Monday, August 31, 2020

स्वर्गात विचारसभेचे अधिवेशन

 मनोगत या मराठी संकेतस्थळावर विनायक गोरे यांचे प्रकाशित झालेले लेखन मी माझ्या ब्लॉगवर सेव्ह करत आहे.

मूळ हिंदी लेख - स्वर्ग में विचारसभा का अधिवेशन

लेखक - भारतेंदु हरिश्चन्द्र

१. स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यू १८८३ च्या ऑक्टोबरात झाला, तर केशवचंद्र सेनांचा १८८४ च्या जानेवारीत. प्रस्तुत लेख भारतेंदू यांनी या दोन घटनांनंतर काही महिन्यातच लिहिला असावा. कारण भारतेंदूंचा मृत्यूही १८८५ च्या जानेवारीत झाला. या लेखामध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एका समकालीन व्यक्तीच्या दृष्टीकोनातून दोघांच्या कार्याचे मूल्यमापन मांडले आहे. लेखामधील उपरोध आणि नर्मविनोद लक्षणीय आहे.

२. मूळ लेखातले कंझर्वेटिव, लिबरल, असे अनेक इंग्रजी शब्द अनुवाद न करता तसेच वापरले आहेत.

स्वामी दयानंद सरस्वती आणि बाबू केशवचंद्र सेन 

मृत्यूनंतर स्वर्गात आल्याने तिथे मोठीच खळबळ उडाली. स्वर्गवासी लोकांपैकी अनेक त्यांचा तिरस्काराने  धिक्कार करू लागले तर इतर अनेक त्यांची स्तुती करू लागले. स्वर्गातही कंझरवेटिव आणि लिबरल असे दोन पक्ष आहेत. जुन्या काळचे जे ऋषीमुनी यज्ञ किंवा कठोर तप करून, उपास-तापास करून, शरीर कृश करून मृत्यू पावल्यावर स्वर्गात गेले त्यांच्या आत्म्यांचा कंझर्वेटिव पक्ष, तर जे केवळ आत्म्याची उन्नती करून, चांगले सामाजिक कार्य करून किंवा परमेश्वराची भक्ती करून स्वर्गात गेले त्यांच्या आत्म्यांचा लिबरल पक्ष. वैष्णवांना दोन्ही पक्षांनी बहिष्कृत केले होते, कारण त्यांचे संस्थापक लिबरल पक्षाचे असले तरी नंतर हे लोक "रॅडिकल्स" काय "महा- रॅडिकल्स" झाले. बिचाऱ्या वयोवृद्ध व्यासांना दोन्ही पक्षांचे लोक पकडून नेत आणि जबरदस्तीने आपापल्या सभांचे "चेअरमन" बनवत. आपला प्राचीन अव्यवस्थित स्वभाव आणि सत्शीलपणा या गुणांमुळे व्यासही ज्या सभेत जात तिथे त्या पक्षाला अनुकूल भाषण करीत. कंझरवेटिव पक्ष प्रबळ होता, त्याचे मुख्य कारण असे की स्वर्गातले इंद्र, गणेश असे जमीनदार लोक या पक्षाबरोबर होते. कारण स्वर्गात उदारमतवादी लोकांचे बहुमत झाले तर बंगालच्या जमीनदारांप्रमाणेच त्यांनाही अग्रपूजेचा मान आणि हविर्भागातील प्राधान्य न मिळण्याचा धोका होता.

अनेक ठिकाणी प्रकाशसभा झाल्या. दोन्ही पक्षाच्या लोकांनी अभिनिवेशाने आपापली मते मांडली. कंझर्वेटिव पक्षाच्या समर्थनासाठी देवताही आल्या आणि आपापल्या लोकांमध्ये त्या पक्षाची स्थापना केली. इकडे लिबरल लोकांची सूचना प्रसृत झाल्यावर मुसलमानी स्वर्ग, जैन स्वर्ग, ख्रिश्चन स्वर्ग या लोकांमधून पैगंबर, सिद्ध, येशू वगैरे लोक हिंदू स्वर्गात आले आणि लिबरल लोकांच्या सभेत भाषणे करू लागले. कंझर्वेटिव लोकांचे म्हणणे होते "छे! दयानंद स्वर्गात येण्याच्या योग्यतेचे अजिबात नाहीत. त्यांनी  १. पुराणांचे खंडन केले , २. मूर्तिपूजेची निंदा केली, ३. वेदांचा उलट-सुलट अर्थ लावला, ४. दक्ष नियोग करण्याचा विधी सुरू केला, ५. देवतांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आणि ६. शेवटी संन्यासी होऊन स्वतःस जाळून घेतले.  नारायण! नारायण!  ज्याने (वैदिक) धर्म विकृत केला आणि आर्यावर्ताला धर्म-पराङमुख केले, अशा मनुष्याच्या आत्म्याला कधीही स्वर्गात प्रवेश मिळता कामा नये.
 
एका सभेत काशीच्या विश्वनाथाने उदयपूरच्या एकलिंगजींना विचारले" अरे बाबा, अशा पतित माणसाला आपले म्हणायला तुझे डोके फिरते होते का? आणि आता त्याच्या पक्षाचा सभापती झाला आहेस. असेच करायचे होते तर तिकडे लिबरल लोकांच्या सभेत जाऊन बसायचे होतेस. " त्यावर एकलिंगजी उत्तरले "तुम्हा लोकांना माझा खरा उद्देश समजलाच नाही. त्याने सांगितलेल्या चुकीच्या गोष्टी मी मानत नाही किंवा त्यांचा प्रचारही करत नाही. फक्त काही दिवस आमच्या जंगल सफाईचा ठेका त्याला दिला होता, दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता त्याला योग्य ठिकाणी आणले तर त्यात काय वाईट केले? "

कोणी म्हणत "केशवचंद्र सेन! छे! छे! ह्याने साऱ्या भारतवर्षाचा सत्यानाश केला. १. वेद - पुराणांचे अस्तित्व संपवले, २. ख्रिश्चन, मुसलमान सर्वांना हिंदू बनवले, ३. खाण्या-पिण्यावरचे धार्मिक निर्बंध उठवले, ४. मद्याच्या तर नद्या वाहवल्या, हाय! हाय!, असा (पापी) आत्मा स्वर्गात कसा काय येऊ शकतो?

अश्या रीतीने दोघांच्या चारित्र्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली.

इकडे लिबरल लोकांचा पक्षही जोरात होता. या पक्षात दोन गट होते. एक केशवचंद्र सेनांची स्तुती करणारा तर दुसरा दयानंदांबद्दल आदर बाळगणारा. कोणी म्हणत "अहा! धन्य ते दयानंद, ज्यांनी आर्यावर्तातल्या मूर्ख, आळशी आणि निंदेचे धनी झालेल्या लोकांची मोहनिद्रा भंग केली. हजारो मूर्ख लोकांना ब्राह्मणांच्या (जे कंझर्वेटिवांचे पाद्री आणि प्रजेचे द्रव्य हरण करणारे होते) कचाट्यातून सोडवले. बऱ्याच लोकांना उद्योगी आणि उत्साही केले. वेदांमध्ये रेल्वे, तार, कमिटी, कचेरी वगैरेंचे उल्लेख दाखवून वैदिकांचे नाक कापले जाण्यापासून वाचवले." तर कोणी म्हणत "धन्य ते केशव(चंद्र सेन)! तुम्ही साक्षात् केशव आहात. तुम्ही ख्रिश्चन समुद्राला मिळू पाहणाऱ्या बंगाली जनांच्या वेगवान प्रवाहाला रोखलेत. ज्ञान आणि कर्म मार्गांचे अवडंबर कमी करून परमेश्वराची निर्मळ भक्ती करण्याचा मार्ग तुम्ही प्रचलित केलात. "

कंझर्वेटिव पक्षात देवतांव्यतिरिक्त अनेक लोक होते ज्यात याज्ञवल्क्यासारखे जुने ऋषीमुनी होते तर काही नारायणभट्ट, रघुनंदन भट्ट, मंडनमिश्र यांच्यासारखे स्मृती-ग्रंथकार होते. लिबरल पक्षात चैतन्य प्रभृती आचार्य, दादू, नानक, कबीर प्रभृती, भक्त आणि ज्ञानी लोक होते. अद्वैतवादी भाष्यकार, आचार्य (आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य), पंचदशीकार ( विद्यारण्यस्वामी)  प्रथम दलमुक्त राहू शकले नाहीत. मिस्टर ब्रॅडलाँप्रमाणेच या लोकांच्या समावेशाबद्दल कंझर्वेटिव लोकांनी तीव्र आक्षेप घेतला, पण शेवटी लिबरल लोकांच्या उदारपणाने त्या पक्षात ह्या लोकांना स्थान मिळाले.

