Saturday, January 09, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (३)

इथल्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये कॅन्ड फूड आणि फ्रोजन फूड अगदी ठासून भरलेले असते. इथल्या बहुसंख्य लोकांचा मुख्य आहार मांसाहार, ब्रेड, सॅलड व आंबटढाण ज्युस असते. हे ज्युसेस मला कधीच आवडले नाहीत. बरेच जण आवडीने पितात. शाकाहारी लोंकाचे खाण्याचे हालच आहेत इथे, त्यातुनही आमच्यासारखे पोळी भाजी आमटी भात खाणाऱ्यांचे जास्तच. इथली फळे पण मोठी, कांदे बटाटे पण खूप मोठाले, पण चव म्हणाल तर अजिबात नाही. कलिंगड मात्र खूपच आवडले. भारतातल्या सर्व फळांना चव आहे. मी इथले फ्रोझन फूड अजिबात वापरत नाही. बीन्स वापरते ते उपयोगी पडतात. पटकन उसळी करायला. तशा भाज्या सर्व चिरलेल्या मिळतात. पण आम्हाला फ्रेश भाज्या खाण्याची सवय आहे. शिवाय मला बारीक चिरलेल्या पण लागतात. चिरण्यासाठी भारतातला अंजली चॉपर खूपच उपयुक्त ठरला आहे. आधी विळीने चिरायची सवय होती पण विळी पॅक कशी करणार त्यामुळे चॉपर आणला. मुंबई पुण्यामध्ये मला ज्यात त्यात ताजा ओला नारळाचा खव घालायची खूप सवय होती. नारळ आणला की तो खवून फ्रीजमध्ये ठेवायचा की आठवडाभर पुरतो, इथे मी वेगवेगळ्या स्टोअर्समधून नारळ आणून पाहिले पण एकही चांगला निघाला नाही. इथे फोजन किसलेला नारळ मिळतो पण चव नाही. इथे इंडीयन स्टोअर्स मध्ये मिळणाऱ्या गुळाच्या ढेपी पण घरी फोडता येत नाहीत. एक तर लाकडी घरे आणि कोणताही दणदण आवाज घरी केला की ते अमेरिकनांना सहन होत नाही. त्यामुळे या ढेपी मी अपार्टमेंट समोरच्या रस्त्यावर जाऊन फोडल्या आहेत.अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा अपार्टमेंटमध्ये रहायला लागलो. शेजारी एक इंडीयन मैत्रिण पण मिळाली. तिच्या घरासमोर मी एकदा केराचा डबा पाहिला म्हणून मी पण केराचा डबा बाहेर ठेवला. एक दोन दिवस गेले आणि बघितले तर केर जसाच्या तसाच. मग कळाले की इथे केर आपला आपणच बाहेर जाऊन टाकायचा असतो. इथे मोलकरीण नाही. धुणे भांडी करायला लागतात हे माहिती होतेच पण आता केरही टाकणे आलेच! मला साधा एक चमचा पण विसळायची सवय नव्हती. ही मोलकरीण किती काम करते ना! झाडू मारणे, लादी पुसणे, धुणे धुते, भांडी घासते, दळण आणून देते. कपड्याच्या घड्या घालते, बाथरूम घासते. भारतात घरी असो किंवा नोकरीवर आपण जात असलो तरी ही सर्व कामे आपल्याला हातावेगळी करता येतात. इथे डीशवॉशर आहे, २४ तास वीज आहे पाणी आहे मग त्यात काय अवघड आहे? असे विचारल्यावर म्हणावेसे वाटते. इथे या आणि घासा बरं भांडी! १-२ महिने नाही तर वर्षानुवर्षे घासत राहा म्हणजे बघा कामाचा कसा 'उबग' येतो ते. त्यातुनही नोकरी करत असले तर या घरकामचे एवढे काही वाटत नाही. कारण घरी आल्यावर वेगळेपणा आल्याने जरा उत्साह येतो हे अनुभवाने सांगते. पण तुम्ही घरी असाल, आत्ता घरीच आहे. घरी असून जर ही घरकामे केली की एक प्रकारचा खूप कंटाळा साचून राहतो आणि तोचतोच पणा खूप येतो. रांधा, वाढा, उष्टी काढा, असेच सारखे वाटत राहते. आपल्याकडे आपली आई, आजी हेच करत आल्या आहेत. खरे तर त्यांनाही हे काम दिवसभर पुरवत असेल. शिवाय पुर्वी बाहेर खाणे पण नव्हते. सर्व घरीच करायचे. अगदी तसेच इथेही आहे. भारतीय पदार्थ पटकन कुठेही उपलब्ध नसल्याने घरी करा आणि खा.
इथे माझ्या ओळखीच्या अमेरिकन बाईकडे एक मेक्सीकन कामाला येते. या अमेरिकन बाईला ३ मुले आहेत. ती मेक्सीकन बाई महिन्याचे २०० डॉलर्स घेते. संडास बाथरूम साफ करते, आणि व्हॅक्युमिंग करते आणि महिन्यातून २ दा येते. इथे धुणे घरात असेल तर ठीक आहे. धुणे घरात म्हणजे वॉशर ड्रायर घरात असेल तर धुणे सोपे आहे पण जर का घरी नसेल तर काही वेळेला अपार्टमेंटच्या बाजुलाच ही धुलाई यंत्रे असतात नाहीतर वॉशर ड्रायर असणाऱ्या दुकानातून आठवड्याचे धुणे धुवावे लागते. हेही एक मोठे काम आहे. आठवड्याभराचे सर्व कपडे ३-४ मोठ्या बास्केट मधून भरून त्या कारमध्ये ठेवा. आठवणीने सोप बरोबर घ्या. सुटे पैसे घ्या. सुटे पैसे नसतील तर धुलाई यंत्राच्या दुकानातून घेता येतात. मुले असतील तर त्यांनाही बरोबर न्या. मुलांकरता इथे वेगळ्या 'कार सीट' घ्याव्या लागतात. त्या उचलायला खूप जड असतात. मग मुलांना त्या कार सीटमध्ये ठेवून, कारसीटचे पट्टे लावून त्याना कारमध्ये ठेवा. थंडी असेल तर त्यांना स्वेटर्स, जाकीटे घाला. असा सर्व जामानिमा करून मग धुण्याला जा. तिथे वॉशर ड्रायर मिळून २ तास जातात. मग कपड्याच्या घड्या घाला, बास्केटमध्ये लावून घ्या. आणि मग परत असाच सर्व जामानिमा करून निघा. या धुलाईयंत्र दुकानात अशा मेक्सीकन, व ब्लॅक बायका मी बघितल्या आहेत. आम्ही पण सुरवातीला असेच बाहेर कपडे धुवून आणायचो. युनिव्हरसिटीमध्ये विद्यार्थी असायचे. तेही यायचे धुणे धुवायला. ज्यांच्याकडे कार नाहीत ते बसमधून यायचे. व काही जण कार शेअर करून यायचे. अमेरिकन विद्यार्थी यायचे ते धुणे वॉशर मध्ये घालून कार घेऊन एक चक्कर मारून यायचे. नंतर ड्रायर लावून परत जायचे. काही जणांचे कपडे असेच ड्रायरमध्ये रहायचे. एकदा आमचे धुणे असेच वॉशरमध्ये अडकले होते. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग त्या दुकानात टोल फ्री टेलीफोन नंबर होता. तिथे फोन केला व त्यांनी काही सुचना दिल्या. त्याप्रमाणे केले आणि आमचे धुणे मोकळे झाले.

.....पूढील भाग घेऊन येतेच....

5 comments:

kayvatelte said...

छान लिहिलंय..

rohinivinayak said...

Thanks!!

mvk said...

रोहिणीताई
एकंदर अमेरिकन गॄहिणी जीवना विषयी (खासकरुन भारतीय संस्कृतीत वाढलेल्या) आपले निरीक्षण व अनुभवकथन फारच वाचनीय व मननीय आहे

meenal said...

Hi Rohini,
apratim lihila ahes...tuzi bhasha agdi sahaj ani oghavti ahe..vachtana maja yete....
meenal daftardar...

rohinivinayak said...

MVK and Meenal, Thanks so much for your complements!! ajunahi lihayche aahe mala sarv anubhav. ek ek karat lihin. thanks once again.