Monday, August 31, 2020

मुमताजमहलची इयरिंग

 मनोगत या संकेतस्थळावर प्रकाशित झालेले लेखन (विनायक गोरे यांचे लेख) इथे मी माझ्या ब्लॉगवर सेव्ह करत आहे.

मूळ कथा - मुमताजमहल का इयरिंग

लेखक - रमेश बक्षी

सकाळच्या थंड हवेमध्ये तो ताजमहालाच्या घुमटाकडे बघत होता आणि फाटक्या कपड्यांतले दोन तरूण त्याला निरखून बघत होते. ते एकमेकांत बोलत होते "हजार वेळा सांगूनही ऐकत नाही. इंग्रजी  येतं म्हणून इतका भाव खातोय. इंग्रजी येत नसतं तर त्याला काहीच करता आले नसतं. " एकीकडे घुमटाकडे पाहत तो हे बोलणे ऐकत होता. तो उत्तरला "ताजमहाल ना तुमच्या मालकीचा आहे ना माझ्या. तुम्हाला धंदा करायचा आहे आणि मलाही. त्यामुळे आपण गिऱ्हाईके वाटून घेऊ".  "जाऊ दे रे," दोघांमधला एक म्हणाला "राहा बाबा सुखात, पण एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्याच्या पोटावर पाय आणून कोणी सुखी होऊ शकत नाही. " तितक्यात दोन पर्यटक आले आणि ते दोघे त्यांच्यामागे धावले. एक जण म्हणाला "चला, तुम्हाला ताजमहालावरचे सर्वात सुंदर फूल दाखवतो. " तर दुसरा म्हणाला "चला, तुम्हाला तळघरातल्या कबरींचे दर्शन घडवतो. "

तो संगमरवरी बाकड्यावर बसला. फिकट रंगाची विजार आणि ढगळ शर्ट घातल्याने तो खरोखर कलावंत दिसत होता. आग्र्याला आल्यापासून दिवसातला जास्तीत जास्त वेळ तो इथेच घालवत असे. तो स्वतःशीच विचार करत होता- इथे आलो होतो एखादी छोटी नोकरी शोधायला, पण ताजमहालात मन इतके गुंतले आहे की आता त्याला सोडवत नाही. कॉलेजात शिकत असताना पदवीसाठी इतिहास  विषय निवडल्याबद्दल त्याला पश्चात्ताप होत असे. पण आता मात्र स्वतःवर खुश होता. कारण इतिहास घेतला नसता तर ही संगमरवरी नोकरी कशी मिळाली असती? तितक्यात त्याचे दोन मित्र परतले.  त्यांच्या आनंदी चर्येवरून त्यांना प्रत्येकी आठ आणे मिळाल्याचे त्याने ताडले.

तेवढ्यात एक मुलगी लाल दरवाज्यातून फोटो काढताना त्याला दिसली. तो जागेवरून उठला आणि तिच्याजवळ जाऊन म्हणाला "इथून नका काढू फोटो. बाजूने काढा. " मुलीने त्याचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले. तो परत म्हणाला "ताजमहालाची डागडुजी सुरू असल्याचे तुम्ही समोर बघताच आहात. इथून फोटो घेतले तर त्यात बांबू वगैरे येतील." "हा तर वैतागच आहे. म्हणजे काय, आता चांगला फोटो मिळणारच नाही? "  त्यावर त्याने स्वच्छ, सुंदर फोटो खिशातून काढून तिला दिला.

मुलीने त्याला धन्यवाद दिले त्याचे आभार मानले. तो तिच्याबरोबर चालू लागला. मध्येच म्हणाला "एक मिनिट इथे थांबा.  याच ठिकाणी उभे राहून ख्रुश्चेव आणि बुल्गानिन यांनी रशियन भाषेत ताजमहालाची प्रशंसा केली होती. " या माहितीने मुलगी खुश झाली. ती पायऱ्या चढत असताना तो म्हणाला "आजपर्यंत या पायऱ्या कोणी मोजू शकला नाही. " "का? तशा काही फार दिसत नाहीत!" मुलीने हळूच विचारले. "त्याचे कारण असे आहे की पायऱ्या चढताना माणसाची नजर वर राहते. संगमरवराच्या सौंदर्यामुळे दृष्टीभ्रमच नाहीतर स्मृतीभ्रंशही होतो. त्यामुळे खालच्या पायऱ्या मोजण्याचे तो विसरून जातो. " तो पाठ केलेली वाक्ये बोलत होता.

"इथे थांबा आणि आपले सँडल्स काढून ठेवा." तो म्हणाला, "संगमरवरावर चरा पडू नये म्हणून हा नियम असल्याचे लोक सांगत असले तरी खरे कारण माझ्या मते वेगळंच आहे. " "कोणते? " मुलीने उत्सुकतेने विचारले. " हा नियम शहाजहाननेच केला होता. तुम्हीच सांगा, ज्या ठिकाणी त्याची लाडकी मुमताजमहल चिरनिद्रा घेत आहे तिथे पादत्राणे घालून गेलेले त्याला कसे आवडले असते? "

तो तिच्याबरोबर चालत राहिला. पहिल्या  दरवाज्यावर कोरलेली अक्षरे तिला दाखवत म्हणाला " हे लेखन बघा. या कुराणातल्या 'आयती' आहेत. ह्यांत विशेष काय आहे ते सांगा पाहू? ",  "मला तर यांमध्ये काहीच विशेष दिसत नाही. " मुलीने विचार करून उत्तर दिले. "मी सांगतो. हे पहा, खालची आणि वरची अक्षरं सारखीच दिसताहेत की नाही? अक्षरांचा आकार सारखाच असेल तर विज्ञानाच्या नियमांनुसार वरची अक्षरं लहान दिसायला हवीत की नाही? पण हेच तर ताजमहालाच्या निर्मात्याचे कौशल्य आहे ! वरची अक्षरं अशा हिशोबाने मोठी कोरली गेली आहेत की पाहणाऱ्याच्या नजरेला ती खालच्या अक्षरांएवढीच दिसतात. " ही गोष्ट ऐकून मुलगी भारावून गेली. नंतर त्याने तिला संगमरवरावरची फुले दाखवली. मग म्हणाला" जरा वर बघा आणि एका बाजूकडून सुरूवात करून किती प्रकारच्या रंगांचे दगड वापरले आहेत ते मोजा. " मुलीने मोजायला सुरूवात केली पण चार- पाच प्रकार झाल्यावर तिला गरगरल्यासारखे झाले. "राहू द्या, अवघड काम आहे ते. मी सांगतो तुम्हाला, एकूण वीस प्रकारचे दगड वापरले आहेत. "

"वीस? " मुलीने आश्चर्यचकित होऊन विचारले.  'एका ऐतिहासिक पत्रात शहाजहानला शंभर प्रकारचे दगड वापरायचे असल्याबद्दल लिहिले आहे. पण आपल्या कारकीर्दीत शहाजहानने जे काही केलंय ते काय कमी आहे? फेब्रुवारी १६२८ मध्ये तो सिंहासनावर बसला ते १६५६ पर्यंत. या अठ्ठावीस वर्षात त्याने बरीच कामे केली. बुंदेलखंडातल्या रजपूत लोकांचे बंड मोडून काढले, खानजहान लोदीचा पराभव केला." "पण सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ताजमहाल बांधला. " मुलगी त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत म्हणाली. "नक्कीच. इथे चारही बाजूला बघा. मला तर वाटते की कोणी हळूवारपणे तारा छेडते आहे.  तसेही 'आर्किटेक्चर इझ फ्रोझन म्युझिक' म्हटलेलेच आहे. ताजमहाल काय आहे? तर गोठलेले संगीत आहे. " तो म्हणाला.

मुलीची नजर ताजमहालावर ठरत नव्हती. तो एकीकडे बोलत होता "तुम्हाला माहिती असेल की  मुमताजमहल ही आसफ खानाची मुलगी होती. लग्नाआधी तिचे नाव अंजुमनबानू होते. विलक्षण सुंदर होती ती. शहाजहान तिला म्हणाला होता की तू चालता बोलता स्वर्ग आहेस आणि तुझ्या सावलीत एक महाल बांधला जाऊ शकेल. " "ताजमहाल बांधून शहाजहान बादशहाने आपला शब्द खरा केला असे म्हणायचे का?" मुलीने विचारले. " असेच समजा.  "त्यावेळी मुमताजमहल थट्टेत म्हणाली होती ' माझी सावली तर काळी आहे, मग महालही काळाच होणार का?' शहाजहान त्यावेळी काही बोलला नाही, पण मला वाटते मुमताजमहलची सावलीही गोरीच असणार. " तो म्हणाला.

मुलीने आश्चर्यचकित होऊन विचारले "किती भव्य आहे हा ताजमहाल? किती खर्च आला असेल त्याला? किती वर्षे बांधकाम चालले असेल? "

"पन्नास लाखांपेक्षा जास्त खर्च झाला त्या काळी. १६३२ मध्ये बांधकाम सुरू  झालं ते १६४३ पर्यंत चाललं. म्हणजे ११ वर्षे.  ही फुले नाहीत. अंगठीत जडवलेले हिरे आहेत. टायटन लोकांनी याचे डिझाईन तयार केलं आणि जवाहिऱ्यांनी ते काम पूर्ण केलं " "तुम्हाला तर सगळे बारकावे माहिती आहेत असं दिसतंय," ती मुलगी कौतुकाने म्हणाली.  "माझ्या आधीच्या पाच पिढ्या इथे काम करत होत्या." हे ऐकून मुलगी खुश झाली. ती मध्येच थांबून त्याने सांगितलेली माहिती आपल्या वहीत टिपून घेत होती. "मला वाटतं स्वप्नांचे दगड आणि कल्पनेचे सिमेंट वापरून ताजमहाल घडवलाय." तो एका फुलाच्या पाकळ्यांवरून बोटे फिरवीत म्हणाला, "मुमताजमहलने चौदा मुलांना जन्म दिला आणि ७ जून १६३१ रोजी तिने शेवटचा श्वास घेतला. शहाजहान किती रडला असेल त्यावेळी? तिला बुऱ्हाणपुरात दफन केले, नंतर तिची कबर आग्र्यात आणली.  चला बघू या. "

मुलगी त्याच्याबरोबर तळघरात उतरली. म्हणाली "इथे बराच अंधार आहे. " त्याने मेणबत्ती पेटवली आणि तिला पुढे येण्यास सांगितले. "या पाहा शहाजहान आणि मुमताजमहलच्या कबरी. इथे १५ सेकंदांपर्यंत आवाजाचा प्रतिध्वनी घुमतो. " मुलगी काहीतरी बोलली आणि आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकत राहिली.  तो पुढे म्हणाला " शहाजहान इथेच उभा राहून मुमताजमहला साद घालायचा. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. आग्र्याच्या पहिल्या पावसात या कबरींवर एक थेंब पडतो. हे कसे होते आणि तोच एक थेंब कसा कबरीवर पडतो मला कळत नाही.  पण मी तो थेंब पाहिला आहे. असे वाटतं की तो अश्रूचा थेंब आहे. याच कबरीला पाहून रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की ताजमहाल काळाचा गालावरच्या चमकत्या अश्रूच्या थेंबासारखा आहे.

मुलगी तो सांगत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होती. तो तिला ताजमहालाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला, "ही पाहा यमुना. ताजमहाल सर्वच बाजूंनी सुंदर दिसतो. इथेच बसून साहिर लुधियानवी म्हणाले होते " "काय? " मुलीने उत्सुकतेने विचारले. त्याने कवितेच्या ओळी गुणगुणायला सुरूवात केली.
"यह चमनजार, यह जमना का किनारा, यह महल
यह मुनक्कश दरोदीवार, यह महराब यह ताक
एक शहेनशाहने ने दौलत का लेकर सहारा
हम गरीबोंकी मुहब्बत का उडाया है मजाक"

मुलगी ऐकत होती. तिची नजर उंच मिनारांकडे गेली. तेव्हा तो म्हणाला "आता त्यांना कुलुपे लावली आहेत. कारण लोक वर चढून आत्महत्या करायचे. आतापर्यंत शेकडो लोकांनी आपले प्राण दिले आहेत. खरे सांगायचे तर ताजमहाल हीच मृत्यूची पूजा आहे. या कोपऱ्यात या. इथेच उभे राहून सुमित्रानंदन पंत म्हणाले होते "हाय मृत्यूका ऐसा अपार्थिक पूजन"

मुलगी प्रत्येक गोष्ट लिहून घेत होती. तो एका कोपऱ्यात गेला आणि म्हणाला " समोरच्या भिंतीवर एकावर एक अशा सर्पाकृती कोरलेल्या आहेत. त्यातल्या कितव्या आकृतीपर्यंत तुमचा हात पोचू शकेल? " मुलगी अंदाजाने म्हणाली " मी आठव्या आकृतीला स्पर्श करू शकेन. " तो हसला आणि मुलीला भिंतीजवळ घेऊन गेला. चवड्यांवर उभी राहूनही तिचा हात जेमतेम दुसऱ्या आकृतीपर्यंत पोचला. तो म्हणाला "हीच ती ताजमहालाची छोटी छोटी वैशिष्ट्यं! आता एक सांगा, घुमटाच्या वरचा भाग किती उंच असेल? " , मुलीने सांगितले "सहा ते सात फूट" "चला माझ्याबरोबर! कबरीजवळच्या फरशीवर त्याचे चित्र आहे. " ते चित्र पाहून मुलगी थक्क झाली. तो भाग कमीतकमी १५ फूट होता.  "बघा, मी सांगत नव्हतो? हीच आहेत ताजमहालाची छोटी छोटी वैशिष्ट्यं? " तो म्हणाला.  मुलीने त्याच्याबरोबर ताजमहाल बघण्यात अनेक तास घालवले . तिने जाताना त्याला दहाची नोट दिली. तो हरखून गेला. पहिल्यांदाच कोणा पर्यटकाने त्याला एकरकमी दहा रूपये दिले होते. ते पाहिल्यावर त्याच्या दोन मित्रांचा जळफळाट झाला.  त्यांच्यातला एक जण म्हणाला "हे बघ माझे पोट. त्याच्यावर या बाबूचे दोन पाय आहेत. "

त्याच्याजवळ रोजीरोटीचा व्यवसाय असल्याने तो खुशीत होता. प्राप्ती बऱ्यापैकी होत होती. सहा महिन्यांनंतर पर्यटकांचा एक जथ्था आला. तो त्यांच्यासोबत निघाला.  "या पायऱ्या पहा... आतापर्यंत कोणी त्यांची अचूक संख्या सांगू शकला नाही...मला वाटतं की ही मुमताजची गोरी सावली आहे... मुमताजने ७ जून १६३१ या दिवशी शेवटचा श्वास घेतला.. . ही बघा कबर... आग्र्याच्या पहिल्या पावसाचा पहिला थेंब... " त्या जथ्थ्यातला लोकांना कुत्सितपणे हसताना बघून तो गप्प झाला. त्यातला एक जण दोन आणे काढून त्याला देत म्हणाला "हे दोन आणे तुझ्या मेहनतीचे आहेत. पण आम्ही मूर्ख बनणार नाही. " "अरे त्याला एक आणा आणखी दे. बाकी काही असो, त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. " "तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? " त्याने विचारले. " आमच्या बोलण्याचा अर्थ असा की तू या पुस्तकातून माहिती पाठ केली आहेस आणि त्याचीच पोपटपंची आमच्यासमोर करतोयस. म्हणूनच आम्ही तुला तीन आणे देत आहोत. " त्यातला एक उत्तरला. "कोणते पुस्तक? कसले पुस्तक? " त्याने गोंधळून विचारले. दुसऱ्याने पुस्तक काढून त्याला दाखवले. त्याने पाहिले. तो जे सांगत होता ती सर्व माहिती त्या पुस्तकात होती. "हे पुस्तक कोणी लिहिले हे जर तुला जाणून घ्यायचे असेल तर लेखिकेचा फोटोही त्यात आहे. " त्या मुलाने पाने उलटून लेखिकेचा फोटो त्याला दाखवला.  फोटो पाहून त्याच्या ओठांवर रक्त, कपाळावर घाम आणि डोळ्यांमध्ये संताप दाटून आला. जिने त्याला सहा महिन्यांपूर्वी दहा रूपये दिले होते तिचाच तो फोटो होता. हे पुस्तक ताजमहालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हातोहात विकले जात होते.

तो संगमरवरी बाकड्यावर जाऊन बसला.  त्याचे दोघे मित्र कुत्सितपणे म्हणाले " अजून सांग खोट्या गोष्टी नव्याने रचून लोकांना ! " त्याला त्या मुलीने आपल्या पोटावर लाथ मारल्यासारखे वाटते होते. त्याला वाईट या गोष्टीचे वाटत होते की लोकांच्या मनोरंजनासाठी ज्या कल्पित कथा तो सांगत असे त्या सर्व या मुलीच्या पुस्तकामुळे सत्य घटना झाल्या होत्या.  तो काय करावे याचा विचार करत होता. एका मित्राने नोकरी सुचवली, पण त्याने ती नाकारली, म्हणाला "जोपर्यंत ताजमहालाच्या भिंती कायम आहेत तोपर्यंत मी दुसरी नोकरी करणार नाही."

आणखी दोन पर्यटक आले. मोठ्या हिंमतीने तो त्यांच्याबरोबर चालायला लागला. त्यांच्यातल्या एकाने त्याला देण्यासाठी एक रुपया काढताच त्याचे दोन मित्र तिथे आले.  ते पुस्तक पर्यटकांच्या हातात ठेवत ते म्हणाले "किंमत फक्त सहा आणे. याने याच पुस्तकातून पाठ करून तुम्हाला गोष्टी ऐकवल्या आहेत. " त्याने विचार केला आता इथे दिवसा येण्यात अर्थ नाही. आता फक्त रात्री यावे, तेही फक्त चांदण्या रात्री. त्यावेळी त्याचे गुपित उघड करणारे त्याचे शत्रू तिथे नसतील.

ताजमहालावर चांदण्याच्या अभ्रकाचा वर्षाव होत होता. त्या रात्री तोही अनेक पर्यटकांपैकी एक होता. त्याही वेळी एक गृहस्थ तिथे धंदा करत होते. ते घुमटाकडे पाहत म्हणत "ते बघा " आणि दोन आण्यांच्या मोबदल्यात घुमटावर चमकणारी एक तेजस्वी वस्तू दाखवीत. एका पर्यटकाने विचारले "हे काय आहे? " त्यावर ते म्हणाले "ही आहे मुमताजमहलची इयरिंग. शहाजहानने घुमटावर चांदीचा खिळा ठोकून त्याला अडकवली होती.  " त्यानेही ती इयरिंग पाहिली. त्याला हा धंदा जास्त आवडला. त्याला त्याच्या पत्नीची आठवण झाली. तिच्यासाठी त्याने एका मोठया सराफाच्या  पेढीवरून इयरिंग बनवून घेतली होती. पत्नी फार कंजूष होती. तिने ती एका पेटीत बंद करून ठेवली होती.  पुढे गर्दी वाढली. तो घरी परतला.

दुसऱ्या रात्री पौर्णिमा होती. लोण्यासारख्या ताजमहालावर दुधासारखे चांदणे बरसत होते. ते गृहस्थ मुमताजमहलची इयरिंग लोकांना दाखवत होते. तितक्यात तो जोरात ओरडला "ती बघा पडली. " लोक धावले. त्याच्या हातात वस्तू होती. तो लोकांना सांगू लागला "जी इयरिंग तीनशे वर्षे घुमटावर अडकवली होती ती खाली पडली आहे. ही पहा, मुमताजमहलची इयरिंग. मोठे मोती जडवलेली. बघा कशी चमकते आहे. तिचीच चमक घुमटावर दिसत होती. " तो लोकांकडून प्रत्येकी चार आणे वसूल करू लागला.. ते गृहस्थ दूर जाऊन झोपले होते. रात्री उशीरापर्यंत तो लोकांना ती इयरिंग दाखवत होता.

घरी परतत असताना पाठीमागून आवाज आला" मिस्टर!", त्याने थांबून मागे पाहिले. ते गृहस्थ त्याच्याजवळ येऊन म्हणाले " ती इयरिंग घुमटावरून खाली कशी पडली याचेच मला आश्चर्य वाटते आहे." तो म्हणाला " यात आश्चर्य कसले? इयरिंग वरूनच पडली आहे आणि माझी खात्री आहे की ती मुमताजमहलचीच आहे. " गृहस्थाचा चेहरा आक्रसला. "तुम्ही माझ्या पोटावर पाय लाथ मारताहात. चला हे इयरिंग पोलिसांकडे जमा करू. ताजमहाल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पोलिसांना कळलं तर ते तुम्हाला अटक करतील. "तो  त्या धमकीला   बधला नाही, तेव्हा ते गृहस्थ म्हणाले "ठीक आहे, मी आताच पोलिसांत तक्रार करतो. " इतके बोलून ते गृहस्थ पोलिस ठाण्याकडे निघाले. तो घाबरला. स्वतःशीच म्हणाला "हा मनुष्य पोटावर लाथ सहन करणार नाही. काय धंदा आहे हा? प्रत्येकाला दुसरा आपल्या पोटावर लाथ मारतो आहे असे वाटते." त्याने त्या गृहस्थाला आवाज दिला "बाबूजी! " पहिल्या हाकेतच तो गृहस्थ मागे फिरला. तो म्हणाला "इतक्या छोट्या गोष्टीकरता कशाला पोलिसात जायच्या गोष्टी करता? ही मुमताजमहलची नाही, माझ्या बायकोची इयरिंग आहे. जरा विचार करा. घुमटावरून खाली पडण्यासाठी ती मुळात तिथे असायला हवी ना? " त्यावर ते गृहस्थांचा चेहरा खुलला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले" हे मात्र खरं बोललात तुम्ही ! ताजमहालावर चांदीचा खिळा ठोकून त्यावर मुमताजमहलची इयरिंग अडकवायला शहाजहानला काय वेड लागलं होतं?" 

No comments: