Wednesday, December 23, 2009

दूध

दूध अशी हाक आली की आम्ही स्टीलचे/हिंडालियमचे पातेले विसळून टेबलावर उपडे करून ठेवायचो कारण की आम्हाला तसे तांब्यांनी सांगून ठेवलेले होते की मी बऱ्याच ठिकाणी दूध घालतो, मला अजिबात वेळ नसतो, पातेले तयार ठेवलेत तर मला पटकन दूध घालून दुसरीकडे जाता येईल. त्यांचा एक टेंपो होता त्यामध्ये ३-४ मोठाले कॅन असायचे. कॅनमध्ये ३-४ मापे असायची. प्रत्येकाच्या घरी ४ मापे, ६ मापे असे ठरलेले दूध ते घालत असत. जेव्हा जास्तीचे दूध हवे असेल तर सांगायचे आधी ८ दिवस सांगून ठेवत जा. सणासुदीचे दिवस असतील तर, किंवा कुणी पाहुणेरावळे आलेले असतील तर, किंवा घरी लहान मूल आलेले असेल तर दूध जास्त लागते. थंडी असो, पाऊस असो, नियमितपणे दूध घालणे आणि ते सुद्धा घरोघरी जाऊन हे काही सोपे काम नाही. दूध नासले की कॅलेंडरवर टीक मार्क करायचो आम्ही. कमीचे, जास्तीचे दूध, दूध ज्यादिवशी आले नाही, अशा सर्व नोंदी कॅलेंडरवर असायच्या. दूध एकदम चांगले दाट असायचे. श्री तांबे अजूनही आमच्या आईच्या घरी दूध घालतात, आता ते पिशवीतून येते.श्री. तांबे यांच्या आधी खूप पूर्वी आईकडे सरकारी दूध घेत असत. हे सरकारी दूध एका चौकोनी लाकडी टपरीमध्ये येत असे. त्यांच्या एक लिटरच्या काचेच्या बाटल्या खूप जाडजूड असायच्या. त्यावर चांदीसारखी दिसणारी टोपी होती. चांदीसारख्या दिसणाऱ्या कागदावर थोडे पट्टे, काहींवर निळे, तर काहींवर हिरवे, लाल. निळ्या रंगाचे पट्टे म्हणजे म्हशीचे दूध आणि हिरव्या किंवा लाल रंगाचे पट्टे असतील तर ते गायीचे दूध असे काहीतरी होते. हे दूध आणायला पहाटे पहाटे जायला लागायचे. सरकारी दूधाची गाडी यायची. त्यातून बाटल्या खाली उतरवल्या जायच्या आणि मग त्याचे वाटप व्हायचे. रिकाम्या बाटल्या देवून भरलेल्या बाटल्या द्यायच्या. बाटल्यांचे दूध घरी आले की ते पातेल्यात काढून तापवायचे व रिकाम्या बाटल्या धुतल्या जायच्या दुसऱ्या दिवशी नेण्याकरता. पहाटे ४ ला चौकोनी टपरीसमोर रांग लावावी लागत असे. वेळेवर गेले नाही तर दूध संपायचे. सरकाअरी दूध घेणाऱ्यांकरता एक कार्ड असे ते दाखवायचे व दूध घ्यायचे. पहाटे दूध आणण्याचे काम माझे आजोबा नाहीतर बाबा करत असत. उन्हाळ्यात पहाटे उठायला काही वाटायचे नाही. उलट गार हवेत छान वाटायचे. आम्ही दोघी बहिणी बाबांबरोबर जायचो कधीकधी दूध आणायला. थंडीपावसात जायला थोडे कठीण असे. त्यावेळेला पुण्यात कडाक्याची थंडी पडायची. पहाटे पहाटे दूध आणण्याकरता बाबांनी दार उघडले की इतके काही थंडगार वारे आत यायचे की आम्ही दोघी बहिणी लगेच ओरडायचो बाबांवर " बाबा दार लावून घ्या ना पटकन, खूप थंडी वाजत आहे" आई बजावायची "अंधार आहे, जाताना बाहेरचा दिवा आठवणीने लावून जा. बाबांचे मित्र दूध आणायला यायचे. तिथे कधीकधी निरोपांची देवाणघेवाण होत असे. "आज आमची सौ येणार आहे बरंका वहिनींना भेटायला. त्यांना आठवणीने निरोप द्या."
लग्न झाल्यावर सासरी आमच्याकडे कॅनचेच दूध होते. दूध घालायला घरी आले की लगेच मनीमाऊ यायची दूध प्यायला. दूध गॅसवर तापवायला ठेवायच्या आधी ही मनीमाऊ इतकी काही भंडावून सोडायची की तिला पहिले बशीत ओतून द्यायचे दूध मग गॅसवर तापवत ठेवायचे. नंतर चितळ्यांचे दूध सुरू केले. जेंव्हा मुंबईत आलो तेव्हा घरी येऊन नाही कुणी दूध घातले. घरी येऊन दूध घालायची फॅशन फक्त पुण्याचीच असावी. मुंबईत जिथे आम्ही राहत होतो तिथे खालीच एक डेअरी होती. तिथे पातेले घेऊन जायचे. हे पातेल्यातले दूध घरी घेऊन जाताना श्वास रोखून जावे लागत असे कारण की पातेल्यातले दूध हेंदकाळून खाली सांडायची भीती. हे दूध इतके काही "महापातळ" होते की काय बिशाद चहाचा रंग बदलेल. नंतर जरा थोड्या लांब असणाऱ्या डेअरीतून चांगल्या प्रतीचे दूध आणायला लागलो. हे दूध तो डेअरीवाला आम्हाला एका पातळ प्लॅस्टीकच्या पिशवीतून देत असे. त्यावर एक छोटा दोरा बांधून. अलगद पिशवीत भाजीच्या सर्वात वर ठेवायचे मी हे दूध. हे दूध पातेल्यात ओतताना पण एक कसरतच असे. एक तर आधी त्या पिशवीला निरगाठ असायची. डाव्या हाताने पिशवी धरायची व उजव्या हाताने ती गाठ सोडवायची. गाठ सोडवायची म्हणजे ब्लेड घेऊन ती अचुक कापायची. कापली की प्लॅस्टीकची पातळ पिशवी पूर्णपणे उघडायची त्यामुळे अगदी काळजीपूर्वक हे दूध पातेल्यात ओतावे लागायचे. त्याकरता मी एक युक्ती काढली. ही पिशवी पातेल्यातच ठेवायची व वरून कापायची निरगाठीच्या खालूनच म्हणजे दूध पातेल्यात आणि मग प्लॅस्टीकची पिशवी काढायची. थोडे दिवसांनी पिशवीतले दूध सर्रास येऊ लागले. आधी महानंदा आले, नंतर वारणा व गोकुळ.इथे अमेरिकेत आल्यावर अगदी पहिल्यांदा सवयीने कॅनमधले दूध मी पातेल्यात घेऊन तापवायचे. पण इथे कुठची साय, नि कुठचे लोणी, नि कुठचे तूप! जरूरीपुरते दूध काढा, तापवा अगर तापवू नका, तसेच प्या. खरे तर दूध म्हणजे चहा आलाच. चांगला चहा हा पूर्णपणे दूधावर अवलंबून असतो. अगदी थोड्या दुधाने चहाचा रंग बदलायला पाहिजे. चहा म्हणजे कसा अमृततुल्य चहा लवकरच घेऊन येते!!

5 comments:

साळसूद पाचोळा said...

रोहिनीताइ..

आमच्याकडेही कैनवालाच दुधवाला येतो. पण पेपरवाला आणि दुधवाला मला तो कधिच दिसत नाहि. (कारण आमची झोप) फक्त महिनाभरल्यावर बिल मागायला येतो तेव्हाच हा आप्ला दुधवाला आहे हे कळते... बाकी त्याकडचे दुध पिशवीतिल दुधापेक्षा महापातळ असते हे मी नक्की सांगू शकतो. .. दुधटाकायला त्याला मारुती व्हन "पाण्यामुळे" परवडते.. मस्त लिहले आहे.

आप्ला.

साळसूद पाचोळा.

Naniwadekar said...

"जेंव्हा मुंबईत आलो तेव्हा घरी येऊन नाही कुणी दूध घातले. घरी येऊन दूध घालायची फॅशन फक्त पुण्याचीच असावी."
----

रोहिणीबाई: भारतभर घरी जाऊन दूध घालायची पद्‌धत आहे. मुंबईतही असणारच. दिल्लीत बरीच दहावीत नापास वगैरे झालेली मुलं अंडी, ब्रेड, दूध विकायला हातगाडी चालवत असत. फरक इतकाच की हे दूध पिशवीत असायचं; पण ते घरपोच मिळायचं. हा व्यवसाय अनेक पिढ्या करणारे लोक महाराष्ट्रात आहेत, तसेच इतर प्रदेशांतही निश्चितच असतील.

Truth or Dare said...

khup chhan.... vachvas watnar lekh

http://yajaganyavar.blogspot.com/

rohinivinayak said...

साळसूद पाचोळा, नानिवडेकर, truth or dare अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद.

नानिवडेकर, पिशवीतले दूध सर्वत्र घरी पोहोचवले जाते, पण सुटे दूध घरी घातले जातेच असे नाही. आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा आमच्या नातेवाईकांकडे असे बघितले नाही कुठे घरपोच सुटे दूध घालताना त्यामुळे तसे लिहिले आहे. तशी प्रत्येक गोष्टीची घरपोच सेवा भारतभर आहेच.

Naniwadekar said...

"नानिवडेकर, पिशवीतले दूध सर्वत्र घरी पोहोचवले जाते, पण सुटे दूध घरी घातले जातेच असे नाही. आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा आमच्या नातेवाईकांकडे असे बघितले नाही कुठे घरपोच सुटे दूध घालताना ... "

मला वाटतं की हा काळाचा महिमा. पुण्यात सुटं दूध घेऊन फिरणारे मी (पंधरा वर्षांपूर्वी) पाहिले नाहीत. विदर्भातही आता ते आधीइतके दिसत नाहीत. मुंबईला मराठी संस्कृतीच्या बालेकिल्ल्यात ही पद्‌धत एके काळी असणारच. आणि : 'घरी येऊन दूध घालायची फॅशन फक्त पुण्याचीच असावी' हा तुमचा अंदाज़ विदर्भावर महाप्रचंड, घोर, अगदी असह्‌य असा अन्याय करणारा आहे. ही पद्‌धत गायीला खूप महत्त्व देणार्‍या सर्व भारतभर असावी, असा माझा अंदाज़ आहे.