Friday, April 27, 2007

कॅट बस
आम्ही जेव्हा क्लेम्सन शहरात आलो तेव्हा तिथे आम्हाला भेटली एक बस, ती म्हणजे कॅट बस. कॅट म्हणजे clemson area transit. शेंदरी व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेल्या कॅट बसवर मात्र वाघाचे पंजे उमटवलेले होते. दर पंधरा मिनिटांनी ही कॅट धावत असे आणि महत्त्वाचे म्हणजे चकटफू!!

विद्यापीठ, घरांची प्रत्येक कॉलनी व दोन तीन किराणामालाची दुकाने येथे प्रत्येक ठिकाणी ही बस जात असे. क्लेम्सन हे डोंगराळ अशा उंच सखल भागात वसलेले छोटे शहर. सगळीकडे हिरवीगार घनदाट झाडी. अशा हिरव्यागार पार्श्वभूमीवर ही शेंदरी व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेली कॅट खूपच उठून दिसे. काही चिनी व अमेरिकन विद्यार्थी सोडल्यास ही बस भारतीय विद्यार्थ्यांनी सतत भरलेली असे. बसमध्ये प्रवास करताना असे वाटे की आपण मुंबईमधल्या बेस्टमधून तर प्रवास करत नाही ना!!

प्रत्येक कॉलनी, विद्यापीठ, किराणामालाची दुकाने याशिवाय पोस्ट ऑफिस, बँक, लॉन्ड्री येथेही एकेक थांबा होता. कॅट बसचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बसथांब्याव्यतिरिक्त एक विनंती थांबाही असे. क्लेम्सन शहरात लेमान्स कॉलनी खूपच मोठी होती आणि या लेमान्समध्ये सर्व भारतीय विद्यार्थी रहात होते, म्हणून या विभागाला mumbai area म्हणत असत. कॅटच्या सर्व अमेरिकन वाहनचालकांना पण mumbai area म्हणून माहित होता.


घराच्या खिडकीतून जात येता डोकावले की कॅट अगदी सहज दिसत असे. अगदी जरी दिसली नाही तरी तिच्या आवाजावरून कळत असे. बसथांब्यावर बस आली की पटापट उड्या मारत सर्व भारतीय विद्यार्थी येत तोपर्यंत थांब्यावर अगदी शुकशुकाट असे. काही वेळेला तर हे भारतीय विद्यार्थी त्या अमेरिकन वाहनचालकाला भजी पकोडे खिलवत असत.


शुक्रवार व शनिवार रात्री ८ ते ११ ही बससेवा खास आठवड्याचे किराणामाल, दूध, भाजी आणण्याकरता होती, तेव्हा खूप मजा येत असे. काही ठराविक विद्यार्थी, विद्यार्थ्यांमधे लग्न झालेली जोडपी, आमच्या सारखी post doc करणारी जोडपी असत. मग अगदी सकाळपासून काय काय आणायचे याची एक यादी बनवून ठेवायचो आम्ही सर्व बायका. त्यादिवशी आम्ही बायका भारतीय पेहराव करायचो. ती जणू काही आमची छोटी पिकनिकच असे. रात्रीची बस म्हणून बसमध्ये मंद प्रकाश व बारीक आवाजात इंग्लिश ट्यून. एकीकडे आमच्या गप्पा.


सगळ्या कॉलनीतून प्रत्येकाला घेत घेत ती बस विद्यापीठात जाऊन नंतर ती दुकानात जायची, कारण विद्यापीठात कोणाचे संध्याकाळ व रात्रीचे वर्ग असतील तर त्यांनाही तेथुनच ग्रोसरी आणायला सोयीचे पडे. बायलो मध्ये ती बस आम्हाला सोडायची व परत न्यायला यायची अर्ध्या तासाने. त्या अर्ध्या तासात पटापट सर्व खरेदी करायची, म्हणजे आमच्या सर्वांची अगदी धावपळतच खरेदी व्हायची. ग्रोसरीचे सर्व सामान उतरवून कार्ट जागेवर लावेपर्यंत ती बस यायची सुद्धा. प्रत्येकाकडे भरपूर सामान. दूध व ज्युसचे कॅन, तांदुळाची पोती, तेलाचे कॅन, भाज्या, आयस्क्रीमच्या बादल्या, पेप्सी, इ.इ. त्या संपूर्ण बसमध्ये आम्ही जेमतेम बारा पंधरा जण, पण संपूर्ण बस आमच्या कॅरी बॅग्जने भरून जायची. अशा रितीने कॅट बसच्या मदतीने आमचा ग्रोसरी डे पार पडायचा!!


कॅटबसचे वाहनचालक इतके काही ओळखीचे झाले होते की रस्त्यावरून फिरायला म्हणून बाहेर पडलो आणि बस जात असेल तर बसमधून आम्हांला हात दाखवून हाय!! करायचे. आणि हो विसरलेच की! या बसमधून विद्यार्थी आठवड्याची लॉन्ड्री करण्याकरता कपड्यांनी भरलेल्या लॉन्ड्री बास्केट पण घेऊन यायचे.


मी कॅटला खूपच मिस करत आहे, कारण मला स्वतःला कार प्रवासापेक्षा बसमधून किंवा ट्रेनमधून प्रवास करायला खूपच आवडते!!


रोहिणी

No comments: