Sunday, February 23, 2014

२३ फेब्रुवारी २०१४


आजचा दिवस कायम लक्षात राहील असा होता. थोडा गडबडीचा, तर थोडा दमणूकीचा तर आनंद देणारा अधिक असा होता. आज  पहिल्याप्रथमच समुद्रातून सूर्य वर येताना पाहिले. सूर्यदर्शन खूपच छान झाले. आज मुख्य म्हणजे हवा चांगली होती. ढग नव्हते, वारा नव्हता, पाऊसही नव्हता. आज काहीही झाले तरी जायचेच असे ठरवले होते.

आमच्या घरापासून समुद्रकिनारा १५ मिनिटांच्या कार ड्राईव्ह वर आहे त्यामुळेच हे जमले. खूप दिवसापासून इच्छा होती ती पूर्ण झाली आणि हा सूर्योदय बघण्याचा अनुभव तर खूपच छान होता. नेहमीप्रमाणेच फोटोसेशन झाले पण तरीही प्रत्यक्ष सूर्याला वर येताना बघण्याचा आनंद काही औरच होता. दुसऱ्यादिवशी लवकर उठून कुठे जायचे असेल तर मला अजिबात झोप येत नाही तरी थोडी लागली. ३ वाजता जाग आली. घड्याळात बघितले तर अजून ३ तासांचा अवधी होता. आजचा सूर्योदय अजिबात हुकवायचा नव्हता. त्यामुळे जागीच राहिले. नाहीतर काहीवेळा पहाटे पहाटेच डोळा लागतो आणि एकदम उन्हे वर येतात. निघालो तर उजाडायला सुरवात झाली होती. तिथे पोहोचलो तर समुद्राच्या आजुबाजुला वर आकाशात गुलाबी रंग विखुरलेला दिसत होता. लालबुंद सूर्य अगदी थोडा दिसत होता. आज काय झाले होते की लालबुंद सूर्याच्या अगदी बरोबर पुढे ढगांचा एक मोठा पट्टा आला होता. आणि त्यामुळे तो त्यातून वर येईपर्यंत पिवळा कम शेंदरी रंगाचा झाला होता. पहाटे पहाटे फटफटले असे जे म्हणतात ना ते मस्त दिसत होते. ढगाच्या वर सूर्य हळुहळू वर सरकत होता.
आज आकाश निरभ्र होते. आकाशात ढग असले आणि जर पाऊस पडला असेल तर आकाशात निरनिराळे रंग जमा होतात असा अनुभव आहे. आज तसे नव्हते पण तरीही हळूहळू सूर्य वर येतोय आणि ढगामागूनही तो जेव्हा वर आला तेव्हा अगदी खास आपण त्याच्या दर्शनासाठी आलोय आणि त्याने दर्शन दिले आहे असे वाटत होते. अगदी काही सेकंदाने सूर्य एकदम पांढरा शुभ्र आणि तेजस्वी दिसला. त्या आधी सूर्यप्रकाशाची पिवळी किरणे पूर्ण समुद्रावर पसरलेली होती. एकूणच सर्व काही छान दिसत होते. साधारण तासभर आम्ही दोघे समुद्रकिनारी होतो. थंडी होतीच. फोटो काढताना हात पार गारठून गेले होते. पटापट येऊन कारमध्ये बसलो आणि हीटर चालू केला तेव्हा बरे वाटले. आल्यावर परत एकदा चहा घेतला.
आल्यानंतर डोसे करायचे होते जेवणासाठी. ते ठरवले नव्हते पण झाले. काल दुपारी विनायक ऑफीसला गेला आणि त्याला यायला थोडा उशीर झाला असे वाटले म्हणून मी भाताचा कूकर लावणार होते. कणिक फ्रीजमधून बाहेर काढली आणि स्वयंपाकाला सुरवात करणार होते तितक्यातच वि आला आणि मग दर शनिवारी आम्ही बाहेर जेवायला जातो त्याप्रमाणे गेलो. कूकरमधले तांदूळ पाण्यात बराच वेळ राहिल्याने मग त्यातच थोडे तांदुळ घालून उडीद डाळही भिजवली आणि आज मसाला डोश्याचा बेत झाला. बासमती तांदुळाचा डोसाही छान लागतो ते कळाले. आजचा मसाला डोसाही चविला छान झाला होता. उकडून बटाट्याची भाजी, नारळाची चटणी, सांबार आणि मोठमोठाले डोसे खायला खूप मजा आली. कालच्या जागरणामुळे दुपारी थोडे झोपणे झाले. काल सर्व ग्रोसरी आणि साफसफाई झाल्याने आज आता संध्याकाळी कुठेही बाहेर पडलो नाही.
आज संपूर्ण दिवस डोळ्यासमोर सारखा आजचा सूर्योदय येत आहे. आता यापुढे हवामान चांगले असेल तर जास्तीत जास्त सूर्योदय बघणार आहोत. आज एक जाणवले की मी सूर्यास्ताचे बरेच फोटो घेतले आहेत आणि त्याचा आनंदही खूप मिळाला आहे. पण आज मात्र उलटे झाले आहे. फोटोपेक्षाही कितीतरी पटीने जास्त प्रत्यक्ष सूर्योदय बघण्याचा आनंद मिळाला. सूर्यास्त बरेच जमवलेत. आता सूर्योदय बरेच जमवायचे आहेत.


आज जर सूर्याच्या समोर जर ढगांचा पट्टा नसता तर लालबुंद सूर्य बघायला मिळाला असता. वर लालबुंद सूर्य आणि त्याच्या तळाशी निळेशार पाणी , किती छान ना !

No comments: