Monday, July 23, 2018

आज इथं तर उद्या तिथं .... (११)

अपार्टमेंटचा शोध घ्यायला सुरवात केली पण ब्रेव्हार्ड मध्ये एकच अपार्टमेंट कॉंप्लेक्स सापडले. बाकी सर्व घरे होती. आर्डेन मध्ये जी अपार्टमेंटस होती ती खूप महाग होती. आणि हँडरसनविल मध्येही २ सापडली. ब्रेव्हार्डपासून आर्डेन आणि हँडरसनवील ही जी दोन शहरे होती ती साधारण ३० मैलांच्या अंतरावर होती. आणि विनुला ऑफीसला जाण्यासाठी रोज ६० मैलाचा जाऊन येऊन प्रवास कारने करायला लागला असता. याशिवाय मी पण सबंध दिवस एकटी राहणार होते म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ कामावर जाऊन येऊन १२ तास एकटीने काढायचे. विल्मिंग्टन शहरात आम्ही या आधी राहत होतो तिथे विनुचे ऑफीस कारने ५ मिनिटांच्या अंतरावर होते त्यामुळे तो रोज घरी जेवायला येत होता आणि त्यामुळेच मला एकटेपणा आला नाही.




ब्रेव्हार्डच्या अपार्टमेंटवाल्यांना फोन केला आणि अपॉइंटमेंट घेतली. त्यांना सांगितले की आम्ही खूप लांबून येत आहोत त्यामुळे आम्हाला ४ ची वेळ द्या. तशी त्या बाईने वेळ दिली आणि मग लगेचच आम्ही हँडरसन इथे इकोनोलॉज मध्ये एक रूम बुक केली. सकाळी ९ वाजता न्याहरी करून निघालो ते ४ च्या सुमारास पोहोचलो. यावेळी जिपिएस लावले होते. ते अपार्टमेंटचा रस्ता नीट दाखवत नव्हते. शेवटी एके ठिकाणी कार थांबवली आणि रस्त्यावर चालत असलेल्या माणसाला विचारले तर त्यांनी पण धड काही सांगितले नाही. तिथल्या तिथेच फिरत होतो. यामध्ये आम्हाला पोहोचायला थोडा उशीर झाला. आणि तसा टेक्सट मेसेजही त्या बाईला लिहिला. आम्ही पोहोचत आहोत पण आम्हाला पत्ता सापडत नाहीये. तिचे त्यावर उत्तरच आले नाही. मग आम्हीच रस्त्यावरच्या पाट्या वाचून हळूहळू कार चालवत त्याच भागामध्ये इकडून तिकडे फिरलो. सरतेशेवटी अपार्टमेंट कॉंप्लेक्स एकदाचे सापडले. कार थांबवली आणि त्या बाईला फोन केला. फोन उचलायला तयार नाही म्हणून मेसेज लिहिला. की आम्ही आलो आहोत. त्या बाईचा पत्ताच नाही. तिचा मेसेज आला की मी तुमची वाट पाहून गेले पण तुम्हाला अपार्टमेंट पाहता येईल. अमुक एका नंबराचे अपार्टमेंट की जे भाड्याने द्यायचे आहे ते उघडेच आहे वरच्या मजल्यावर आहे ते तुम्ही बघा आणि आवडले तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मला येऊन भेटा.



त्या अपार्टमेंट मध्ये गेलो तर निराशा झाली. एक तर ते अपार्टमेंट कॉंप्लेक्स मुख्य रस्त्याच्या खूप आत होते. आजुबाजूला अजिबात कार जाण्यायेण्याची वर्दळ नाही. २ बेडरूम अपार्टमेंट आम्हाला हवे होते तसे ते होते. रचना पण बरी वाटली. पण स्वयंपाक घरात अंधार वाटला. शिवाय वॉशर आणि ड्रायर्स साठी जे कनेक्शन होते तेही स्वयंपाक घरातच होते. म्हणजे त्या कनेक्शनला आमच्याकडे असलेले वॉशर्स आणि ड्रायर्स लावले असते तर जागा व्यापली असती. स्वयंपाक घराला लागूनच एक मोठी प्रशस्त बाल्कनी होती आणि तिथून मोठमोठाली झाडे दिसत होती. घर खूप जुने वाटत होते. आणि या वरच्या मजल्यावर येण्यासाठी जो जिना होता तो आतून होता आणि तो खूप अरूंद होता. त्या घरात आपले मोठमोठाले फर्निचर आणताना कसा त्रास होईल याची कल्पना येत होती. बेडरूमला लागून ज्या बाल्कन्या होत्या त्याही विचित्र होत्या. उंचीने खूप लहान होत्या. त्यामुळे बाल्कनीत कठड्याला टेकून उभे राहणे शक्य नव्हते. आम्हाला दोघांनाही ती जागा अजिबात आवडली नाही. ही जागा ऑफिसच्या जवळ म्हणजे कारने १० मिनिटांच्या अंतरावर होती. घरी जेवण्यासाठी येता येईल हा विचार होताच पण तरीही या अश्या जुनाट जागेत रहायचे? विचार चालूच होता. ती बाई पण म्हणाली की उद्या येऊन भेटा त्यामुळे आम्ही मोटेलवर गेलो.



डोके भणभणायला लागले होते. एक तर त्या बाईचा खूप राग आला होता. मेसेजला उत्तर नाही. जागा बघायला आलो तर ही बया जागा दाखवणासाठी थांबली नव्हती. मोटेलवर गेलो आणि काय करायचे असा प्रश्न सारखा सतावत होता. बाकीच्या अपार्टमेंटचे फोन नंबर घेऊन ठेवले होते. हँडरसनविल शहरात २ अपार्टमेंट कॉंपेक्सचा फोन नंबर होता. पण आयत्यावेळी जागा उपलब्ध असतील का आणि नसल्या तर काय करायचे. एकूणच सर्व विचारांनी डोके दुखायला लागले होते. बाहेर जाऊन पिझ्झा खाल्ला आणि झोपलो . झोपेत पण ती जागा येत होती आणि या जागेत आपण रहायचे या विचाराने निराशाही येत होती. सकाळी उठल्यावर अजून एका माणसाचा फोन आला की आमच्याकडे एक जागा आहे. म्हणजे त्या आवारात दुसरीकडे एक जागा होती त्याच अपार्टमेंट कॉप्लेक्स मध्ये.तर विचार केला आता एक जागा पाहिली आहे दुसरी पण पाहू. ती बरी वाटली तर दोन पैकी कोणती जागा फिक्स करायची ते ठरवू. आणि सुरवातीला ६ महिन्याच्या लीजवर घेऊ. वेळ इतका काही कमी होता की जागा बुक करूनच निघायला हवे होते. कारण की ५ दिवसांनी आम्हाला सर्व सामानासकट इथेच रहायला यायचे होते.



विलमिंग्टन इथल्या राहत्या जागेत सामानाची बांधाबांध करायला सुरवात केली होती. खोकी आणून पडली होती. तिथल्या मॅनेजर बाईला सांगितले होते की आम्ही जागा सोडून जात आहोत. घरात पसारा दिसायला सुरवात झाली होती. जागा बुक करून मग ५ ते ६ दिवसात बरीच कामे करायची होती. सकाळी बरोबर १० वाजता आदल्या दिवशी पाहिलेल्या जागेत आलो. त्या बाईला फोन केला. ही बाई फोन उचलायलाच तयार नाही ! टेक्स्ट मेसेजला उत्तर नाही. दुसऱ्या बुवाला फोन केला तर त्याचाही पत्ता नाही. अरे काय चाललयं काय? यांना खरच जागा भाड्याने द्यायची आहे की नाही?? खूप संताप येत होता. तिथे तासभर थांबलो आणि विनू म्हणाला की आपण कंपनी मध्ये जाऊ आणि तिथल्या लोकांना विचारू की तुम्ही जिथे राहता तिथे जागा आहे का? तिथे २ भारतीय होते. तिथे गेलो आणि त्यातला एक जण म्हणाला की इथे ब्रेव्हार्ड मध्ये जागा मिळणे खूप कठीण आहे. आम्हाला पण असेच अनुभव आलेत. एकाने तर आम्हाला सांगितले की त्या बाईने उत्तर दिले नाही हे चांगलेच आहे. मी तिथे राहत होतो. १५ दिवसात ती जागा सोडून दुसरीकडे रहायला गेलो. तिथे खालच्या मजल्यावर एक बाई राहत होती ती खूप स्मोकिंग करायची त्या धुराच्या वासाने आम्ही ती जागा सोडून दिली.



तिथे एक दुसरा भारतीय होता तो म्हणाला की हँडरसनवील मध्ये २ अपार्टमेंट कॉंप्लेक्स आहेत मी तिथल्या एका जागेत राहिलो आहे. जागा छान आहे. हीच ती जागा की जिथे आम्ही आता राहतो. आणि माझे कामावर जाण्याचे ठिकाण इथून १० मिनिटांच्या अंतरावर आहे. अर्थात तिथे आम्हाला त्यावेळी अपार्टमेंट उपलब्ध नसल्याने मिळाली नाही. या जागेच्या ५० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर एक अपार्टमेंट कॉंप्लेक्स होते तिथे फोन केला तर ती बाई म्हणाली की तुम्ही या. एक जागा उपलब्ध आहे. कंपनीतल्या २ भारतीय मित्रांचे आभार मानून आम्ही जागा बघण्यासाठी ब्रेव्हार्ड मधून परत हँडरसनवीलला आलो. मोटेल सकाळीच सोडले होते. तिथून निघताना न्याहरी केली होती त्यामुळे बरे झाले. दुपारी १ च्या सुमारास आम्ही ब्रिटनी प्लेस मध्ये आलो. तिथे आलो आणि " आहा किती छान" हे शब्द बाहेर पडले. तिथल्या मॅनेजर बाईनी आमची सर्व माहीती विचारली. फॉर्म भरून घेतले. जी जागा उपलब्ध आहे ती ४ दिवसांनी खाली होणार आहे त्यामुळे ती जागा दाखवता येणार नाही. पण तुम्हाला दुसरी जागा दाखवते. जी जागा दाखवली ती आम्हाला आवडली. पण आम्हाला जी जागा मिळणार होती ती तिसऱ्या मजल्यावर होती आणि तिथल्या आवाराच्या बरीच मागे होती आणि त्यातुनाही ती मागच्या बाजूला होती की जिथून फक्त झाडेच दिसतील. ही जागा आवडली. फक्त एक होते की रेल्वेच्या डब्यासारखे हॉल - बाजूला किचन आणि हॉलला लागूनच एकाला एक लागून २ बेडरूम होत्या. एकच बाल्कनी होती आणि त्या बाल्कनीला एक मोठे दार होते. ते दिवसा उघडे ठेवता येणार होते. रात्री मात्र ते दार बंद करावे लागणार होते. त्यामुळे बंद डब्यासारखेच हे अपार्टमेंट होते. अर्थात दोन्ही बेडरूमना खिडक्या होत्या.पण आमच्याकरता वेळेला जागा मिळणे हे अगदी अत्यावश्यक होते. अपार्टमेंट बुक केले आणि तिथून निघालो. जागेचे सर्व सोप्सकार होईपर्यंत ३ वाजायला आले होते आणि प्रचंड प्रमाणात भूक लागली होती.




पेट्रोल संपायला आले म्हणून त्याकरता एक एक्झीट घेतली आणि तिथेच पिझ्झा इन ची पाटी दिसली. इथल्या पिझ्झाने एक सुखद धक्का दिला. सलाडही खूप छान होते. पिझझाही खूप छान होता. कोक बरोबर सलाड आणि पिझ्झा खाऊन आत्मा तृप्त झाला होता आणि अपार्टमेंट मिळाल्याने भणभणारे डोकेही शांत झाले. घरी पोहोचायला रात्रीचे ११ वाजले. एका त्रासदायक अनुभवाची भर पडली होती. विनायकने कंपनीचा राजिनामा दिलाच होता त्यामुळे आफीसमध्ये जाऊन उरलेले काम फक्त मार्गी लावायचे होते. मूव्हर्सला फोन करून झालेला होता त्यामुळे त्यांना निश्चित तारीख सांगितली. ते म्हणाले आम्ही त्या तारखेला सकाळी १० ला येतो तोपर्यंत तुम्ही तुमचे इतर सामान खोक्यात भरून आणि त्याला चिकटपट्या चिकटवून तयार ठेवा. त्या मूव्हर्स वाल्यांनी पण आम्हाला वेगवेगळ्या साईजची खोकी आणून दिली. घरात अर्धवट भरलेली काही खोकी होतीच. घराचा परत एकदा मोठाच्या मोठा पसारा आवरायचा होता.तो पसारा कसा आवरला, सामानाची बांधाबांध कशी केली, कोणकोणते सामान टाकून दिले हे सर्व या लेखाच्या पुढील भागात लिहिते. :) Rohini Gore

क्रमश : ...





4 comments:

मिलिंद कोलटकर said...

मजा येतेय! पुढील भागांची वाट पाहू! शोधेन आणि पहिल्या पासून पुन्हा वाचेन!! -मिलींद, एक चाहता.

rohinivinayak said...

अनेक धन्यवाद मिलींद !! या लेखा खाली मूव्हींग नावाचे लेबल आहे त्यावर क्लिक केलेत तर या आधी लिहिलेले लेखाचे सर्व भाग तुम्हाला वाचता येतील. पुन्हा एकदा धन्यवाद ! लेखाचा पुढील भाग लवकरच लिहिते.

मिलिंद कोलटकर said...

ह्हो की! पाहिलं. पण त्याचा असा उपयोग असेल असं वाटलं न्हवंत. :-) तसेही काल गुगलकृपेकरून पहिल्या भागापासून सुरुवात केलीच आहे. आज आता सारे एकत्र-क्रमाने वाचेन! फाफॉ चा इतिहास सांगतो की सप्टें०१६ पासून मी आपले लेख वाचतोय...संख्या शंभरी पलीकडे. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. -मिलींद. एक चाहता.

rohinivinayak said...

Anek Dhanyawaad Milind !