Wednesday, October 14, 2009

माझ्या आठवणीतली दिवाळी





दिवाळी जवळ आली की आमच्यात एक प्रकारचा उत्साह संचारायचा. आमच्या घरादाराचे रंगरूप उजळायचे. सर्वात प्रथम म्हणजे घराला रंग. घरामध्ये एक भली मोठी लाकडी मांडणी व दुभत्याचे कपाट होते, लाकडी पाट होते, तेही रंगवले जायचे. मग घरातल्या प्रत्येक वस्तूची साफसफाई. त्यावेळी पितळेचे डबे असायचे ते चिंचेने घासून लखलखीत व्हायचे. फरशी पण धो धो पाण्याने धुतली जायची. ही सर्व घराची प्राथमिक साफसफाई झाली की मग वाण्याची लांबलचक यादी, कारण आई मोठ्या उत्साहाने व आनंदाने लाडू चिवड्यापासून ते अगदी अनारसे कडबोळीपर्यंत सर्व पदार्थ करायची आणि ते सुद्धा मुबलक प्रमाणात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पदार्थ करत बसायचो, मग त्याचा सुटणारा घमघमाट व प्रत्येक पदार्थाची चव पाहणे.


नंतर बाकी सर्व खरेदी. पणत्या, रांगोळी, भरपूर रंग, पणत्या भिजत घालणे, त्याकरता लागणाऱ्या वाती करून ठेवणे. पणत्याही भरपूर लागायच्या. पुढील व मागील दारी तीन पायऱ्यांवर प्रत्येकी चार. डावीकडे व उजवीकडे दोन याप्रमाणे. फाटकावर चार. कोयनेलच्या कुंपणात एक, जाईच्या वेलीशेजारी एक, मातीच्या किल्ल्यात एक, पेरूच्या, पपईच्या, केळीच्या झाडांजवळ एकेक. आई पूर्ण अंगण शेणाने सारवून देई. अंगण साफ करण्यासाठी झाडू खराट्याची पण नव्याने खरेदी व्हायची. आकाशकंदील तर चांदणीचाच आवडायचा आम्हा दोघींना. भरपूर फटाक्यांची खरेदी झाल्यावर त्याची आमच्या दोघींच्यात समान वाटणी. दिवाळीच्या काही दिवस आधी आमचे भाऊ आमच्या अंगणात एक सुरेखसा मातीचा किल्ला बनवून द्यायचे. सर्व तयारीनिशी दिवाळीचे स्वागत करायला सज्ज राहायचो.



दिवाळीच्या दिवशी भल्या पहाटे कुडकुडत उठून एकीकडे रेडिओवर पुणे केंद्रावर प्रसारित होणारी नरकासुराची गोष्ट ऐकत तांब्याच्या बंबातील कडकडीत पाण्याने साग्रसंगीत अंघोळ व नट्टा पट्टा करून अंगणात ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत बसायचो. आमच्याकडे खरी मजा असायची ती भाऊबीजेची. खूप दणक्यात व्हायची भाऊबीज. आमचे आठ मामा व त्यांचे कुटुंब मिळून ३५ ते ४० जण असायचे. स्वयंपाक पण अगदी साग्रसंगीत. ओल्या नारळाची पाटावरवंट्यावर वाटलेली चटणी, बागेतल्या अळूची भाजी, बटाट्याची भाजी, तळण, पुऱ्या, वरणभात व घरच्या चक्क्याचे बनवलेले श्रीखंड. आमच्याकडे पाट भरपूर होते त्यामुळे पाटावर बसून पुढे मोठे ताट, वाटी, फुलपात्र, तांब्या अशा थाटात पंगती होत असत. पिण्यासाठी थंडगार पाणी मोठ्या रांजणातले. जेवणानंतर विडे खाणे. आमच्याकडे एक स्टीलचे बदक होते. त्याच्या पोटात विड्याची पाने व पाठीत लवंग, सुपारी, चुना असे ठेवलेले असायचे. बदकाचे पंख उघडताना त्याची मान आधी वळवावी लागत असे. विडा करून घ्यायला प्रत्येकाकडे ते बदक फिरत असे.



जेवणानंतर मुख्य कार्यक्रम ओवाळण्याचा. हा कार्यक्रम २-३ तास चाले. आधी आई (सर्वात धाकटी) तिच्या आठ भावांना ओवाळायची मग आमच्या भावंडांचा ओवाळण्याचा कार्यक्रम. त्यात आमच्या बरोबरीचे भाऊ मजा करायचे. एक भाऊ ओवाळताना ताम्हणाकडे पाहून त्याप्रमाणे त्याचे तोंड गोल गोल फिरवायचा. मग आम्ही बहिणीपण मुद्दामून उलट्या दिशेने ताम्हण फिरवायचो. एक भाऊ १०/१० सुटे पैसे करत २-३ रुपये ओवाळणीत घालायचा. एक भाऊ ओवाळताना ओवाळणीची उगाचच शोधाशोध करायचा. पॅंटच्या खिशात बघ, शर्टच्या खिशात बघ. त्याने भाऊबीजेसाठी तयार केलेली सर्व पाकिटे पाटाखाली लपवलेली असायची. मग आमची सगळ्यात मोठी मामी ओरडायची. उरका लवकर तुमचे ओवाळण्याचे कार्यक्रम. फटाके उडवायचेत ना! मग सर्वांचे मिळून उरलेले सर्व फटाके उडवायचो. एक दोन तास धडाडधूम!


दुसऱ्या दिवशी जरा उशीराने उठून चिवडा खाणे कार्यक्रम. मोठाल्या परातीत चिवडा, त्यावर बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर व खवलेला ओला नारळ. नंतर आम्हा सर्व बहिणींची खरेदीसाठी तुळशीबागेत फेरी खास भाउबीजेच्या जमलेल्या पैशातून. अशा रितीने दिवाळीचा मनमुराद आनंद लुटायचो.

7 comments:

Mahendra said...

फारच लवकर संपवलं हो पोस्टं. एखादा सिनेमा क्लायमॅक्स वर जावा, आणि लाईट जावी तसं झालं.. बाकी पोस्ट जमलंय मस्तं.. म्हणुनच कॉमेंट टाकतोय. राग नसावा..

Mugdha said...

खुप छान झालाय लेख!! मस्तं लिहिलंयस..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

अरविंद said...

खुप छान.....मस्तं झालाय लेख

rohinivinayak said...

Mahendra, Mugdha, Arvind chaudhari, abhiprayabaddal anek dhanyawaad!!!

Shyam said...

सहज एक दीप पेटे
उजलु दे प्रकाशु
मनाचिये अंधाराचा
होवू दे निराशु !

PRAJAKTTA said...

ekdum masta diwali rangavlis Rohini...mazya pan lahanpanicha chitra ubha rahila dolyasamor...amche bhau pan ashich maja karayche...eheh..maja hoti...ani sarvaat avadlela mhnje chiwda ani tyavar kanda ani khobra....slurrppp...ekdum famous dish hoti diwali chi saglya bhavandan madhe basun ekach taatat khaychi :D..thnx for the post..maja ali vachtana

rohinivinayak said...

Shyam, prajaktaa, thank you so much!