Sunday, July 20, 2014

२० जुलै २०१४


आजची रोजनिशी लिहायची म्हणजे एकत्रित वीकेंडची आहे. गेले २ दिवस हवेत प्रचंड आर्द्रता आहे. मुंबईसारखेच हवामान समुद्रकिनारी असल्यामुळे ! त्यातून प्रचंड डोकेदुखी आणि दमणूक झाली आहे. आत्तासुद्धा रोजनिशी लिहायचीच काही झाले तरी म्हणून लिहायला बसले कारण की ठरवले आहे ना काहीतरी वेगळे घडले की लिहायचे. तर याची सुरवात झाली शुक्रवारी संध्याकाळी. विनू ऑफीसमधून आला आणि मला त्याने सांगितले की आपल्या शहरात एक नवीन उपहारगृह सुरू झाले आहे. ही वार्ता त्याला ऑफीसमधल्या एकाकडून कळली. इथले अमेरिकन लोक चिकन करी खायला भारतीय उपहारगृहाना भेटी देत असतात. जे नवीन उपहारगृह झाले आहे त्याजागी एक जुने भारतीय उपहारगृहच होते. पण ते नीट चालत नव्हते म्हणून ते दुसऱ्या ठिकाणी हलले आणि हे नवीन सुरू झाले आहे. लगेचच गुगलींग केले तर वावावा ! पहिल्याप्रथमच इडली डोसे खायला मिळणार म्हणून आनंद झाला. आणि आमची शनिवारची पोटाची तरतूद इथेच करायची असे ठरवले. त्यानुसार मला शुक्रवारी मी मोठा मसला डोसा खात आहे असे स्वप्नही मी पाहिले ! शनिवारी बाकीची ग्रोसरी आणि क्लिनिंगची कामे रविवार वर ढकलली आणि हेअर कलर करण्याचा मुहूर्त आजच लावायचा म्हणून पटापटा आवरले. तिथे गेलो आणि काय घ्यायचे यावर आमची थोडी चर्चा झाली. जेवायची वेळ आहे तर पंजाबी नान आणि भाजी घेऊया पण डोसा उत्तप्पाचा मोह काही सोडवेना म्हणून तो घेतला. मोठाच्या मोठा मसाला डोसा आणि ताटभरून मोठा कांदा उत्तप्पा घेतला. खाताना छान वाटले. पोट अगदी टम्म फुगले होते इतके हे दोन पदार्थ वजनदार होते. घरी आल्यावर अर्थातच थोडे आडवे झालो. चक्क गाढ झोप लागली. झोपेतून उठलो मात्र जे काही डोके सणसणत होते , ते दुपारचा चहा घेतला तरी थांबले नाही. विनू म्हणाला चल बाहेर पडू, तरच बरे वाटेल. पण एकूणच कुठे जाऊन चालणे अशक्य होते इतकी प्रचंड आर्द्रता हवेत होती. आकाश पण ढगाळलेले होते.


आमच्या शहराच्या थोडा बाहेरून जाणारा एक रस्ता आहे तो आहे आय १४०. तो कुठून आणि कसा जातो हे विनुने नकाशात पाहिले आणि चल आपण या रस्त्यावर चक्कर मारून येऊ. तासभर लागेल. मला खरे तर बाहेर पडायची अजिबात इच्छा नव्हती इतके डोके दुखत होते. भूक तर दोघांनाही नव्हती. खरे तर झाले होते असे की जेवायच्या वेळेला या डिशा खाणे बरोबर नाही हे कळत असूनही वळत नव्हते आणि हेच खाल्ल्ले गेले होते म्हणूनच डोके दुखत होते. त्या रस्तावर जाऊन आलो तर या रस्त्याने तर जामच निराशा केली इतका बोअर रस्ता आहे. रस्त्यावर तुरळक वाहने होती आणि रस्ता भकास होता. आल्यावर मुगाच्या डाळीची खिचडी खाऊन झोपलो त्यामुळे डोके दुखणे बरेच कमी झाले. आज सकाळी उठलो आणि काही कामानिनित्ताने लवकरच बाहेर पडून , जेवून ४ ला घरी आलो. थोड्यावेळाने चालण्याकरता नदीवर निघालो. उत्साह तर अजिबातच नव्हता इतकी घाणेरडी आणि गचाळ हवा. त्यातून निघताना मी भाजी करून घेतली आणि कणीकही भिजवली म्हणजे आल्यावर पोळ्या केल्या की झाले. निघताना थोडी भूक लागली होती तर ठरवले की नदीवर पोहोचल्यावर लगेच आयस्क्रीम खाऊ म्हणजे मग चालायला उत्साह येईल आणि चालून झाल्यावर ग्रोसरी करून घरी येता येईल. आयस्क्रीम घेण्यासाठी ही प्रचंड गर्दी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे नदीवर नेहमीच गर्दी असते. ते खाऊन चाललो. आज मात्र सूर्यास्ताने मोठाच पोपट केला. सूर्यास्त होताना त्याच्या आड ढगांचा गठ्ठाच्या गठ्ठा आड होता. जरा सुद्धा हालला नाही. आजुबाजुला इतरत्र आकाशात काळेनिळे ढगच विखुरले होते. त्यामुळे रंगांची उधळण अजिबातच झाली नाही. घरी आलो आणि पोळी भाजी खाल्ली आणि झोपायच्या आत रोजनिशी लिहायचीच म्हणून लिहिली. एकूण हा विकेंड खूप कामांचा होता. बाहेरची काही कामे झाली. पण आनंद अजिबातच मिळाला नाही. यापेक्षा त्रासच झाला. अगदी नाही म्हणायला  एक फूल जर बरे मिळाले. आज चालणे पण खूपच झाले ! आणि हवा, अरे देवा ! असे म्हणण्या इतपत होती !

No comments: