Sunday, September 11, 2011

११ सप्टेंबर २०११

आजची संध्याकाळ खूपच सुंदर होती. घरातून निघतानाच सूर्य छान दिसत होता. सूर्यास्ताला अजूनही आवकाश होता. सूर्याभोवती पांढरेशुभ्र छोटे ढग जमा झाले होते. संध्याकाळी ७ वाजताही सूर्य प्रखर होता. डोळ्यावर येत होता. तेव्हाच म्हणाले कॅमेरा घ्यायचा राहिला. मी तसे बरेच घेतले आहेत सूर्यास्त त्यामुळे म्हणाले जाऊ दे. नदीवर पोहचलो तर तोपर्यंत सूर्य लालबुंद झाला होता आणि त्याचा लालबुंद प्रकाश पाण्यावर छान तरंगत होता. इतके सुंदर दिसत होता तो सीन!आज चालायचा मूड नव्हता. खूप दमायला झाल्याने नदीवर जाऊन नुसते बसण्याचे ठरवले होते. हवेत गारवा नसला तरी सुखद हलके वारे होते. नदीवर लाकडी पुलावर बाकावर बसलो आणि आभाळातले रंग न्याहाळत राहिलो. सूर्यास्त होत होता व त्याच्या अनेक छटा दिसत होत्या. सूर्याभोवती थोडे निळे छोटे ढग जमले होते. सूर्यास्त होता होता त्या निळ्या छोट्या ढगांमध्ये वेगवेगळे रंग निर्माण होत होते. पिवळा रंग व काळेनिळे ढग त्याचा एक छान पट्टा निर्माण झाला होता. नंतर पिवळा रंग जाऊन त्या ढगांच्या पट्यामध्ये गुलाबी रंग घुसला. नदीच्या पाण्यात आकाशात निर्माण झालेले निरनिराळे रंग दिसत होते. पिवळा, नंतर लाल, हिरवा व निळा असे एकामागोमाग एकेक थर खूप छान दिसत होते. एक बोट गेल्याने नदीचे पाणी हलले आणि रंगीबेरंगी लाटा निर्माण झाल्या. मन हळहळत होते कॅमेरा आणला नाही म्हणून. नदीवर नेहमी कोणकोणते आर्केस्ट्र असतात. आजचा छान होता. म्युझिक छान होते. हिंदी गाण्याची आठवण करून देणारे होते. संगीतकार पंचमची आठवण करून देणारे होते. लेकर हम दिवाना दिल, आजा आजा मै हु प्यार तेरा, ये काली काली ऑखे. म्युझिक इंग्रजी असले तरी ट्यून हिंदी गाण्याचीच वाटत होती.संगीत ऐकत असतानाच नदीतून एक खाजगी बोट जाताना दिसली. त्या दोघे नवरा बायको त्या बोटीत खुर्च्या टाकून निवांत बसले होते. त्या संगीताला त्या माणसाने जोरात शिट्टी मारून दाद दिली. अरे वा, इथे पण लोकं शिट्या मारतात वाटते? छान वाटली त्याची ती दाद पाहून! हळूहळू सूर्यास्त झाला तरीही लाल निळे रंग क्षितीजावर रेंगाळलेले होते, कितीतरी वेळ! आजची संध्याकाळ मनाला आनंद देवून गेली. नदीवरून रस्त्यावर येतो तर निरभ्र आकाशात चंद्रही खूप सुंदर दिसत होता. त्याचा फोटो घरी आल्यावर घेतला. कॅमेराची बॅटरी संपत आली असल्याने जास्त चांगला आला नाही. आज अजून एक फोटो घ्यायचा राहून गेला त्याची पण हळहळ वाटत आहे. सकाळी बदकीणीच्या अंड्यात किती भर पडली हे बघायला गेले तर बाजूला असलेल्या झुडुपामधून चिवचिव आवाज आला, वाटले छोटी पिल्ले आहेत का? तसाच आवाज येत आहे, बघते तर एक छोटे पिल्लू व त्याची आई झुडुपाच्या मागे बसलेली दिसली. झुडुपामागे खूप वाकून पाहिल्यावर दिसली. दोघेही छान दिसत होती. त्याचा एक फोटो घ्यायचा राहून गेला. अंड्यात वाढ झालेली आहे. बदकीण फॅमिली नं २ चा अजूनही पत्ता नाही.

No comments: