Sunday, July 22, 2018

आज इथं तर उद्या तिथं ... (१०)

विनायकला प्रत्यक्ष मुलाखतीकरता बोलावले ते सुद्धा अगदी अचानकपणे. फोन आला आणि सांगितले की तू उद्या मुलाखतीला ये आणि त्याकरता तुझे आम्ही हॉलीडे इन मध्ये रूम बुक केली आहे. हा फोन आला विनायकच्या ऑफीसमध्ये दुपारी ३ वाजता. ४ वाजता निघायलाच हवे होते म्हणजे आम्ही रात्री १० ते ११ च्या सुमारास ब्रेव्हार्ड मध्ये पोहोचणार होतो. अतिजलद वेगाने मी आणि विनुने ब्रेव्हार्ड ला जाण्याची तयारी केली. शर्ट पॅटला इस्त्री केली. कोट आणि टाय आठवणीने बॅगेत टाकला. बाकीचे एका रात्रीचे दोघांचे कपडेबॅगेत भरले. मी पण त्याच्याबरोबर गेले होते. घरी एकटी बसून काय करु? आणि समजा कंपनीने ऑफर दिली तर येताना अपार्टमेंटही पाहू असे ठरवले.



बाकीच्या गोष्टी म्हणजे रात्रीची पोळी भाजी, पाणी पिण्याची बाटली, थोडी फळे, कूकीज आणि बटाटा चिप्स घेतले. जिपिएस, याहूमॅप, लॅपटॉप, फोन इ. इ. सर्व घेतले आणि कारमध्ये बसलो. कार सुरू झाली आणि ७४ रस्त्यावरून नंतर महामर्ग ९५, २०, आणि २६ असे वेगवेगळे महामार्ग ओलांडले आणि काही वेळाने बाहेर पाहिले तर उंच उंच डोगर आणि दऱ्या दिसायला लागल्या. वळणावळणाचे रस्ते दिसायला लागले. घाटात कारचा गिअरही बदलावा लागला. पोहोचेपर्यंत ठार अंधार झाला होता. वाहतुक तुरळक होत गेली. एखादीच कार किंवा एखादाच ट्रक दिसत होता. या रस्त्यावर आम्ही आधी म्हणजे साधारण वर्षापूर्वी आलो होतो चिमनी रॉक पहायला. उंच डोंगरावरचा विश्रांती थांबाही माहीती होता. तिथे थांबलो. रात्र झाल्याने आणि इथला सर्वच भाग डोंगराळ आणि घनदाट झाडीचा असल्यानेे काजवे चमकताना दिसले. रातकीड्यांचा आवाज घुमत होता. थंडगार वाटत होते. थांब्यावर थांबून तिथे कॉफी प्यायलो आणि निघालो. आता तर रस्त्यावरची चढण खूपच जाणवत होती. काही वेळाने आम्हाला वेगळ्या रस्त्यावर जाणारी एक्झीट घ्यायची होती ती घेतली. आणि नंतर थोडाफार सरळ रस्ता लागला. निघताना खूपच घाईघाईने आवरायला लागल्याने दमायला झाले होते. कार धावत होती.



आता थोडा कारचा वेग मुद्दामच हळू केला आणि रस्त्यावर हॉलीडे इन ची पाटी कुठे दिसते का ते बघत होतो. जिपीएस लावले नव्हते. गुगलमॅप बघूनच कार चालवत होतो. काही वेळाने पाटी दिसली आणि हॉटेलमध्ये बुक केलेल्या रुमचा ताबा घेतला. बरोबर पोळी भाजी घेतल्याने खूपच चांगले झाले होते. जेवण केले. हात पाय तोंड धुतले आणि विनायकने प्रेझेंटेशनची थोडी तयारी केली. झोपायला १ वाजून गेला. झोप अजिबात लागत नव्हती. पाठीला आराम म्हणून कॉटवर पडलो होतो इतकेच. सकाळी अंघोळी पांघोळी आणि न्याहरी करून कंपनीत गेलो.



ब्रेव्हार्ड मधली कंपनी चहूबाजूने वेढलेल्या डोंगराच्या कुशीत होती. कंपनीच्या आवाराच्या बाजूलाच सफरचंदाची काही झाडे आहेत. त्या झाडांच्या फांद्या वाकून त्या कंपनीच्या आवारात आल्या होत्या. तिथे एक बाकडे होते त्या बाकड्यावर मी बसून राहिले. बरीच सफरचंद बाकड्याच्या आजुबाजूला असणाऱ्या हिरवळीवर पडली होती. त्याचे लगेच फोटोही काढले. अधून मधून कंपनीत असलेल्या एका डेस्क टॉपवर मी टाईमपास करायला जात होते. विनुची मुलाखत आणि प्रेझेंटेशन खूपच छान झाले. नंतर कंपनीचे दोन मालक आणि आम्ही दोघे एका मेक्सिकन उपहारगृहात जेवलो. त्यांनी माझी पण चोकशी केली. जेवणे झाल्यावर आम्ही एकमेकांना हास्तादोंलन केले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशात रस्ता तर छान दिसत होताच पण आजुबाजूला असलेल्या डोंगरातून ढग खाली उतरलेले दिसत होते. अतिशय नयनरम्य दृश्य होते. ६ ते ७ तासांचा प्रवास करून घरी आलो. २ दिवसांनी कंपनीच्या मालकाचा फोन विनुला आला आणि लवकरात लवकर कधी कामावर रूजू होतोस हे विचारले. तेव्हा विनू म्हणाला मला कंपनीत १५ दिवसाची नोटीस द्यायला लागेल त्यामुळे मी अमुक एका तारखेला रूजू होईन. असे सांगितल्यावर ब्रेव्हार्ड मधल्या कंपनीने लगेचच अपॉईंटमेंट लेटर काढले.



आता मात्र कामांची नुसती रांग लागली. पहिले काम म्हणजे गूगल मध्ये शोधण्याचे काम. गुगल शोधामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्सचे पत्ते, फोन नंबर शोधणे. अपार्टमेंटच्या शोध कार्यासाठी गुगलची मदत घेणे. आणि शोध घेऊन फोन करणे, अपार्टमेंट बघायला येण्यासाठीची अपॉइंटमेंट घेणे. शिवाय घराच्या आवरा आवरीमध्ये खोकी आणणे, चिकटपट्या आणणे. तिथल्या राहत्या अपार्टमेंटच्या मॅनेजरला सांगणे की आम्ही चाललो आहोत. परत एकदा खोक्यात सामान भरा, पोतीच्या पोती कचरा फेका., अपार्टमेंट साफ करा , इलेक्ट्रिक कंपनीला कळवा. पोस्ट ऑफीस मध्ये जाऊन पत्ता बदललेला सांगा. एकेक करत बरीच कामे मार्गी लावायची होती आणि त्यात भर म्हणजे ब्रेव्हार्ड मध्ये अपार्टमेंट बघायला परत एकदा जाऊन येऊन ८०० मैलांचा प्रवासही करायचा होता. यामध्ये आफीसच्या जवळ अपार्टमेंट असणे याला आम्ही जास्त प्राधान्य देत होतो. शिवाय ब्रेव्हार्ड पासून २५ ते ३० मैलाच्या अंतरावर आर्डेन आणि हँडरसनविल ही छोटी शहरे होती तिथल्या अपार्टमेंटचा पण गुगल शोध घेऊन एकूणच अपार्टमेंटची भाडी किती आहेत आणि ते उपलब्ध आहे का याची चौकशी पण करणार होतो. सर्व कामाची यादी एका वहीत मी लिहून काढली. विनुला सांगितले की तू मला खोकी आणून दे म्हणजे जे काही सामान अजिबातच लागणारे नाहीये ते मी खोक्यात भरायला सुरवात करते आणि एकीकडे लॅपटॉप वर अपार्टमेंटचा गुगल शोधही घेते. Rohini Gore :)
क्रमश : ....

No comments: