Wednesday, November 23, 2022

मराठी मालिका

 आई कुठे काय करते.... आजचा एपिसोड पाहिला... आणि मला सुचलेले लिहिले... संवादलेखन करायला मला आवडेल.... मी जे काही लिहिते ते उत्स्फुर्तपणे.

माझा निर्णय तुम्हाला सगळ्यांना सांगितल्यावर तो निर्णय कुणाकुणाला आवडणार नाही हे मला माहीती होतेच. माझी या घरात कोणी मनापासून काळजी घेतली असेल तर ती अप्पांनी आणि यशने. इतकी वर्ष लग्नाला झाली पण माझ्या मनाला ज्या गोष्टींचा त्रास होत होता तो फक्त अप्पा आणि यश यांना कळत होता. मला विशेष कौतुक वाटते ते अनघाचे. ती तर बाहेरून आली आहे पण माझ्या निर्णयाचा तिने आदर केला. आई, आशुतोष ने जेव्हा त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम व्यक्त केले तेव्हा मला पण शॉकच बसला होता पण त्यांनी कधी त्यांचे प्रेम माझ्यावर लादले नाही. ते माझ्याकरता थांबले. म्हणाले विचार करून सांग.

त्यांनी माझा नेहमीच आदर केला आहे. माझ्या मनाचा विचार ते करतात हे मला जाणवले आहे. आणि आई मी पण एक जबाबदार आई आहे. प्रेम व्यक्त केल्यावर लगेच भाळायला मी काही आता कॉलेज तरूणी नाही. आणि कॉलेज तरूणी नसले तरी एखादी असती तर लगेच भाळलीही असती. मी आशुतोषची लग्न करण्याचा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहे. मला या नात्याला आता रीतसर नाव द्यायचे आहे. समाज काय दोन्ही बाजूने बोलणारच आहे, लग्न केले तरी आणि नाही केले तरीही. लग्न केले नाही तर म्हणतील हिचे आणि आशुतोषचे अनैतिक संबंध आहेत. लग्न केले तरी बोलतील या वयात ३ मुले असताना पण लग्न केले. पण एक आहे लग्न झाल्यावर काही दिवस बोलतील आणि विसरूनही जातील.

अनिरुद्ध आणि संजनाने तर मला उघड उघड फसवले आहे आणि जेव्हा मला हे कळाले की त्या दोघांनी प्रेमसंबंधाच्या मर्यादा ओल्यांडल्या आहेत तेव्हा माझ्या मनाला किती त्रास झाला असेल ते तुम्हाला कधीही कळणार नाही आई ! मी दोघांनाही लग्न करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आणि सर्वांनाच मोकळे केले. चुकले का माझे? सांगा ना आई. मी माझ्या स्वबळावर उभी राहिले ते फक्त आशुतोषमुळे आणि याला पाठींबा होता अप्पांचा आणि यशचा. मला तीन मुले आहेत पण ती आता काही कुकुल्ली बाळे राहिली नाहीयेत. ते त्यांचे निर्णय घेतात आणि घ्यायलाच पाहिजेत. पण मी किती दिवस सर्वांना पुरून उरणार आहे? मला माझे आयुष्य आहे की नाही? आता मलाही माझ्या आयुष्यातले उरलेले दिवस माझ्या मनाप्रमाणे घालवायचे आहेत. यात चूक काय आहे? कोणता गुन्हा केलेला आहे? मी आता आज जरा स्पषटच बोलणार आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ मला कळत नाही असा होत नाही.

प्रत्येकाची मनं जपण्याचा आणि प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळी धावून येण्याचा मी काही मक्ता घेतलेला नाहीये. आज आशुतोषचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझा त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय सांगून एक सुखद धक्का देणार आहे. तुम्हाला सर्वांना त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण आहे. ज्यांना कुणाला यायचे असेल त्यांनी या, ज्यांना यायचे नाही त्यांनी खुशाल नाही आले तरी चालेल. माफ करा आई अप्पा, या आधी मी इतकी स्पष्ट कधीच बोलले नाही. जे काही आहे ते सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. निघते मी. मला अजून बरीच कामे आहेत आणि मुख्य म्हणजे आशुतोषच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे. Rohini Gore

No comments: