Monday, September 01, 2025

सीधे रस्ते की एक टेढीही चाल है.

 

सीधे रस्ते की एक टेढी ही चाल है... गोलमाल है भाई सब गोलमाल है... गोलमाल गोलमाल....


रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा हा एक सी.ए. झालेला तरूण. त्याच्या मामाच्या मित्राच्या कंपनीत तो नोकरीला लागतो. मामाने मित्राजवळ आपल्या हुशार भाच्याची शिफारस आधीच करून ठेवलेली असते. ही नोकरी मिळवण्याकरता काही खास अटी आहेत रामप्रसाद ! त्या तुला मान्य कराव्या लागतील. तरच ही नोकरी तुला मिळेल. थांब हं जरा सांगतो. रत्ना बेटी जरा पानी ले आ ! रत्ना पाणी आणते. देखो राम, पहिली अट म्हणजे मुलाखतीला जाताना तुला डोक्याला तेल चोपडून जावे लागेल. कुडता पायजमाही हवा. और एक बात. उसे मुछे बहूत पसंद है ! मामा या कोणत्या जगावेगळ्या अटी ! ये मुझसे नही होगा. तुझे करना ही पडेगा, नही तो ये नोकरी हातसे गयी समझो. और उनकी एक बहूत सुंदर बेटी भी है. उसका मन भी तुझे जीतना होगा!


रामप्रसाद सर्व अटी मान्य करून मुलाखतीला जातो. रामप्रसादकडे कुडता पायजमा कुठून असणार ना ? त्याकरता तो देवेन वर्मा ची मदत घेतो. त्याला सांगतो यार एक दिन का सवाल है, मै बादमें लौटा दुंगा. देवेन वर्मा शुटींगमध्ये गुंतलेला असतो. तो म्हणतो थांब तू ये माझ्याबबरोबर आपण काहीतरी करू. देवेन आणि रामप्रसाद त्याच्या मेक अप रूम मध्ये जातात. देवेनच्या सांगण्यानुसार एक जण बरेच कुडते पायजमे घेऊन येतो. त्यात त्याला एक थोडा आखूद होणारा कुडता पायजमा सूट होतो. सर्व जामानिमा करून म्हणजे डोक्याला तेल चोपडून, आखूड कुडता पायजमा घालून व गळ्यात एक शबनम (पिशवी) अडकवून सच्ची मूछे असलेल्या रामप्रसाद वर उर्मिला डेटर्सचा मालक भवानीशंकर बेहद्द खूश होतो. अभ्यासा व्यतिरिक्त त्याला कशाचेही ज्ञान नाही असे रामप्रसाद दाखवतो. मुद्दाम चुकवलेली बॅलन्स शीट त्याला दाखवतो तेव्हा रामप्रसाद म्हणतो किस गधे ने ये बनाई है आणि चुका दाखवून देतो. मुलाखत संपल्यावर चेहऱ्यावर बावळटपणाचे आणि प्रामाणिक पणाचे भाव तसेच ठेवून घरी येतो. आणि एके दिवशी खेळाच्या पटांगणात रामप्रसादच्या बॉसला म्हणजेच भवानीशंकरला रामप्रसादचे खरे रूप कळते.
केस विस्कटलेले, डोळ्यांवर गॉगल, रंगीत शर्ट व मुछमुंडा रामप्रसाद त्याच्या नजरेस पडतो. येथून सुरवात होते गोलमालला ! एक खोटे लपवण्याकरता दुसरे खोटे व ते लपवण्यासाठी तिसरे ! एके दिवशी देवेन वर्माकडून रामप्रसाद नकली मुंछ बनवून घेतो. नंतर नुसती धमाल. पटांगणावर बघितला तो माझा जुळा भाऊ लक्ष्मणप्रसाद. तो काहीच काम करत नाही. मलाच सगळे घर सांभाळावे लागते, असे रामप्रसाद भवानीशंकरला सांगतो. जिधर मै हु उधर वो आता नही है और जिधर वो है उधर मै नही जाता. जुडवे है ना ! सगळे फसतात. मी काय करू? तू काही करू नकोस. त्याला पाठवून दे माझ्या घरी माझ्या मुलीला गाणे शिकायचे आहे. हा जुडवा भाईचा रोल सांभाळता सांभाळता रामप्रसादची त्रेधातिरपीट उडते. सज्जन, दुसऱ्याचा मान राखणारा निष्पाप रामप्रसाद ऑफीसमध्ये व संध्याकाळी तोच रामप्रसाद लक्षुमणप्रसाद म्हणजेच लकी बनून भवानीशंकरच्या मुलीला लुच्चा लफंगा बनूनगाणे शिकवायला येतो. गाण्यातले तत्वज्ञान भवानीशंकरला समजावून सांगतो. लक्ष्मणप्रसाद येतोच मुळी एका बोटात बाईकच्या किल्ल्या फिरवत आणि त्याला माळी म्हणून हाक मारतो. तो येतो तेव्हा भवानीशंकर बागेत काम करत असतो. त्याला म्हणतो जरा बुढ्ढे को बुलाओ. बुढ्ढा मै ! मै हुं उर्मिलाका बाप भवानीशंकर जिसे गाना सिखना है बागेत काम करणारा माळी म्हणजेच भवानीशंकर आहे हे कळल्यावर लक्ष्मण सॉरी म्हणतो तेव्हा भवानी म्हणतो बुढ्ढा तो मै हुं. हा आप बुढ्ढे तो है ही . मगर जैसे अंधे को अंधा नही कहना चाहिए, लंगडे को लंगडा नही कहना चाहिए वैसे बुढ्ढे को बुढ्ढा नही कहना उसे उसको मनको ठेंच पहुंचती है, चाहिए ऍम आय राईट?


एकदा रामप्रसादला बॉसला खोटेच सांगावे लागते की त्याच्या आईला बरे नाहीये कारण त्याला त्याच्या मित्रांबरोबर सहलीला जायचे असते. आता खोटी आई कुठून आणणार? परत मदतीसाठी देवेन वर्माकडे रामप्रसाद जातो. तो म्हणतो तेरी स्टोरी तो बहुत कॉम्प्लिकेटेड होती जा रही है. पहले कुडता, बादमें मुंछ, और अब तुझे नकली मां चाहिए ! ते दोघे कमला श्रीवास्तव कडे जातात आणि तिला नकली आई बनवण्यासाठी राजी करतात. तिने लिपस्टीक लावलेली असते. दागिने घातलेले असतात. महागड्या साड्या व उंच टाचेच्या चपला घालून ती मोठमोठ्या पार्ट्यांना जात असते. तिला पांढरी साडी, कुंकू नाही अशी मां तयार करतात. रामप्रसादची बहीण तिला सर्व समजावून सांगते. रत्ना कमला श्रीवास्तव यांना सांगते आंटी आपको सब मालूम है ना? हां हां मुझे सब मालूम है, घरमें एक मै हुं, एक तू है और एक रामप्रसाद. तीन नही आंटी चार लोग. वो लक्ष्मणप्रसाद जो नही है. मिसेस श्रीवास्तव रत्नाला म्हणते मै सब संभाल लुंगी, तू फिकर मत कर. आईची तब्येत बरी नाही कळल्यावर भवानीशंकर रामप्रसादच्या घरी तब्येतीची चौकशी करायला येतो. तब्येतीबद्दल प्रश्न विचारून भवानीशंकर हैराण करून सोडतो पण रामप्रसाद आणि रत्ना सर्व काही सांभाळून घेतात. या सर्व गोलमालमध्ये भवानीशंकर रामप्रसादला जावई करून घेण्याकरता उतावीळ झालेला असतो. तो लुच्चा लफंगा मवाली लक्ष्मणप्रसादचे तोंडही पहायला तयार नाही आणि बॉस भवानीशंकरची मुलगी उर्मिला बावळट रामप्रसादचे नावही घ्यायला तयार नाही. आता आली का पंचाईत ! जुडवे भाई आणि जुडवी मां यांचा नुसता गोंधळच गोंधळ दाखवून या चित्रपटाचा शेवट केला आहे. एके दिवशी नकली मां ला पार्टीला जायचे असते. तिथे ती नटून थटून जातेही. नेमका तिथे भवानीशंकरही आलेला असतो. कमला श्रीवास्तवला नटलेल्या रूपात पाहून तो बावचळतो. ती मैत्रीणींशी बोलत असते. तिथे तो येतो. तिला लगेचच कळते. त्याचे तोंड चुकवून ती दुसरीकडे जाते. परत तिथे भवानीशंकर हजर ! असे करता करता ती झोपाळ्यावर बसते.


हा सीन खूप छान आहे. झोपाळा हळूहळू हलत आहे आणि भवानीशंकर झोपाळ्यावर बसण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेवटी झोपाळ्याच्या दुसऱ्या बाजूला बसून तो कमला श्रीवास्तवची चौकशी करायला लागतो. म्हणतो मैने आपको कही देखा है. आता नकली मां चांगलाच अभिनय करते. हां हां वो ! जो खारमें रहती है, उसकी बात कर रहे है आप? वो तो मेरी जुडवा बहन है, वो कमला और मै विमला. भवानी म्हणतो आपके खानदानमें कोई जुडवा होने की परंपरा है क्या? हां भाई देखो ना, मेरी नानी थी, उसकी भी एक बहन थी गंगा रानी, जमुना रानी, और ये राम और लक्ष्म ण. अशी सर्व बनवाबनवीची उत्तरे देऊन ती तिथून निसटते आणि घरी येते. तिकडे कार घेऊन भवानीशंकरही रामप्रसादच्या घरी हजर होतो खरे खोटे करण्यासाठी. कमला खिडकीतून कशीबशी घरात येते. इकडे लक्ष्मण प्रसाद व रत्ना चिंतेत असतात. कसातरी वेळ काढत असतात. एकमेकांना आता काय करायचे? असे खुणावत असतात. अश्यातच लक्ष्मण कौन है रे? असे ऐकल्यावर दोघांच्या जिवात जीव येतो. नंतर लक्ष्मण बाहेर जा ऊन पायजमा कुडता घालून रामप्रसाद येतो. भवानीशंकरला आता खात्रीच पटते की हे सर्व खरेच जुडवे आहेत. त्यानंतर भवानीशंकरच्या घरी रामप्रसाद जेवायला येतो तेव्हा डायनिंग टेबलवर जेवताना त्याची मिशी थोडी हलते आणि तिथून सगळी पळापळ होते. रामप्रसाद निसटतो आणि रामप्रसाद उर्फ लक्ष्मणप्रसादचे लग्न उर्मिलशी होते. लग्नमंडपात भवानीशंकर येतो आणि त्याला सर्व प्रकार कळून चुकतो. फोटो काढताना सर्व मुछमुंडे असतात.

Wednesday, August 27, 2025

मनोगती मैत्रीण

 मी काही महिन्यांपूर्वी रेडिओ कम सीडी व कॅसेट प्लेअर घेतला होता, त्यातला रेडिओ मी रोज दुपारी 2 तास लावते, तिथे रेडिओ जिंदगी वर जुनी हिंदी गाणी लागतात, आज मनात आले की सीडी ऐकू, बऱ्याच सीड्या आहेत, त्यातली एक सीडी आनंद देऊन गेली, बघू तरी कोणती गाणी आहेत म्हणून लावली तर पहिलेच गाणे गणपतीचे, आणि आज गणेश चतुर्थी ! काय हा योगायोग ! ही गाणी आम्हाला मनोगती वरदा ने रेकॉर्ड करून दिली आहेत, 2006-2007 च्या दरम्यान वरदा आमच्या wilmington च्या घरी आली होती, मनोगत वर तिची व्यक्तीगत निरोपावर आमची ओळख झाली आणि तिने आम्हाला विचारले तुमच्या घरी 2 दिवस रहायला आले तर चालेल का? आम्हाला दोघांना खूपच आनंद झाला, 2001 नन्तर आम्हाला पहिल्यांदाच इतकी मनमोकळी बोलणारी मराठी मुलगी भेटायला आमच्या घरी येणार होती, आम्ही दोघे तिला विमानतळावर घ्यायला गेलो होतो, मला तर काय करू नी काय नको असे झाले होते, तिच्याकडे असलेली गाण्याची यादी तिने मला पाठवली व यातली कोणती गाणी तुम्हाला हवी आहेत ते सांगा म्हणजे ती मी रेकॉर्ड करून देईन, तेव्हा मी मला अमूक गाणी हवी आहेत ते सांगितले होते. ती आमच्या घरी आल्यावर अर्थातच मनोगतावर चर्चा झाली, खूप गप्पा मारल्या व तिला आम्ही आमच्या कार मधून आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर नेले, नदीवर पण गेलो आणि तिला जायच्या दिवशी परत विमानतळावर सोडले, नंतर काही वर्षांनी आम्ही दोघे पण तिच्या दोन वेगवेगळ्या घरी गेलो होतो, जेवणात तिने मुळ्याची भाजी केली होती आणि आम्हाला गरम गरम पोळ्या वाढल्या, आम्ही तिला व तिच्या मुलांना घेऊन थाई उपाहारगृहात गेलो, तिची मुले खूप लहान होती, आमच्याशी खूप खेळत होती, मजा आली होती,, आजच्या दिवशी आठवणी जागृत झाल्या आणि छान वाटले rohinigore 27 August 2025





Thursday, August 21, 2025

मनोगत - एक मराठी संकेतस्थळ जिथे मराठीतून लिहिता वाचता येते.

 एके दिवशी विनु विद्यापीठातून घरी आल्यावर त्याने मला सांगितले की तुझ्याकरता एक मराठी वेबसाईट आहे. मी अति आनंदाने ओरडले काय? मराठी वेबसाईट? तुला कशी कळाली? ही गोष्ट आहे २००४ सालामधली. वि म्हणाला अगं आमच्या गाण्यांच्या ग्रूपवर कळाली. लगेच आमचा डेस्क टॉप ऑन. मनोगतावर गेलो आणि विनायक त्या साईटचा सदस्य झाला. त्याने त्याची माहिती प्रोफाईलवर लिहिली. एके दिवशी मनोगतावर मी आलेली दिसले वि ला. हे काय तू पण झालीस सदस्य? मी म्हणाले म्हणजे काय, इथे मराठीत लिहिता वाचता येते. मग मला काही लिहावेसे वाटले तर सदस्य असलेले केव्हाही चांगलेच ना ! मनोगतावर येण्याची नोंद केली की तिथे अजूनही कोणं कोणं आलयं हे दिसायचे. सदस्य आले की त्यांची नावे आम्ही दोघेही वाचत होतो. सुरवातीला सुभाषचंद्र आपटे, नरेंद्र गोळे, अमित चितळे, द्वारकानाथ कलंत्री. प्रशासक या नावाने खुद्द प्रशासक आलेलेही कळायचे. आणि एक दिवस एक टोपण नाव दिसले. ते म्हणजे प्रवासी. या नावाचे आम्हाला दोघांनाही खूप कौतूक वाटले. मला आठवतयं मनोगतावर सुर्वे नावाच्या सदस्याने म्हणी लिहा ही चर्चा टाकली. मला तर खूप मजा आली. सुरवातीला मराठी टंकलेखन थोडे अवघड गेले पण नंतर सराव झाला. म्हणींमध्ये रोज आठवून आठवून २/४ म्हणी मी लिहायला लागले. पत्यांमधल्या चॅलेंज खेळासारखे रोज कुणी ना कुणी म्हणी लिहायचे. आणि त्यामुळे और एक, और दो, असे करत करत बऱ्याच म्हणी जमा झाल्या. त्यावेळी मनोगताकडे इतके लक्ष गेले नव्हते कारण की मी नोकरी करत होते. विनुच्या नोकरी निमित्ताने आम्ही दुसऱ्या गावात स्थलांतरीत झालो आणि माझे विसा स्टेटस बदलले. एच ४ वर वर्क पर्मिट मिळत नसल्याने नोकरी करता येत नाही. त्यामुळे मी घरकोंबडी झाले. सोबतीला मनोगत होते ते खरच खूप छान झाले.

मनोगतावर मला घरबसल्या छान छान कविता, कथा वाचायला मिळायच्या. चर्चा सदरात इतर सदस्यांनी व्यक्त केलेली मते पण कळायची. काही वेळा चर्चा खूपच रंगायच्या ! एकदा एका चर्चेत बटाटेवड्याचा विषय निघाला. त्या चर्चेत अजूनही काही सदस्यांनी अमुक एक पाककृतीची विचारणा केली. त्या चर्चेचा आढावा घेऊन प्रशासकांनी पाककृती हा विभाग सुरू केला. सुरवातीला खूप कमी कविवर्य होते ते म्हणजे सुभाषचंद्र आपटे, मिलिंद फणसे, प्रवासी, मानसी, अदिती, सोनाली आणि लेखकही खूप कमी होते ते म्हणजे प्रभाकर पेठकर, अनु, मृदुला, इद्यादी. जसजशी पाककृतीची विचारणा होत गेली तसतशी मी मनोगतावर पाकृ लिहायला लागले. नंतर अनुक्रमे अमेरिकेतले अनुभव, भारतातल्या आठवणी असे लिहीत गेले. इथे मराठी माणसं खूप ओळखीची झाली. याहू मेसेंजर वर ७०-८० जण जमा केले मी ! सकाळी डेस्क टॉप वर लॉग इन केले की पहिले मनोगतावर जायची सवय लागली. याहू मेसेंजर वर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत कुणी ना कुणी असायचे. सर्व जगातल्या कानाकोपऱ्यातली मराठी माणसं स्क्रीनवर ! जेवण झाले का? मनोगतावर काय नवीन आले? याहूवरच्या प्रत्येक जणांच्या खिडक्या उघडायच्या. खिडकीतून विचारणा व्हायची काय चालू आहे सध्या? आम्ही एकटे आहोत असे आम्हाला कधीच वाटले नाही. अनेक चर्चा कविता लेख याची चंगळ होती. २००५ ते २००८ या तीन वर्षात मनोगत खूप बहरले. एके दिवशी मनोगत कोलमडले, विखुरले गेले. प्रशासकांनी ते सर्व निस्तरण्याचा प्रयत्न करून परत मनोगताची उभारणी केली. सर्व सदस्यांना सांगितले की आपापले लेखन जतन करून ठेवा आणि यातूनच ब्लॉगचे वारे वहायला सुरवात झाली. बरेच जणांनी आपापले लेखन ब्लॉग वर जतन करायला सुरवात केली. माझ्या दोन ब्लॉगचा जन्म याच काळातला. 
 
 
मनोगतावरची खरी करमणूक टोपण नाव घेणाऱ्या सदस्यांची. कोणं कोणं आलयं या सदरात ती नावे समजायची आणि आम्ही खूप हासायचो. ती नावे आहेत अनुक्रमे खादाड बोका, उपाशी बोका, काय जोडी आहे नै ! कोकणस्थ आले की देशस्थ लगेच दोन पावले कोकणस्थांच्या पुढेच ! टग्या आल्यावर टुण्याला पण यावेसे वाटले. ययाती आल्यावर देवयानी ने का म्हणून मागे रहावे? माफीचा साक्षीदार यांनी कविता लिहिली की नम्रपणाने शेवटी माफी मागणार. एवढा नम्रपणा बरा नव्हे ! टोपण नावाचा उच्चांक गाठला तो "लुब्रा मेला" या सदस्याने. वा ! नाव घेणाऱ्याचे कौतुक करावे तितके कमीच, नाही का? परी आणि बदक छान वाटले. नुसते मनोगतावर डोकावून जाणार. मनोगतावर खऱ्या नावाने लिहिणारे कमीच होते. टोपण नावे जास्तीची. सर्वसाक्षी, (खरे नाव कळाले तरी आम्ही त्यांना याच नावाने संबोधतो.😃 ) तो, प्रवासी, चौकस, हर्षल खगोल, कुशाग्र, भाष, शुद्ध मराठी, मी मराठी, संग्राहक, वळू, खारूताई, हरणटोळ. तसे अजून बरेच आहेत. rohinigore 21 august, 2025

Friday, August 08, 2025

८ ऑगस्ट २०१८

 आज संध्याकाळी एकमेकांना बोलावल्यासारखे पावसाळी ढग जमा झाले. खूपच गर्दी केली होती ढगांनी. नंतर थोड्यावेळाने अर्थातच पाऊस कोसळून थांबला. आज सूर्यास्त दिसण्याची चिन्हं दिसत नव्हती. खूप नाही तरी आज सूर्यास्ताने थोडे रंग दाखवले. निळ्यावर गुलाबी उठून दिसत होते. sunset - August 8th 2018 Hendersonvile, NC

 







 

Thursday, July 24, 2025

2025 (2) photos

 






















Tuesday, July 22, 2025

2025 (1) photos