Friday, October 23, 2009

.......आणि माझे मन भूतकाळात गेले......

ऑर्कुटवरच्या माझ्या मित्रमंडळींच्या यादीत एक काका आहेत. मी त्यांना अजिबात ओळखत नाही. त्यांची friend request जेव्हा मला आली तेव्हा common friends बरेच होते म्हणून मी ती स्वीकारली. त्या दिवशी त्यांच्या ऑर्कुट अल्बममध्ये काही छायाचित्रे पाहिली, आणि मी पाहतच राहिले. अय्या! ही तर दिप्ती, आणि ही तिची मुलगी मधुरा! किती गोड दिसत्ये मधुरा! छायाचित्रे मंगळागौरीची होती. लगेच काकांना स्क्रॅप लिहिला की दिप्ती व मधुरा तुमच्या ओन लागतात. त्यांनी त्वरित उत्तर पाठवले की दिप्ती ही त्यांची धाकटी भावजय व मधुरा ही त्यांची पुतणी असे नाते आहे. त्यांच्याकडून लगेच दिप्तीचा दूरध्वनीक्रमांक घेतला.

ट्रिंग ट्रिंग!! लागत का नाहीये फोन! परत एक दोन वेळा प्रयत्न करूनही लागला नाही. घरात कामे बरीच पडली होती, ती थोडी आवरली, बघू आता तरी लागतो का फोन म्हणून नंबर फिरवला आणि तिकडून आवाज आला हॅलो! कोण बोलतयं. तोच टोन! अगं दिप्ती मी रोहिणी गोरे बोलत्ये! ओळखलेस का मला? "अगं रोहिणी तू! आणि हसायला सुरवात. अगं दिप्ती what a pleasant surprise! मग घडाघडा बोललो. तु कशी आहेस, मी कशी आहे. तिने विचारले कशी दिसतेस तू गं! बारीक झालीक की जाड? तिने पण तिच्या मुलीची व नवऱ्याची कुशाली दिली. बोलता बोलता ऑफिस आठवतयं का? हो गं! समोसे आठवतात का? आणि BM? (branch manager) हो. गं आणि खूप खूप हासलो. आजकाल दिलखुलास हासणे पण दुर्मिळ झाले आहे. आणि लक्ष्मी (आपली प्रेमळ सासू) आठवते का? .... बोलता बोलता माझे मन भूतकाळात निघून गेले.......

दिप्ती व मी एकाच ऑफिसमध्ये होतो. नंतर काही वर्षाने मी नोकरी सोडली. नंतर तिने तिची राहती जागा बदलली. काही दिवसांनी मी पण दुसऱ्या शहरात गेले. नंतर तिथून अमेरिकेत आले. अशा या सांसारिक व्यापामुळे संपर्क साधता येत नव्हता. किती वर्षे झाली! त्या दिवशी जवळ जवळ १२ ते १५ वर्षाने दिसली दिप्ती मला. संपर्कात नसलो तरी आठवणी तर कायम असतातच ना!

मी व दिप्ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काही वर्षे काम करत होतो. ऑफिस गावातच होते. त्या कंपनीची ती एक शाखा होती. आमच्या बरोबर अजून एक मैत्रिण होती लक्ष्मी नावाची. दिप्ती माझ्याहून ५ वर्षाने मोठी ताईसारखी! लक्ष्मी व माझ्यात २० वर्षाचे अंतर होते. मी त्या कंपनीत नव्यानेच लागले होते.

आमची ऑफिसची वेळ होती ९ ते ५. आम्ही तिघी एकाच गावात होतो व आफीस त्याच गावाच्या एका औद्योगिक वसाहतीत होते. आम्ही तिघी वेगवेगळ्या रिक्षेने यायचो ऑफिसला कारण की बसला नेहमीच तोबा गर्दी असायची. नवाच्या ठोक्याला हजर रहायचे असे असले तरी पण कधी कधी ९.०५, किंवा ९.१० व्हायचेच. कारण की सकाळच्या वेळेत वाहतुक मुरंबा हा ठरलेलाच असतो सगळीकडे. आमच्या बरोबरच बी. एम. पण ऑफीसमध्ये प्रवेश करायचे. एकमेकांना hi, hello, good morning चे सोपस्कार पार पाडून बी. एम. सगळ्यांना कामे द्यायचे व चहा घेऊन कंपनी व्हिजिटकरता बाहेर पडायचे. सकाळ दुपारचा चहा, अगदी मध्ये जरी कोणी जादाचा चहा घेतल्ल तरी तो कंपनीतर्फे होता. चहाचा मसाला घातलेला व आलं घातलेला गरम गरम चहा घेत एकीकडे फायली हाताळणे, दिलेल्या कामांवरून एक नजर, कुणाची साडी नवीन असेल तर "मस्त आहे गं साडी, केव्हा घेतलीस? असे करत करत बी. एम पण घाईगडबडीत, ब्रीफकेस घेऊन, घड्याकाकडे एक नजर टाकत बाहेर पडायचे. कंपनीच्या काळ्या कारमध्ये बी. एम बसले आणि कार सुरू झाली रे झाली की आमच्या तिघिंचा पहिला प्रश्न म्हणजे डब्यात काय आणले आहे! कुणाच्या डब्यात जर चमचमीत काही असेल तर आम्हाला लगेच भूक लागायची. तशी आम्हाला ११ वाजता भूक लागायचीच. तेव्हा गरम गरम सामोसे मागावले जायचे व त्यानंतर चहा हवाच!

