Sunday, January 29, 2023

भारतभेट २०२२ फोटो, वर्णन (१)

 































माझी शाळा मैत्रिण शुभदा मला ४० वर्षांनी प्रत्यक्षात भेटली. ३/४ वर्षापूर्वी फेबुवर भेट झाली होती. गप्पाही खूप झाल्या. भारत भेटीत ती पण पुण्यात आली होती त्यामुळे ती व मी एके दिवशी मनसोक्त भटकंती केली. माझ्या आईकडे ती सकाळी आली. मी आम्हाला तिघींना साबुदाणा खिचडी खायला केली होती. ती, आई व मी असे आमचे फोटोसेशन झाले आणि भटकायला निघालो. आधी सारस बागेत गेलो. तिथे गणपतीचे दर्शन घेतले. तिने एका बाकड्यावर बसून गप्पा मारल्या. नंतर आम्ही आमच्या गरवारे शाळेत गेलो. शाळेतल्या सर्व आठवणी निघाल्या. 

शाळेचे पटांगण खूप छोटे वाटले. शाळेत असताना हे पटांगण खूप मोठे वाटायचे. मधल्या सुट्टीत पटांगणाच्या दारातून चिंचा बोरे खायचो ते आठवले. आमच्या वर्गाचा ग्रुप फोटो ज्या चौथऱ्यावर काढला होता तो पाहिला. ५ ते १० चे वर्ग पाहिले. शाळेत एके दिवशी कॅंप भरला होता ते आठवले. पाणी प्यायलो. शाळेतल्या सर्व बाजूने फोटो काढले. नंतर तिथून एका होटेल मध्ये मस्तानी प्यायली. सगळीकडे रिक्शाने हिंडलो. डेक्कन टॉकीजवर गेलो. रूपालीत डोसा व उत्तापा खाल्ला. हाँगकाँग गल्लित शिरलो. तिथे फक्त आता बॅकपॅक, मोबाइची कव्हरे आणि टोप्या इतकेच सर्वत्र भरले होते. डेक्कन वरचा स्टोप बघितला. सर्व काही बदलले आहे. मन खट्टू झाले. खूप जत्रेसारखी गर्दी पाहून जीव घाबरा घुबरा झाला. रूपाली मधला डोसा खूपच तेलकट होता. तिथून मी शुभदा बरोबर तिच्या आईवडिलांच्या घरी गेले. त्यांची भेट झाली. जुन्या आठवणी निघाल्या आणि तिथून मी घरी आले.

आयुष्यात पहिल्या प्रथम मी मैत्रिणी बरोबर एक दिवस भट्कंती केली.  सारस बागेत गजरे घेतले. ते केसार माळले. लगेच त्याचे फोटोही काढले. सारस बागेतल्या गणपतीचे फोटो काढायला मिळाले त्यामुळे समाधान झाले. सारस बागेत आता पूर्वीची पाण्याची कारंजी नाहीत त्यामुळे तितकी मजा आली नाही. जुने पुणे आता फक्त आठवणीतच !

No comments: