Tuesday, July 08, 2014

ऑर्कुट



सोशल मिडिया ऑर्कुट ३० सप्टेंबर रोजी बंद होणार हे वाचले आणि तिथे लॉग इन झाले. मन भूतकाळात निघून गेले. मनोगती मैत्रिण गौरी हिने मला ऑर्कुटवर यायला सांगितले. मी तिला आधी नकार दिला तर म्हणाली की एकदा येऊन तर बघा, नाही आवडले तर सोडून द्या. ऑर्कुटवर गेले. प्रोफाईल बनवली. तिथे एक कुठला तरी वेगळाच फोटो अपलोड केला. कुठलातरी म्हणजे मीच काढलेला , पण तो फुलापानाचा नसून कोणता तरी वेगळाच होता. त्यावेळेला फोटोग्राफीला नुकतीच सुरवात झाली होती म्हणजे माझ्याकडे तेव्हा डिजिटल कॅमेरा नव्हता. लिखाणाची सुरवात मनोगतावर पाककृती आणि इतर लेखन म्हणजे आठवणी व अमेरिकेत आलेले अनुभव लिहिण्यापुरती झाली होती. साधारण २००६ चे वर्ष असेल ऑर्कुटवर जायला. प्रोफाईल बनवली. पण तिथे जाऊन काय करायचे असते ते माहीत नव्हते. जायचे यायचे असे ठरवले. पण एके दिवशी मला एका मैत्रिणीची मित्रविनंती आली. अदिती नावाची माझी मैत्रिणी आमच्याच राज्यातली होती. ही माझी पहिलीवहिली ऑर्कुटवरची मैत्रिण झाली. हळूहळू मित्रमंडळ वाढत गेले आणि ऑर्कुटवर असलेल्या काही समुदायांमध्ये भरती झाले.





एच ४ एम एम हा एक समुदाय होता. हा  समुदाय परदेशात  डिपेंडंट व्हीसावर राहणाऱ्या मराठी बायकांचा होता. हा मला वेळ घालवायला खूपच उपयुक्त ठरला. एच ४ या डिपेंडंट व्हीसावर नोकरी करता येत नाही. मग घरी बसून काय करायचे? किंवा कुणाला काही मदत लागली, काही विचारायचे असेल तर ते इथे विचा
रता येत होते.




इथे एका मैत्रिणीने रेसिपी स्पर्धा सुरू केली. आणि या स्पर्धेत मी भाग घ्यायचे ठरवले. मनोगतावर मराठीतून पाककृती मी लिहीत होते. काही कारणाने तिथले विदागर कोसळले आणि तिथल्या प्रशासकांनी आपापले लेखन कुठेतरी साठवून ठेवा असा सल्ला दिला. तेव्हा बऱ्याच मनोगतींनी आपापले ब्लॉग सुरू केले. मी पण माझ्या रेसिपींचा ब्लॉग सुरू करून त्यात सर्व पाककृती जतन करून ठेवल्या. रेसिपी स्पर्धेमुळे मला रेसिपी लिहिण्यासाठी विषय मिळत गेले आणि ब्लॉगलेखन वाढले.



रेसिपीच्या एका स्पर्धेत "इडली" विजेती ठरली. तिथे एकेक करून जी मते पडत होती तेव्हा तर मी एका निवडणूकीला उभे रहायला सारखेच
वाटत  होते.  उत्सुकता शिगेला पोहोचत होती. आणि इडली विजेती ठरल्यावर मला खूपच आनंद झाला होता. दुसऱ्या एका समुदायात भरली तोंडली उपविजेती ठरली. तो समुदाय होता एच ४ डिपेंंडट विसाचाच पण अमेरिकेतल्या अमराठी बायकांचा. तिथल्या काही अमराठी मुलींनी भरली तोंडली करून पाहिली आणि ती त्यांना आवडली.




याच समुदायात मी बरेच गाण्यांचे धागे सुरू केले. त्यामुळे गाणी आवडत असलेल्या मैत्रिणी वाढत गेल्या. या धाग्यांमध्ये एक धागा होता मुखडा अंतऱ्याचा. यामध्ये तर खूपच मजा येत होती. दिवसरात्र गाण्याचेच विचार करत होते. गाणी शोधण्यासाठी गुगलींग करत होते. एका मैत्रिणीने दर बुधवारी अंताक्षरी खेळण्याचे सुचवले. ऑर्कुटच्या जमान्यात याहू पण जोरात होते. याहू मेसेंजरवर १०० च्या वर मित्रमंडळ जमा झाले. याहू मेसेंजर वर अंताक्षरी होत होती. त्यामध्ये खूप धमाल यायची. एकेक करत सगळ्या जमायच्या. खेळामध्ये अधुनमधून गप्पाही चालायच्या. रश्मी , रोमा, उल्का, आरती, गौरी सर्वजणी यायच्या.  या समुदायामध्ये निबंध लेखन स्पर्धा पण व्हायच्या. त्यातही भाग घेतला.

 पहिल्या निबंध स्पर्थेत पहिला नंबर आला. ऑर्कुटवर पोल सिस्टीम छान होती. शिवाय रेसिपी धाग्यामध्ये अजून कोणाला रेसिपी हव्या असतील तर त्याची लिंकही देत होते.




सुचेता ही मनोगती मैत्रीण मला ऑर्कुटवर भेटली आणि तिथे मला तिच्या स्वयंपाकघर समुदायात सामील करून घेतले. याशिवाय अजून बरेच मित्रमंडळ जमा झाले. निवेदिता, अवनी, आणि अजूनही अश्याच काही मैत्रिणी मला मिळाल्या. त्यात उमा व संदीपही होते. इथे काही मैत्रिणींची नावे घेतली नाहीत तरीही त्यांनी राग मानू नये. ५-६ वर्षापुर्वीचे काही काही आठवते, तर काही आठवत नाही. आर्कुटचा वेगळेपणा म्हणजे तिथे रोजचे भविष्य होते. प्रोफाईल कोणी बघितली हे कळायचे. एकमेकांचे फॅन होता यायचे. टेस्टिमोनिअल्स असायच्या. उमाची टेस्टिमोनियल तर इतकी छान होती ती मी मेलवर जतन करून ठेवली आहे.





तर एकूण काय आर्कुटमुळे सतत ऑनलाईन राहण्याची सवय लागली. घरातले पसारे वाढतच जात होते. बाकीचे जग आहे की नाही याचे भानही नसायचे. सकाळपासून पीसी जो ऑन व्हायचा तो रात्रीच बंद व्हायचा. आर्कुटवरच्या मित्रमंडळीचा कब्जा हळूहळू फेसबुकाने घेतला. फेसबुकावरही काही नवीन मित्रमंडळ झाले.  फेसबुकालाही मी आधी नाके मुरडली. नको. तिथे गिचमिड आहे असे म्हणाले. पण तिथल्या वेगळेपणाने माझे मन ऑर्कुटपेक्षा जास्त रमायला लागले.  काही काळ असा होता की ऑर्कुट आणि फेसबुक दोन्ही वर लॉग इन व्हायचे. पण हळूहळू ऑर्कुट मागे पडत गेले आणि आता तर बंदच होईल.

आर्कुटबद्दल एक कायमची आठवण राहावी म्हणून थोडे लिहिले इतकेच. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतील.

प्रत्येक गोष्टीचा एक ठराविक काळ असतो. अवतार असतो. फेसबुकाचा अवतार संपत आलाय की संपलाय? तुम्हाला काय वाटते?
 ऑर्कुटवर वेळ घालवला पण प्रेमात मात्र मी फेसबुकाच्या आहे. :)

No comments: