Thursday, April 21, 2011

२१ एप्रिल २०११

आज ठरवले होते की घर आवरायचे. सकाळी नेहमीप्रमाणेच उठल्यावर फेसबुकवर चक्कर आणि एकीकडे चहा. आधी स्वयंपाक करून घेऊ मग आईला फोन व जेवल्यावर थोडी डुलकी काढून थोडे घर आवरू असे ठरवले होते पण झाले नाही. नंतर नंतर म्हणता गोष्टी होत नसतात.



दुपारच्या डुलकीनंतर चहा घेता घेता साम मराठीवर सुगरण या कार्यक्रमात एक रेसिपी पाहिली ती म्हणजे मेथीची खिचडी. एकदा करून पाहणार आहे. बघू कधी ते. संध्याकाळी पक्षांना व बदकांना ब्रेड घातला. सीगल पक्षी वर उडत असतानाच ब्रेडचा कॅच चोचीने झेलून ब्रेड खातात. सर्वच तसे नाही वागत काहीकाहीच. त्यांना तसे खाण्यातच मजा वाटते. असा एक फोटो मी पूर्वी घेतलेला आहे.



आमच्या घराच्या गॅलरीतून सूर्यास्ताचे फोटोज घेत असते. काही मनासारखे येतात तर काही नाही. आज आला मनासारखा. दिप्तीच्या ब्लॉगवरची एक पोस्ट वाचली धुके नावाची. ती वाचून खूप छान वाटले आणि ब्लॉगमध्ये काही बदल केले. वाचकांना ते लगेच ओळखू येतीलच. आज माझ्या हातून काहीही झाले नाही. डोक्यात मात्र बरेच काही घोळत राहिले.

No comments: