Monday, January 04, 2010

मी अनुभवलेली अमेरिका (१)

गवार कितीला दिली गं? ८ रुपये पाव ताई. बापरे, ८ रु. पाव! ७ नि दे ना! ताई न्हाई परवडत, तुम्हाला म्हणून ७.३० रू पाव ने देते. घ्या ताई. माल एकदम चांगला आहे. ताजी भाजी आहे एकदम. असे संभाषण होते ते भारतात. दररोज जर का तुम्ही ठराविक भाजीवालीकडून भाजी घेत असाल तर तुमचा संवाद वाढतो. मुले किती? कोणत्या ऑफीसला जाता? साडी किती छान आहे ताई तुमची असे करत करत तुमच्या जीवनातला भाजी व भाजीवाली हा एक अविभाज्य घटक ठरून जातो. इथे तसे नाही. इथे म्हणजे अमेरिकेत. सर्व दुकानातून भाजी आकर्षकरित्या मांडलेली असते. स्वच्छ सुंदर भाजी. कोणतीही कीड नसलेली. माती न लागलेली भाजी. कोणतीही भाजी तुमची तुम्ही, हवी तशी घेऊ शकता. शक्य वाटल्यास वजनही करून घेऊ शकता. वजन काटे बाजूला असतातच. पैसे देवून बाहेर पडा. इथे पण कॅशिअरशी संवाद होतो, पण तो ठराविकच. hi, hello, how are you? you have a good day. that's it.पुढे पुढे भाजी घेणे खूपच मेकॅनिकल होऊन जाते. जेव्हा आपण पहिल्यांदा अमेरिकेत येतो तेव्हा आपल्याला हा भाजी नामक प्रकार खरेदी करायला खूप छान वाटते, पण नंतर कंटाळवाणा होतो. कितीही कंटाळा आला तरी जावे हे लागतेच नाहीतर आठवडाभर भाजी नाही. भारतात कसे सहज म्हणून चक्कर मारायला बाहेर पडले तरी आपण येताना एक दोन जरुरीपुरत्या भाज्या आणू शकतो. काही ठिकाणी तर टोपलीभर भाजी घेऊन घरी तुमच्या दारात येतात विकायला. इथे अमेरिकेत भाजीची दुकाने काही जवळ नसतात. त्यासाठीच इथे कार लागते. तुमच्याकडे कार नसली तर तुम्हाला कोणीही विचारत नाही तुम्हाला भाजी/किराणा आणायचा आहे का? सुरवातीला लगच्या लगेच तुमच्याकडे कार नसते. त्यातून तुम्ही युनिव्हरसिटीत असाल तर जवळपास किराणामालाची दुकाने असतात. तुम्ही चालतही जाउ शकता. दुकान दूरवर असेल तर बस सर्विस असते, त्यातुनही जाऊ शकता. बसस्टॉप हा काही वेळेला घरापासून थोडा लांब असू शकतो. मग अशा वेळेला घरापासून किराणा माल/भाजीची ने आण करणे कठीण होऊन बसते. कडाक्याच्या थंडीत तर ओझी उचलून जीव जातो तुमचा. चक्क हमाली. नशिबाने तुमची एखादी मैत्रिण/मित्र असेल तर सांगतो आमच्याबरोबर या तुम्ही भाजी आणायला.तर ही भाजी म्हणजे नुसती भाजी नाही तर सर्व सामान दैनंदिन जीवनात लागणारे आणावे लागते. भाजीपाला, फळे, दूध, ज्युस, काही वेळेला पाणी पण विकत आणावे लागते. शिवाय तेल, साखर, चहा, पीठे, मीठ, ब्रश, कोल्गेट, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, यादी बरीच मोठी आहे. पेपरटॉवेल, लहान मुलं असेल तर डायपर, साबण, अजून बरेच काही दैनंदिन जीवनाला लागणारे. ही झाली अमेरिकन स्टोअर्स मधली यादी. इंडीयन स्टोअर्सची यादी वेगळी. हे इंडियन स्टोअर्स जर जवळ असेल तर ठीक. खूप दूर असेल तर एकाच वेळी आठवणीने बरेच सामान आणावे लागते. त्यात डाळी, पिठे यांचे वजन खूप असते ना. त्यातून वरचा मजला असेल तर त्रासदायक ठरते. दूध, ज्युस, पाणी यांचेही ३-४ लिटरचे कॅन असतात ते वाहून आणायचे. कार्टमधून कारमध्ये, कारमधून काढून घरी. वरचा मजला असेल तर वैताग. सध्या आम्ही वरच्या मजल्यावर राहतो. बाहेरून जिना आहे त्यामुळे पायऱ्या कमी आहेत इतकेच. कडाक्याची थंडी असेल आणि बर्फ पडत असेल तर काय छान वाटतयं ना ही ओझी उचलायला. एक तर जाड जाड कोट, स्वेटर्स, मफलर, हातमोजे घालून शरीर वजनदार होते, त्यात ही सामानाची भर! ओझी उचलून मनगट बळकट बनते. जड जड सामानाची ने आण करून ,जिने वर खाली उतरून व्यायाम होतो. ऱ्हदयाचे ठोके वाढतात म्हणजेच श्वासाचा व्यायाम पण छान होतो.मी मुंबईत असताना तर टेलिफोनवरून किराणामालाची यादी सांगायचे. दोन तासात स्वच्छ व नीटनेटके पॅकींग केलेले सामान घरपोच! नाहीतर जाता येता यादी द्या तुमच्या दुकानदाराकडे, माल घरपोच. तुमच्याकडे कार नसेल तर भारतीय किराणामाल तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. ५० डॉलर्सच्या वर बिल असेल तर घरपोच मालाचे वेगळे पैसे घेत नाहीत. पॅकींग चांगले असते. भारतात बाकीचा किराणा सोडला तर भाजीपाला आणावाच लागतो. मुंबई मध्ये असाल ट्रेनच्या धक्याबुक्यातून पटकन फलाटावर उतरून घरी जाता जाता भाजी. पुण्यात असाल तर प्रचंड गर्दीतून कसरत करत भाजी आणायला लागते. धूळ व धुर असतोच सगळीकडे पसरलेला. पण भाजी सोडली तर किराणा, दूध, पेपर, घरपोच असते! धुणे भांडी नाहीत! ऑफीसमधून घरी आल्यावर फक्त स्वयंपाक. घरी असाल तर बाकीची दमणूकही नाही. तसा काही ठिकाणी वीज व पाण्याचा तुडवडा आहेच, तिही एक कटकट असतेच. या सर्वातून मला जाणवले ते असे की भारतात इतर सुखसोयी असल्या तरी हवेतले प्रदुषण, वाहनांचे आवाजाचे प्रदुषण, मुंबईत तर सतत घाम येत असतो, या सर्व गोष्टींनी खूप दमायला होते. इथे बाकीची हमाली कामे करून दमायला होते पण एक प्रकारचा व्यायाम होतो, शिवाय स्वच्छ शुद्ध हवा आणि आपल्याला ही सर्व कामे करायचीच आहेत मग तुम्हाला कंटाळा येवो, बरं नसू देत, किंवा तोचतोचपणा साठून रहू देत. आपल्याला सतत काम करण्यासाठी सज्ज रहायचे आहे त्यामुळे ओघाने सतत तरतरीत रहाने आलेच. मुंबई पुण्यात तर संध्याकाळच्या स्वयंपाकालाही बायका मिळतात. ऑफिसमधून आले की स्वयंपाक तयारच असतो. मी माझ्या मैत्रिणीकडे बघितले आहे की स्वयंपाकाला बाई संध्याकाळची. शिवाय सकाळी ६ लाच मोलकरीण हजर. धुणेभांडी केरवारे करून ७ लाच घर एकदम चकाचक. असो.


.....पूढील भाग घेऊन येतेच....

3 comments:

Truth or Dare said...

खुप छान लेख आहे....पुन्हा पुन्हा वाचायला......जसं भाजी घेतल्या सारख....

अनिकेत said...

छान लेख. अमेरीकेची गोडवी गाणारे लेख वाचुन खरं तर कंटाळा आला होता. लिहा पण जे रिअलिस्टीक आहे ते पण लिहावं असं मला तरी वाटतं जे तुम्ही केलं आहे आणि त्याचबरोबर भारतातील त्रुटीही दाखवल्या आहेत.

तुमचा ह्या मालीकेतील पुढील भाग हे सुध्दा असे बायस्ड न रहाता रिअलिस्टीक असतिल अशी आशा करतो

rohinivinayak said...

truth or dare, Aniket, thanks a lot!!!