Sunday, March 09, 2014

९ मार्च २०१४आजचा दिवस भरपूर कामाचा आणि तितकाच खूप आनंद देणारा होता. शनिवार रविवार नेहमीच कामात जातो पण आज स्वयंपाकघर पूर्णपणे आवरायचे ठरवले म्हणजे ओट्यावरची आणि खालची कपाटे आवरण्यात ४ ते ५ तास लागतात. झाडून पुसून सर्वच त्यात बरण्या पण आल्या स्वच्छता आणि भारतीय ग्रोसरी पैकी काय संपले आहे न काय नाही इत्यादी. तसेच कालच ठरवले होते की आजचा सूर्योदय बीचवर जाऊन पहायचा, कारण की हवा स्वच्छ व सुंदर होती.


कालचा दिवस पण  असेच काही ना  खरेदी करण्यात व  ग्रोसरी पण केल्याने झोपायला उशीर झाला होता म्हणून ठरवले होते की अट्टाहास करून लवकर उठून जायचेच असे नाही. सहज जाग आली तर जायचे. इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर आपोआप जाग येते याचे प्रत्यंतर आज आले. मला व विनायकला आपोआप जाग आली आणि सूर्योदयाच्या सुमारास आम्ही बीचवर जाऊन पोहोचलो. तशी थोडी घाईच झाली. उठलो, ब्रश केला, चहा घेतला आणि लगेच तातडीने निघालो. झुंजुमुंजू झाले होते. मी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचताच क्षणी लहान मुलासारखी धावत सुटले. कारण की मला सूर्योदयापूर्वीचे क्षण अजिबात वाया घालवायचे नव्हते. आज बऱ्यापैकी गरम होते. मागच्या वेळेस चांगलीच थंडी होती. आज आकाश निरभ्र होते. समुद्राच्या मागील आकाश  हळूहळू  लालसर  शेंदरी होत होते. काही क्षणातच लाल चुटूक सूर्य डोकावला. जसे काही म्हणाला "मी आलो" किती सुंदर दिसत होता. हळूहळू करत सूर्याचा लाल गोळा समुद्राच्या वर येत होता. आज मनासारखा लालबुंद सूर्य पहायला मिळाला. समुद्रातून वर येताना  इतका काही सुंदर दिसत होता. काही क्षणच हे लालपण टिकले. नंतर पिवळसर शेंदरी आणि नंतर पांढरा गोळा झाला. त्याला हात जोडून नमस्कार केला. समुद्रकिनारी चालण्याचा मूड होता पण नाही चाललो. कारण की जितके चालत पुढे जाता तितके मागे यायला खूप कंटाळा येतो आणि घरी जाऊन आजची ठरवलेली कामे करायची होती.


घरी आल्यावर २ तास साफसफाई केली. अंगोळपांघोळ करून पिझ्झा खायला बाहेर गेलो. नंतर अशीच काही ना काही कामे करून घरी परतलो. थोडावेळ आडवे पडल्यावर जरा बरे वाटले. उठून परत चहा घेतला. आणि परत कामाला सुरवात. खरे तर काम करण्याचा खूपच कंटाळा आला होता आणि दमायलाही झाले होते. असे वाटले की छान हवा आहे तर बाहेर नदीवर फिरायला जाऊन आजचा सूर्यास्ताचाही फोटो घेऊ,  पण गेलो नाही. आज रात्री गरमगरम साबुदाणा खिचडी खाल्ली त्यामुळे खूप छान वाटत आहे. खूप काम झाले की असे काहीतरी आवडीचे चमचमीत खायला आम्हाला दोघानांही खूप आवडते. जेवायलाही पोटभरीची होते. नाहीतरी नेहमीचे असतेच , आज जरा वेगळे म्हणून केली होती.


आज मात्र उठायच्या आधी मला एक खूप विचित्र स्वप्न पडले. स्वप्न चांगलेच होते पण त्याचा क्रम विचित्र होता. एका इमारतीच्या बाल्कनीत आम्ही दोघे उभे आहोत आणि एकदम हिरवा प्रकाश पडलेला आहे. मी म्हणले चल लवकर सूर्योदय बुडेल नाहीतर. मग मी व विनायक आमच्या कारमध्ये बसून निघालो. रस्ता नेहमीचा नव्हता. मोठा ब्रीज कधीच लागत नाही. तो स्वप्नात दिसला आणि समुद्रावर उतरताना रिक्षात बसलेलो होतो. आणि समुद्रावर भरती होती. ती भरती इतकी होती की रिक्षातून खाली उतरताना पाय ठेवला तर तो समुद्रातच. मी म्हणाले अरे आपण इथे कुठे आलो ? हा तर मुंबईचा समुद्र आहे. सगळीकडे गजबजाट होता. मासे विक्री चालू होती. आणि समुद्राच्या आजुबाजूला लालसर छटा पसरली होती. थोड्यावेळाने एकदम सूर्यच वर आला. निराशा झाली. एकदम पांढरा सूर्य कसा काय? मग आम्ही दोघांनी विचार केला की आलोच आहोत तर सकाळचा समुद्र तरी बघू. परत सगळीकडे शांतता. नंतर काहीवेळाने एकदम अंधार. नंतर कळाले की ही तर ढगांची किमया आहे आणि स्वप्न पूर्ण होताच मला जाग आली आपोआपच आणि खिडकीतून बाहेर बघितले तर अंधार होता. घड्याळात पाहिले तर पावणेसात झाले होते आणि सूर्योदय होता साडेसातला. मी उठले आणि विनायकला म्हणाले चल. तर तोही जागाच होता. पटापट आवरून निघालो आणि समुद्रावर पोहोचलो तर ५ मिनिटात सूर्योदय झाला. पण काही म्हणा पहिल्या सूर्यास्ताची मजा काही वेगळीच होती. म्हणतात ना पहिला कोणताही अनुभव चांगला आणि कायम लक्षात राहणारा असतो.  आज लालबुंद सूर्य पाहण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली. पण आज एक कळाले की हा लाल रंग सूर्य वर आला की काही सेकंदच टिकतो. हळूहळू लगेच तो शेंदरी व्हायला लागतो. आजचा सूर्य तर क्षितीजाची रेषा छेदून वर आला होता. आणि जेव्हा जेव्हा अगदी थोडा सूर्य की जो लाल होता तो सुरवातीला जेव्हा त्याची एंट्री झाली ना आहाहा काय दिसत होता. सुंदर. अजूनही तो लालचुटूक सूर्य डोळ्यासमोरून हालत नाहीये.

No comments: