Saturday, September 15, 2018

फ्लोरेन्स नावाचे वादळ

फ्लोरेन्स नावाचे प्रचंड मोठे वादळ आले त्यात विल्मिंग्टन या शहराची खूपच मोठी हानी झाली आहे. खूप वाईट वाटत आहे. या शहरात आम्ही २००५ ते २०१५ पर्यंत राहत होतो. जवळपास असणारे सर्व समुद्रकिनारे पाहिलेत. तिथले बरेच फोटोज घेतले आहेत. केप फिअर नदीवर तर दर शनिवार रविवार पैकी एक दिवस चालायला जायचो.नदीवर बरेच सूर्यास्त पाहिले. तिथे तर पाणीच पाणी झाले आहे. एका विडिओ मध्ये आणि न्यूज चॅनलवर सर्व प्रकारची झालेली हानी दाखवत आहेत. पेट्रोल पंप उध्वस्त झाले आहेत. कॅरोलायना बीचवर एकीकडे समुद्र आणि एकीकडे रस्त्यावर पाणी आहे. राईटसवील समुद्रकिनाऱ्याची तर खूपच वाट लागली आहे. मोठमोठाली झाडे मुळासकट खाली जमिनीवर पडली आहेत. सर्व रस्तेच नाही तर विल्मिंग्टनपासून सुरू होणारा महामार्ग ४० नेस्तनाबूत झाला आहे. रस्ता दिसतच नाहीये. तिथे फक्त पाणी चिखल आणि असंख्य पाने आणि झाडे पडली आहेत. घरांची छपरे उडाली आहेत. जवळजवळ ४० इंच पाऊस झाला आहे. न्युजमध्ये असे सांगत आहेत की तिथे महिनाभर इलेक्ट्रीसिटी नसणार आहे. न्यू बर्न जॅक्सनविल या छोट्या शहरांची पण खूप नासधूस झाली आहे. हे वादळ आले तेव्हा ते प्रचंड मोठे म्हणजे ५०० मैल व्यासाचे होते.




विल्मिंग्टन पासून ऍशविल पर्यंत आम्ही ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच रस्त्याने हे वादळ येत आहे. विल्मिंग्टन शहरातून बाहेर पडण्यासाठी आधी ७४/७६ रस्ता नंतर महामार्ग ९५ नंतर २० कोलंबिया - साऊथ कॅरोलायना, नंतर ते २६ स्पार्टनबर्ग महामार्गाने ऍशविलला म्हणजे उद्या येईल. पण हे वादळ इथे येईपर्यंत पार मरतुकडे होऊन गेलेले असेल. वादळ जरी साऊथ कॅरोलायना कडे सरकले असले तरीही अजून विल्मिंग्टन, रॅले मध्ये पाऊस पडत आहे.मनात विचार चालू आहेत की आपण आत्ता तिथे राहत असतो तर काय करावे लागले असते? पहिले म्हणजे शहर सोडायलाच लागले असते आणि ते सुद्धा वेळेवर. नंतर विचार करून जाऊ कि नको असे करत बसलो तर अजूनच बरेच अडथळे निर्माण झाले असते. घर सोडून जाताना एक आठवडा पुरेल असे सर्व काही घ्यायला लागले असते. कपडे, औषधे, थोडे अन्न आणि पाणी. शिवाय होॅटेल बुक करून जास्तीत जास्त उंचावर म्हणजे आम्ही आता जिथे राहत आहोत तिथे आलो असतो. डेबिट क्रेडीट कार्डे, फोन, लॅपटॉप, कॅश, असे सर्व काही बरोबर घेऊन जे जे काही सुचेल तेही बरोबर घेऊन जरी निघालो असतो तरी वाहतुक मुरंबा लागला असता.










आणि वादळ शमून गेल्यावरही परत आपल्या शहरात गेल्यावर म्हणजे तसे पटकन जाताही आले नसते. कारण रस्त्यावरून जाता आले नसते. शिवाय तिथे गेल्यावर घरातल्या वस्तुंची काय हानी झाली असेल? याचे विचार मंथन, शिवाय पॉवर नाही. त्यामुळे इंटरनेट नाही. फोन नाही. असे एकेक करून बरेच विचार मनात येत आहेत. विल्मिंग्टन शहरातले दिवस आठवत आहेत. या शहराची प्रलयासारखी झालेली अवस्था न्युज मध्ये पाहून खूप वाईट वाटत आहे. :( Rohini Gore

No comments: