Tuesday, April 20, 2010

एम्बॉसिंग

हार्डवेअरच्या दुकानातून सर्वात पातळ ऍल्यूमिनियमचा पत्रा कापून आणा. आवडेल त्या चित्राचा ट्रेसिंगपेपर वर छाप काढून तो पेपर त्या पत्र्यावर ठेवा. कडेने जाड पुस्तके वजनासाठी ठेवा. त्यामुळे छाप न हालता बॉलपेनने जश्याचा तसा गिरवता येईल. शाई असलेल्या टोकदार बॉलपेनने तो छाप दाब देऊन गिरवायला लागतो, तरच त्या चित्राची आउटलाइन ऍल्यूमिनियमच्या पत्र्यावर उमटते.



चित्राची बारीक आउटलाइन पत्र्यावर उमटली की शाई नसलेल्या टोकदार बॉलपेनने त्या संपूर्ण चित्राच्या आउटलाइनवर अगदी जवळजवळ डॉट काढा. हे डॉट काढताना खूप जोर द्यावा लागतो तरच ती पत्र्यावर उमटतात. हे डॉट पत्र्याचा भाग फुगवण्यासाठी उपयोगी पडतात.



आता पत्रा उलटा करून डॉटच्या साहाय्याने पत्रा घासून घासून फुगवा. पत्रा घासताना रंगवायचे ब्रश वापरतात. हे ब्रश ३-४ प्रकारचे घ्यावेत. म्हणजे काहींची टोके निमुळती, मध्यम, जाड अशा प्रकारे. उदा. हातपाय फुगवायला जाड टोकाचा तर बोटे फुगवायला निमुळत्या टोकाचा ब्रश. पत्रा फुगवताना खूप दाब द्यायला लागतो, पण जास्ती नको, कारण भेग पडली तर चित्राची वाट लागेल. डॉटच्या साहाय्याने चित्राचा प्रत्येक भाग फुगवायचा, म्हणजे पत्र्याच्या प्रथमदर्शनी तेवढाच फुगवलेला भाग वरती येईल व सर्व चित्र व्यवस्थित दिसेल. डॉटच्या दोन लाइनच्या आतील पत्रा फुगवा.



पत्र्याच्या प्रथमदर्शनी फुगवून उमटलेल्या चित्राच्या सर्व आउटलाइन काळ्या रंगाच्या ऑईलपेंटने रंगवा. रंगवताना बारीक रेषा हवी. पत्र्यावर रंग पडला तर रॉकेलमध्ये कापसाचा बोळा बुडवून पुसून घ्या. आता या फुगवलेल्या व्यतिरिक्त जो पत्रा आहे त्यावर टोकदार हातोडीने सावकाश ठोका. ठोकण्यामुळे बाकीच्या पत्र्यावर एकदम बारीक बारीक खळगे पडतील. अगदी जवळजवळ ठोकायचे. नंतर त्यावर सोनेरी रंग पातळ करून लावा. तयार झालेला पत्रा फ्रेम करण्यासाठी दुकानात द्या.



सोनेरी रंगाने भरलेल्या खळग्यांच्या पार्श्वभूमीवर फुगवलेले चकचकणाऱ्या पत्र्याचे चित्र व काळ्या ऑईलपेंटने रंगवलेल्या आउटलाइन असे सुंदर चित्र दिसते. डोळे, भुवया, अलंकार काळ्या ऑईलपेंटने रंगवणे. मेहनत खूप आहे, पण तयार झालेल्या कलाकृतीकडे बघितले की आनंद होतो. ही कला मला भैरवीने शिकवली.

4 comments:

mau said...

ए मी बनवले होते हे एकदा...मस्तच दिसते...

Nutan said...

vaah...collegelaa asatana hostelmadhye ase barech kaahi chalayache...ek navin kaahitari aale ki sagale tech banavat sutayache...Rangoli painiting,embossing,glass painting,vinkam,bharatkam,motyache dagine banavane aani kaay kaay...mi ekada (8-9 varshapoorvi) cloth embossing kele hote...readymade kale kapad milate tyaat chitra vagere kadhalele asate....istri phiravali ki emboss hote mag aapalya aavadipramane rang bharayache...aani frame karayachee...tyaat rajasthani chitre khoop chhan disataat...tujhe likhaan junya aathavani punhaa navyaane aathavayalaa laavate :)Thanx...

भानस said...

आम्ही असा तांब्याचा पातळ पत्रा आणून सूर्य बनवला होता.... एकदम झकास जमला होता.:) तू बनवलेल्याचा फोटू टाकायचास नं.... आता पुन्हा केव्हांतरी प्रयोग करायला हवा. :)( का फोटो टाकला आहेस आणि मलाच दिसत नाहीये.... :( )

rohinivinayak said...

uma, nutan, bhagyashree, pratisadabaddal anek dhanyawaad!!

painting india t aahe tyamule photo kadhta aala nahiye aani mi laga jhalyavar kahi divsat iit madhe astana shikle. thanks. bhagyashri tuze embossing pahayla aavdel.

mi 2 embossing banali hoti ek mulgi lagna houn ghari jatana dolit basli aahe aani dusre shreekrishna radheche. pahile painting mi mazya maitrila lagnat bhet dile. donhi embossing frame mothya hotya. thanks again!