Thursday, March 12, 2020

१२ मार्च २०२०

आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालच्या दिवसाचीही भर घालावी लागेल. काल सकाळी विनायक ऑफीसच्या कामानिमित्ताने न्युयॉर्कला जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि माझा एकटीचा दिवस सुरू झाला. एकटीने काय काय करायचे याची रूपरेषा मनात आखून ठेवली होतीच. चहा आणि न्याहरी झाल्यावर स्मार्ट टिव्हीवर क्रॉमकास्ट च्या मदतीने युट्युबवरचा परिचय सिनेमा पहायला सुरवात केली. अधून मधून ब्रेक घेत होते. सिनेमाची प्रिंट अजिबातच चांगली नव्हती त्यामुळे बंद केला. नंतर नेहमीप्रमाणेच एफबी वर चकरा मारल्या. युट्युबवर वर चक्कर मारली. गुगलींग केले. जेवणासाठी भाजणीचे थालिपीठ करून खाल्ले. मग थोडी पडले. नंतर घरातली साफसफाई केली. दुपारचा चहा झाल्यावर मनसोक्त साबुदाणे वडे खाल्ले. टाईमपास साठी एक दोन मालिका पाहिल्या. नंतर २ मैत्रिणींशी फोनवर मनसोक्त गप्पा मारल्या. विनायकशी २ वेळा फोनवर बोलणे झाले.



संध्याकाळी नेटफ्लिक्सवर डोक्याला अजिबात ताप न होणारा सिनेमा लावून बसले. तो सिनेमा म्हणजे अमर अकबर अँथनी. अधून मधून ब्रेक घेत होते. रात्रीच्या जेवणासाठी काय करायचे तेही ठरवले होते. नंतर माझ्या एका जिवलग मैत्रिणीशी (मोनिकाशी) खूप मनसोक्त बोलले. तीही बोलली. रात्रीच्या जेवणात शेवयाची खीर केली आणि सोबत पोळी खाल्ली. झोपण्याच्या आधी परत विनायक ला फोन केला. त्याचाही दिवस कामा मध्ये खूप हेक्टिक गेला होता. होटेल मधून बाहेर पडून त्याने फूटपाथ वरून पाऊण तास चालून आला. तो म्हणाला इथे मुंबईत फिरल्यासारखेच वाटत आहे. बरेच लोक फूटपाथ वरून चालताना दिसतात. त्याला फोन वरून माझा दिवस कसा गेला ते सांगितले.



प्रिय मैत्रिण शुभदाला विडिओ कॉल केला व तिचे घर बघितले. मला खूप आवडले तिचे घर. तिने पोहे केले होते सकाळच्या न्याहरीसाठी. तिच्याशी बोलते मी बरेच वेळा फोन करून पण आज मात्र न बोलता तिचे घर बघितले आणि नंतर तिला बाय केले. रात्रीचे ११ वाजले आणि खऱ्या अर्थाने माझा दिवस सुरू झाला. ऑनलाईन अंताक्षरी मध्ये मनसोक्त खेळले दिड दोन तास. आज मोहिनीने अंताक्षरीची थीमही छान दिली. होती. शब्दभेंड्या आधीची थीम थोडा बदल करून दिली होती. अंताक्षरी खेळताना मध्ये भांडी घासण्यासाठी ब्रेक घेतला. अंताक्षरीमुळे कालचा आणि आजचा दिवस कायम लक्षात राहील माझ्या. धन्यवाद मोहिनी !



शब्दभेंड्या आणि मुखडा अंतरा या दोन्हीही थीमा मी पूर्वी ऑर्कुटवर एका ग्रुप मध्ये टाकली होती त्याची आज खूप आठवण येत होती. आणि या ग्रुप मध्ये दर बुधवारी याहू मेसेंजर वर अंताक्षरी खेळायचो तेही आठवत होते. अंताक्षरीमुळे मित्रमंडळ तयार होते हे मी अनुभवलयं. पूर्वी मनोगत या मराठी संकेत स्थळावर सुद्धा मी अंताक्षरी टाकली होती. ती तर खूपच रंगली होती. पण आम्ही त्यामध्ये लिहून गाणी टाकायचो. अमेरिकेतले झोपायचे तेव्हा भारतातले मनोगती भेंड्या खेळायचे आणि भारतातले मनोगती झोपले की अमेरिकेतले खेळायचे. तसेच ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इंग्लंड मधलेही असायचे.अंताक्षरी खेळून झाल्यावर झोप येईना म्हणून परत गुगलींग केले. परत झोपायचा प्रयत्न केला. सरतेशेवटी मला पहाटे ३ ला झोप लागली. उठायला ८ वाजले. पण आज आराम होता. आजच्या जेवणाच्या २ पोळ्या आदल्या दिवशी रात्रीच लाटून ठेवल्या आहेत. घट्ट झणझणीत पिठले आणि पोळी होती दुपारच्या जेवणाला.



उठल्यावर चहा, न्याहरी झाल्यावर परत थोडी अंताक्षरी खेळले. आज संध्याकाळी आदल्या दिवशी उरलेल्या साबुदाणा वड्यासाठी तयार करून ठेवलेल्या मिश्रणाचे थालिपीठ करून खाल्ले. दुपारी नेहमीच्या २ मराठी मालिका बघून थोडी गादीवर आडवी झाले. दुपारनंतर मात्र मला खूपच कंटाळा आला. केव्हा एकदा विनायक घरी येतो असे झाले होते.  विनायक घरी आल्यावर जसे ऑफीस मधून घरी आल्यावर रूटीन असते त्याप्रमाणे चहा, थोडे काहीतरी खायला केले. आणि नंतर जेवण करून झोप. हे दोन दिवस लक्षात राहावेत आणि नंतर कधी वाचताना मग छान वाटते म्ह्णून रोजनिशीत लिहिले इतकेच.

No comments: