Thursday, July 17, 2014

फोटोंच्या आठवणी ... (३)



या फोटोची खूप छान आठवण आहे. २ वर्षापूर्वी फेसबुकावर प्रोफाईल फोटो बदलावेत आणि ते सुद्धा ठरवून दिलेल्या रंगानुसार अशी एक मजा मी सुरू केली होती. नवरात्रीचे ते ९ रंग होते. रंग तानापिहीनिपाजा याप्रमाणे मी ठरवून दिले होते आणि त्यामध्ये माझ्या काही मैत्रिणींचा सहभाग होता. अंजली, अंजू, स्वाती, अवनी नं १ आणि अवनी नं २ क्रमाक्रमाने एकेकीचे रंग येत. आणि प्रत्येकजण दुसरीचा फोटो कोणता असेल या उत्सुकतेमध्ये असत. यामध्ये मी तानापिहिनिपाजा याप्रमाणे फुलांचे रंग द्यायचे असे ठरवले होते. माझ्याकडे सर्व रंग होते. त्यात पा नुसार पांढरा रंगही होता पण तो तितका प्रभावी नव्हता. आणि ठरवलेल्या दिवशी त्या रंगाचे फूल पोफाईल वर तर टाकायचे होते. मी एकूणच फेसबुकावर काय किंवा माझ्या स्मृती ब्लॉगवर काय,, मी स्वतः काढलेलेच फोटो टाकते. कधीही नेटवरचे फोटोज घेत नाही. आणि कधीच नेटवरचे फोटोज पाहिले पण नाहीत. तशी कधी वेळच आली नाही. अर्थात याचे कारण असे की मला फोटोग्राफीची आवड खूप उत्पन्न झालेली आहे.



  इथे अमेरिकेत आल्यापासून. २००१ मे ला आम्ही अमेरिकेत आलो आणि माझ्या फोटोग्राफीला सुरवात झाली.  आणि याच कारणामुळे मी नेटवरचे कुठलेच फोटो कधी शोधतही नाही आणि ते कुठे अपलोडही करत नाही. हा पांढऱ्या फुलांचा फोटो कधी आणि कुठे घ्यावा या विचारात आणि शोधात मी होते. मला अगदी पांढरा शुभ्र रंग हवा होता. आम्ही ग्रोसरीला गेलो होतो तर तिथे काही फुलांचे गुच्छ ठेवले होते. पांढऱ्या रंगाप्रमाणे माझे जांभळ्या रंगाचेही असेच झाले. माझ्याकडे जांभळ्या रंगाचे फूल होते पण खूप गडद जांभळा रंग नव्हता.  तर अशी ही दोन्ही फुले मी ग्रोसरी करताना घेतली. एक पांढऱ्या रंगाचे मी गुच्छातले असलेले घेतले, म्हणजेच त्याचा फोटो काढला आणि जांभळ्या रंगाचे मला त्या ग्रोसरी स्टोअरच्या बाहेर फुलांच्या कुंड्या आहेत तिथले घेतले. तर अशी आहे या दोन फुलांच्या फोटोची आठवण. बाकी मैत्रिणींनी पण खूप छान छान फोटो टाकले होते. ही एक आठवण कायमची होऊन गेली.




या फोटोची आठवण जर निराळीच आहे. हा जो छोटा गोड मुलगा दिसत आहे तो आहे एका मासिकातला. आम्ही क्लेम्सनला राहत होतो त्यावेळचा. आम्हाला तातपुरती ३ महिन्यांकरता एक जागा मिळाली होती. तिथे बरीच इंग्रजी मासिके होती व त्यात लहान मुलांची बरीच चित्रे होती.

 मासिके खूप जुनी होती  यामुळे त्यातली छोट्या मुलांची चित्रे मी कापून माझ्या अल्बममध्ये ठेवली. पूर्वी माझ्याकडे साधा कॅमेरा होता. त्यात रिळे भरली आणि ती संपली की फोटो प्रिंट करून आणायला लागायचे. त्यामुळे मी २-४ अल्बम केले होते. तर त्यामध्ये मी ही चित्रे ठेवली होती. त्यानंतर ३ ते ४ वर्षांनी आम्ही आत्ता जिथे राहतो त्या शहरात आलो आणि एके दिवशी अचानक मला कागदी फ्रेम बनवायचा मूड आला. ती कागदी फ्रेम बनवली. ती पण अशीच ठेवून दिली होती बरेच दिवस. नंतर एके दिवशी त्या फ्रेमवर मी नक्षीकाम केले आणि त्यात कोणता फोटो ठेवावा असा विचार करत होते. या छोट्या फ्रेममध्ये राहणारा फोटो पण छोटाच हवा होता त्यामुळे मी अल्बम चाळायला घेतला आणि एकदम सुचले की यातली चित्रे त्यात घालावी आणि या गोड मुलाचे कापलेले चित्र मी त्यामध्ये ठेवले व त्याचा एक फोटो काढला. ही एक आठवण अशीच कायम आहे.

2 comments:

Vijay Shendge said...

chan aahe photo

rohinivinayak said...

Thanks so much !