Monday, December 14, 2009

मी जरा फ्रेश होऊन येते !

तीन चार महिने झाले की माझी चुळबुळ सुरू व्हायची. चार महिने म्हणजे खूप झाले. विनुला सांगायचे मी जाऊन येते रे पुण्याला. खरे तर मुंबईवरून पुण्याला जाणे म्हणजे काही खूप लांब जाणे नाही, अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याइतपत जवळ आहे. ही चार पाच दिवसांची ट्रीप म्हणजे जाताना जितका उत्साह तितकाच किंवा त्याहूनही अधिक उत्साह मला येताना असायचा. खूप फ्रेश होऊन यायचे मी. बॅग पण छोटी सुटसुटीत असायची. ही छोटी बॅग भरताना पण मला भारी उत्साह असायचा. जाता येताना डेक्कन एक्सप्रेस ठरलेली असायची. रेल्वेमध्ये ही एक छान सोय असते. बायकांचा एक वेगळा डबा असतो. आपण एकटे जरी असलो तरी इतर बायकांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात. ऐकून करमणूक होते आणि प्रवासही छान होतो.पंजाबी ड्रेस घालून, गळ्यात एक पर्स लटकवून व बॅग घेऊन मी डेक्कनमध्ये प्रवेश करायचे. गाडी सुटताक्षणी कानातले गळ्यातले सेट घेऊन विक्रेते यायचे. हा एक छान टाईमपास असतो. तीन चार चौकोनी बॉक्स असायचे ते सर्व बायकांमध्ये फिरायचे इकडून तिकडे. हे बघण्यात पण छान वेळ जातो. खिडकीत जागाही कदाचित मिळायची थोड्यावेळाने. कर्जत आले की बटाटेवडे खाणे हे ठरलेले. खिडकीतल्या बायकांना विनंती करून बाकीच्या "ए माझ्यासाठी घे गं पटकन" अशा सांगायच्या. मग खिडकीतून हळूच बटाटेवडे घेऊन ते बायकांकडे द्यायचे व पैसे बटाटेवडेवाल्याकडे. सगळ्यांचे मग बटाटेवडे व त्यावर कॉफी चहा वगैरे सुरू व्हायचे.सर्व बायका थोड्या स्थिरस्थावर होऊन मग "तुम्ही कुठे निघालात? " "कोणत्या स्टेशनवर उतरणार? शिवाजी नगर की स्टेशन? " "मुंबईत कुठे राहता? " अशा थोड्या गप्पा टप्पा सूरू व्हायच्या. नंतर घाटातले सृष्टीसौंदर्य पाहण्यात खूप मजा यायची. घाट पाहता पाहता मनातच "हं आता तासाभरात येईलच शिवाजी नगर" कधी एकदा पुणं येतयं आणि मी आईकडे जाते असे होऊन जायचे मला. शिवाजी नगरला उतरायचे मी. स्टेशन येताक्षणी अगदी लगेचच उतरायचे. भराभर जिना चढून पूल ओलांडून पलिकडच्या पायऱ्या पण अगदी पटापट उतरायचे. मला अजिबात धीर नावाचा प्रकार नाही. असे भराभर चालून गेले की मग शिवाजी नगरला पटकन रिक्षा मिळते नाहीतर नंतर थोडे कठीण होऊन बसते.रिक्षात बसल्यावर पण किती ही रहदारी! केव्हा येणार घर! असे मनातल्या मनात पुटपुटायचे. आईच्या घरासमोर रिक्षा थांबली रे थांबली की हातातले पैसे देऊन धावतच बॅग टाकून आईला आवाज द्यायचे आले गं मी! आई पण लगेच म्हणायची आलीस का! आम्ही वाटच बघतोय! चल लगेच हात पाय तोंड धूऊन घे. जेवायलाच बसू या. मी आमटी गरम करत ठेवते. का आधी चहा ठेऊ? " नको चहा नको. माझे खाणेपिणे झाले आहे मधेवाटेत" इति मी. जेवायलाच बसूया लगेच. मला खूप भूक लागली आहे. जेवत जेवता "आई तुझ्या हातचं जेवायला किती चांगलं वाटतं गं!! एकीकडे गप्पा सूरू व्हायच्या लगेच आमच्या. जेवल्यावर रंजनाला फोन. ती पण लगेच ऑफीस सुटल्यावर घरी यायची आणि सई पण माझी भाची! मग आमच्या तिघींची जी टकळी चालू व्हायची ती अगदी मी निघेपर्यंत! बडबड करून डोके दुखायला लागायचे. रात्री झोपताना पण "आता झोपू या हं १२ वाजून गेलेत, सकाळी उठवत नाही मग" आई म्हणायची. ५ ते १० मिनिटेच शांत जात असतील. परत कुणाला तरी काहीतरी आठवायचे की परत वटवट सूरू.आईकडे गेल्यावर एक दिवस चतुर्श्रुंगी व कमलानेहरू पार्क हे कार्यक्रम ठरलेले. चतुर्श्रुंगीला देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे एक गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो. या दोन ठिकाणी जाऊन आले की मन प्रसन्न व्हायचे. कमला नेहरू पार्कला तर खूपच मजा यायची. सई जायची घसरगुंडी खेळायला. बाबा पार्कला एक चक्कर मारून यायचे व येताना सईला परत घेऊन यायचे. तोपर्यंत आम्ही तिघी म्हणजे आई, मी व रंजन माझी बहीण हिरवळीवर बसून निवांत गप्पा मारत बसायचो. तिथे आमच्या ओळखीचा एक भेळपुरीवाला व पाणीपुरीवाला होता. तिथे मनसोक्त खादाडी करायचो. भेळपुरी, पाणीपुरी, दहीबटाटापुरी व रगडा पॅटीस. जाताना व येताना आईबाबा व सईला रिक्षेत बसवून द्यायचो. त्यामुळे आम्हा दोघी बहिणींच्या वेगळ्या गप्पा व्हायच्या. रिक्षेत बसल्यावर आई बजावायची. लवकर या बरं का! आम्ही दोघी "हो गं आई. " आम्ही दोघी मुद्दामुनच रमत गमत यायचो कारण की तोच वेळ आमच्या दोघींच्या गप्पांसाठी असायचा! या दोन कार्यक्रमांच्या आधी १-२ दिवस मी सासरी जाऊन यायचे. तिथे माझी जाऊ वसुधा व पुतणी सायली माझी वाटच पाहात असायच्या कारण की आमच्या तिघींचाही कार्यक्रम ठरलेला असायचा तो म्हणजे तुळशीबाग व पुष्करिणी भेळ!!मुंबईला परत निघायच्या दिवशी मी थोडे लवकर जेवायचे. नंतर एक छोटी डुलकी काढून साबणाने स्वच्छ तोंड धूउन पावडर कुंकू लावायचे. तोपर्यंत आईचा चहा व्हायचा. चहा घेऊन आजीआजोबांच्या फोटोला व आईबाबांना नमस्कार करून निघायचे. निघताना आई हळदी कुंकू लावायची. सोबत डिंकाचे लाडू, साजूक तूप, थालिपीठाची भाजणी काही ना काही द्यायचीच!! मुंबईला निघताना मी एकदम फ्रेश असायचे. बहीण भाची किंवा कधी कधी आईबाबा मला सोडायला यायचे पुणे स्टेशनवर. पुणे स्टेशनला बसायला जागा मिळायची. गाडी सुटल्यावर रंजना सई किंवा आईबाबा जे कोणी सोडायला येणार असेल त्यांना हात हालवून टाटा करत रहायचे मी खिडकीतून ते दिसेनासे होईपर्यंत!


गाडी सुरू होऊन प्लॅटफॉर्म सोडायची. आता मात्र थोडे अश्रू वाहायचे डोळ्यातून. थोड्यावेळाने चहा यायचा. चाय चाय ! गरम चाय! कितने को दिया?..... गाडीनेही भरपूर वेग घेतलेला असायचा.

17 comments:

Suhas Zele said...

वाह...अप्रतिम !!

Minakshi said...

khup chan mi hi mazya aaikade Kolhapurla jate na tyachi aathavan zali......pratek mulicha lagna zalyavar asach anubhav asel.

Shravani said...

chhan lihile aahes...hostel madhye raahat asatana 2-3 divasachi sutti milali ki asech fresh vatayache... halli bharat bhetine fresh hote mee...

Amol said...

heart touching !!!!!!!!

Amol said...

Heart Touching !!!!

l said...

mast aaj tumcha ha lekha sakali vachala,aaj divas mast janar aahe maja smrutincha hidolyaver........

भानस said...

जाताना माझे मन धावे वा~यावेगे
येताना त्याचे पायी मणाचे की ओझे...
हळवे झालेयं गं मन वाटतेय असेच उठावे अन सुटावे....:) छान लिहिलेस.

rohinivinayak said...

सुहास झेले, मीनाक्षी, उद्गारवाचक चिन्ह! श्रावणी, अमोल, भाग्यश्री, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद!! खूप छान वाटले अभिप्राय वाचून तुमच्या सर्वांचे आणि उत्साह आला.

माऊ said...

आता काय रडवणार आहेस का ग???खुपच हळवे झाले बघ...[:(]

काल निर्णय said...

Chhan lekh ahe ha! Nokari nimittane Mumbai t rahat asatana, malahi Maherachi athavan yeun weekend chi vaat baghaycho (ani adhemadhe sutti milali tar Punyala 1day trip hi maraycho) tyachi athavan jhali!

Nirupama said...

Rohinitai, tumcha blog vachala ki aaichi ani gahrchi khup athavan yete.College madhle divas athavatat.Common off ghevun gahri yayacha utsaha kahi veglach.Ekde US madhe tar he sagale miss karto.Agdi raduch kosalale.Khup chaan vatala ani nehmi tumche blog vachun Satara maze maherchi khup athavan yete.Thanks

rohinivinayak said...

उमा, व संदीप, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद! संदीप तुम्हाला सुट्टीत पुण्याला येताना नक्कीच आनंद होत असणार!

Anonymous said...

वा रोहिणीवहिनी! अतिशय सुंदर लेख. वा वा!!

आपला
(चाहता) प्रवासी

Prajaktta said...

mastaaa vatlaa vachun..ataach india trip karun alee ahe so ekdum saglya memories fresh ahet mazyaa..i cud complete relate to ur article :))

rohinivinayak said...

Nirupama, Pravassee, Prajaktaa, abhiprayabaddal anek aabhar!!! chhan vatle tumche sarvanche abhipray vachun. thanks!!

Sarika Kamat said...

Agadi chaan vatla Rohini lekh aaikun(orkut-varcha). Especially me nuktech Punyala jaun ale mhanun asel :)

rohinivinayak said...

Thanks Sarika, je pune miss kartat na tyana khupach aavadato ha lekh:) pune tithe kaay une barobar na? :)