Wednesday, January 18, 2012

१८ जानेवारी २०१२

आज सकाळी उठल्यावर बाहेर पाहिले तर बराच पाऊस पडून गेलेला दिसत होता. रस्ते ओले होते. पावसाळी हवा होती. चहा झाल्यावर मागच्या बाल्कनीत जाऊन पाहिले तर तिथे बदके जमली होती. पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये चोची घालून काहीतरी वेचून खात होती. विचार केला आताच त्यांना ब्रेड खायला द्यावा. आजकाल मी तळ्यावर बदकांना ब्रेड घालण्यासाठी जात नाही. त्यांना आता माहिती झाले आहे मी ब्रेड घालते ते त्यामुळे बदके सकाळ संध्याकाळ अपार्टमेंटच्या समोर आलेली दिसतात. त्यात हिवाळा असल्याने सीगल्स पक्षी पण असतात. हे सीगल्स तर मला खूपच आवडतात. निष्पाप असतात. ब्रेड खाण्यापेक्षा ते उड्याच जास्त मारतात. गोंगाट करतात. त्यांचा गोंगाट ऐकायला खूप छान वाटते.आज सकाळी जी पावसाळी हवा होती ती अगदी पुण्यात पाऊस पडून गेल्यावर कसे वाटते अगदी तसेच वाटत होते. पावसाळी हवा, ढगही होते, अधुनमधून पाउसही झिमझिमत होता. जास्त गारवा नाही की उकाडाही नाही. थंडी असली तरी सुद्धा काही वेळेला ती खूपच जास्त पडते नाहीतर झेपेल इतपतच पडते. आज ठरवले होते लायब्ररीत जायचे. रोज मी युट्युबवर गाणी बघतच असते, अगदी काही वेळेला बरे नसेल किंवा मूड नसेल तर बघत नाही. आज आणि अजून काही दिवस मीठे बोल बोले हे किनारा चित्रपटातले गाणे मनात घोळत राहणार. असेच होते माझे. काही वेळेला काही गाणी बघितली की काही दिवस खूप घोळत राहतात. मागच्या आठवड्यात आज कुणीतरी यावे हे गाणे घोळत होते. पूर्वी रेडिओवर ऐकले होते पण जेव्हा युट्युबवर पाहिले तेव्हा परत परत ऐकावेसे वाटले इतके अफलातून गाणे आहे. चित्रीकरण पण छान आहे. तसेच कालचे किनारा मधले गाणे "मीठे बोल" असेच आज दिवसभर मनात घोळत होते. या गाण्यात तर सर्व काही छान आहे. हेमामालिनीचा नाच, गाण्याची चाल, ती नाचते तो बंगला, बाहेर जो निसर्ग आहे तो तर लाजवाब आहे. हिरवीगार झाडे. एकूण काही वेळेला असे सगळे काही जमून आले की छान वाटते. गाणे बघताना असे वाटले असा छान बंगला असायला हवा. अशी मोकळी जागा नाचायला हवी. मला पण असे मनसोक्त नाचायला आवडेल. गाण्याप्रमाणे नाच शिकण्याची आवड अपूर्ण राहिली. माझी आई मला सांगते की मी लहानपणी रेडिओवर गाणे लागले की नाचायचे आणि जशी सूचेल तशी ऍक्शनही करायचे. मलाही आठवते. हा किनारा चित्रपट मी माझ्या शैला नावाच्या मैत्रिणीबरोबर पाहिला होता.आज लायब्ररीतून येताना बसमध्ये चक्क गर्दी होती. आजचा दिवस छान गेला. संध्याकाळी क्लेम्सनमधल्या आठवणी आल्या. क्लेम्सनमध्ये मी मनसोक्त बसने जायचे. सुरवातीला असाच वेळ घालवण्यासाठी. नंतर नोकरीनिमित्ताने. ही नोकरी पण घरापासून चालत जाण्यासारखीच. पण मी बसने जायचे. शिवाय बुधवारी संध्याकाळी चर्चला जायचे नोकरीसाठी तेव्हाही बसने जायचे. येताना चालत यायचे. खूप छान होते ते दिवस. रविवारी सकाळी पण चर्चची नोकरी. क्लेम्सनचे दिवस खरच खूप छान होते. नोकरी केली की घरकाम करायलाही उत्साह येतो. अशी एखादी नोकरी हवी. अर्थात नोकरी नसली तरी लायब्ररीचे काम करायला जातेच. पण तरिही मुद्दामून उठून बाहेर जाणे आणि कामानिमित्ताने बाहेर जाणे यात फरक आहेच. नोकरी असली की टापटीप राहणे होते. घरातल्या कामाचेही प्लनिंग होते. उत्साह येतो. खरे तर ठरवले तर रोजच्या रोज लायब्ररीत जाता येईल, पण थंडी असल्याने बाहेर पडायला नको वाटते. एकदा का घरी बसण्याची सवय झाली की खूप आळस अंगात शिरतो. अगदी तसेच झाले आहे माझे!

4 comments:

Anonymous said...

Rohini Tai, Mala tumhi ekadhya khup chaan javalchya maitrini sarkhe vatta. Me tumche sarva lekh vachte va tumcha recipe blog pan me regularly check karte, kahi divas kahi lihile nahit tar sarkha tumcha vichar yeto ki tumhi kaay karat asal? tabbet bari asel na? kuthey firayla gela asal ka? :) Tumchi katha parat lihayla kadhi suru karnar ahat...kiti chaan jamli hoti.

rohinivinayak said...

pahilya pratham tumhi maze lekhan nehmi vachta yabaddal kharch khup chhan vatle,,,hoho,, katha purNa karnar aahe. pudhil katha dokyat aahe,, aadhi vahit lihun lagech blog var type karte,,, phakt katha lihayla kahi velela salag vel nahi milat,,, kahi vela tabyet thik naste, kahi vela mood nasto, libraryt jate mi 1-2 vela week madhe,, pan pudhchi katha nakii lavkarat lavkar lihin... promise,, mala pan lihayla chhan vatat aahe,, aani tumhi vachat aahat tyamule jast lihayla aavadat aahe,, tumche naav kaay aahe? mala khup utsukata aahe tumhi kon aahat yachi :) :)

Anonymous said...

Tumhaala vel milel tehvha liha. Me vaat pahin. :) Tumhi khush jhaalat ki maalahi khup ananda hoto.

Priti

rohinivinayak said...

thanks priti :)