Sunday, July 13, 2014

१३ जुलै २०१४

आजचा दिवस कुरडयांचा होता. आज करू उद्या करू, करता करता आज केल्या. तशा खास कुरडया करण्याचा बेत नव्हता. गव्हाचा चीक करून पहायचा होता. पहिल्यांदाच केला आणि तो छान झाला. त्याकरता लागणारे गहू केव्हाचेच आणले होते. आम्ही कुठेतरी फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे एक इंडियन स्टोअर होते तिथून आणले होते. ते बरेच दिवस काय बरेच महिने तसेच पडून होते. काल वाटले आणि आज चिक केला आणि ३ कुरडया घातल्या. आनंद झाला.
तसा तर आजचा दिवस काल रात्री पाहिलेल्या मुव्हीच्या मूड मध्ये होता. काल ऑनलाईन सागर पाहिला. मला ऋषिकपूर आणि डिंपलची जोडी खूप आवडते. हा सिनेमा मी पूर्वी कधी आणि केव्हा पाहिला, कुठे आणि कुणाबरोबर पाहिला ते काहीच आठवत नाहीये. खूपच आवडला हा सिनेमा मला. यामध्ये प्रेमाचा त्रिकोण छान दाखवला आहे. गाणी बरी आहेत. खूपच लांबलचक आहेत गाणी. अर्थात ती फास्टफार्वड करून पाहिली. सिनेमा रात्री साडेबाराला संपला आणि झोप उडाली. लगेच झोप लागली नाही. पण आज सबंध दिवस त्या सिनेमाच्या आठवणीतच आहे मी. चीकाची बरीच भांडी जमा झाली होती. काल गहू वाटले आणि पाणी बदलून पिळून वगैरे सोपस्कार करण्यात वेळ गेला. हे तसे खूपच किचकट काम आहे. आज बरेच दिवसांनी पिझा खायला गेलो.
संध्याकाळी नदीवर जायच्या ऐवजी समुद्रावर गेलो. तिथे खूपच वारा होता आज. वाऱ्याने लाटाही एकमेकींवर हेंदकाळत होत्या. वारे तर सुसाट वाहत होते. ते इतके सहन होत नव्हते. वादळवारे तर याहूनही अधिक जोरदार असते तेव्हा तर काय होत असेल? याची कल्पना आली. मला वादळे येतात तेव्हा वाटते की समुद्रावर जावे आणि तिथली प्रत्यक्षातली परिस्थीती अनुभवावी. तर आज असा वेगळाच दिवस गेला. आता ३ कुरडयांपैकी श्रावणातल्या शुक्रवारी पुरणपोळी केली तर तळायला होईल आणि गणपतीतही घरची कुरडई तळली जाईल याचा आनंद होत आहे. आता एकदा असेच पोह्याचे डांगर करून त्याचे थोडे तरी पापड लाटणार आणि डांगर खाणार. बघू कसा आणि कधी मुहूर्त लागतो ते ! तसेच तांदूळाचे खिच्चे पण करून बघणार आहे एकदा. हे पापड तसे सोपे असतात आणि तळल्यावर खूप फुलून येतात.

No comments: