Thursday, June 21, 2012

ते तीन महिने !

भारतातून आणलेल्या ४ बॅगा, भारतीय किराणामाल व पुस्तके भरलेली काही खोकी, व अमेरिकेत खरेदी केलेला पहिलावहिला छोटा टीव्ही असा सर्व बाडबिस्तारा घेऊन आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. डेंटन - टेक्साज एक वर्षाचा कालावधी खूप छान गेला होता. साऊथ कॅरोलायना - क्लेम्सनचा निसर्गरम्य परिसर पाहून आपण एका चांगल्या ठिकाणी येऊन पडलो आहोत याचे समाधान होते. या अपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त ३ महिन्यांकरता आलो होतो. आलो होतो म्हणण्यापेक्षा आम्हाला यावेच लागले होते. ही जागा आम्हाला कशीबशी मिळाली होती. डेंटनवरच्या एका ओळखीच्या मित्राच्या मित्राकडे आम्ही ८ दिवस राहिलो होतो. रोजच्या रोज जागेची विचारणा करता करता ही एक जागा आम्हाला मिळून गेली आणि तीही ३ महिन्यांकरताच !क्लेम्सनमध्ये विद्यापीठ सोडून बाकी काहीच नाही. तिथली घरे ३ ते ४ बेडरूमची व सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरलेली होती. ते उन्हाळ्याचे दिवस होते. ३ ते ४ बेडरूम अपार्टमेंटपैकी आम्हाला एक जागा मिळाली कारण त्या जागेत राहणाऱ्यांचे शिक्षण पूर्ण होऊन ते तिथून जागा सोडून गेले होते. अपार्टमेंट चांगले मोठे व टुमदार होते. १२०० ते १३०० स्क्वेअरफूटचा एक फ्लॅट खाली व तसाच एक फ्लॅट वरती होता. हॉल किचन कॉमन. बाकीचे दोघेजण तिथेच राहत होते पण सुट्टीकरता गावी गेले होते. अपार्टमेंटमध्ये सर्व फर्निचर होते. शिवाय एक टीव्ही, वॉशिंग मशीन, डीश वॉशर व मायक्रोवेव्हही होता. कीचन फुल भरले होते. आम्हाला आमची ग्रोसरी व काही भारतातून आणलेली भांडीकुंडी ठेवण्याकरता जास्त जागाच नव्हती. थोडीफार जागा त्यातल्या त्यात करून घेतली. भांडी डीश वॉशरमध्ये ठेवली. फ्रीजही फुल्ल भरलेला होता. त्यातला एक कप्पा मी भाजी ठेवण्यासाठी ठेवला. आमची रूम म्हणजे एक मोठी आयताकृती बेडरूम व त्यात एक कॉट व त्याला लागूनच टबबाथ वगैरे होते.क्लेम्सनमध्ये सर्व घरे अशीच उंचसखल भागात विसावलेली आहेत. सभोवती हिरवीगार झाडे. निसर्गाने नटलेले हे शहर खूपच सुंदर आहे. विनायक सकाळी ८ ला जायचा ते संध्याकाळी ६ ला घरी यायचा तोपर्यंत मी एकटीच भुतासारखी त्या मोठ्या फ्लॅटमध्ये असायचे. क्वचित कुणीतरी पायी चालत जाताना दिसायचे किंवा एखादी कार जाये करताना दिसायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेचसे विद्यार्थी गावी गेले होते. या इथल्या अपार्टमेंटमध्ये कोणी भारतीय राहत नव्हता. भारतीय विद्यार्थ्यांची वस्ती दुसरीकडे होती. त्या परिसरला सर्व बाँबे एरिया म्हणत.दिवसभर एकटीला खूपच कंटाळा यायचा. विनायक पोळीभाजीचा डबा घेऊन जात असल्याने पोळीभाजी सकाळीच होऊन जायची. भाजी आदल्या दिवशी चिरून ठेवायचे. नाही म्हणायला तिथे केबल टीव्ही होता व काही इंग्रजी मासिके होती. अमेरिकेत तसे नवीनच होतो. एक वर्ष डेंटनला राहून लगेच क्लेम्सनमध्ये आलो होतो. त्यामुळे कार नाही व संगणकही नाही. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने तिथल्या बसेस एकेक तासाने धावत असत. त्या अपार्टमेंटपासून विद्यापीठ बऱ्यापैकी लांब होते. चालत  पाऊण ते एक तास
लागत  होता. त्यातूनही चालणे उंचसखल भागातून होते. काही वेळा भले मोठे उतार व काही वेळा भली मोठी चढण. चालायला आम्हाला दोघांनाही आवडते त्यामुळे रिकाम्या रस्त्यावरून चालताना छान वाटायचे. स्वच्छ सुंदर हवा व उन्हाळ्याची सुरवात नुकतीच झाली होती. स्प्रिंग ऋतूचा गारवा थोडा शिल्लक होता.
क्लेम्सनला आल्यावर एका भारतीय कुटुंबाकडे आम्ही ८  दिवस राहिलो होतो त्यामुळे ती एक मैत्रिण झाली होती व तिचा मुलगाही खूप छान होता. तिच्याशी मी सकाळी १ तास व दुपारी १ तास फोनवरून बोलायचे. तिलाही बोलायला हवे असायचे कारण की ती पण खूप दूर एका टेकाडावर राहत होती. तीही एकटीच होती. ती म्हणायची बरे झाले तुम्ही आलात मला कोणीतरी बोलायला एक मैत्रिण मिळाली. दिवसभर वेळ कसा घालवायचा याचे मी एक रूटीन आखून घेतले होते तरी कंटाळा येतच होता. उघड्या तुरुंगात कुणीतरी डांबून ठेवल्यासारखे वाटायचे. त्या तीन महिन्यात मी भरपूर टीव्ही बघितला अर्थात अमेरिकन इंग्रजी चॅनल्स. एक चॅनल लावायच तिथे काही चांगले असेल तर ते बघायचे, नसेल तर दुसरा चॅनलकडे वळायचे. बऱ्याच सिरिअल्स व चित्रपट बघितले.


टीव्ही बघायचा कंटाळा आला की तिथे असलेली इंग्रजी मासिके वाचायचे. त्याचा कंटाळा आला की जे काही मनात येईल ते एका डायरीत लिहीत सुटायचे. बाकी कामात तर वेळ जातोच. हॉलचे दार उघडेच ठेवायचे. दारात उभे राहून आजुबाजूला पाहिले तर कोणी दिसायचे नाही. परत आत येऊन बसायचे. बरेच वेळा रंडकुंडीला यायचे. रोज दोनहा विनायकलाही लॅबमध्ये फोन करायचे. त्यावेळी भारतात अगणित कॉल करता येत नव्हते. १० डॉलरला २० मिनिटे कॉलिंग कार्डवर मिळायची. काही वेळा कॉल मध्येच तुटायचा व त्यापुढील मिनिटे वाया गेलेली असायची.वाहत्या रस्त्यापासून हे अपार्टमेंट खूपच आत होते. एकदा मुख्य रस्ता कुठे आहे ते बघून आले व अंदाज घेतला की बाहेर एकटे चालत गेलो तर किती चालायला लागेल. बरेच लांब अंतर होते. ठरवले, काही ना काही निमित्ताने बाहेर पडायचेच. नंतर एकदा मुख्य रस्त्याला लागून एकार्ड दुकान व त्याच्या बाजूलाच पोस्ट ऑफीस आहे ते कळाले. मग माझी भारतात पत्रे लिहायला सुरवात झाली. दर आठवड्याला एक पत्र लिहून ते पोस्टात टाकू लागले. शिवाय एकार्डमधून दुधाचे कॅन आणत असे. ते मोठाले व जड कॅन हातात घेऊन उंचसखल भागातून चालताना हात व पाय खूप दुखायचे. पण त्यामुळे वेळही जायचा व कामही व्हायचे. उन्हाळा वाढत गेला तसा चालायचा त्रास व्हायला लागला. टोपी आठवणीने घालून जायचे तरी उन्हाने डोके खूप दुखायचे.आमच्याकडे बसचे वेळापत्रक होते आणि आमच्या अपार्टमेंटजवळच बस स्टॉप होता पण बसचा कधी आवाज आला नाही की स्टॉप दिसला नाही. एखादी तरी बस दिसायला हवी ना! मग स्टॉप कुठे आहे ते शोधून काढता येईल पण बस दिसायचे नावच नाही! आणि एकदा अचानक चालत असताना समोरून बस येताना दिसली. बस बरीचशी रिकामीच होती. मला बस बघून खूप आनंद झाला व ती बस कुठे जाते व कोणत्या रस्त्यावर वळते हे पाहण्याकरता रस्त्यावरच उभी राहिले. दुसऱ्या दिवशी बस जिथे वळाली त्या रस्त्यावरून चालत जाताना बरेच लांब गेल्यावर मला एक बस स्टॉप दिसला. इथे बस स्टॉप पटकन ओळखू येत नाहीत. बस स्टॉपवर बसायला काहीच नसते. एका खांबाला एक पाटी लावलेली दिसली आणि पाटीवर नाव होत कॅट बस. बस स्टॉप माहीती झाल्यावर विनायक विद्यापीठात बसने जायला लागला. मी पण आठवड्यातून एक दिवस विद्यापीठात जाऊन तिथल्या लायब्ररीत जायचे. तिथे नेटवर मेल चेक करायचे व थोडे वाचायचे. दूर टेकाडावर राहणाऱ्या मैत्रिणीकडे आठवड्यातून एक दिवस जायला लागले पण तरीही मैत्रिणीच्या घराच्या तिथे बस जात नव्हतीच. विद्यापीठात बसने जाऊन नंतर एक डोंगर चढून तिच्याकडे जावे लागायचे. शनिवार रविवार आठवड्याची ग्रोसरी आणाताना बसने जात होतो पण तरीही त्रास होतच होता. बस स्टॉप लांब होता त्यामुळे ओझी वाहून नेताना खूप दमायला व्हायचे. उन्हाळा असल्याने दिवस मोठा होता त्यामुळे आम्ही उन्हे उतरल्यावर ग्रोसरीला जायचो. त्यावेळी मी ग्रोसरिला जाताना पंजाबी ड्रेस घालायचे. थोडा वेगळेपणा यायचा.विद्यापीठातून रोज विनायक संध्याकाळी ६ ला घरी आल्यावर चहा खाणे झाले की लाईफटाईम चॅनलवर आम्ही ओळीने रोज दोन चित्रपट पहायचो. रात्रीची मुगाच्या डाळीची खिचडी किंवा आमटी भात खाऊन मग थोडा वेळ अपार्टमेंटच्या बाहेरच्या बाजुला एक बाकडे होते तिथे जाऊन बसायचो. रात्री छान थंडगार वाटायचे. क्लेम्सनमध्ये उन्हाळ्यात पुण्यात जसा वळवाचा पाऊस पडतो तसाच पडायचा. काही वेळा गारा पडलेल्या पाहिल्या आहेत. तेव्हा तर हे शहर पावसाने भिजल्यावर खूप छान दिसायचे. खूप जोराचा पाऊस यायचा. शनिवार रविवार भारतातून आणलेल्या गाण्यांच्या कॅसेट ऐकायचो. डेंटनला टीव्ही व एक रेडिओ कम टेप रेकार्डरही घेतला होता.आम्हाला कमीतकमी २ वर्षे राहता येईल अशी जागा शोधायची होती. आमच्याकडे असलेल्या अपार्टमेंट गाईडवरून जागा बघण्याकरता मी फोन करायचे व तिथे जाऊन अपार्टमेंट पहायचे. एक तर तिथे अपार्टमेंट बघण्यासाठी जास्त वाव नव्हता. दोन बेडरूमचे फ्लॅटही विद्यार्थ्यांनीच घेतले होते. एक दोन जे रिकामे झाले होते ते तिककेसे चांगले नव्हते आणि भाडी पण खूप होती. १ बेडरूम असलेल्या १- २ जागा होत्या त्या खूपच अंधाऱ्या होत्या. आठवड्यातून दोन चकरा तरी अपार्टमेंट पाहण्याकरता मी जात होते. नंतर कळाले की तिथे फक्त एक रुमची पण अपार्टमेंट आहेत. एक विदार्थी ओळखीचा झाला होता. तो पिएचडी करत होता. त्याचे लग्न झाले होते. हे असे लग्न झालेले विद्यार्थी अशा एक रूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. अशा अपार्टमेंटला इथे स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात. अशी २ ते ४ जोडपी या क्लेम्सनमध्ये आहेत असे कळाले. आम्ही पण ही रूम पहायची ठरवली. त्या ओळख झालेल्या विद्यार्थ्याकडून फोन घेतला व जागा बघण्याकरता आम्ही दोघेही गेलो. अशा जागा काही ठिकाणी होत्या. एक जागा खूप उंचावर असलेल्या एका टेकाडावर होती. जी जागा पाहण्याकरता गेलो होतो ती मुख्य रस्त्याला लागून होती. बस स्टॉप जागेला लागूनच होता. त्या रूममध्ये डीश वॉशर व वॉशिंग मशीन नव्हते. लाँड्रोमॅट चालायच्या अंतरावर होती. रूममध्ये टब बाथ होते. सर्व बाजूने विचार करता ही जागा आम्हाला सोयीची वाटली. शेवटी विचार करून नाईलाजाने व नाखुषीनेच त्या छोट्या जागेत रहायला गेलो.
एका रूममध्ये राहण्याची आमची पहिलीच वेळ होती. त्या जागेत एक रोलिंग खुर्ची होती. कोणीतरी ती खुर्ची जणू काही आमच्याकरताच तशीच सोडून गेले होते. त्या चौकोनी जागेत एका भिंतीला ओटा बेसीन व शेगड्या होत्या. दुसऱ्या भिंतीत भांडी, कपडे व सामान ठेवण्याकरता बरेच कप्पे होते. एका भिंतीला काचेची एक मोठी खिडकी व प्रवेशाचे दार होते. एक भिंत अशीच रिकामी होती. या अपार्टमेंटच्या भोवती उंच काटकुळी अशी बरीच झाडे होती. मी तर या घराला खेड्यामधले घर कौलारू असेच नाव दिले आहे. त्या जागेत जरी नाखुशीने प्रवेश केला असला तरी नंतर ही जागा कशी सेट झाली व नंतरची दोन वर्षे कशी मजेत गेली ते नंतरच्या लेखात लिहीनच.


एका खोलीत संसार करण्याची पहिलीच वेळ! त्या एका खोलीत मी माझा संसार चांगल्या प्रकारे सेट केला होता. असे म्हणतात की सजीव माणसांचे ऋणानुबंध असतात त्याप्रमाणे माणसे भेटतात, असेच काही नाही, तर निर्जीव वस्तुंचेही ऋणानुबंध असतात, ते कसे ते पुढच्या लेखात ! त्या घराची मला जेव्हा आठवण येते तेव्हा मी मनामध्ये आपोआप गाणे गुणगुणायला लागते... खेड्यामधले घर कौलारू... घर कौलारू...

10 comments:

Ninad Kulkarni said...

साध्या सरळ भाषेत तुम्ही ते ९० दिवस आमच्यापुढे उभे केले.

rohinivinayak said...

Anek Dhanyawaad Ninad !!

Nisha said...

Khupach chan rohinitai aani khare aahe baryach nirjeev vastunche pan runanubandh asatat nakkich :) mast vatala vachun... pudhcha part lavkar liha .. vat baghtey

Nisha

प्रविण डोंगरे,(मांची,ता.संगमनेर,जि.अहमदनगर) said...

तुमची भाषा अगदी साधी सरळ,ओघवती आहे .आपल्या मूळ घरापासून ,देशापासून दूर राहताना कसे एकाकी वाटत राहते हे अगदी मोजक्या शब्दात सांगितले आहे.

निसर्गवार्ता said...

खूप छान लेख !मनातल्या हळव्या आठवणी जागृत करणारा!

rohinivinayak said...

Nisha, Pravin Dongre, Nisargavarta,,, abhiprayabaddal anek dhanyawaad!!!

Nisha, tya ek room chya gharabaddal lavkarach lihin :) thanks!!

Anonymous said...

Rohini Taai, Tumche anubhav vachtana nehemi asech vatate ki tumcha samor basun aiktye...itke bolkey ahe tumche likhaan.

Tumchya ek roomchya ghara baddhal nakki vachayla avdel. Ithe alyvar amhi pan pahile 10-15 divas eka roomchya studiotach rahilo hoto. Khup sundar divas hote te. :)

Tehvhachi ek gammat saangte, me yeychya adhi hyaani kahi vastu anun fridge madhye thevlya hote. Tya peiki hote lettuce! Me tehvha lettuce pahilyanda baghitle hote, ithli kuthlitari local pale-bhaaji samjun me chakka te barik chirun tyaachi bhaajich keli and varan-bhaat lavla. Bhaaji baghun hey ekdum chakit jhaale ki hi kasli bhaaji? saangitlyavar khup hasle anhi aajahi bajaraat lettuce baghitla ki ti bechaav bhaaji athavte. :)

- Priti

rohinivinayak said...

priti,, tuzi lettuce chi bhaji vachun khup chhan vatle ga,, vegli asel na chav tyachi :) mastach ,, kathechi aaturtene vaat pahatyes he vachun aani bharat bheti varcha savisttar pratisad vachun khup khup chhan vatle ga!! thanks a lottt ...:) ase chhan chhan abhipray vachun khup utsah vatato aani ajun lihave ase vatate aani lihile jate,, eka room baddal lihinyachya aadhi ajun ek lekh manat gholat aahe,, bahudha toch aadhi lihila jail ase vatate.. baghu kase jamte te :)


thanks a lottt to All My Readers !!!

Anonymous said...

मस्तच लिहिता तुम्ही, सहज ओघवती शैली.. अगदी तिथेच असल्यासारखे वाटते.

rohinivinayak said...

Anonymous , anek dhanyawaad, khup chhan abhipray lihila aahe tumhi!