Saturday, January 21, 2012

अमेरिकेतील पाळणाघर (२)

अमेरिकेतल्या पाळणाघराबद्दल मी पहिल्या लेखात लिहिले आहे. तिथे मी substitute म्हणून काम केले होते. तेव्हा माझ्या dependent visa (J2 visa) वर वर्क परमिट घेतले होते म्हणून मला ही नोकरी करता आली. J 2 visa संपल्यावर मला H4 dependent visa झाला. या व्हीसावर वर्क परमिट घेता येत नाही त्यामुळे मला ही नोकरी सोडायला लागली. मी येथील पाळणाघरामध्ये toddler मध्ये काम केले हे मी पहिल्या लेखात लिहिले आहेच. तिथल्या मुलांची मला खूप सवय झाली होती त्यामुळे नंतर मी तिथे नोकरी न करता हौस म्हणून जाऊ लागले. मी तिथल्या डायरेक्टरला विचारले की मी इथे काम आठवड्यातून एक दोन वेळा काम करायला आले तर चालेल का? त्यांनी मला आनंदाने परवानगी दिली. माझाही वेळ छान जात होता. जेव्हा त्यांना कोणी रजेवर गेले आणि अत्यंत गरज लागली की मला बोलावून घेत असत पण त्यावेळेला मला त्या कामाचे कॅश पैसे देत. कामाचा सर्वात जास्त काळ हा लंच टाईममधला असे त्यामुळे मी voluntary work करायला ११ ते २ या वेळात जायचे. तिथल्या काही मुलांच्या आठवणी लिहायच्या राहून गेल्या आहेत त्या मी इथे या लेखात लिहीत आहे.


लंच टाईम म्हणजे साधारण ११ ते २ हा काळ खूप महत्त्वाचा असे. जेवायला बसायच्या आधी या सर्व मुलांचे हात धुवून पुसून तोंडावरून पाण्याचा हात फिरवून व पुसून त्यांना टेबल खुर्चीवर बसवणे हे माझे काम असे. मला हे काम खूप आवडायचे. १० मुलांमध्ये त्यावेळेला आमच्या तिघींचा वेळ खूप व्यग्र जात असे. एक जण सर्वांचे डब्यातले अन्न गरम करून द्यायची. एकजण मुलांवर लक्ष ठेवायला कारण की ही मुले एका जागी थोडी बसातात! टेबल खुर्ची पुसण्याचे काम एक जण करायची. या मुलांचे चिमुकले हात धुताना खूप छान वाटायचे. त्यात डॅनिअल योगर्ट खायचा. मी त्याला चमच्याने योगर्ट भरवायचे. मग पटापट खायचा. खरे तर या मुलांनी स्वःत हातानेच खाणे अपेक्षित असते. त्यांना भरवायचे नसते. हा डॅनिअल एक चमचा योगर्ट खाल्यावर इकडे तिकडे पाहत बसायचा. मग ठरवले याला भरवायचेच. मग कसा पटापट संपवायचा सगळे योगर्ट! हा डॅनिअल मला खूप आवडायचा. सर्व बाजूने वाटोळा होता. जेवणानंतर परत सगळ्या मुलांचे हात धुवून पुसायचे. टेबल खुर्ची पुसायची. मॉपिंग करायचे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व मुलांचे डायपर्स बदलायचे. मला मुलांना जेवण भरवायला व झोपवायला खूप आवडते. तिथल्या अमेरिकन बायका होत्या त्या मला म्हणायच्या तुझ्याकडे कशी काय पटकन झोपतात मुले? त्यांनी माझ्यावर मुलांना झोपवण्याचे काम टाकले. मला तेच हवे होते. एक जण सर्व साफसफाईची कामे करायची आणि एक जण सर्व मुलांचे डायपर्स बदलण्याचे काम करायची. मी सगळ्या मुलांच्या छोट्या गाद्या घालून प्रत्येकाला झोपवाय्चे. सर्व लाईट ऑफ व्हायचे. बारीक आवाजात बालगीत चालायची. मुलांच्या जेवणाच्या आधी मी जेवून घ्यायचे, कारण की माझे जेवण पोळी भाजीचे त्यामुळे माझे जेवण १५ मिनिटात व्हायचे. मला मुलांना झोपवण्याचे काम देवून इतर दोघी लंचला बाहेर जायच्या. अर्थात दोघी एकदम जायच्या नाहीत. या अमेरिकन बायका चांगला १ तासाचा आरामात लंच टाईम घेतात. त्यांचा लंच बाहेर उपहारगृहातच असतो.

डॅनिअलची झोप कावळ्याची! सर्व मुलांना झोपवून आपण खुर्चीवर निवांतपणे बसावे तर हा जागा व्हायचा. सर्वात प्रथम डॅनिअल झोपायचा आणि सर्वात शेवटी मॅनव्हेल झोपायचा. खुर्चीत मी बसलेली असायचे आणि डॅनिअल झोपेतून उठून मान वरू करून माझ्याकडे पाहत बसायचा. त्याला हातानेच 'झोप' अशी खूण करायचे पण काहीही उपयोग नाही. डॅनिअल उठून त्याचे बूट घेऊन माझ्याकडे यायचा आणि दरवाजाकडे बोट दाखवायचा. मग त्याला मी विचारायचे 'want to go outside' की लगेच मान डोलवायचा. तोपर्यंत एकेक जण लंच टाईम करून यायची आणि मी व डॅनिअल बाहेरच्या हॉलमध्ये माझे बोट घरून चालायचा. त्याला खरे तर पूर्ण बाहेरच जायचे असायचे. मग बाहेरच्या हॉलमध्येच आम्ही दोघे फेऱ्या मारायचो.

क्रीपरमधून क्ले नावाचा मुलगा टोडलर मध्ये नुकताच मुव्ह झाला होता. तो सुरवातीला इतका काही रडायचा की त्याचा चेहरा लालेलाल व्हायचा. मी त्याच्याकडे पाहून हासले की अजूनच जोरजोरात रडायचा. मग मी त्याच्याकडे न हासता पाहू लागले, तरीही त्याचे रडणे थांबेना. मी त्याच्याकडे पाहण्याचे पूर्णपणे टाळले, तरी सुद्धा हळूच एक नजर त्याच्यावरून फिरवायचे व बाजूला तोंड करून हासायचे. हळूहळू त्याचे रडणे थांबायचे पण अगदी थोडावेळ. नंतर मी त्याच्या जवळ असलेल्या मुलाकडे बघून हासायचे बोलायचे. नंतर मग हळूहळू त्याला कळाले की ही बाई आता आपल्याकडे बघत नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे हे कळाल्यावर एकदा माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि हासला. मग मीही त्याच्याकडे पाहून हासत राहिले. त्यानंतर मग एकदम माझ्याशी गट्टी जमली.
मुले झोपून उठली की त्यांना खायला देतात व मैदानावर खेळायला नेतात. तिथून आल्यावर गोष्टी, गाणी, कवायती, खेळणे, थोडी दंगा मस्ती चालू राहते. एलिसाबेथ गाण्याच्या तालावर त्यांना हात वर खाली करायला सांगायची. एलिसाबेथ आणि अँजला या दोघींमध्ये खूप फरक होता. एलिसाबेथ मुलांमध्ये खेळायची व कामे टाळायची. याविरुद्ध दुसरी. तिला साफसफाई अगदी मनापासून करायची. एकदा मुलांच्या कवायतीमध्ये मी पण सामील झाले तेव्हा एलिसाबेथ रजेवर होती. त्यांना गाण्याबरोबर हात वर खाली करणे. गुडघ्यावर हात ठेवणे असे प्रकार सांगितल्यावर मी एकदम सूर्यनमस्कार घालायला सुरवात केली. आणि मुलांना सूर्यनमस्काराच्या स्टेप्स सांगितल्या. हात वर, हात खाली, एक पाय मागे, दुसराही मागे, आता डोके जमिनीवर टेका. याप्रमाणे मी पण एकीकडे सूर्यनमस्कार घालत होते. मजा म्हणजे मुले त्या सर्व स्टेप्स करत होती. मला ते बघून खूपच हासू येत होते. नंतर मुलेही हासायला लागली. सूर्यनमस्कार घालताना माझ्याकडे पाहून हासत होती. त्यांना मजा याची वाटत होती की बाई कोणते कवायतीचे प्रकार करत आहे याची! मग एकदा मी मुलांशी खेळताना त्यांच्यात झोपले. डोळे मिटले आणि किलकिले केले आणि मुले हासायला लागली. नंतर डोळे बराच वेळ मिटून घेतले आणि मग एकेक करत मुले येवून माझी डोळ्याची पापणी वर करायची. मी डोळे उघडले की जोरात हासायची. एकदा बसून डोळ्यावर हात ठेवले आणि मुलांना सांगितले कोण बरे पहिले येत आहे माझ्याकडे? मग मुले येऊन डोळ्यावरचा हात काढण्याचा प्रयत्न करायची. मी मुद्दामून मग डोळ्यावरचा हात घट्ट करायचे. खूप दंगामस्ती करायची ही मुले! एकाला एक खेळ हवा असला की तोच सर्वांना हवा असायचा.

माझे वर्क परमिट संपल्यानंतरही मी हौस म्हणून जायचे आठवड्यातून एक दोन वेळा. तेव्हा तर तिथल्या बायकांना खूप आनंद व्हायचा. दरवेळी मी निघाल्यावर माझे अनेक वेळा आभार मानायच्या. मी जेव्हा हौस म्हणून जायचे तेव्हा ११ ते २ जायचे. या डेकेअरमध्ये मी जेव्हा substitute म्हणून नोकरी करायचे तेव्हा माझी वेळ १० ते ४ असायची. पण काही वेळा अचानक कोणी रजेवर गेले तर तिथली डायरेक्टर मला सकाळी ७ लाच फोन करून यायला सांगायची तेव्हा मी सर्व आवरून ८ ला हजर व्हायचे. क्लेम्सनमध्ये मला फक्त शनिवार वार मोकळा असायचा. कारण की रविवारी सकाळी ४ तास व बुधवारी रात्री २ तास मी एका चर्चमध्ये कामाला जायचे. खूप बिझी असायचे मी क्लेम्सनमध्ये!! गेले ते दिन गेले! तिथल्या सर्व मुलांचे फोटोही आहेत माझ्याकडे.मला या नोकरीचा पूर्वानुभव नव्हता की डेकेअरमध्ये काम करण्याकरता जो कोर्स करायला लागतो तोही केलेला नव्हता. अशा प्रकारे मला इथे या नोकरीचा खूप छान अनुभव आला.

8 comments:

Anonymous said...

chan lekh ahe Rohini tai. mala vachun khup han vatle,tumhi mazyashich gappa arat ahat ase vatle.

rohinivinayak said...

Thanks a lottt....:)

Anonymous said...

Rohini Tai, Khup khup avadla ha lekh. Tumcha maanat tya mulan baddhalcha prem tumchya shabdaat jaanvat hota.

rohinivinayak said...

Thanks a lottt...:)

Anonymous said...

Good one.. Just wanted to mention that "Ya americans mulana swatahachya hatane khayachi savay lavanyacha prayanta asato.. Aapana tyna bharavun ka bighadavayach?" Think over it.

Anonymous said...

Apan sarvach mothhe jhalyavar ap-aplya haatani jevtoch pan konhi premani aplyala lahanpani bharavla asel tar tyachi athvan nehemi rahate.

Americans khup lahanpana pasnach savay lavtat anhi bharatat aplyala shaletun alyavar suddha varan bhaat kalvun bharavtat! Aaj ek tari tarun bharatiya tumchya olakhicha ahe ka jyala hi savay lagli nahiye kivva swatahun jevtana khup kashta hotayt? :D

Khara saangaycha tar jehvha lahan mulache motor skills develop hotat te swatacha-swataha khaicha prayatna kartat. Tumhi tyaana bharvaicha prayatna jari kelat na tar te tumcha haatatna swatahacha haatat gheun mag tondaat taktil. :)

Tar saangaycha tatparya hey ki 'bharavney' ha ek premacha bhaav ahe. Mhanunach kadachit lagnachya pangtit suddha navra-navrila ek-mekana ghaas bharvaila saangtat. :)


Priti

Yashodhan Walimbe said...

मस्त ताई..

rohinivinayak said...

Thanks so much !