एके दिवशी विनु विद्यापीठातून घरी आल्यावर त्याने मला सांगितले की तुझ्याकरता एक मराठी वेबसाईट आहे. मी अति आनंदाने ओरडले काय? मराठी वेबसाईट? तुला कशी कळाली? ही गोष्ट आहे २००४ सालामधली. वि म्हणाला अगं आमच्या गाण्यांच्या ग्रूपवर कळाली. लगेच आमचा डेस्क टॉप ऑन. मनोगतावर गेलो आणि विनायक त्या साईटचा सदस्य झाला. त्याने त्याची माहिती प्रोफाईलवर लिहिली. एके दिवशी मनोगतावर मी आलेली दिसले वि ला. हे काय तू पण झालीस सदस्य? मी म्हणाले म्हणजे काय, इथे मराठीत लिहिता वाचता येते. मग मला काही लिहावेसे वाटले तर सदस्य असलेले केव्हाही चांगलेच ना ! मनोगतावर येण्याची नोंद केली की तिथे अजूनही कोणं कोणं आलयं हे दिसायचे. सदस्य आले की त्यांची नावे आम्ही दोघेही वाचत होतो. सुरवातीला सुभाषचंद्र आपटे, नरेंद्र गोळे, अमित चितळे, द्वारकानाथ कलंत्री. प्रशासक या नावाने खुद्द प्रशासक आलेलेही कळायचे. आणि एक दिवस एक टोपण नाव दिसले. ते म्हणजे प्रवासी. या नावाचे आम्हाला दोघांनाही खूप कौतूक वाटले. मला आठवतयं मनोगतावर सुर्वे नावाच्या सदस्याने म्हणी लिहा ही चर्चा टाकली. मला तर खूप मजा आली. सुरवातीला मराठी टंकलेखन थोडे अवघड गेले पण नंतर सराव झाला. म्हणींमध्ये रोज आठवून आठवून २/४ म्हणी मी लिहायला लागले. पत्यांमधल्या चॅलेंज खेळासारखे रोज कुणी ना कुणी म्हणी लिहायचे. आणि त्यामुळे और एक, और दो, असे करत करत बऱ्याच म्हणी जमा झाल्या. त्यावेळी मनोगताकडे इतके लक्ष गेले नव्हते कारण की मी नोकरी करत होते. विनुच्या नोकरी निमित्ताने आम्ही दुसऱ्या गावात स्थलांतरीत झालो आणि माझे विसा स्टेटस बदलले. एच ४ वर वर्क पर्मिट मिळत नसल्याने नोकरी करता येत नाही. त्यामुळे मी घरकोंबडी झाले. सोबतीला मनोगत होते ते खरच खूप छान झाले.
मनोगतावर मला घरबसल्या छान छान कविता, कथा वाचायला मिळायच्या. चर्चा सदरात इतर सदस्यांनी व्यक्त केलेली मते पण कळायची. काही वेळा चर्चा खूपच रंगायच्या ! एकदा एका चर्चेत बटाटेवड्याचा विषय निघाला. त्या चर्चेत अजूनही काही सदस्यांनी अमुक एक पाककृतीची विचारणा केली. त्या चर्चेचा आढावा घेऊन प्रशासकांनी पाककृती हा विभाग सुरू केला. सुरवातीला खूप कमी कविवर्य होते ते म्हणजे सुभाषचंद्र आपटे, मिलिंद फणसे, प्रवासी, मानसी, अदिती, सोनाली आणि लेखकही खूप कमी होते ते म्हणजे प्रभाकर पेठकर, अनु, मृदुला, इद्यादी. जसजशी पाककृतीची विचारणा होत गेली तसतशी मी मनोगतावर पाकृ लिहायला लागले. नंतर अनुक्रमे अमेरिकेतले अनुभव, भारतातल्या आठवणी असे लिहीत गेले. इथे मराठी माणसं खूप ओळखीची झाली. याहू मेसेंजर वर ७०-८० जण जमा केले मी ! सकाळी डेस्क टॉप वर लॉग इन केले की पहिले मनोगतावर जायची सवय लागली. याहू मेसेंजर वर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत कुणी ना कुणी असायचे. सर्व जगातल्या कानाकोपऱ्यातली मराठी माणसं स्क्रीनवर ! जेवण झाले का? मनोगतावर काय नवीन आले? याहूवरच्या प्रत्येक जणांच्या खिडक्या उघडायच्या. खिडकीतून विचारणा व्हायची काय चालू आहे सध्या? आम्ही एकटे आहोत असे आम्हाला कधीच वाटले नाही. अनेक चर्चा कविता लेख याची चंगळ होती. २००५ ते २००८ या तीन वर्षात मनोगत खूप बहरले. एके दिवशी मनोगत कोलमडले, विखुरले गेले. प्रशासकांनी ते सर्व निस्तरण्याचा प्रयत्न करून परत मनोगताची उभारणी केली. सर्व सदस्यांना सांगितले की आपापले लेखन जतन करून ठेवा आणि यातूनच ब्लॉगचे वारे वहायला सुरवात झाली. बरेच जणांनी आपापले लेखन ब्लॉग वर जतन करायला सुरवात केली. माझ्या दोन ब्लॉगचा जन्म याच काळातला.
मनोगतावरची खरी करमणूक टोपण नाव घेणाऱ्या सदस्यांची. कोणं कोणं आलयं या सदरात ती नावे समजायची आणि आम्ही खूप हासायचो. ती नावे आहेत अनुक्रमे खादाड बोका, उपाशी बोका, काय जोडी आहे नै ! कोकणस्थ आले की देशस्थ लगेच दोन पावले कोकणस्थांच्या पुढेच ! टग्या आल्यावर टुण्याला पण यावेसे वाटले. ययाती आल्यावर देवयानी ने का म्हणून मागे रहावे? माफीचा साक्षीदार यांनी कविता लिहिली की नम्रपणाने शेवटी माफी मागणार. एवढा नम्रपणा बरा नव्हे ! टोपण नावाचा उच्चांक गाठला तो "लुब्रा मेला" या सदस्याने. वा ! नाव घेणाऱ्याचे कौतुक करावे तितके कमीच, नाही का? परी आणि बदक छान वाटले. नुसते मनोगतावर डोकावून जाणार. मनोगतावर खऱ्या नावाने लिहिणारे कमीच होते. टोपण नावे जास्तीची. सर्वसाक्षी, (खरे नाव कळाले तरी आम्ही त्यांना याच नावाने संबोधतो.

) तो, प्रवासी, चौकस, हर्षल खगोल, कुशाग्र, भाष, शुद्ध मराठी, मी मराठी, संग्राहक, वळू, खारूताई, हरणटोळ. तसे अजून बरेच आहेत. rohinigore 21 august, 2025
No comments:
Post a Comment