दोन्ही पक्षांनी  "मेमोरॅन्डम" तयार करून, त्यावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन,  ते परमेश्वराकडे पाठवले. एकात दयानंद आणि केशवचंद्र या दोघांनाही स्वर्गात कधीही स्थान मिळू नये असा युक्तिवाद आणि आग्रह होता तर दुसऱ्यात असे म्हटले होते की दोघांनाही स्वर्गात सर्वोत्तम स्थान मिळावे.   ईश्वराने दोन्ही पक्षांच्या "डेप्युटेशन" ला बोलावून म्हटले "बाबा, आता तुमच्या लोकांची सेल्फ-गवर्नमेंट आहे. आता आम्हाला कोण विचारतो? ज्याच्या मनाला जे येईल तो ते करतो.ज्याला संस्कृतचा गंधही नाही तो धर्मविषयावर वाद करायला लागतो. आता आमचा उपयोग फक्त न्यायालय, व्यवहार किंवा स्त्रियांनी शपथ घेण्याच्या कामापुरता उरला आहे. कोणाला धाक आहे आमचा?  कोण आमचा सच्चा भक्त आहे? भूत-प्रेत, ताजिये यांच्याइतकेही आमचे महत्त्व राहिले नाही. आता वैकुंठात कोणी यावे याच्याशी आम्हाला काय देणेघेणे आहे? आम्ही जाणतो की (सनकादिक) चार मुलांनी आधीच रीत बिघडवून ठेवली आहे. आता कोणाला अडवण्यासाठी जय-विजयांना आम्ही पुन्हा राक्षस बनवावे? हवे तर सगुण माना, हवे तर निर्गुण, हवे तर द्वैत माना, हवे तर अद्वैत, आता आम्ही काही बोलणार नाही. तुम्ही आणि तुमचा स्वर्ग. काय ते बघून घ्या."

परमेश्वराच्या अशा खजील करणाऱ्या बोलण्याने डेप्युटेशनवाले वरमले. त्यांनी परमेश्वराला मोठे निवेदन वगैरे केले. त्याचा राग कसातरी शांत केला. शेवटी परमेश्वराने या विषयाचा निर्णय करण्यासाठी एक "सिलेक्ट कमिटी" स्थापन केली. त्यात राजा राममोहन रॉय, व्यास, तोडरमल, कबीर, अश्या भिन्न भिन्न मतांचे लोक निवडले. मुसलमानी स्वर्गातून एक इमाम, ख्रिश्चन स्वर्गातून मार्टीन ल्यूथर, जैनांमधून पारसनाथ, बौद्धांमधून नागार्जुन आणि आफ्रिकेतून सिटोवायोंचे बाप यांना कमिटीचे "एक्स ऑफिशिओ" सदस्य नेमले. रोमच्या जुन्या हर्क्युलिस प्रभृती देवता, ज्या आता गृहसंन्यास घेऊन स्वर्गातच रहायला आल्या होत्या आणि पृथ्वीशी संबंध तोडून बसल्या होत्या, त्यांना आणि पारश्यांच्या झरतृष्टांना "कॉरस्पाँडिंग मेंबर" म्हणून नियुक्त केले आणि आज्ञा केली की सर्व कागदपत्रे तपासून मला अहवाल द्या. आणखी एक गुप्त आज्ञा अशीही केली की (परमेश्वराने) अहवाल वाचण्याआधी त्याची कुणकुण संपादकांच्या आत्म्यांना अजिबात लागू देऊ नका. नाहीतर कोणी त्यांचे ऐको न ऐको, ते लोक उगीचच गोंधळ माजवतील.

सिलेक्ट कमिटीचे अधिवेशन झाले. सर्व कागदपत्रे नजरेखालून घालण्यात आली. दयानंदी आणि केशवी ग्रंथ, त्यांच्यावरचे आक्षेप, त्यांची खंडने आणि वर्तमानपत्रांमधून झडलेल्या चर्चा तपासल्या गेल्या. बाळाशास्त्रींसारख्या कंझर्वेटिव आणि द्वारकानाथांसारख्या लिबरल आत्म्यांच्या साक्षी नोंदवल्या गेल्या. शेवटी कमिटीने जो अहवाल दिला त्यातला महत्त्वाचा भाग असा होता.

आमची इच्छा नसतानाही परमेश्वराच्या आज्ञेवरून आम्ही खटल्याची सर्व कागदपत्रे तपासली. त्यावरून या दोन मनुष्यांबद्दल जे आम्हाला समजले ते इथे सांगतो. आमच्या मते ह्या दोन पुरुषांनी परमेश्वराने निर्माण केलेल्या मंगलमय सृष्टीमध्ये कुठलेही विघ्न आणले नाही उलट त्यात सुख आणि संतती कशी वाढेल ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.  दुराग्रह आणि वाईट चालीरीतींमुळे मनासारखा वर धर्मानुसार न मिळाल्याने लाखो स्त्रिया वाईट मार्गाला लागतात, लाखो स्त्रिया विवाह होऊनही जन्मभर सुखापासून वंचित राहतात, लाखो गर्भ नाश पावतात, लाखो बालहत्या होतात त्या पापमयी, नृशंस रीती नष्ट करण्यासाठी या दोघांनी शक्य तितके प्रयत्न केले.

जन्मपत्रिकेतील ग्रहांमुळे (वधूवरांच्या आवडीनिवडी, गुणावगुणांचा विचार न करता केवळ पत्रिका जमवून लग्न ठरवण्याच्या प्रथेमुळे) नवरा - बायकोमध्ये विसंवाद राहतो. असंतोष आणि वैमनस्यामुळे स्त्रिया व्यभिचारी तर पुरूष कामांध होतात, एकमेकांत सतत भांडणे होतात, शांती स्वप्नातही मिळत नाही, वंश चालत नाही, हे प्रकार या दोघांना सहन झाले नाहीत. विधवा गर्भपात करून घेत आहेत, धर्मगुरू हे सर्व सहन करत आहेत इतकेच नव्हे तर गुपचुप उपायही करत आहेत, पाप सतत लपवत आहेत, शेवटी (विधवेचा) त्यात मृत्यू झाला तर त्यात आनंद मानत आहेत, हा प्रकार बंद करण्याचा दोघांनी नि:संशय प्रयत्न केला. जातीत योग्य नवरा न मिळाल्याने मुली मूर्ख, आंधळे किंवा नपुंसक नवरे करत आहेत.  मुले काळ्या, कर्कशा मुलीशी विवाह करत आहेत.  या गोष्टींचे दूरगामी दुष्परिणाम होत आहेत. असा हा दुराग्रह या लोकांनी दूर केला. ब्राह्मण लोक, शिकलेले असोत की मूर्ख, सुपात्र असोत की कुपात्र, व्यभिचार करोत किंवा दुसरे काही पाप करोत, पण गुरू आहेत, पंडित आहेत म्हणून त्यांना दोष देऊ नका, दोष द्याल तर पतित व्हाल, अश्या समाजाचा सत्यानाश करणाऱ्या संस्कारांना त्यांनी दूर केले. आर्य लोकांचा दिवसेंदिवस ऱ्हास होत चालला आहे, लोक कधी स्त्रीच्या मोहाने तर कधी धन, नोकरी, व्यापार यांच्या लोभाने तर कधी मद्याच्या व्यसनाने, पराभूत मनस्थितीत मुसलमान किंवा ख्रिश्चन होत आहेत. एकही मनुष्य आर्यजातीत नव्याने येत नाही, फक्त लोक धर्म सोडून बाहेर चालले आहेत, शेवटी आर्यांचा धर्म आणि जाती फक्त इतिहासात नोंद करण्यापुरत्याच राहतील, अशी परिस्थिती आधी होती. एकदा अपराधी तो कायम अपराधी. परत जातीत कसा येईल? कोणतेही पाप केले तर लपून छपून का केले नाही? या वृत्तीमुळे हजारो लोक आर्य (हिंदू) समाजातून दरवर्षी बाहेर जात होते हे या लोकांनी थांबवले. सर्वात मोठे कार्य या दोघांनी केले ते म्हणजे सगळा आर्यावर्त परमेश्वरापासून विन्मुख झाला होता, देव राहिले दूर, भूत - प्रेत, पिशाच्च, साप चावून मेलेले, आत्महत्या करून मेलेले, पाण्यात बुडून मेलेले, इतकेच नाही तर अवलिये, शहीद, ताजिये, गाझीमिया वगैरेंना देव मानून लोक त्यांची पूजा करायला लागले होते. जणू विश्वास हे व्यभिचाराचे अंग झाले होते. पाहून - ऐकून लाज वाटते की हे कसले आर्य आहेत? कुणापासून हे जन्माला आले? दयानंद आणि केशवचंद्रांनी आपल्या वक्तृत्वाने या लोकांना थपडा मारून त्यांची तोंडे दुराचारापासून सन्मार्गाकडे वळवली आणि सर्व आर्यावर्तास शुद्ध आणि निष्ठावंत केले.

