Friday, February 07, 2014

७ फेब्रुवारी २०१४

 प्रत्येक दिवस खरच खूप वेगळा असतो , नाही का? तुम्ही म्हणाल त्यात काय, नेहमीचेच रूटीन असते की, वेगळा कसा? तर तसे नाहीये. छोटी गोष्ट का असेना पण ती वेगळी घडते. काही वेळा छोटीशीच गोष्ट खूप तापदायक ठरते तर काही वेळा खूप उत्साह वाढवणारी असते. तसे तर गेले दोन दिवस असेच काही ना काही वेगळे घडतच आहे. रविवारी समुद्रकिनाऱ्यावर गेलो तोही दिवस असाच काहीतरी खास होता. म्हणजे ओहोटी अनुभवायला मिळाली आणि त्यातून नवीनच काहीतरी गवसले. त्याचा फोटो काढला.  हा फोटो माझ्या मनात घर करून राहिला आहे. तो फोटो मी वेदर चॅनलला पाठवला आणि तो त्यांनी दाखवला. शिवाय वेबसाईटवरच्या फोटो गॅलरीतही लावला आहे. तसाच आजचा दिवस वेगळा आहे.






फेसबुकावरच्या दोन म्युझिक ग्रुपात आम्ही दोघेही आहोत, तिथे रोज काही ना काही थीमा सुरू असतात. त्याप्रमाणे गाणी टाकायची असतात. म्हणजे युट्युब वरच्या गाण्याच्या लिंका द्यायच्या असतात. आज एका ग्रुपमध्ये एक थीम अशी होती की सिनेमाचे नाव गाण्याच्या मुखड्यात न येता ते अंतऱ्यात यायला हवे. थीम आली आणि माझ्या मनात एकच गाणे आले ते म्हणजे तेरे मेरे सपने मधले ए मैने कसम ली. या गाण्यात तिसऱ्या कडव्यात या सिनेमाचे नाव आले आहे. तो अंतरा म्हणजे एक तन है , एक मन है , एक प्राण अपने, एक रंग एक रूप तेरे मेरे सपने. लगच्या लगेच हे गाणे टाकले. त्यामुळे मी आज खूप उत्साहात आहे. मला अभिमान आणि तेरे मेरे सपने मधली गाणी खूपच आवडतात. प्रत्येक वेळी ऐकताना आनंद देतात. गाताही येतात.





गेले दोन दिवस माझ्या मनात आई पूर्वी करायची ती वड्या घोळत होत्या. आल्याच्या वड्या करायच्या म्हणून रिकोटा चीझ आणलेच होते म्हणून त्या वड्याही केल्या गेल्या. आल्याच्या वड्या झाल्या, नंतर तीळाच्या वड्या झाल्या आणि आज टोमॅटोच्या वड्या झाल्या. पहिल्यांदाच केल्या. आधी थोड्या बिघडल्या. मग दुरूस्तही केल्या. रंग सुंदर आला आहे. या वड्यामध्ये बटाटा आणि थोडा नारळाचा खवही घालतात. आज दोन बटाटे जास्त उकडले होते बटाट्याचे डांगर करायला. संध्याकाळी खायला म्हणून केले होते. तितकी मजा आली नाही. बटाट्याचे डांगर खाताना खास मूड यायला लागतो. म्हणजे असे की बटाट्याचे पापड लाटताना अधून मधून डांगर खायला जास्त मजा येते. आज वांगे कांदे आणि टोमॅटो याचा रस्सा बिघडला. गांग्याच्या रस्सा भाजीत तेल कमी पडले की भाजी पांचट होते. शेवटी रात्रीच्या जेवणामध्ये या भाजीला वरून थोडी फोडणी करून घातली आणि फोडणीमध्ये थोडे लाल तिखट घातले आणि मग भाजीला खूप छान चव आली. जेवणे झाली. भांडी घासली. आणि रोजनिशी लिहायला बसले. आता झोपते. पण आजचा दिवस ए मैने कसम ली या गाण्याने खूपच आनंदात गेला.

2 comments:

aativas said...

गाण्यावरून वड्यांवर एकदम उडी .. काय असेल त्यांना जोडणारा दुवा?

rohinivinayak said...

सविता, तुझा प्रतिसाद खूप आवडला. मला झालेला आनंद हाच दुवा आहे. खरे तर वड्या करू करू म्हणता होत नाहीत, रिकोटा चीझ होते आणि मग कधी कधी उशीर झाला की ते वाया जाते म्हणूनही वड्या केल्या. पण गाण्यामुळे मी खूप आनंदात होते. आणि आनंदात असले की माझ्या हातून खूप काही कामे होतात. आणि वड्या आधी केल्या आणि गाणे नंतर पोस्ट केले. पण एकदम सारे छान जुळून आले. या टोमॅटो वड्या पहिल्यांदाच केल्या आहेत.