Sunday, August 30, 2020

Apple picking

 

अविस्मरणीय आठवणी चांगल्या असतातच पण काही त्रासदायकही असतात की ज्या कायम स्मरणात राहतात. अशीच एक आठवण ऍपल पिकींगची. काळ होता २००३ सालातला. आम्ही दोघे क्लेम्सनमध्ये राहत होतो. युनिव्हरसिटीमध्ये नामुष्किलीने एक जागा मिळाली होती आणि ती होती स्टुडिओ अपार्टमेंट. मी व उमा दोघीही डिपेंडंट विसावाल्या होतो. उमाचा नवरा पिएचडी करत होता आणि विनायक पोस्डॉक करत होता. आम्ही दोघी मिळून काही वेळेला बसने वीकडेज मध्ये ग्रोसरी आणण्याकरता जात असु. असेच एकदा तिने मला विचारले
कि आपण ऍपल पिकींगला जायचे का? मि उत्साहात लगेच "हो" सांगितले. एका मिनिबसमधून ५ डॉलर्स मध्ये ही ट्रीप निघणार होती. ट्रीप मध्ये काही भारतीय तर काही चिनी आणि अमेरिकन विद्दार्थी होते. मी नेहमीप्रमाणे पोळी भाजीचा डबा घेतला होता. आम्ही दोघी खूप उत्साहात होतो. मधल्या एका विश्रांती थांब्यावर जेवणाकरता बस थांबली. आम्ही दोघींनी जेवून घेतले. टाको बेलच्या आवारात ही बस थांबली होती. आम्ही दोघींनी तिथून एक कोक घेतला. त्यावेळेला आम्हाला अमेरिकन उपहारगृहातले तितकेसे माहीती नव्हते. पिझ्झा माहिती झाला होता. बाकी सर्वांनी टाको मधुनच काही मागवले होते. ते खाण्यात सर्व दंग होऊन गेली होती.आता पुढचा प्रवास सुरू झाला. काटकोनातली लांबच्या लांब वळणे चालू झाली. तिथे पोहोचेपर्यंत दुपारचे टळटळीत उन चमकत होते. 
 
 
तिथे गेल्या गेल्या सर्वांनीचसफरचंदाचा रस प्यायला. एक डॉलरला पूर्ण ग्लास भरून रस अतिशय चवदार लागत होता. आता सर्वांनी बास्केट घेतल्या ऍपल पिक साठी. सफरचंदाच्या शेतात शिरलो. सगळीकडे सफरचंदाची झाडे होती. प्रत्येक झाडावर सफरचंदे लटकत होती. काही झाडावर डार्क मरून रंगाची तर काही झाडांवर फिकट लालसर रंगाची तर काही झाडांवर हिरवी सफरचंदे होती. जिकडे पाहावे तिकडे हिरवे हिरवे गार गालिचे होते. त्या हिरव्या गालिच्यावर बसले. प्रत्येक झाडापाशी जाऊन आपल्याला हवे ते सफरचंद तोडून बास्केट मध्ये भरत होतो. तिथून हालावेसेवाटत नव्हते. त्यावेळेला साधा कॅमेरा होता माझ्याकडे पण नेला नव्हता. फोटोग्राफीला खूप जोमाने सुरवात झाली नव्हती. त्यावेळेला डिजिटल कॅम असता तर काय विचारता. सर्व अँगल्सने फोटू काढून झाले असते. 
 
 
सफरचंद तोडून झाली. हिरवळीवर बसून झाले. परत एकदा ताजा सफरचंदाचा रस प्यायलो. आता निघण्याची वेळ झाली. परतीचा प्रवास काटकोनातल्या वळणावळणाच्या वाटेने सुरू झाला. आता तर वळणावळच्या रस्त्यात उताराची भर पडली होती. वळण आले की हासत होतो आणि एकमेकींना धरत होतो. मला तर रस्त्याकडे बघवत नव्हते. मला उंच उंच वळणावळणाचे रस्त्यांची खूप भीती वाटते व गरगरते. माझे डोके प्रचंड दुखायला लागले. डचमळायला लागले. माझ्या शेजारी उमा बसली होती. तिला खुणेनेच मला उलटी होत्ये असे सांगितले. तिने त्वरीत बस थांबवायला सांगितली आणि आम्ही दोघी बाहेर पडून एका झाडाखाली मी उभी राहिले आणि मला खूप मोठी उलटी झाली. पाण्याने चूळ भरली. परत बस मध्ये बसले. असे ३ वेळा बस थांबवायला लागली. प्रत्येक वेळी उलटी आणि पोटामधली आतडी पिळवटून निघत आहेत ते जाणवत होते. बसमधल्या ड्राइव्हर बाईने मला एक गोळी दिली आणि थोडे बरे वाटायला लागले. दुसरा एक अमेरिकन मला म्हणाला आता बरे वाटतयं का? मी हासूनच हो म्हणाले. तो म्हणाला की काही जणांना वळणावळाच्या रस्त्याचा त्रास होतो. घरी आलो. माझा चेहरा आणि कोपऱ्यापर्यंतचे हात लालेलाल झाले होते. अंगात थोडा सुद्धा त्राण उरला नव्हता. उमाने पाणी प्यायला दिले. अगदी घोटभर प्यायले. ती म्हणाली काही करून देऊ का? मी म्हणाले नको. आता मला बरे वाटत आहे. 
 
 
विनायक लॅब मधून घरी आला. तो म्हणाला चहा पितेस का? बरे वाटेल. मला काहीही म्हणजे काहीही नको होते. तशीच निपचित पडून राहिले. अजूनही मला खूप गरगरत होते. डोके ठणठण करत ठणकत होते. हळूहळू करत सर्व शमत होते. रात्री जेवणाकरता कूकरमध्ये खिचडी टाकली. दही होतेच. अगदी बळे बळे २ घासच खिचडी खाल्ली. थोडे पाणी प्यायले. नुसते पडूनच खूप बरे वाटत होते. अजिबात बोलवत नव्हते. रात्री झोप मात्र छान लागली. सकाळी उठले तर फ्रेश वाटत होते. सकाळी विनायकला सगळा वृत्तांत सांगितला. सर्व आणलेली सफरचंदे लॅब मध्ये सर्वांना एकेक करत वाटून टाकली. आम्ही दोघेही सफरचंदप्रेमी नाही. रणरणत्या उन्हामुळे पित्त झाले असावे, किंवा झाडांची ऍलर्जी असावी किंवा कशाचेतरी इंन्फेक्शन झाले असावे. पण एक धडा शिकले की इथे बाहेर पडताना कधी काय होईल सांगता येत नाही. बाहेर पडताना पिशवीत इथल्या हवामानानुसार सर्व गोष्टी ठेवते. Rohini Gore


No comments: