Thursday, April 19, 2007

एक सुखद आठवण




अमेरिकेत एका शहरातून दुसऱ्या शहरात गेल्यावर लगेचच सर्वांच्या ओळखी होतातच असे नाही, त्याला थोडा वेळ जायला लागतो. आम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात सुनिता, येमुल व त्यांचा मुलगा प्रथमेश यांच्याकडे आम्ही पहिले काही दिवस राहिलो होतो. नंतर जागा मिळाल्यावर स्वत:च्या जागेत रहायला गेलो. माझी व सुनिताची मैत्री लगेच झाली, कारण आम्ही दोघीही पुण्याच्याच. क्लेमसन हे शहर खूपच सुंदर आहे. उंच सखल भागात विभागले आहे. नंतर आमच्या दोघींचे घर एकमेकींपासून खूपच लांब. तिचे घर उंच डोंगरावर तर माझे घर दुसऱ्या एका भागात कमी उंचीच्या डोंगरावर. दोघींचे नवरे सकाळी कामाला गेले की एकदम संध्याकाळी उशीराने येत. ती तिच्या घरी एकटी व मी माझ्या घरी एकटी पूर्ण दिवस खूपच कंटाळून जायचो.

अमेरिकेत पटकन कोणी बोलायला माणसे मिळणे तसे थोडे कठीणच असते. आम्हाला तर पहिल्यांदाच मराठी कुटुंब भेटलेले त्यामुळे जास्त आपुलकी. आमच्या आधी काही दिवस ते त्या शहरात थोडे स्थिरस्थावर झाले होते. इतर ओळखी व त्या शहराची माहिती होईपर्यंत आम्हीच एकमेकांना आधार. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस का होईना मला तिच्या घरी जाता यायचे. त्यामुळे आमच्या दोघींचा तो एक दिवस खूपच मस्त जायचा. बाकीचे दिवस आम्ही दिवसातून दोनदा फोनवरून एकेक तास बोलायचो. जीवनात काही वेळा काही काही गोष्टी कायमच्या आठवणीत रहातात त्यापैकी एक आठवण.


रस्ता ओलांडून गेल्यावर काकू समोरच्या डोंगरावर एक नजर टाकते आणि चालायला सुरवात करते. डोक्यावरचे ऊन खूपच रणरणते.

"चला पहिला चढ गेला!! आता दुसरा"

"आई गं! हा दुसरा चढ तर किती अवघड आहे! पण हा चढून गेला की निम्याच्यावर अंतर आपण पार पाडू आणि मग शेवटचा चढ गेला की सुनिताचे घर दिसेलच. रस्त्यावर शुकशुकाट. मध्येच एखादे वाहन, किंवा असेच कोणीतरी चालत असलेले. निरनिराळे रंगीबेरंगी पक्षी तोंडाने "चुक चुक" आवाज करत फांदिवर झोका घेत बसलेले.

टोपी घातलेली काकू मधुनच वर दिसणाऱ्या तळपत्या उन्हाकडे पहात, घाम पूसत, धापा टाकत टाकत चढ चढत असते. "हे हे! दिसले बाई एकदा सुनिताचे घर! अरेच्या पण आज खिडकीत कोणीच कसे काय दिसत नाही?" असे म्हणत परत खाली मान घालून हळू हळू चालते आणि थोड्यावेळाने मान वर करून पहाताच तिला सुनिता व प्रथमेश खिडकीत दिसतात.

हसतमुखाने सुनिता व प्रथमेश तिचे स्वागत करतात.

"कोण आले रे प्रथमेश? तुझी काकू आली कारे? अग काकू तू किती लालबुंद झाली आहेस? बस बस. पाणी पाहिजे का तुला? " सुनीता म्हणते.

" हो हो. चांगले ७-८ ग्लास भरून थंडगार पाणी दे, आणि टेबलपंख्याची मानही जरा माझ्याकडे वळव" काकू.

सुनिताच्या घरामध्ये गणपतीसमोर उदबत्ती लावलेली असते तिचा सुगंध खोलीभर दरवळत असतो आणि "सुखकर्ता दुखहर्ता वार्ताविघ्नाची" ही लता मंगेशकरची आरती सुरू असते.

"सुनिता मला तुझ्या घरी आले ना की अगदी पुण्यात आल्यासारखे वाटते बघ" काकू.

"अगं मग ये ना तू रोजच. मी व प्रथमेश पण खूप कंटाळून जातो" सुनिता.

"आले असते गं अगदी रोजच्यारोज! पण येताना हा मोठा सिंहगड आहे ना!! त्याचे काय?" "आज कोणता भात केला आहेस गं खूप मस्त वास येतोय." काकू.

"आज ना मी आमचा तेलगू स्पेशल वांगेभात केलाय" सुनिता.

मग सुनिता व काकूच्या गप्पा सुरु होतात आणि अधुन मधुन प्रथमेशशी खेळणे. प्रथमेश हा सुनिताचा दीड वर्षाचा मुलगा. खूप गोड व खेळकर. काकूवर त्याचे विशेष प्रेम. अता काकू सुनिता व प्रथमेश यांची अंगतपंगत सुरू होते. गप्पा मारत मारत तिखट भात, तिखट भाजी व नंतर मनपसंद आयस्क्रीम!

जेवणानंतर प्रथमेशची दुपारच्या झोपण्याची तयारी. " चला आता झोपायचे ना काकू तुला? तुला जायचे आहे ना परत! तू नाही झोपलीस तर काकांना नाव सांगीन हं तुझे. चल प्रथमेश तू झोपणार का काकू व आईच्या मध्ये? " सुनिता

प्रथमेश कुठचा झोपायला!! मग सुनिता खोलीत पडदे लावून अंधार करते. मग दोघीजणी दामटून दामटून झोपवतात प्रथमेशला. ती झोप म्हणजे काय छोटीशी डुलकीच. त्या १० मिनिटांच्या डुलकीमध्ये असे वाटायचे की असेच झोपून रहावे.

आता काकूची निघण्याची वेळ. तोंडावर गार पाण्याचा हबका मारून सुनिताने केलेला चहा पीत व एकीकडे घड्याळाकडे नजर टाकत काकू निघण्याच्या तयारीला लागते. जेवढे येताना रणरणते ऊन तेव्हढेच आता खुप अंधारून आलेले असते आणि मुसळधार पाऊस सुरू झालेला असतो. हा पाऊस पण अगदी पुण्यासारखाच आला काय न गेला काय! लगेच इकडे प्रथमेशचे रडणे सूरू. कारण त्याला काकूबरोबर बाहेर जायचे असते. रडून रडून गोंधळ नुसता!!

"अरे प्रथमेश मी येणार आहे उद्या परत. रडू नकोस." काकू.

"अरे प्रथमेश उद्या येणार आहे काकू परत. ती घरी नाही गेली तर काकांना जेवायला कोण देईल बरे?"

चल. रडू नकोस. काकूची बस जाईल बर का निघून. तिला टाटा कर बरं. टाटा काकू. टाटा. " सुनिता.

त्या दोघांचा निरोप घेऊन, प्रथमेशचे अनेक पापे व गालगुच्चे घेऊन सतराशे साठ वेळा मागे वळून काकू त्या दोघांना टाटा करते ते दिसेनासे होईपर्यंत. आणि मग मात्र काकूला झपाझप पाउले उचलायला लागतात; बससाठी!!

कधी कधी रिमझिम पाऊस सुरू असेल तर मात्र पाऊसात भिजत, रमतगमत, हिरव्यागार निसर्गाचा आनंद लूटत व गुणगुणत "सुहाना सफर और ये मौसम हँसी"


रोहिणी

No comments: