हणाला तुमच्या बिलाची रक्कम त्या बाईने दिली आहे. तसेच परत एकदा ती बाई दिसली त्याच उपाहारगृहात तर आम्ही तिच्या बिलाची रक्कम दिली होती. विल्मिंग्टन
मधले Mellow Mashroom उपाहारगृहातले hoagie असेच लक्षात राहिलेले. soft
french bread मध्येavacodo, sour cream, thin slice roma tomato, avocodo
cheese, घालतात.
आधी आम्ही पिझ्झा हट चे फॅन होतो. तिथे आधी सुरवातीला मध्यम आकाराचा पिझ्झा घ्यायचो. नंतर personal pizza घ्यायला लागलो. हा पिझ्झा एका छोट्या डिश मध्ये येतो. एरवी ८ स्लाईस असतात. पण या छोट्या डिश मध्ये ४ slice येतात. तिथल्या बायकांना पण आम्ही काय टॉपिंग घेतो ते माहिती झाले होते. Thin crust pizza म्हणजे भाकरी, hand tossed pizza म्हणजे पोळी, pan pizza म्हणजे थालिपीठ. मेक्सिकन फूड आम्हाला खूपच आवडते. सुरवातीला Nacho chips आणि सालसा देतात ते तर खूपच आवडते. आमची सगळ्यात आवडती डिश म्हणजे sizzling Fajita ! यामध्ये (4 tortillas, mexican rice, guacamole salad, shredded lettuce, sour cream ) तव्यावर थोडे तेल घालून सर्व भाज्या ( onion, bell pepper, tomato, broccoli , mushroom )परततात. आणून देताना भाजीमधून वाफा येत असतात. चुर्र असा आवाजही येत असतो. त्यावर आम्ही भरपूर मिरपूड, red चिली फ्लेक्स, मीठ घालतो. ही डीश म्हणजे आपली पोळी भाजी, कोशिंबीर, मसाले भातासारखीच वाटते आम्हाला. जेवल्याचे समाधान होते. तसेच hard tacos, soft tacos, chimichanga, या डिशेश पण आवडीच्या आहेत. soft tacos म्हणजे आपल्याकडचा बटाट्याचा पराठा. chimichanga is deep fried burrito
एक मेक्सिकन जेवण लक्षात राहिलेलं म्हणजे आम्ही चायनिज टुर बरोबर फिरायला गेलो होतो. एके ठिकाणी रात्रीचे होटेल मध्ये पोहोचलो आणि जेवायला बाहेर पडायचे होते. टुर मधल्या माणसाने आम्हाला सांगितले होते की इथे एक उपाहारगृह आहे पण ते दिसता दिसेना. एक तर होटेल उंचावर होते. बसमधून जाताना आम्हाला waffle house दिसले आणि मेक्सिकन उपाहारगृहाची पाटी दिसत होती उंच एका खांबाला लावलेली. माझ्या मनात शंका. मेक्सिकन उपाहारगृह सापडले नाही तर आपण waffle house मध्ये काय खाणार आहोत? आम्ही या उपाहारगृहात कधीच गेलो नाही. जेवायला बाहेर पडलो. काळाकुट्ट अंधार. रस्त्यावर एखादाच मिणमिणता दिवा. चढावरून येता जाता कार जात होत्या. आम्ही उंचावर पाटी होती तिथपर्यंत पोहोचलो तर खाली अजून एक उतार होता. तो उतरून पुढे चालत गेलो तर समोरच उपाहारगृह होते. आत शिरलो आणि आम्हाला आवडणारे मेक्सिकन जेवण पोटभर जेवलो.
Singas famous pizza - NJ या उपाहारगृहात मिळणारा पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड असाच लक्षात राहील. इतका क्रिस्पी गार्लिक ब्रेड आम्ही प्रथमच खाल्ला. पिझ्झावर आपण सांगू ते टॉपिंग घालत नाही. ते ठरलेले आहे. (sweet onion, bell pepper, mushroom, spinach, broccoli) भरपूर घालतात. त्यामुळे हा पिझ्झा खूप आवडला.
सर्वात लक्षात राहिलेलं आवडतं खाणं म्हणजे शाळेत असताना आई बाबा, आम्ही दोघी बहिणी कमलानेहरू पार्क मध्ये जायचो. तिथे खूप खेळून झाले की आम्ही चौघे मस्त खादाडी करायचो. सर्वात आधी पाणीपुरी, नंतर शेव बटाटा पुरी, नंतर रगडा पॅटीस व सर्वात शेवटी मसाला पुरी !!! rohini gore - 8 April 2025
No comments:
Post a Comment