Monday, April 05, 2010

हँगिंग रॉक (१)

वळणावळणाचा रस्ता पार करत आमची कार पार्कच्या दिशेने चालली होती. आजुबाजूला डोंगराळ प्रदेश होता. स्प्रिंग चालू झाला तरी खूप हिरवेगार झाले नव्हते. उंच उंच झाडे. झाडांना पानेही तुरळकच दिसत होती. काटक्या व सुकलेला पालापाचोळा सर्वत्र दिसत होता. रस्ता काळा कुळकुळीत. रस्त्याचे दोन भाग पाडणारी मधली पिवळी रेषा व कडेच्या दोन पांढऱ्या रेषा स्पष्टपणे दिसत होत्या. आपण उंच उंच जात आहोत हे जाणवत होते. पार्कमध्ये कार पार्क केली. तिथल्या ऑफीसमध्ये जाऊन एक छोटे माहितीपत्रक घेतले ज्यामध्ये पार्कमध्ये असणाऱ्या सर्व ट्रेल्सची माहिती होती. आमच्या प्रवासाला पाच तास पूर्ण झाले होते. ४ तास हायवे वरचा प्रवास पार करून उरलेला तासाभरचा प्रवास केला आणि पार्कमध्ये हजर झालो. ऐन जेवणाच्या वेळेला पोहोचलो होतो त्यामुळे प्रचंड भूक लागली होती. कारमध्ये बसूनच जेवण केले. सर्वजण असेच करत होते कारण की पार्कमध्ये खाण्यापिण्याची सोय अजिबात नाही. पाणी पिण्याची बाटली, माहितीपत्रक, थोडी फळे व कुकीज घेऊन निघालो.
माहितीपत्रक वाचून सुरवातीला दोन तीन छोटे ट्रेल करायचे ठरवले. हे ट्रेल धबधब्याचे होते. एक उजव्या बाजूला व एक डाव्या बाजुला असे दोन धबधबे पाहिले. एक होता हिडन फॉल व दुसरा होता विंडो फॉल. हिडन फॉलला बरेच खाली उतरावे लागले. निसर्गनिर्मित छोट्या दगडांच्या पायऱ्या होत्या. खडकांवरून कोसळणारा छोटा धबधबा. त्याचे पाणी पायऱ्या पायऱ्यांवरून खाली येत होते. पुढे कुठेतरी आणखी दरीत जात असेल. तिथे छोटी मुले पाण्यात उभी होती. काही मुले तर खडकावर चढून धबधब्याच्या पाठीमागून येऊन दुसरीकडच्या खडकांवरून खाली उतरत होती. मला पण पाण्यात उभे राहण्याचा मोह होत होता.
दुसरा धबधबा जो होता तो होता विंडो फॉल. याकरता आधीही खूप चालावे लागले. चालताना खालची दरी दिसत होती. या धबधब्यासाठी १०० फूट खाली उतरावे लागले. इथेही निसर्गनिर्मित दगडांच्या छोट्या पायऱ्या व डावीकडे भरपूर सुकलेला पालापाचोळा व काटक्या, सुकलेली उंच झाडे. हा धबधबा आधी कठड्यावरून पाहिला. नंतर अजून थोडे खाली गेलो. धबधब्याचे नितळ पाणी खूप खालपर्यंत जाताना दिसत होते. इथे पण मुले बागडत होती. इथून वरती येताना मात्र अरे देवा! असे म्हणण्याची पाळी आली. लगच्यालगेच पायऱ्या असल्या की उतरताना काही वाटत नाही पण चढताना मात्र जीव जातो. मी तर दर दोन तीन पायऱ्या चढल्या की दम खायला बसत होते. हृदयाचे ठोके नुसते वाढले नाहीत तर घौडदौड करत होते. त्यादिवशी मुहूर्त पण नेमका साधला गेला होता. डोक्यावर रणरणते उन होते. प्रचंड प्रमाणात सूर्यप्रकाश होता जणू काही टिपूर चांदणेच! या दोन धबधब्यांनी खूपच दमवले. बरेच पुढे चालत गेल्यावर एक लाकडी शेड होती त्यामध्ये बाकड्यावर बसलो. थोडा गारवा जाणवला. तिथल्या थंडगार पाण्याने हातपाय तोंड धुतले. थोडी फळे, चॉकलेट व कूकीज खाल्या त्यामुळे उत्साह आला.
आता तिसरा धबधबा पाहण्यासाठी परत चालायला सुरवात केली. वरचे दोनही धबधबे जातायेता मिळून ३ मैल चालणे, उतरणे, चढणे झाले होते. तिसरा धबधबा जाऊन येऊन १ मैलाचा होता. इथे डोंगराळ भागावरून बरेच खाली चालत गेलो. हा धबधबा मला प्रचंड आवडला. इथे धबधब्याच्या अगदी जवळ बसता येत होते. धबधब्याच्या बाजूला खडकांवर सहज बसता येत होते. मी खडकावर बसून धबधब्यामध्ये पाय सोडले. पाणी बर्फासारखे थंडगार होते. दुखणाऱ्या पायांना हे थंडगार पाणी आराम देत होते. असे वाटत होते की इथेच बसून राहावे. वेळेचा अंदाज घेतला आणि तिथून निघण्याचा निर्णय घेतला कारण की हॉटेलमध्ये जाऊन पडायचे होते. हॉटेल पार्कपासून तासाभराच्या अंतरावर वेगळ्या दिशेला होते. वळणावळण्याच्या रस्त्यावरून हॉटेलच्या दिशेला मार्गस्थ झालो. मान डोके आणि पाय प्रचंड प्रमाणात दुखत होते. चढण्याची काय तर चलण्याची सवयही पूर्णपणे गेली आहे. पूर्वी शाळाकॉलेजात असताना पर्वती, हनुमान टेकडी, चतुर्श्रुंगी असे चढ उतार बरेच वेळा केले होते. अमेरिकेत पहिल्यांदाच डोंगरमाथ्यावरचे चढ उतार करत होतो.
दुसऱ्यादिवशी परत पार्कमध्ये हजर. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी तापमान थोडे खाली होते आणि तुरळक ढगही दिसत होते. सर्वात मुख्य आणि आकर्षक ट्रेल म्हणजे हँगिंग रॉक ट्रेल. हा जर केला नाही तर इथे येण्यात अर्थच नाही. परत पाणी पाण्याची बाटली, फळे घेऊन निघालो. हा ट्रेल अतिशय निसर्गरम्य आणि छान ट्रेल आहे. सुरवातीला थोडा उतार उतरल्यावर चढायला सुरवात केली. पायवाटेवर पांढरी माती व त्यावर खडी परसलेली होती. आजुबाजूला उंच उंच झाडीच झाडी, पण फांद्या नाहीत. सर्वत्र काटक्या. झाडांच्या खाली सुकलेला पालापाचोळा. अगदी तुरळक ठिकाणी हिरवीगार पाने. अधून मधून झाडे पडलेली होती. काही झाडांची खोडे अर्धी कापलेली तर अर्धी अशीच उघड्यावर पडली होती. डोंगर चढायला सुरवात केली. पहिला चढ गेला, दुसराही गेला, तिसरा पार केला. तिसऱ्या चढावर तर पाऊले उभी पडायला लागली. प्रत्येक चढावर एक लाकडी बाकडे होते दम खाण्याकरता बसायला. कोरड्या झालेल्या घशात बरे वाटेल इतपत पाणी पीत होतो. चढ चढताना इतके काही दमायला झाले होते की तोंडातून एक शब्दही फूटत नव्हता. मनात गाणे मात्र गुणगुणत होते, परबतोंके पेडोंपर श्याम का बसेरा है...
डोंगराच्या माथ्यावर आलो आणि सपाट पायवाट सुरू झाली. यातही थोडा उंचसखलपणा होता पण खूप नाही. इथे मला थोडा कंठ फुटला. विनायकला विचारले अजून किती चालायचे आहे रे! विनायक म्हणाला अर्धे अंतर झाले अजून अर्धे तरी नक्कीच असेल, बघू या पुढे! पुढे बरेच चालत गेलो आणि परत थोडा चढ लागला. थोड्यावेळाने लाकडाच्या पायऱ्या चढत वर गेलो आणि समोर पाहतो तो काय! २०० फूट उंच टोकदार सुळका! इथे खालच्या खडकांवर काही तरूण मुले बसली होती. वर सुळक्याकडे पाहिले तर दोघेजण तिथे उभी होती. ते बघूनच पोटात धस्स झाले! आम्हाला वाटले संपला आता ट्रेल तर संपला कुठचा! उजव्या दिशेने जा असा एक बाण दिसला. तिकडून माणसे येताना दिसत होती. त्यातला एक जण मजेने म्हणाला ती दोघे वर खोळंबली आहेत. खालून एलेव्हेटर पाठवा म्हणजे त्यांना खाली येता येईल. इथे सुळक्याचे फोटो काढले. फोटो काढण्यात माही टोपी तिथेच पडली. इथुनही थोडासा उतार आणि परत चढणच चढण. ही चढण परत निसर्गनिर्मित छोट्या खडकांच्या पायऱ्यांची होती. हा जो चढ आहे तो डोंगराळा मागून वळसा घालून खूद्द हँगिंग रॉक कडे नेऊन पोहोचवतो. इथे बरेच मोठाले खडक होते. निरनिराळ्या खडकांवर उभे राहून खालची खोल दरी दिसत होती. भीतीच वाटत होती. अजूनही थोडे पुढे गेल्यावर मोठमोठाले ओबडधोबड निरनिराळ्या आकाराचे खडक होते. खडकांची टोके निमुळती होत वेगवेगळ्या दिशेला पुढे गेली होती. इथे उभे राहून सर्वांचे फोटोज काढणे सुरू होते.
काही जण पुढे गेलेल्या खडकाच्या अणकुचीदार टोकावर जाऊन बागेत बसल्यासारखे आरामात बसले होते. काही जण खाली पाय सोडून खुर्चीत बसल्यासारखे बसले होते. इथेही लहान मुले, छोटी बाळे होती. मी पण खडकावर उभे राहूनच खोल दरीचे फोटो काढले, पण अगदी टोकाला जाऊन उभे राहण्याची किंवा बसण्याची हिम्मत कदापिही होणे शक्य नाही, कारण की खाली पहिले तर खोल दरी!! सुळका २०० फूट व डोंगरावरचे चढ मिळून साधारण २०० ते ३०० फूट अंदाजे अंतर असे मिळून वर गेलो होतो. तिथे जाऊन खालच्या दरीतला नयनरम्य परीसर बघितला. दूरवर परसलेले डोंगर बघितले. डोंगरातून येणारी आमची पायवाट बघितली. वर येताना त्रास होता, आता काय खाली उतरायला खूप सोपे आहे. खाली उतरायला सुरवात केली. सुळक्याच्या पायथ्याची येऊन परत एकदा सुळक्याच्या टोकापर्यंत नजर टाकली. तिथे माझी पडलेली टोपी मिळाली. वेळेवर मिळाली, कारण उन चढायला सुरवात झाली होती. कोणीतरी छोट्या झाडाच्या अर्धवर कापलेल्या खोडावर टांगून ठेवली होती. उतरताना खूप छान वाटत होते. मनात गाणे गुणगुणत होते, घडी घडी मोरा दिल धडके..... मधुमतीतले चित्रीकरण असेच आहे. डोंगराच्या माथ्यावर सपाट पायवाट. उंच उंच झाडे, खाली उतरलेली खोल दरी. उतारावर आपोआप भरभर उतरले जात होते. पायांना रोखण्यासाठी खूप कष्ट पडत होते.
वर येऊन परत थोडी फळे खाल्ली. गार पाण्याने हातपाय तोंड धुतले. थंडगार पाणी प्यायले. विचार केला होता इतके लांब आलोत तर उद्याही एक दोन ट्रेल करावेत का पण मनाला आवर घतला आणि सूर्योदय होण्याअअधी घरी येउन पोहचलो. निघताना वळणावळणाची वाट संपल्यावर एका मेक्सीकन उपहारगृहात जेवण केले. जेवणाची चव चांगली होती त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी उत्साह आला. घरी आल्यावर फोटोज पीसीवर अपलोड केले कारण की म्ला खडकाच्या टोकावर बसलेली माणसे व एकूणच सर्व फोटोज पाहण्याची उत्सुकता होती.
आगळावेगळा अनुभव घेतल्याचा एक प्रचंड उसाह मनात साठून राहिला आहे! डोळे मिटले की सारखा हँगिंग रॉक डोळ्यासमोर येत आहे! इतक्या उंचावर नाही तरी अशाच प्रकारच्या जंगलात व डोंगराळ भागा आम्ही राहिलो होतो. क्लेम्सनमध्ये, साऊथ कॅरोलायना राज्यात. त्याची आठवण होत आहे. तिथे घराच्या आजुबाजूने उंच उंच झाडी होती. ते घर तर अगदी "खेड्यामधले घर कौलारू..."

No comments: