Sunday, February 02, 2014

२ फेब्रुवारी २०१४आजचा दिवस चांगला, स्वच्छ हवेचा होता. सकाळी उठल्यावर चहापाणी झाले आणि गॅलरीत उभी राहिले तर आहाहा, खूप छान हवा होती. असे वाटत होते की विंटर जाऊन स्प्रिंग सुरू झाला की काय? आणि मनात एकच विचार आला की बीचला फिरायला जावे. थोड्यावेळाने आज स्वयंपाक काय करायचा, की करूच नये , बाहेरच जावे, असा विचार करता करता भेंडीची भाजी आणि पोळी केली. विनायकच्या मनातही आज बीचवर जावे असे होते. हवा चांगली आहे ना? मग बाहेर पडा आणि दिवस सत्कारणी लावा. उगाच संगणकाच्या समोर बसून टिचक्या मारत बसू नका. असे संभाषण आमच्या दोघांच्यात हवा चांगली असेल की होतेच होते.

जेवण करून लगेचच समुद्रकिनारी जायला निघालो. आमच्या शहरापासून फोर्ट फिशर बीच साधारण १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे̮. जेवण करून आडवे पडले की दिवस संपला. मग  कसला आलाय समुद्रकिनारा ! उन्हाळ्यात ठीक आहे. दिवस संपता संपत नाही इतका लांबलचक असतो. मग या दिवसात जेवण करून, नंतर थोडी डुलकी काढून दुपारचा चहा घेऊन निघाले तरी चालते. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा रणरणते उन नसेल तर आम्ही सर्व तयारीनिशी बाहेर जेवूनच थेट बीचवर जातो. सकाळी नित्यनियमाची घरेदारे आवरण्याची व साफसफाईची कामे करून बाहेर जेवायला पडायचे ते थेट संध्याकाळी घरी परतायचे.   अर्थात वीकेंडलाच. नाहीतर आठवड्याचे रूटीने हे ठरलेलेच असते की ! तर आम्ही निघालो आमच्या लाडक्या समुद्रकिनाऱ्यावर. याला मी खडकवासला बीच असे नाव दिले आहे. हा समुद्रकिनारा मला मनापासून आवडतो.

आजचा समुद्ररकिनारा काही वेगळाच होता ! आमची नेहमीची फेरी असते ती म्हणजे या किनारी आधी उजव्या बाजूला चालत जायचे. मग थोडे वाळून बसून उठायचे आणि समुद्रकिनाऱ्याच्या दुसऱ्या म्हणजे डाव्या टोकापर्यंत चालत जायचे. पण हे चालणे किनाऱ्यालगत होत नाही म्हणजे तसे चालताच येत नाही. समुद्राला लागून जे मोठमोठाले अवाढव्य खडक आहेत त्याच्या बाजूने एक रस्ता आहे तिथून चालत दुसऱ्या टोकाला यायचे  आणि मग परतायचे. या रस्त्यावरून चालताना एकीकडे समुद्र दिसत असतो आणि खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज येतो.  आज आम्ही काय केले तर आधी डाव्या बाजूच्या टोकाला गेलो आणि कधी नव्हे ते समुद्राचे पाणी आम्हाला नेहमीपेक्षा कमी वाटले. म्हणजे ओहोटी सुरू होती. ओहोटी आम्ही कधी पाहिलेली नव्हती. ओहोटीमुळे काय झाले होते की समुद्रकिनाऱ्याचा एक वेगळाच नजारा आज पहायला मिळाला. समुद्रातले काळे खडक आणि त्यावर साठलेले हिरवे शेवाळे असे वेगळेच काही दिसले. नेहमी समुद्राच्या लाटा खडकावर आदळत असतात आणि त्याचा आवाजची येत असतो. आज तसे नव्हते. विनायक म्हणाला आता आपण उजव्या नेहमीच्या टोकाला असेच चालत जाऊ. वरून रस्त्यावरून जायला नको. आणि चक्क आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरून उजव्या टोकाला चालत आलो. असे कधीच होत नाही. कारण की भरतीमुळे सदैव पाणी असते. समुद्रालगतच्या खडकामध्ये तर खूप छान छान मोठे शिंपले अडकले होते. मी हात घालून काढण्याचा प्रयत्न केला पण ते तिथून अजिबात हलत नव्हते इतके ते त्या खडकांमध्ये अडकले होते. सीगल्स तर नेहमी मजा मारत असतात समुद्रकिनारी !

आज हवा चांगली असली तरी किनाऱ्यावर बऱ्यापैकी गारठा आणि वारा होता. अर्थात तो सहन होत होता. काल केलेल्या आल्याच्या वड्या बरोबर नेल्या होत्या. त्या खाल्या आणि जरा बरे वाटले. घरी आलो आणि चहा प्यायला. अजून दोन कामे बाकी होती ती म्हणजे ग्रंथालयात पुस्तके परत करायची होती आणि केबल चॅनलवर काही चॅनल्स का दिसत नाहीत हे पण विचारायचे होते. १४ न्यूज वेदर चॅनलची तर आम्हाला खूपच सवय झाली आहे. ती दोन्ही कामे केली आणि विचार केला की ग्रंथालयात आलोच आहोत तर नदीवरचा सूर्यास्त पाहून जाऊ. सूर्यास्त चांगला होता पण तितका चांगला नाही. थोड्यावेळ बसलो आणि थंडी वाढायला लागली म्हणून लगेच घरी परतलो. आज जेवायला काय करावे? परत कंटाळाच आला होता. मग भाज्या घालून सांजा केला आणि भांडी घासून रोजनिशी लिहायला बसले आहे. आजचा दिवस समुद्रकिनाऱ्यावरच्या दिसलेल्या वेगळ्या नजाराने खूप वेगळा भासत आहे. अता चहा प्यायची तल्लफ आली आहे. तो पिऊन मग झोपणार.

4 comments:

Anonymous said...

photo khupach chaan aahe. Tumhi kadhala ka? Lucky aahat tumhi ki 1 tasachya distance var beach aahe. Enjoy!

rohinivinayak said...

Thanks Anonymous ! ho, photo mich kadhla aahe,, ya blog madhle sarv photos mich kadhle aahet,, mala photography khup aavadte ! ek beach tar aamchya gharapasun 15 min, car drive var aahe !

Aniket said...

khup mast photo aani writeup suddha

Aniket

rohinivinayak said...

Thanks so much Aniket !