Wednesday, March 04, 2020

आहार,व्यायाम, वजनातील घट आणि वाढ - स्वानुभव (2)

मी माझा फक्त अनुभव लिहीत आहे. वजन कमी करण्यासाठी मुद्दामहून मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. माझे वजन मुळातच जास्त नव्हते. ते व्यायामामुळे वाढले. अर्थात नंतर जे १५ किलोने वाढले ते जास्तच आहे उंचीला अनुसरून. आम्हाला दोघांना चालायला खूप आवडते. माझ्या वजनात वाढ कशी होत गेली आणि ते घटले कसे याचे निरिक्षण केले आणि तेच मी इथे शेअर करत आहे इतकेच. उपदेशाचे डोस अजिबातच नाहीत. मला इंगल्स मध्ये नोकरी लागली ती डेली सेक्शनला उत्पादन विभागात. ही नोकरी प्रचंड अंगमेहनतीची आहे. एक तर ८ तास उभे राहून ही नोकरी होती. उभे राहून ८ तासात मी माझ्या सहकारी मैत्रिणीबरोबर काही ना काही बनवत होते. हाताची प्रचंड प्रमाणात हालचाल होत होती. शिवाय जे काही बनवायचे असेल त्याचे जिन्नस आणण्याकरताही स्टोअर्स मध्ये फेऱ्या होत होत्या. खाली वाकणे, हात वर करणे, ढवळणे, कापणे, चिरणे अशा हाताच्या बऱ्याच हालचाली होत होत्या. जेवायच्या सुट्टीमध्ये अर्धा तास बसणे आणि नंतर १० मिनिटांच्या ब्रेक साठी बसणे इतकीच विश्रांती मिळत होती. ही नोकरी करून मी सव्वा मैल चालत घरी जात होते. घर पण दुसऱ्या मजल्यावर होते. या चालण्यामध्येही रस्ते उंचसखल होते. चालताना मध्ये वाटेत मी एका कट्यावर बसायचे. आणि घर आले की जेव्हा मी जिन्यात बसायचे तेव्हा मला इतका दम लागलेला असायचा की माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकायला यायचे. श्वासही खूप खोलवर मोकळा यायचा. मनात मी म्हणायचे पण की हा खरा व्यायाम.




अर्थात हे चालणे आठवड्यातून २ वेळा म्हणजे अडीच मैल होत होते. शनिवार रविवार मला विनायक कारने सोडायचा आणि आणायचा. या चालण्यामुळे मला पायांना खूप व्यायाम झाला. नोकरीत ८ तास उभे असल्याने पायांना तितका व्यायाम होत नव्हता. पण हाताना भरपूर व्यायाम. या नोकरीमुळे आणि चालण्यामुळे माझे पोट आत गेले आणि चपळता वाढली. उत्साह वाढला. अर्थात दमणूक प्रचंड होत होती. माझे २ वर्षात वजनही घटले. वजन घटले आणि ताकदही वाढली. नुसते वजन घटून उपयोगी नाही. ताकदही टिकली पाहिजे. वजन कमी आणि चेहरा ओढग्रस्त असेही उपयोगाचे नाही. माझे वजन हळूहळू करत ६० वरून ५५ वर आले. शिवाय खांद्यावरची आणि कमरेवची हाडेही दिसायला लागली.




नोकरीच्या या ४ वर्षात माझा व्यायाम बंद झाला. आठवड्यातून १ वेळा जेमतेम व्हायचा. तसा तर व्यायाम गेले काही वर्षे कमी कमी होत गेला. रोजच्या रोज न होता आठवड्यातून २ ते ३ वेळा होतो. आता तर आठवड्यातून १ वेळाच होतो. मला हल्ली व्यायामाचा खूप कंटाळा येतो. चालण्याचा कंटाळा मात्र येत नाही. पहिला जो व्यायाम करायचे तोही कमी होत गेला. म्हणजे १२ सूर्यनमस्कारा ऐवजी आता मी ८ सूर्यनमस्कार घालते तेही २ - २ करत घालते. चाराच्या ऐवजी २ जोर २ बैठका आणि आसने करत नाही. आसनांच्या ऐवजी मी पिटीचे प्रकार करते. हात वर हात खाली. सर्व अँगलने हात फिरवते. सर्व अँगलने मानही फिरवते. उभे राहून हात जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करते. मांडी घालून हाताची घडी मागे घालून डोके जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करते. १९८८ ते २०१२ पर्यंत रोजच्या रोज चालणे होत होते. तेही आता होत नाही. चालणे आठवड्यातून १ वेळाच होते.



निरिक्षणामध्ये असे लक्षात आले की व्यायामापेक्षा चालण्याने वजन कमी होते. चालणे म्हणजे आठवड्यातून १ मैल किमान २ वेळा. असेही लक्षात आले की चालण्याने सर्वांगाला व्यायाम होतो पण पायांना जास्त होतो म्हणून मग हाताचे व्यायाम करायचे. वजने उचलणे किंवा जोर मारणे. सूर्यनमस्कारानेही सर्वांगाला व्यायाम होतो. मुख्य म्हणजे चपळता वाढते. या नोकरीमुळे असे कळाले की शरीराची जास्तीत जास्त हालचाल व्हायला पाहिजे.आहाराबद्दल लिहीन पुढील लेखात.@Rohini Gore
क्रमश : ....

No comments: