Thursday, June 08, 2017

H 4 Dependent Visa (3)

मी घरबसल्या जरी बरेच उद्योग करत होते तरी एक प्रकारचा साचलेपणा आला होता. प्रत्यक्षातले मित्रमंडळ तीन वर्षे झाली तरी भेटले नव्हते आणि पुढे भेटतील याबद्दलही खात्री नव्हती. क्लेम्सनला आल्यावर सुरवातीच्या काळात मी बसने बरीच हिंडले होते. येण्याजाण्यात वेळ जातो. मॉलमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअर्स मध्ये तिथल्या गोष्टी पाहण्यातही वेळ जातो. त्यामुळे बसने हिंडायचे ठरवले.
आमच्या अपार्टमेंटच्या काही मिनिटांच्या अंतरावर बस येते हे माहीत होते पण तरी ती बस कुठे जाते याचा पत्ता नव्हता आणि नेमका बस-स्टॉप कुठे आहे तेही शोधायचे होते. गुगल शोधामध्ये आम्ही राहत असलेल्या शहरात कोणत्या बसेस धावतात हे शोधले. बसच्या वेबसाईटवर बघितले कोणत्या नंबराच्या बसेस धावतात, त्याचे वेळापत्र काय आहे आणि मुख्य म्हणजे बस थांबे कुठे आणि किती आहेत. शिवाय प्रत्येक रूटचा मॅपही बघितला. या सर्व गोष्टींची एक प्रिंट काढली आणि आमच्या घराजवळचा बस स्टॉप कुठे आहे तेही शोधले. त्यावर किती नंबरची बस थांबते तो आकडाही पाहिला. लायब्ररीत जाण्यासाठी ही बस माझ्यासाठी खूपच सोयीची होती, म्हणजे आमच्या घरापासूनचा बस थांबा आणि लायब्ररीतजवळचा बसथांबा १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर होता.लायब्ररीत जायला सुरवात केली. नंतर लायब्ररीपासून दुसरी एक बस होती ती ग्रोसरी स्टोअर्स आणि मॉलला जाणारी होती. त्यामुळे एक दिवसा आड बसने फिरायला लागले. कंटाळा गेला. बसमधली माणसे दिसायची. त्यांचे संभाषण कानावर पडायचे, लायब्ररीत गेल्यावर काही ना काही वाचायचे. या वेगळ्या दिनक्रमा मुळे फ्रेश वाटायला लागले. घरातून निघताना धोपटीत पाणी पिण्याची बाटली, टोपी, एक स्वेटर, छत्री, थोड्या कुकीज अशी सगळी जय्यत तयारी करून निघायचे. कॅमेराही न्यायचे सोबत. लायब्ररीत जाण्यासाठी बसने जाण्यासाठी १५ मिनिटे लागायची.एकदा लायब्ररीत पुस्तके बदलताना तिथल्या बाईला विचारले की इथे नोकरी मिळू शकेल का? तर ती बाई म्हणाली नोकरी नाही पण voluntary work मिळू शकेल. मग तिने मला एक फॉर्म दिला. तो दुसऱ्या दिवशी भरून दिला. फॉर्म मध्ये कोणकोणते काम आहे याची एक यादी होती. त्यावर मला आवडणाऱ्या कामावर टीक मार्क केले. काही दिवसांनी लायब्ररीतून मला सुसानचा फोन आला कि तुझ्यासाठी एक काम आहे, मला येऊन भेट. मि लगेचच गेले तिला भेटायला, कारण की नुसते फिरण्यापेक्षा कामानिमित्ताने बाहेर पडायला केव्हाही चांगलेच. लायब्ररीच्या तिसऱ्या मजल्यावर सुसानला भेटले. तिने विचारले कि तुला बुक रिपेअरचे काम करायला आवडेल का? या आधी हे काम कधी केले आहेस का? तर मी म्हणाले की हे काम मला नक्किच आवडेल पण या कामाचा मला अनुभव नाही. सुसान म्हणाली काळजी करू नकोस. एलिझाबेथ तुला हे काम व्यवस्थित समजाऊन सांगेल. कोणत्या दिवशी आणि किती तास येशील? हे विचारल्यावर मी तिला आठवड्यातले २ दिवस आणि दुपारचे २ ते ४ येईन असे सांगितले. एलिझाबेथने मला काम समजाऊन सांगितले. मला हे काम खूपच आवडून गेले. काम करता करता तिथे रेडिओ ऐकता यायचा. त्यावरची इंग्लिश गाणी आवडायला लागली होती. काही गाणी तर आर डी बर्मन ने चाली लावल्यासारखीच वाटायची. एकूणच रेडिओवर संगीत कोणत्या का भाषेत असेना मला ऐकायला आवडते.गाण्याच्या अधून मधून जाहीराती असायच्या त्याही ऐकायला छान वाटायचे. लायब्ररीत काम मिळाल्याने माणसात आल्यासारखे वाटले. व्यवधान असले की माणूस आपोआपच त्या व्यवधानाच्या अवतीभवती फिरत राहतो. बाहेर पडले की घरातल्या कामाचीही आखणी करता येते. नेटवरून मित्रमंडळींशी रांत्रदिवस बोलता बोलता घरातली इतर कामेही असतात याचा विसरच पडला होता जणू. विनायक म्हणायचा जेव्हा पाहावे तेव्हा संगणकाजवळच असतेस. आणि जेव्हा विनायक ऑफीस मधून यायचा तेव्हा तो संगणक घेऊन बसायचा तेव्हा मला राग यायचा.
लायब्ररीतील बरीच पुस्तके रिपेअर केली. साधारण हजार पुस्तके असतील. पण त्यांनी मला चहापाण्यापुरतेही पैसे दिले नाहीत.

अर्थात अपेक्षा नव्हतीच. मी माझा वेळ जाण्यासाठीच हे काम करत होते आणि तेही आवडीने करत होते. तीन वर्षे हे काम केले. अजून दुसऱ्या प्रकारचे काम आहे का? असेही विचारले तर सुसान म्हणाली की दुसऱ्या विभागात मेल लिहून बघते काही काम आहे का ते. पण काम निघाले नाही.माझ्यासारख्याच अजून काही जणी तिथे कामाला यायच्या. काम झाले की एका फायलीत नाव, किती तास काम केले आणि दिनांक टाकायचा असतो तेव्हा कळाले की
माझ्यासारख्या अजून काही जणी इथे येतात तर !
H4 dependent visa या लेखमालेत अजून २ ते ३ भाग तरी होतीलच तेव्हा येईनच परत काहीतरी घेऊन.

2 comments:

Milind Kolatkar said...

पुढच्या भागांचीही वाट बघू! आपले लेखन भावते. भाषा सहज, साधी, सोपी आणि ओघवती असते. वाचत रहावेसे वाटते. मी आपले आधीचे लेखनही वाचलंय. धन्यवाद. -मिलींद

rohinivinayak said...

तुम्ही माझे लेख वाचत आहात आणि वाचत राहावेसे वाटते ही प्रतिक्रिया खूप प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे लिहिण्यासाठी उत्साह वाढतो.
अनेक अनेक धन्यवाद मिलींद !!! डिपेंडंट विसाच्या लेखमालेतील पुढचा भाग लवकरच घेऊन येते. परत एकदा धन्यवाद !