बाकी या दोघांच्या चरित्रामध्ये जो फरक आहे तोही सांगितला पाहिजे. आमच्या मते दयानंदांची बुद्धी विशेष आणि प्रसिद्ध होती. आपले विचार त्यांनी अनेक वेळा बदलले. सुरूवातीला त्यांनी फक्त भागवताचे खंडन केले, नंतर सर्व पुराणांचे. काही ग्रंथ मान्य केले, काही अमान्य. आपल्या सोईची वचने मान्य केली, विरोधी वचनांना "प्रक्षिप्त" म्हटले. सुरुवातीला ते अंगाला राख फासणारे त्यागी दिगंबर साधू होते. पुढे संग्रह करीत एक एक वस्त्रे त्यांनी धारण केली. वेदभाष्यामध्ये रेल्वे, तारा (असण्याबद्दलचा) अर्थ बळेच लावला. त्यामुळेच संस्कृत चांगल्या प्रकारे न जाणणारेच त्यांचे अनुयायी झाले. जाळ्याला सुरीने कापण्याऐवजी दुसऱ्या जाळ्याने कापायचा प्रयत्न केला, त्यामुळे दोन्ही जाळी एकमेकांत गुंतून धार्मिक गृहकलह उत्पन्न झाला.

ह्याविरुद्ध केशवचंद्र सेनांनी जाळे कापून एक नवीन आणि शुद्ध मार्ग निर्माण केला. परमेश्वराला  भेटण्यासाठी कुठलाही अडथळा किंवा मध्यस्थ (ब्राह्मण, धर्मगुरू) ठेवला नाही. त्यांच्या  (बौद्धिक) शक्तींच्या उंच लाटांमुळे लोकांची अंतःकरणे आर्द्र झाली.  ब्राह्मण लोकांमध्ये मद्यपानाचे आणि मांसाहाराचे प्रमाण वाढले आहे. पण त्यात केशवचंद्रांचा दोष नाही. परंतु कूचबिहारच्या संस्थानिकाशी संबंध जोडल्याने (आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह करून दिल्याने) आणि येशू वगैरे लोक मला भेटतात अशी वक्तव्ये केल्याने आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या मनाची दुर्बलता दिसून आली. पण हा एक प्रकारचा उन्माद असावा. जश्या बऱ्याच धर्मप्रसारकांनी मोठमोठ्या गोष्टी परमेश्वराची आज्ञा म्हणून सांगितल्या, तश्या एखाद - दोन गोष्टी ह्या बिचाऱ्यांनी केल्या तर असे काय मोठे पाप केले?


वर सांगितलेल्या कारणांनी केशवचंद्रांचा जसा जगभरात  मरणोत्तर सन्मान झाला तसा दयानंदांचा झाला नाही. ह्यापेक्षा वेगळे असे काही पापपुण्य या दोघांच्या मनात दडलेले असेल तर ते आम्ही जाणत नाही. ते सर्व जाणणारा तू आहेस!

अहवालाचे निष्कर्षाने नाराज झालेल्या काही विदेशी सदस्यांनी अहवालावर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. अहवाल परमेश्वराकडे सुपूर्त केला गेला. त्यावर परमेश्वराची काय आज्ञा झाली आणि या लोकांना कुठे पाठवले हे एक तर आम्ही तिथे जाऊन परत येऊ तेव्हाच वाचकांना सांगू शकू किंवा काही दिवसांनी तुम्ही स्वतःच जाणू शकाल!

 

No comments: