Friday, January 08, 2010

इंग्रजीचा वर्ग

मेथॉडीस्ट चर्चमध्ये कॅथेलीन नावाची ७० वर्षाची बाई इंग्रजीचा वर्ग घ्यायची. हसत खेळत वर्ग चालायचा हा. या इंग्रजी वर्गाची सर्वात प्रमुख बाई बॉबी ८५ वर्षाची आहे. पाच सहा वर्ग आहेत. या इंग्रजी शिकणाऱ्या वर्गांमध्ये प्रामुख्याने चिनी, कोरीअन, टर्कीश, पाकिस्तानी या देशातील विद्यार्थ्यांच्या बायका होत्या. या बायका त्यांच्या मुलांना पण घेऊन यायच्या. या चर्चमध्ये त्या बायकांना इंग्रजी नीट शिकता यावे याकरता तात्पुरती बेबीसीटर्सची सोय केलेली असते.मी व माझी एक श्रीलंकन मैत्रीण रेणूका या मुलांचे बेबीसिटींग करायचो. (अर्थातच वर्क परमिट होते म्हणून). ही मुले आमच्याकडे राहायची नाहीत. एक तर यांना बेबीसीटर्सकडे राहायची सवय नसते जशी अमेरिकन मुलांना जन्मापासूनच असते. आम्हाला खूप वैताग यायचा, एक तर त्या मुलांना इंग्रजी बोललेले कळायचे नाही आणि खूप रडायची ती मुले. त्यांना आई दिसायची नाही व खूप कावरीबावरी व्हायची. अशा वेळी मग त्या बायका मुलांना घेऊनच इंग्रजी वर्गात बसायच्या, मग आम्ही पण त्या वर्गात उपस्थित राहायचो.हा इंग्रजीचा वर्ग असायचा आठवड्यातून दोन दिवस दोन तास. एका दिवशी एक धडा. त्या धड्यातील सर्व वाक्ये एकेकीने वाचायची. प्रत्येकीचे उच्चार वेगळे. या सर्व बायका इंग्रजी वाक्यांच्या खाली त्यांच्या भाषेतून इंग्रजी उच्चार लिहून घ्यायच्या. जसे मराठीतून ("माय नेम इज" याप्रमाणे) इंग्रजी शिकवताना शिकवणे कमी व गप्पा जास्ती. कॅथेलीन तिच्या नातवंडांची, पतवंडांची छायाचित्रे दाखवायची. प्रत्येक विद्यार्थिनीची चौकशी करायची.
इंग्रजी शिकवताना इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये एकदा साडीचा विषय निघाला. प्रत्येकीने साडीबद्दल खूप उत्सुकता दाखवली व मला विचारले की " तू आम्हाला साडी कशी नेसायची हे शिकवशील का?" कॅथेलीनच्या वर्गात ७-८ विद्यार्थिनी होत्या. प्रत्येकीलाच उत्सुकता आहे म्हणल्यावर एके दिवशी "साडी नेसण्याचा दिवस" घोषित केला. एका चीनी बाईकडे तिने भारतातून आणलेल्या ३-४ साड्या होत्या, त्याप्रमाणेच मॅचिंग पेटीकोट व ब्लाऊज पण होते. २ चिनी मुलींना साड्या नेसवल्या. नंतर लगेच साडीमधले छायाचित्रणही झाले. एका कोरिअन बाईला शर्ट पॅन्ट वरच साडी नेसवली. त्यातील पाकिस्तानी बाईने माझ्याकडून ३-४ साड्या सेट करुन घेतल्या. (सेट करून घेतल्या म्हणजे लहान मुलींची "कल्पना" साडी असायची त्याप्रमाणे). सेट केल्या म्हणजे निऱ्यांना व पदराला पिना लावलेल्या तिने तशाच ठेवल्या. साडी नेसणे शिकवल्याबद्दल या सर्व बायकांनी मिळून माझे आभार मानले. साडीबद्दल इतकी उत्सुकता दाखवल्याबद्दल मला तर खूपच छान वाटत होते.
एकदा कॅथेलीनने आम्हाला तिच्या घरी ख्रिसमस पार्टीला बोलावले. तिथे ८५ वर्षाची "बॉबी" व तिची १०२ वर्षाची आई "जुली" पण आली होती. ख्रिसमसचे झाड सुंदर सजवले होते व त्या झाडाखाली आम्हाला द्यायच्या भेटवस्तू ठेवल्या होत्या. रंगीबेरंगी व आकर्षक कागदी पिशव्यांमध्ये भेटवस्तू व त्या पिशव्यांमध्ये एकेकीच्या नावाची चिठ्ठी. प्रत्येकीला वाटले की आपल्याला काहीतरी वेगळी भेटवस्तू आहे, पण सगळ्यांच्या भेटवस्तू एकसारख्याच होत्या. नंतर सगळे मिळून स्मरणशक्तीचा खेळ खेळलो. स्मरणशक्तीच्या खेळात तिच्या घरांतील फक्त वस्तूंची नावे घ्यायची होती.
जेवणामध्ये सलाड, सँडविच, चॉकलेट केक, ज्युसेस, सुकामेवा, बटाटा चिप्स, आल्याची वडी (भारतीय नाही), कुकीज असे होते. आम्ही पण सर्वांनी कॅथेलीनला भेटवस्तू दिल्या. कॅथेलीनने प्रत्येकीच्या नवऱ्याला जेवण बांधून दिले."ख्रिसमस सुखाचा जावो" अशा शुभेच्छा देऊन एकमेकींचा निरोप घेतला. पार्टी सकाळी ११लाच होती. त्यादिवशी मायनस ५ अंश सेल्सिअस तापमान व कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल असे काळेकुट्ट आकाश भरून आले होते. असे पावसाळी वातावरण मला खूपच आवडते त्यामुळे ही पार्टी माझ्या कायमच्या लक्षात राहिली.

2 comments:

Vijay Manohar Deshmukh said...

छान लिहिलत, पण अर्धवटच वाटलं. असो... शुभेच्छा पुढच्या लिखाणाला

rohinivinayak said...

thanks for comment!