एकदा आम्ही असे ठरवले की महिन्यातून एकदा एकीने तिघींचाही डबा आणायचा. त्यादिवशी इतर दोघींनी डबा आणायचा नाही. त्यात मी एकदा बटाटेवडे, एकदा साबुदाणा खिचडी, दिप्तीने ओली भेळ आणली होती. लक्ष्मीने एकदा अडाई व एकदा इडली सांबार चटणी असे आणले होते. खूप मजा आली होती. दुपारच्या जेवणानंतर आम्ही आमचे जेवणाचे डबे ऑफिसमध्येच घासून विसळून उपडे कर्रून ठेवायचो. निघेपर्यंत डबे वाळायचे व फ्रेश रिकामे डबे घरी न्यायचो. बाकी लोणची, कोरड्या चटण्या यांच्या बरण्या पण ऑफीसमध्येच आणून ठेवल्या होत्या. ऑफीस सुटल्यावर आम्ही तिघी एकत्रच निघायचो. बसने जायचो. शेवटचा बसस्टॉप ऑफिसजवळ त्यामुळे बसायला जागा मिळायची. ५.१० ची बस ठरलेली असायची. ऑफिसमधून वरच्या बसस्टॉपला बस गेलेली दिसायची. ४.३० हळू हळू काम आवरते घेऊन टेबल आवरून निघायचो. निघताना पण फ्रेश होऊन निघायचो. साबणाने स्वच्छ हात व चेहरा धुऊन पावडर कुंकू करून निघायचो. काम बरेच असल्याने दमणूक खूप व्हायची.दुपारच्या जेवणाच्या वेळी जेवणानंतर फलाहार घ्यायचो. आमचे ऑफीस औद्योगिक वसाहतीत असल्याने तिथे फळवाले बरेच यायचे. आम्ही मग द्राक्षे, संत्री, मुसंबी घेऊन खायचो. शिवाय उन्हाळ्यात काकड्या, बर्फाचे रंगीत गोळे, कुल्फी खायचो. काम करता करता काही वेळा अधून मधून गप्पा चालायच्या. मी साडीपेक्षा जास्त पंजाबी ड्रेस घायालचे तेव्हा लक्ष्मी मला नेहमी म्हणायची, रोहिणी अभी भी कॉलेज गर्ल जैसी दिखती है रे. और बिंदियाँ भी कितनी छोटी लगाती है. ती कुंकू नेहमी ठसठशीत लावायची. मला एका जागी बसून खूप बोअर व्हायचे तेव्हा मी काही कामा निमित्ताने उठबस करायचे. फाईल ठेवायला काढायला किंवा पाणी प्यायला उठायचे. दिप्ती व लक्ष्मी काही हवे असेल तर ऑफिस बॉयला सांगायच्या. आमच्या ऑफिसमध्ये २ जुळी मुले ऑफीस बॉय म्हणून होती. राजा व राजू.

आमचे बी. एम. पण मस्त होते. त्यांच्याकडे कोणी कस्टमर आला भेटायला ऑफिसमध्ये की त्याला चहा व बिस्कीटांची ऑर्डर असायची. आम्हाला तिघींनाही बाहेर चहा बिस्कीटे यायची. काही वेळा cold drink त्यात दिप्ती व लक्ष्मी नेहमी मँगोला घेत असत. माझे thumps up ठरलेले. thumps up नसेल तर gold spot. दिप्ती बरेच वेळा आमच्या दोघींकरता गजरे आणायची. मी त्या दोघींचे मजेने गालगुच्चे घ्यायची. दिप्ती मला म्हणायची रोहिणी तू गालगुच्चे घेऊ नकोस हं . बारीक दिसलीस तरी तुझ्यात ताकद खूप आहे हं! लक्ष्मी नेहमी हसतमुख असायची. आमच्या तिघींचा अजून एक कार्यक्रम ठरलेला असायचा दर महिन्यात. तो म्हणजे पाणीपुरी खाणे. दर महिन्यात एकीने तिच्यातर्फे सर्व काही खायला घालायचे. आधी पाणीपुरी, मग शेवबटाटापुरी, नंतर रगडा पॅटीस व सर्वात शेवटी एकेक मसाला पुरी.

माझी एक लाल रंगाची सिल्कची साडी होती. त्या लाल रंगाची शेड थोडी काळपट रंगाकडे झुकली होती. दिप्तीची एक लिंबू कलरची साडी होती. या एकमेकींच्या साड्या आम्हाला खूपच आवडायच्या. एकदा ठरवून आम्ही एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आवडती साडी दुसरीच्या अंगावर पाहून खूप छान वाटत होते. त्या दिवशी सगळ्यांचे चेहरे गोंधळ्यासारखे वाट होते! लक्ष्मी (तमीळ मैत्रिण) म्हणाली देख अब ऐसाही होगा, सब तुम दोनोंकी तरफ ही देखेंगे. कामानिमित्ताने कोणी बोलायला आले आमच्याशी की त्यांचे गोंधळलेले चेहरे पाहून आम्ही दोघी एककेकींकडे पाहून गालातल्या गालात खूप हास्त होतो.

आमच्या ऑफीसमधले सेल्समन पण खूप छान होते. ते नेहमी आम्हाला तिघींना उपहारगृहात पार्टी द्यायचे. त्यांचा पगार , पगार प्लस कमीशन असा होता. कोणाला जास्त कमीशन मिळाले की लगेच आम्हाला पार्टी. त्यात नॉर्थ इंडीयन नान, कुर्मा, टोमॅटो किंवा व्हेजिटेबल सूप, आयस्कीम, कोल्ड ड्रिंक असायचे. खूप मजा यायची. हे सर्व आठवले की असे वाटते किती छान दिवस होते ते. अशा एक ना अनेक आठवणी!! दिवसभर रेंगाळत होत्या माझ्या मनात त्यादिवशी!! तो दिवस असाच छान गेला आठवणींमध्ये.

No comments: