Sunday, December 29, 2024

चल चल जाऊ शिणुमाला

 

सिनेमा हा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची मजा काही वेगळीच ! सिनेमा बरोबर आठवणीही असतात. सिनेमा कधी कुठे कसा पाहिला गेलो होतो, कुणाबरोबर गेलो, बघून झाल्यावर चर्चा झाली का, असे अनेक किस्से या सिनेमा पहाण्याच्या कार्यक्रमात असतात. पूर्वी पुण्यात अनेक चित्रपटगृहे होती ती अनुक्रमे विजय, भानुविलास, मिनर्व्हा, प्रभात, श्रीनाथ, अल्का, राहूल, अलंकार , निलायम, नटराज, डेक्कन वगैरे. तीन सहा नऊ बारा हे नेहमीचे शोज आणि याव्यतिरिक्त मॉर्निंग शो आणि मॅटीनीज असायचे. मॉर्निंग शो १० ला सुरू व्हायचे. मॅटीनी १२ वाजता. सिनेमाला जाण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा वेगवेगळ्या. कुणाला ऍडव्हान्स बुकींग केल्याशिवाय सिनेमाला जायचे पसंत नाही तर कुणाला आयत्यावेळी तिकिटे काढून सिनेमा पहाण्यात मजा वाटते.


पूर्वी वर्तमानपत्रातून सिनेमांच्या जाहिराती यायच्या. त्या बघून मग ठरवायचे कोणता पिक्चर पहायचा ते. सिनेमांची तिकिटे खूप पातळ कागदावर छापत असत. ते कागद रंगीत असायचे. पिवळे, लाल, हिरवे, शेंदरी, व काही वेळेला पांढरे. नटराज चित्रपटगृहामध्ये मध्ये शोले दुसऱ्यांना पाहिला होता ७० एम एम पडद्यावर. जय-विरूचे नाणे पडल्याचा आवाज अगदी जवळ ऐकू यायचा, म्हणजे ते नाणे आपल्या पायापाशी पडले की काय असा भास झाला होता. विनयाताई व तिच्या मैत्रिणी ठाण्यावरून आईकडे आल्या तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून शानदार नावाचा संजीवकुमारचा सिनेमा पाहिला होता. त्यात संजीवकुमारच्या खांद्यावर कबुतर येऊन बसते हेच फक्त लक्षात राहिले होते. राहुल टॉकीजला नेहमीच इंग्रजी सिनेमे लागायचे. तेव्हा Towering inferno पाहिला होता. हा सिनेमा पहाताना तर खूप भारावून गेलो होतो इतका आवडला.


निलायम टॉकीज मला खूप आवडायचे. प्रशस्त होते. तिथे आम्ही सर्व भावंडांनी मिळून गोलमाल पाहिला होता. एका मामेबहिणीचे डोहाळेजेवण आमच्या घरी झाले. आईने बरेच बटाटेवडे तळले होते. डोहाळेजेवण झाल्यावर गोलमाल पहायचे ठरले. आईला सिनेमा सुरू झाल्यावर मळमळायला लागले म्हणून आईबाबा घरी परतले. आई खूपच दमली होती. घरी आल्यावर आईला उलटी झाली. आमचा साखरपुडा झाल्यावर मी व विनुने बरेच पिक्चर पाहिले. गंगा जमुना, मधुमती, मेरा नाम जोकर, संगम, बीस साल बाद, आयायटीवरून विनु शुक्रवारी पुण्यात यायचा. शनिवारी आईच्या घरी. वर्तमानपत्रात कोणते सिनेमे लागले आहेत ते पाहून त्याप्रमाणे ठरवायचो कोणता पाहायचा ते.


एका रविवारी अचानक मॅटीनी पहायचा ठरला. मी व आईने वर्तमानपत्र बघितले तर उपहार लागलेला दिसला अलंकार टॉकीजवर. रंजना एनसीसीच्या क्लासला गेली होती. ती घरी आली आणि तिला घेऊनच लगेच रिक्शात बसलो. मी व आई जेवलो होतो. रंजनाचे जेवण डब्यात भरले व सिनेमा पहाता पहाता जेवली. पिक्चर हाऊसफुल्ल होता. ब्लॅकची तिकिटे घेऊन हा सिनेमा पाहीला. आम्ही दोघी बहिणी व आमच्या मैत्रिणी यांना अमिताभ खूप आवडायचा, अजूनही आवडतो. आमच्या घरी एक मैत्रिण तर अगदी रोजच्या रोज यायची. एकदा मिनर्व्हा टॉकीजला अमिताभचा 'अदालत' लागला होता. ती म्हणाली जायचे का आपण? तीनचा शो होता म्हणून लवकरच निघालो. तिकीट काढून मंडईतच थोडा वेळ काढायचा व पिक्चर पहायचा असे ठरवले होते. बसस्टॉपवर गेलो तर एक बस नुकतीच गेली होती. दुसऱ्या बसची वाट पाहतोय तर आलीच नाही. मैत्रिण म्हणाली आपण चालायला लागू. पुढच्या स्टॉपवर गेलो तरीही बस अजून आलेली नव्हती. चालत चालत गेलो तर बसचा पत्ता नाहीच आणि चालता चालता गणेशखिंड रोड ते मिनर्व्हा टॉकीजपर्यंत चालत गेलो होतो! तिकीटे काढली आणि चित्रपट सिनेमा सुरू होऊन काही वेळ झाला होता तरीही उरलेला पाहिला. नंतर मात्र पाय प्रचंड दुखायला लागले. बसचा संप होता त्यादिवशी म्हणून एकही बस जाताना-येताना दिसत नव्हती.
पनवेलला मामाकडे मामेबहीणीच्या लग्नाला जमलो होतो. सर्व भावंडे जमल्यावर तर आमचे पिक्चर पाहणे व्हायचेच. नेहमीप्रमाणे कोणता चित्रपट बघायचा यावर चर्चा सुरू झाली. पनवेलमध्ये गावाबाहेर एक चित्रपटगृह होते. बहुतेक त्याचे नाव ग्यान होते, आणि म्हणे तिथे एक भूत होते म्हणून तिथे जास्त कोणी जायचे नाही. तेव्हा खेलखेलमें लागला होता. मामी ओरडत होती त्या थिएटरमध्ये जाऊ नका, तिथे भूत आहे. आम्ही मामीला म्हणालो अगं मामी भूत वगैरे काहीही नसते गं आणि आम्ही १२-१५ जण आहोत. आम्हाला सर्वांना पाहून भूतच घाबरून जाईल. रात्री ९ ते १२ चा शो होता. खेलखेलमें मध्ये ३-४ खून आहेत. चित्रपट संपला आणि बाहेर पडलो तर काळाकूट्ट अंधार! त्यावेळेला बस वगैरे नव्हती. चालतच गेलो होतो. चित्रपटात नुकतेच खून पाहिले होते आणि मामीचे शब्द आठवले. तिथे जाऊ नका त्या चित्रपटगृहात भूत आहे आणि जाम टरकायला झाले. रस्त्यावरही म्युनिसिपाल्टीचे मिणमिणते पिवळे दिवे. ते सुद्धा जास्त नव्हते. अंधारच अंधार सगळीकडे. चालत पळत एकदाचे घर गाठले आणि सुटकेचा निश्वाः स टाकला.


अमर आकबर अँथनी एकदा पाहिला. दुसऱ्यांना मैत्रिणीला कंपनी म्हणून पाहिला, त्यानंतर तिसऱ्यांनाही तोच! अमर अकबर ऍथनी पाहिल्यानंतर बरेच दिवसांनी मामेबहिणीकडे गेले होते. तिच्याकडे गेले तर तीच कुलूप लावून सर्व मंडळी बाहेर पडत होती. मला म्हणाली अगं बरे झाले तू आलीस. चल आता आम्च्याबरोबर अमर अकबरला. मी म्हणाले काय? अगं नको गं तो पिक्चर मी दोनदा पाहिला आहे. तर म्हणाली की आमच्याबरोबर तिसऱ्यांना पाहा. हीच कथा हम आपके है कौनची. असाच तिसऱ्यांना जबरदस्तीने पाहिला लागला. पुणे स्टेशनच्या रेल्वे क्वार्टर मध्ये एक मामेबहीण रहायची. तिला पण सिनेमा पहाण्याची खूपच आवड. आम्ही सर्व भावंडे मिळून असेच लागोपाट २ पिक्चर पाहिले. रात्रीचा ९ ते १२ तेरे मेरे सपने पाहिला आणि दुसऱ्या दिवशी मॅटीनी शो पाहिला तो होता 'बंबईला बाबू' हा चित्रपट आम्हाला खूप आवडला आणि बाहेर पडल्यावर एकच चर्चा. हे काय? देवानंद सुचित्रासेनचे लग्न दाखवायला हवे होते. सुचित्रा सेन व देवानंदची जोडी किती छान दिसत होती ना! आणि त्या दोघांना कळाले होतेच की आपण भावंडे नाहीत ते. मग काहीतरी करून त्या दोघांचेच लग्न लावायला पाहिजे होते. पूर्ण निराशा झाली. इतका छान चित्रपट आणि शेवट हा असा. दुसऱ्याशी लग्न. त्या नवऱ्यामुलाला कोणीतरी किडनॅप करायला हवे होते अशी आमची चर्चा!


गोखले नगरला रहात असताना आम्ही मैत्रिणींनी 'संगम' पाहिला होता. आयत्यावेळी ठरले. बस करून टॉकीजवर गेलो तर चित्रपट हाऊसफुल्ल होता. पहिल्या रांगेतली काही तिकिटे बाकी होती. विचार केला इतक्या लांबून आलो तर पाहू या. पहिल्या रांगेत बसून पिक्चर पाहणे म्हणजे किती त्रासदायक असते ते त्यावेळी कळाले. मान उंच करून पाहिला लागले. चित्रपटातिल चित्र तर अंगावर धावून आल्यासारखी वाटत होती, पण पिक्चर पहायची हौस केवढी! मी व वंदना गरवार कॉलेजला होतो. इकोनोमिक्सचे महाबोअर २ तासाचे तास बंक केले. कोल्हे बाई शिकवायला होत्या. त्या खूपच बोअर शिकवायच्या. गरवारे कॉलेजच्या एका कॉर्नरला एक दुकान होते तिथे बरेच काही मिळायचे. तिथे आम्ही गरमागरम बटाटेवडे खाल्ले. त्यावर चहा प्यायला. झिमझिम पाऊस पडत होता. त्या पावसात छत्री घेऊन गेलो सिनेमा पहायला प्यार का मौसम. मॉर्निंग शो होता.


काही काळानंतर बरेच वर्षांनी 'दिल तो पागल है' हा असाच बघितला गेला. खरे तर मला शाहरूख खान अजिबात आवडत नाही. डोंबिवलीत आमच्या सोसायटीत रहाणारे श्री नेर्लेकर एकदा आम्हाला म्हणाले चला येताय का पिक्चरला. मी म्हणाले कोणता? दिल तो पागल है. अहो तुमची माधुरी दिक्षित आहे त्यात. पारखी काका-काकू यांनाही विचारले येताय का? लगेच तयार झालो. श्री नेर्लेकर यांनी आमच्या सहा जणांची तिकिटे काढली. जाताना-येताना रिक्शा. रिक्शाचे पैसेही त्यांनीच दिले. इतकेच नव्हे तर मध्यंतरात चहा-सामोसेही खायला दिले. मी व सुषमा नेर्लेकर आम्ही दोघी खूप हासत होतो. नेर्लेकर म्हणाले हासू नका हो. पिक्चर बघा. आम्ही दोघी एकीकडे कुजबुजत होतो आणि हासत होतो. पारखी काकू मात्र मन लावून पिक्चर बघत होत्या. पारखी काका चक्क झोपले होते. सगळ्या सिनेमात मला व सुषमाला ले गई ले गई हा नाच आणि गाणेही आवडले. तरुणीला लाजवले असा आवाज लागला आहे आशा भोसलेचा या गाण्यात !
अकेले हम अकेले तुम हा पिक्चर डोंबिवलीत टिळकला पाहिला. मी विनु अर्चना अपर्णा, अदिती असे गेलो होतो. सर्वांनाच आवडला. ९ ते १२ पिक्चर पाहिल्यावर आम्ही चालत आमच्या घरी आलो आणि नंतर २ वाजेपर्यंत चर्चा करत होतो. कोण चुकले आमिर खान की मनिषा कोईराला. असाच एक पिक्चर आम्ही चौघांनी म्हणजे पारखी काका-काकू व आम्ही दोघे बघितला तो म्हणजे माधुरी दिक्षीत व संजय दत्तचा थानेदार.गर्दी अजिबातच नव्हती. कोणीही कुठेही बसा. तिकिटे पण अगदी आयत्यावेळी काढली. आमच्या घरासमोरच रामचंद्र टॉकीज असल्याने जेवून निघालो ९ ते १२ चा पहायला. यातले गाणे आणि नाच दोन्ही मला आवडले. तम्मा तम्मा दोगे.


डर हा सिनेमा लक्षात राहिला याचे कारण त्या दिवशी खूप उन होते. मॅटीनी होता. येताना खूपच रणरणते उन होते आणि माझे डोके खूपच दुखायला लागले. मळमळायला लागले आणि घरी आल्यावर उलटी झाली. तो सिनेमा डोक्यातून जाता जात नव्हता इतके टेंशन आले होते. सिनेमा बघून खरच खूप घाबरायला झाले होते. गरवारे शाळेत जाता-येता डेक्कन टॉकीज वर बदललेल्या सिनेमाचे मोठे बॅनर दिसायचे. शाळेत असताना आम्ही दोघी आणि आईबाबा दादर मध्ये रहाणाऱ्या मामाकडे गेलो होतो. तेव्हा प्लाझा चित्रपटगृहात सिंहासन पाहिल्याचे आठवते. मामेबहीण व आम्ही दोघी बहिणी मिळून मनोजकुमारचा पूरब और पश्चिम पाहिला. आम्हाला कोणालाच आवडला नाही. सिनेमा अर्धवट पाहिला आणि बाहेरच हॉटेल मध्ये डोसा, इडली खाऊन घरी परतलो.
अमेरिकेतल्या क्लेम्सन शहरात एक सिनेमा पाहिला तो म्हणजे लॉर्ड ऑफ द रिंग. सुधीर जोशी आणि आम्ही दोघे गेलो होतो. ऍस्ट्रो नावाचे थिएटर होते. आम्हाला दोघांना हा सिनेमा अजिबातच आवडला नाही पण लक्षात राहिला तो एका कारणाने. सुधीर व राजेश हे दोघे रूममेट होते. राजेश नेहमी पास्ताचे कौतुक करायचा. मी त्याला सांगितले की मला एकदा दाखव ना पास्ता कसा बनवायचा ते. तर म्हणाला तुम्ही सिनेमा बघून या तोवर मी पास्ता बनवून ठेवतो. त्याने इंडियन स्टाईल फोडणीत भाज्या घालून तिखट, मसाला, घालून पास्ता बनवला होता आणि तो मला खूपच आवडून गेला. नंतर मी बरेच वेळा वन डिश मील पास्ता करायचे. सिनेमा व त्यानंतर आयता पास्ता व नंतर बनाना स्प्लिट आईसक्रीम खाल्याने खूप बरे वाटले होते.


डोंबिवलीत असताना बरेच सिनेमे पाहिले. अर्चना, तिच्या बहिणी, अर्चनाची आई, शेजारी रहाणाऱ्या पारखी काकू सर्व मिळून जायचो. उन्हाळ्यात वाळवणे करायचो. ती झाली की जेवून ३ चा किंवा कधी कधी ९ ते १२ रात्रीचा बघायचो. साजन, बेटा, बाँबे, रोझा, हम आपके है कौन, मैने प्यार किया असे अनेक पाहिले.लग्नानंतर १० वर्षाने जेव्हा रंगीत ओनिडा घेतला तेव्हा घरच्या घरी सोनी चॅनल वर सिनेमा पहाण्याचा सपाटाच लावला होता. अभिमान, चुपके चुपके, गोलमाल, खूबसूरत, बावर्ची इत्यादी. जेव्हा न्यु जर्सीत राहायला आलो तेव्हा चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर हिंदी/मराठी सिनेमा पहाण्याचा आनंद घेतला पण बरोबर मित्रमंडळ/नातेवाईक नाहीत त्यामुळे मजा नाही. काश्मीर फाईल हा सिनेमा पहायचा ठरवला पण आपण तो पाहू शकू का ही भिती मनात होती. चित्रपट आवडला पण घरी आल्यावर डोके सून्न झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर, सॅम बहादूर, कलम ३७० पहाताना मात्र खूप मजा आली आणि आनंद वाटला. मराठी बाई पण भारी देवा आवडून गेला.


मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा.... या गाण्याची व नटरंग या चित्रपटाची जाहिरात ऑनलाईन झी मराठीवर पाहिली होती आणि तेव्हाच ठरवले की पुण्यात टॉकीजवर जाऊन नटरंग पाहायचा. हे ठसकेबाज गाणे मला खूप आवडते. एकदा ऐकले की दिवसभर तेच डोक्यात राहते. चित्रपटाची सुरवात याच गाण्याने होते त्यामुळे मला सुरवात अजिबात चुकवायची नव्हती. पुण्यात कुठेही जायला रिक्षा हवीच. नेमका रस्ता काही कारणाने अडला होता. रिक्षावाल्याने मागे वळवून वेळेवर प्रभातवर पोहोचते केले. २०१० सालच्या भारतभेटीत हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पहायचा योग आला. मी, वसुधा, सायली गेलो होतो रिक्शाने. त्यानंतरच्या एका भारतभेटीत विनुचा मित्र हरीश, त्याची बायको ऋजुता व आम्ही दोघे अल्काला दुपारी ३ च्या शोला गेलो होतो हरिश्चंद्राची फॅक्टरी पहायला. वेगळाच आहे हा चित्रपट. त्यामुळे आवडला.


तर अशी ही चित्रपटगृहात जा ऊन मोठ्या पडद्यावर सिनेमा पहाण्याची मजा काही न्यारीच ना ! प्रत्येकानेच अनुभवलेली आहे. तुमच्या काही खास आठवणी असतील तर कमेंट मध्ये लिहून शेअर करा.
rohinigore


Friday, December 27, 2024

२७ डिसेंबर २०२४

 

पाणी आलं रे आलं
काल सकाळपासून ते अगदी या क्षणापर्यंत खूप बारीक सतत धार पाणी येत आहे. नळाला पाणी कोणत्याही रूपात का होईना येतय हे महत्वाचे ना ! पाण्याचा ठणठणाट नाहीये ना! आमच्या शहरात काही ठिकाणी पाण्याचा टिपूसही नाहीये. पाईपलाईन फुटल्याने बऱ्याच भागात पाणी नाही. अमेरिकेत वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात आणि कधी नाही असे होतच नाही. एखाद वेळेस क्वचित असे होते. मोठमोठाली वादळे आली तरीही वीज आणि पाणी असतेच. वीज नाही असे पूर्वी अनुभवले आहे. फटकन वीज गेल्याने होणारी पंचाईत अनुभवली आणि लिहीली पण आहे. पाण्याची खूप कमी धार पहिल्यांदाच !


प्रत्येक बाईच्या अंगी एक उपजतच गुण आहे तो म्हणजे थोडक्यात कसे भागवायचे? कमी पैशात संसार कसा करायचा, कमी पाण्यात धुणेभांडी कशी करायची? दत्त म्हणून हजर आलेल्या पाहुण्यांच्या समोरच घरातला पसारा कसा आवरायचा? तर थोडक्यात काल आणि आज सतत खूप कमी धार असलेल्या पाण्यात मी काल रात्री भांडी घासली. काल शॉवरला पण पाणी होते. पण आज पाण्याची धार खूपच कमी झालेली आहे. काल पातेल्यातून, कूकरमधून पाणी भरून ठेवले होते. एक वेळ अंघोळ झाली नाही तरी चालेल पण बाकीच्या गोष्टीना खूप पाणी लागते ना ! तर आज विनायकने भारतात करतो तशी छोट्या बादलीत पाणी घेऊन अंघोळ केली आणि ऑफीसला गेला. मी म्हणाले मी धो धो पाणी आले की करेन अंघोळ. मी घरातच आहे. आमच्याकडे एक छोटी बादली आहे. ती आज उपयोगी पडली. पाणी बंद न करता ती बादली भरली आणि बादली भरली तरीही नळ बंद केला नाही. त्यामुळे बादली सतत भरलेली राहिली आणि मी अंघोळ केली. न जाणो पाणी बंद झाले तर ! आज अंघोळीची मजा काही औरच होती. भारतातल्या अंघोळीची आठवण करून देणारी.


वीज नाही पाणी नाही असे असले की अगदी हात मोडल्यासारखा होतो ना ! आणि आता तर मोबाईल डेटा नसला किंवा नेट गेले की पण अगदी तसेच होते ! आज मला पूर्वीची अंघोळ आठवली. आईकडे तांब्याचा भला मोठा बंब होता. हा बंब अंगणात पेटवला जायचा. पूर्वी पुण्यात शून्य अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जायचे. बंबातले कढत पाणी बादलीत काढून अंघोळ करायचो. नंतर हा बंब बाथरूम मध्ये आला. बंबाला कॉईल बसवून घेतली. अंघोळ म्हणजे आम्ही सर्व पाण्यात डुंबायचो. कढत पाणि एका बादलीत असायचे पण त्यात विसावण घालण्याकरता बाजूला दोन गार पाण्याच्या बादल्या असायच्या. सकाळी नळाला पाणी असे पर्यंत सर्व काही उरकायला लागायचे. नंतर दिवस भराकरता ड्रमातून पाणी भरून ठेवायला लागायचे.


सकाळी स्टीलच्या पिंपात, कळशीत, व माठात पिण्याचे पाणी भरून ठेवायचो. बंबाला कॉईल बसवण्याच्या आधी स्टोव्ह आणि नंतर गॅस वर अंघोळीकरता पाणी तापवत ठेवायचो. गॅसवर शक्यतो फक्त स्वैपाक आणि अंघोळीचे पाणि स्टोव्ह वर तापवायचो. त्याकरता एक गोलाकार पण खालून सपाट असलेले मोठे पातेले होते. पाणि तापले की फडक्याने दोन्ही हाताने ते पाणी उचलून बादलीत पाणी ओतायचे. अशा प्रकारे एकेकाच्या अंघोळी उरकायच्या. लग्न झाल्यावर सासरी पण असेच पाणी भरून ठेवायला लागत होते. पाणी तापवायला लागत होते. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर आधी आयायटी व नंतर डोंबिवलीत रहायला आलो. डोंबिवलीत आमच्या सोसायटीत २४ तास पाणी होते. याचे कारण खालच्या टाकीत २ वेळा धो धो पाणी यायचे ते आम्ही वरच्या टाकीत पंपाद्वारे सोडायचो. टाकी वाहिली की निश्चिंत व्हायचो. सोसायटीत बिऱ्हाडे कमी होती त्यामुळे पाणी पुरायचे. आम्ही कोणीही कधिही जास्तीचे पाणि भरून ठेवलेले नाही.


जेव्हा पाणी अचानक जायचे तेव्हा ते का गेले , पंप चालवण्याची टर्न कोणाकडे होती, दिवसातून २ वेळा तरी पंप चालवायला हवा, टाकी वहायला हवी, अशी चर्चा व्हायची. जेव्हा म्युनिसिपाल्टीचे पाणी यायचे नाही तेव्हा मात्र भरून ठेवायचो. मी वॉशिंग मशिन मध्येही पाणी भरून ठेवायचे. बादल्या, पातेली, वाट्या, वाडगेही भरायचे. एक प्लॅस्टीकचा ड्रम आणून ठेवला होता तोही भरायचो. पाण्याचा पाईप फुटला की टॅंकरचे पाणी वरच्या टाकीत भरायचो. सर्व काही मुबलक प्रमाणात आहे असे आपण जेव्हा म्हणतो ना तर ते चांगलेच आहे पण त्यात नाविन्य रहात नाही. हल्ली कोणत्याच बाबतीत नाविन्य नसल्याने एकूणच कोणत्याही गोष्टीची गोडी कमी झाली आहे. अजूनही नळाला धो धो पाणी आलेले नाही. जेव्हा येईल तेव्हा म्हणीन पाणी आलं रे आलं ! गोंद्या आला रे आला सारख.
rohinigore

Wednesday, December 25, 2024

२५ डिसेंबर २०२४

 Wishing you All a Very Happy Merry Christmas and prosperous New Year 2025

काल मंगळवार २४ डिसेंबर रोजी सकाळी सकाळी बर्फ पडणार होता म्हणून सर्व बाहेरची कामे रविवारी उरकली. शनिवारी बर्फ पडला होता आणि तो दिवस कसा गेला हे मी रोजनिशीत लिहिले आहेच. आजचा दिवस बराच उदास गेला. डोके ठणकत होते. ताप आल्यासारखे वाटत होते. सकाळी खूप उशिराने उठलो. कालचा दिवस आराम केला. रात्री उत्तप्पे, सकाळी वालपापडीची भाजी आणि भोपळ्याचे भरीत व भात. दिवसभर तेच होते. काल गुलाबजाम नावाचा सिनेमा पाहिला. वेगळेच कथानक आहे त्यामुळे आवडला. तर आज काय करावे जेवायला की बाहेरच जावे असा विचार चालू राहिला आणि जेवायला बाहेर पडलो. जेवण छान होते आणि आयते असल्याने बरे वाटले. मी दर वर्षी ख्रिसमसला वेगळे काहीतरी करते. त्यामुळे रात्रीचे जेवण वेगळे करायचे असे ठरवले होते. सकाळीच बटाटे व तोंडली उकडून ठेवली होती. 

 
विनायक जेवण करून आल्यावर परस्पर चालायला गेला. मी थोडी आडवी झाले. बुफे म्हणजे बरच काही खाणे पण आम्हाला काही मानवत नाही म्हणून एखाद वेळेस जातो. खरे तर कालची थोडी उपासमार झाल्याने आजचे जेवण खूप नाही तरी थोडे जास्त खाल्ले गेले. चवही लागली. दुपारी ४ ला उठले आणि चहा प्यायला आणि लगेचच स्वयंपाक करायला सुरवात केली. बाहेर थोडा उजेड होता. शून्य अंश सेल्सिअस पेक्षा थोडे जास्तीचे तापमान होते म्हणून बाहेर फिरून आले. बोचरा वारा अजिबात नव्हता म्हणूनच चालणे झाले. नेहमीप्रमाणे फोटो काढले. शनिवार - रविवार कडे मायनस १० ते १२ रात्री आणि दिवसाही थोडेफार प्रमाणात कमी-जास्त असेच तापमान होते. अर्थात हिवाळा म्हणजे असेच तापमान असणार ना? हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जास्त गरम/जास्त गार अशा लाटा येत रहातात. उलट ज्या वेळी जे हवे ते व्हायलाच हवे, नाही का? जे ठरवले होते ते केले रात्रीच्या जेवणात. फक्त ओल्या नारळाची चटणी आणि पुऱ्या केल्या नाहीत. यावेळी भरली तोंडली करताना ती आधी उकडून घेतली. आता मूड बराच बदलला आहे. चालून आल्यावर मूड लगेच बदलतो असा अनुभव आहे.


तर आज एक गोष्ट घडली. माझा चष्मा काही केल्या सापडत नव्हता. सगळीकडे शोधला. कुठे ठेवला मी असा विचार करता करता बहुतेक कट्यावर विसरले असेल असे माझ्या ध्यानात आले. जेवण डीश मध्ये वाढले. त्याचा फोटो काढला. विनायक झोपला होता त्यामुळे त्याला उठवले नाही. मी साधारण १ मैलाची फेरी मारते आणि आमच्या घराजवळ एक कट्टा आहे तिथे थोडावेळ बसले. मी खरे तर चष्मा असा कधीच काढून ठेवत नाही. परत बाहेर गेले तर कट्यावर चष्मा होता !असा होता आजचा दिवस. पुढचे वर्ष ५-६ दिवसात सुरू होईल. मी एक ठरवले आहे ते आता मी करणार आहे रोजच ! रोज कमीत कमी १५ मिनिटे मांडी घालून बसायचे. आधी या उरलेल्या दिवसात करून बघते आणि एकदा का सुरू झाले की झाले. दर आठवड्याला १ मैल चालणे व व्यायाम झालाच पाहिजे हे मात्र मी मनावर घेतले आहे.
rohinigore


















 

Sunday, December 22, 2024

२१ डिसेंबर २०२४

आजचा दिवस खूप खास होता. स्नो डे/वर्क डे (विनुचा)/साडी डे. साडी मला खूपच आवडते नेसायला पण आजपर्यंतच्या आयुष्यात मी खूपच कमी वेळा साडी नेसली आहे. लग्ना नंतर नोकरी केली तेव्हा मी कामावर जाताना पंजाबी ड्रेस घालत असे आणि अधुन मधून साडी. साड्यांच्या आठवणी तर खूपच आहेत. ओन्ली विमल गुलाबी रंगाची आईची साडी मी विनुबरोबरच्या कांदेपोहे कार्यक्रमाला नेसले होते. गुलाबी कानातले आणि गळ्यातले. साखरपुड्यानंतर मी व विनु फिरायला जायचो तेव्हा माझ्या वाढदिवसाला त्याने एक साडी आणली होती. रंग होता आंबा कलर आणि त्याला मरून रंगाचे काठ. ही साडी मी वाढदिवसाला नेसले. लग्नानंतर विनुच्या मित्राच्या लग्नात नेसले. आईची एक साडी बांधणी लाल रंग आणि त्याला हिरव्या रंगाचे काठ होते. आईची अजून एक साडी सॅटीन पट्टा. या साडीत ७ रंग होते. आईने आम्हा दोघींना कॉलेजला गेल्यावर साड्या घेतल्या होत्या. माझी लाल रंगाची जरीवर्क केलेली साडी आणि रंजनाला आंबा कलरची आणि काठ होते मरून रंगाचे. माझ्या सासुबाईंनी मला मंगळागौरीला घेतलेली पांढऱ्या रंगाची साडी खूप आवडली होती. त्यावर वेगवेगळ्या रंगाचे गोळे होते. अशा काही साड्या मनात भरलेल्या आणि आठवणीतल्या आहेत. काही साड्या नेसलेले फोटो आहेत पण ते जुने आहेत. लग्नात आईने व सासुबाईंनी घेतलेल्या साड्याच फक्त मला होत्या. मी दुकानातून खरेदी केलेल्या साड्या ४ ते ५ असतील. मी जरी पंजाबी ड्रेस घालत असले तरी सुद्धा ते कमीच होते. ढीगाने कधीच साड्या/ड्रेस नव्हते माझ्याकडे. आता पुढील आयुष्यात ही कसर भरून काढणार आहे. आज विनुला कामावर जायचे होते. खूप नाही तरी स्नो बऱ्यापैकी पडलेला होता. जेवणाच्या वेळी विनु घरी परतला आणि आम्ही दोघे साऊथ इंडियन थाळी (दोघात एक) खायला बाहेर पडलो. नंतर विनुने मला कोह्ल्स मध्ये सोडले व परत कामावर गेला. ३ तास मी दुकानात हे बघ ते बघ करत होते. पाय खूप दुखायला लागले म्हणून दुकानात बाहेरच्या बाजूला असलेल्या बाकावर बसले पण बाकडे थंडीने अतीशय गार झाले होते. लोक दुकानात येत-जात होती त्यामुळे दार उघडे होत होते आणि थंडी वाजत होती. मधेच मी विला पिझ्झा मध्ये गेले आणि फक्त डाएट कोक घेतला. इथे फक्त मी बसण्यासाठी गेले होते. तिथल्या माणसाने विचारले आज पिझ्झा नाही का? सगळे लपेटून घेतले होते तरीही दुकानात खूप थंडी वाजत होती. शून्य अंश डिग्री
सेल्सिअसच्या आसपास तापमान होते आज. उद्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे चुपचाप घरीच बसायचे आहे. आज स्नोचे फोटो घेतलेच नेहमीप्रमाणे आणि कुडकुडत का होईना आजचा दिवस छानच गेला. घरी आल्यावर आलं घालून चहा व गरम गरम पोहे केले.


आईने आम्हा दोघी बहिणींना घेतलेल्या कल्पना साड्याही आठवल्या आणि एकंदरीतच आईच्या, बहिणीच्या, सासुबाईंच्या साड्या, रंजनाच्या व माझ्या लग्नातल्या साड्याही आठवल्या. पूर्वीच्या आठवलेल्या साड्यांचे रंग आणि रंगसंगती असलेल्या साड्या घ्यायच्या आणि नेसायच्याही असे ठरवले आहे.
rohinigore






























Thursday, December 12, 2024

आठवणी खिडकीच्या (२)

 पलभर के लिए कोई हमे प्यार कर ले झुठाही सही. हे गाणं मला आता एकदम आठवल याच कारण फेबुची आजच्या दिवसाची मेमरी समोर आली आणि आठवलं की खिडकीच्या आठवणी लिहायच्या आहेत. त्यातल्या एका खिडकीची आठवण लिहीली आहे. आता ही दुसरी आठवण. खिडकीची म्हणण्यापेक्षा खिडक्यांची आठवण. आम्ही हेंडरसनविल मध्ये रहात होतो ते घर होते डोंगरावर. हॉल आणि दोन्ही बेडरूमला खिडक्या होत्या. प्रत्येक खिडकीतून डोकावले जायचे आणि सुंदर सुंदर दृश्य दिसायचे. सूर्यास्ताच्या वेळी निर्माण झालेले आकाशातले निरनिराळे रंग, सूर्योदय, सूर्यास्त, झाडांची प्रत्येक ऋतूतली वेगवेगळी रूपे. बर्फातला सूर्यास्त, आजच्या दिवशीचा सूर्योदय तर मस्त होता. आकाशात गुलाबी रंग पसरलेला होता. एका बेडरूम मधून चंद्रही दिसायचा. प्रत्येक खिडकीतून निसर्गाचे वेगवेगळे फोटो काढता आले. खिडकीच्या आठवणी फक्त आणि फक्त फोटोंच्याच ! rohinigore