Friday, October 30, 2009

एका गोल्डनज्युबिलीचा आगळावेगळा कार्यक्रम....(1)

आईबाबांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या लग्नाची गोल्डन ज्युबिली धूमधडाक्यात व थाटामाटात साजरे करायचे ठरले. आम्ही दोघी मुली, भाच्चे, भाच्या, जावई, भाचेजावई, व डझनभर नातवंड असा प्रचंड गोतवाळा होता.

हॉलवर आल्यावर आईबाबांना वेलकम करण्यासाठी फुलांच्या पायघड्या, त्यांना ओवाळण्यासाठी तबकात ५१ज्योती, शिवाय केक, फुगे, फुलांची सजावट, त्यांचे अनेकविध फोटो, काही मुलींबरोबर, तर काही जावयांबरोबर काढलेले, लग्नातले कृष्णधवल फोटोज आकर्षकरित्या एका टेबलावर मांडले होते. या बरोबरच काहीतरी वेगळे केले पाहिजे असा हिनीचा म्हणजेच त्यांच्या मोठ्या मुलीचा आग्रह होता. अमेरिकेवरून ती खास आईबाबांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भारतात आली होती. आईबाबांना वेलकम केल्यावर ते एका सुंदर सजवलेल्या सोफ्यावर स्थानापन्न झाले. त्यांच्या समोर विशिष्ट कोनातून व विशिष्ट पद्धतीने खुर्चांची मांडणी केली होती. आईबाबांना सहजसमोर दिसतील अशी नातवंडे बसली होती. मुलांच्या डावीकडे आईबाबांच्या भाच्या व भाच्चेसूना, उजवीकडे भाचे व जावई मंडळी. मागे आईचे भाऊ, बाबांच्या बहीणी, आईचे दीर जाऊ बसले होते.

हिरवीगार साडी सावरत सावरत हातात माईक घेऊन हिनी आली. सर्वांकडे तिने एक कटाक्ष टाकला, स्मित हास्य केले आणि बोलायला सुरवात केली.

" आज आपण सगळे इथे जमलो आहोत ते एका खास कारणासाठी. आज आईबाबांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. तर मग आपण खास ठरवलेल्या कार्यक्रमाला सुरवात करू या का! पहिल्याप्रथम मी माझ्या लाडक्या बहिणीला बोलावू इच्छिते "जनाला" जना कुठे गं? "अगं ती काय! कोपऱ्यात जाऊन मोबाईलवर बोलत्ये! इति घनाताई (हिनी व जनाची लाडकी मामेबहीण)

"हो हो. आले गं! एक मिनिट. जनाने आंबा कलरची साडी नेसली होती. तिने माईक हातात घेतला व आईबाबांबद्दल इतके काही भरभरून बोलली की काही क्षणांकरता सर्वांचे डोळे पाणावले.

हिनीची परत एकदा अनाउन्समेंट. आता मी निमंत्रित करते घनाताईला. घनाताई ये गं स्टेजवर. ती बोलण्या आधी मी तिच्याबद्दल काही सांगते. आमच्या दोघींपेक्षा घनाताईच खरी आईची मुलगी शोभते. आईसारखीच गोरी गोरी पान! टापटीप, व्यवस्थितपणा अगदी आईसारखाच! बोल गं घनाताई. घनाताईने आईबाबांबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. आता नंबर आहे आईबाबांचा सर्वात लाडका भाचा हासदादाचा. अमिताभ स्टाईल हासदादा उठला. माईक हातात घेऊन बोलण्या आधी त्याने आईबाबांना वाकून नमस्कार केला. नंतर त्याने त्याचे आईबाबांबद्दलचे मनोगत व्यक्त केले.

दुसरा भाचा आला आणि म्हणाला की मी काही बोलणार नाही. माझ्या भावना मी काव्यातून व्यक्त करतो. काव्यामध्ये आमच्या दोघींची, जावयांची व नातींची अक्षरे पण गुंफली होती. सगळ्यांच्या आश्चर्यचकित मुद्रा!! अरे कुंदा दादा तू काव्य? कधी? कुठे?

आता टर्न होती जावई व भाच्चे जावयांची. जावई म्हणाले आम्हाला काही बोलता येत नाही बुवा! आम्ही किनई अगदी साधीसुधी माणसे! घनाताईच्या नवऱ्याने हातात माईक घेतला. सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे. त्यांनी बोलायला सुरवात केली व एका वाक्यात गुंडाळले. आमच्या सासुबाई व सासरे इतके काही प्रेमळ आहेत, इतके काही प्रेमळ आहेत की शब्दच नाहीत बोलायला. अशा रितीने सर्व जावयांनी पळ काढला! बोलून चालून जावईचे ते!

आईबाबांची नातवंड हिनीमावशीकडे रागारागाने बघत होती. ही आम्हाला का बोलवत नाहीये!? त्यांच्या चेहऱ्यावरचे रागाचे भाव पाहून हिनी गालातल्या गालात हसत होती. शेवटी म्हणाली एकदाची या रे पोरांनो, बोला काय बोलायचे ते तुमच्या आज्ज्जीआजोबांबद्दल. नातू म्हणाले आज्जीसारखा खाऊ कुणालाच बनवता येत नाही म्हणून आम्ही आईच्या मागे सारखा लग्गा लावतो व आजीकडे येतो खाऊ खायला. नाती म्हणाल्या गोष्टी सांगाव्यात तर त्या आजोबांनीच. आमच्या बाबांना अजिबात गोष्टी सांगता येत नाहीत.

आता खरी टर्न होती भाचेसुनांची. पण त्या म्हणाल्या इथे नको. आम्ही घरी आल्यावर सांगू आमच्या खाष्ट सासुबद्दल काय वाटते ते! असे म्हणल्यावर आईचा चेहरा थोडा पडला. हिनी आईला म्हणाली अगं आई त्या मजा करत आहेत गं तुझी!

कार्यक्रमाच्या शेवटी हिनीने बोलायला सुरवात केली. तिने तिच्या आईबाबांबद्दलच्या भावना इतक्या छान रितीने व्यक्त केल्या की सगळे एकदम प्रभावित झाले.

" आता सर्वांनी जेवायचे आहे. हा कार्यक्रम इथेच संपलेला नाहीये. जेवणानंतर अजून एक खास कार्यक्रम आहे, त्याची एक छोटी अनाउन्समेंट करून मी आपला निरोप घेते. नमस्कार!!!

.... ‌सनईचोघड्यांचे सूर निनादत होते... पंगतीची सजावट खूपच उत्तम होती.... आईबाबांच्या जेवणाच्या ताटापुढे सुंदर रांगोळी घातली होती... उदबत्तीचा घमघमाट होता.. जेवणाचा मेनू खास लग्नपंगतीसारखाच होता..... वरणभात, अळूची भाजी, मसालेभात, आम्रखंड पुरी, तळण, बाकीचे पंचपक्वान्न.... ‌सगळ्याजणींनी ठेवणीतल्या साड्या परिधान केल्या होत्या.. ‌साड्यांचे अकेकविध रंग डोळ्यांना सुखावत होते... हिरवा, केशरी, लाल, गडद पिवळा.... विडिओ शुटींग चालू होते.... आईबाबांच्या चेहऱ्यावर सुखसमाधान नांदत होते..... आईबाबांचे सुखीसमाधानी चेहरे पाहून हिनी व जना दोघीजणी खूप खूप सुखावल्या होत्या... गोल्डन ज्युबिलीचा हा सोहळा ठरवल्यापेक्षाही छान झाला होता.....

सीडीचा आधार घेऊन व थोडा कल्पनेचा वापर करून हा लेख लिहिला आहे. प्रत्यक्ष सोहळ्यात हिनी म्हणजे मी रोहिणी काही कारणांमुळे हजर नव्हते.

8 comments:

Mahendra said...

मनःपुर्वक अभिनंदन.. त्यांचं वैवाहिक आयुष्य असेच सुखा समाधानात जाओ हिच इश्वर चरणी प्रार्थना..

tanvi said...

मन:पुर्वक अभिनंदन....आणि शुभेच्छा!!!
लेख छान झालाय....

rohinivinayak said...

mahendra, tanvi abhiprayabaddal anek dhanyawaad!!

mahendra, aapan mazya lekhanala aavarjun abhipray deta he pahun khup chhan vatate. utsah vadhto. anek dhanyawaad!!

Yogi said...

फारच सुंदर आणि वेगळा लेख आहे. मज़ा आली वाचायला. आजी व आजोबाना आमच्या तर्फे शुभेच्छा

rohinivinayak said...

thanks Yogen! tula ha lekh aavadala he vachun khup chhan vatle!

काल निर्णय said...

तुमच्या लेखनकलेस व कौशल्यास पुन्हा एकदा मनःपूर्वक दाद द्यावीशी वाटते. हा लेखही छान जमलाय. विशेष म्हणजे तुम्ही या ह्रद्य सोहोळ्यास प्रत्यक्ष हजर नसूनही शब्दांकन इतकं प्रत्ययकारी झालंय कि माझ्यासारख्यालासुद्धा हा कार्यक्रम जणू आपल्याच घरातला असावा असं वाटून त्यातली भावभावनांची ऊब जाणवली, शिवाय हा कार्यक्रम आपण खूप enjoy करत आहोत असंही वाटत राहिलं. 'स्मृती' च्या अनेक सुंदर आविष्कारांपैकी हा ही एक सुखद, मनाला खूप भावणारा अनुभव. तुमच्या आई-बाबांना साष्टांग नमस्कार व मनःपूर्वक शुभेच्छा! आणि तुम्हालासुद्धा!! खूप छान लिहीताच [अ‍ॅज ऑलवेज :-) ] अशाच लिहीत रहा!!

rohinivinayak said...

तुम्हाला या सोहळ्याचे वर्णन आवडले हे वाचून खूप आनंद झाला. अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद संदीप!

Anonymous said...

:)