Monday, June 15, 2020

Sunday, June 14, 2020

रस्ते (२)

विल्मिंग्टन मध्ये मी जेव्हा अपार्टमेंटच्या बाहेर फिरायला जायचे तो रस्ता वाहता होता. वाहता म्हणजे त्या रस्त्यावरून कार्स जायच्याच, शिवाय चालणारी मंडळी, धावणारे युवक युवती आणि हो या रस्त्यावर बदके आणि त्यांची पिले पण चालायची बर का! या रस्त्यावर घरे होती. काही कंपन्या होत्या. कमी स्पीड लिमीट असले तरी काही कार वाली मंडळी उगाचच जोरात जायची त्यामुळे जरा जपूनच चालावे लागायचे. चालण्याचा आनंद या रस्त्याने कधीच दिला नाही. रमतगरम चालायचे मी या रस्त्यावर. या रस्त्यावर दोन तळी होती. या दोन्ही तळ्यांवर मि बदकांना पहायला थांबायचे. चालताना आकाशात काही वेळा छान रंग जमून यायचे. सूूर्यास्तही दिसायचे. काही वेळा उगवलेला चंद्रही दिसायचा. होळी पौर्णिमेचा मोठाच्या मोठा चंद्र दिसला होता मला एकदा ! पाऊस पडला की मोठेच्या मोठे इंद्रधनूही दिसायचे. या अपार्टमेंटच्या आवारात जो रस्ता होता. तिथेही बदके, त्यांची पिले आणि सीगल्स पक्षी खूप यायचे. संध्याकाळच्या सुमारास चालायला गेले की अनेक पक्षी दिसायचे वेगवेगळे. सारखे इकडून तिकडे जात असायचे. संध्याकाळी चालण्यापेक्षा बाकीची मजा जास्त असायची.


या रस्त्याच्या विरूद्ध दोन्हीही दिशेला दोन रस्ते समांतर होते. एका रस्यावर खूपच शुकशुकाट होता. तिथे कोणीही जायचे नाही. एक्दोन वेळा गेले होते मी पण निर्मनुष्य रस्ता. आणि दुसरा समांतर रस्ता होता तो महामार्ग ४० ला पोहोचणारा होता त्यामुळे त्या रस्त्यावर वाहने खूप जोरात जायची. याच रस्त्यावर एक बस स्टॉप होता. तो बस स्टॉप म्हणजे एक लोखंडी खांब जमिनीत रोवलेला होता आणि त्यावर किती नंबरची बस थांबते तो आकडा लिहिला होता. या बस स्टॉप वरच मी उभी रहायचे जेव्हा लायब्ररीत काम करायला जायचे तेव्हा. या बस स्टॉप वर बसायला बाकडे नव्हते. या रस्त्याच्या पुढचा चोक होता त्याच्या उजवीकडे कम्युनिटी कॉलेज होते तिथे मी २ सेमेस्टर केल्या होत्या पॅरालीगल डिप्लोमाच्या. त्यामुळे हे दोन रस्ते खूप जास्त आठवणीतले नाहीत.जिथे बस स्टॉप होता तो रस्त्याच्या पलीकडे होता त्यामुळे हा रस्ता क्रॉस करताना खूप भीती वाटायची. जोरात वाहने धावायची या रस्त्यावरून ! डेंटन टेक्साज मध्ये रस्त्याशी संबंध आले पण आठवणीत राहिले नाहीत. त्यांच्याशी नातं निर्माण झाले नाही. माझ्या मैत्रीणीकडे ज्या रस्त्याने मी चालत जायचे तो खूप भकास वाटायचा मला. रस्त्यावर मैलो न मैल कोणीही नाही. आम्ही दोघेही शनिवार रविवार खूप चालायचो पण रस्त्यावर शुकशुकाट असायचा. आनंद नाही. एक चालण्याचा व्यायाम होत होता इतकेच. इथे मी रोजच्या रोज विद्यापीठात जायचे. तो रस्ता असा नव्हता. अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता क्रॉस करून गेले की एक चढण होते. नंतर परत सपाट रस्ता. नंतर थोड्या पायऱ्या, नंतर परत सपाट रस्ता असे करत मी लायबरीत जायचे. पोस्टात पत्र टाकायला जायचे. विद्यापीठातचेच आवार होते हे खरे तर रस्त्यापेक्षाही !


विल्मिंग्टनच्या रस्त्यावर फिरताना मला एम आय डी सी मध्ये फिरल्यासारखे वाटायचे. कारण की थोड्या कंपन्या होत्या. थोडी घरे होती. एक डे केअर होते. एक ग्रोसरी स्टोअर होते. हँडरसनविलचा डाऊन टाऊनचा रस्ता आणि फूटपाथ खूप छान होते. फूटपाथ वरून आरामात चालायचे. चालताना आजुबाजूची दुकाने बघायची. शिवाय इथे बरीच उपहारगृहे पण होती. बाजूच्या रस्त्यावर वाहने सावकाश जायची. या रस्त्यावरच पार्कींग पण होते. हा रस्ता मला पुण्याच्या लक्ष्मी रोडची आठवण करून द्यायचा. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर मारली की चालणेही होत असे. आणि आनंदही मिळत असे. इथे एक प्राचीन खडकांचे म्युझियम पण होते. आयस्क्रीम पार्लर होते. या फूटपाथ वर बाकडेही होती आणि डुलणाऱ्या खुर्च्याही होत्या. त्यावर पण बसता येत होते. या रस्त्याशी आठवणी अश्या जास्त नाहीत. कारण की नंतर मला नोकरी लागली. नोकरीवर जाताना रस्ता होता तो म्हणजे असाच की फूटपाथवरून चाला आणि बाजूला वाहने असायची. नंतर जेव्हा अपार्टमेंट बदलले तेव्हा कामावरून निघून १० मिनिटात मी चालत घरी येत असे.



या नवीन अपार्टमेंटच्या आवारातले उंचसखल रस्त्यांवरून चालणे होत असे पण जास्त नाही. चालताना मात्र खूप छान वाटायचे. हे अपार्टमेंट डोंगरावर असल्याने. चालताना आजुबाजूचे डोंगर दिसायचे. आणि फ्रेश वाटायचे. इथे तर चालताना आकाशातले रंग कितीतरी पाहिले आहेत. सर्वच्या सर्व रंग कॅमेरात बंदीस्त केले आहेत. या आधीच्या अपार्टमेंट मध्ये जेव्हा रहायचो तेव्हा ज्या फूटपाथवरून चालत घरी यायचे तेव्हा या फूटपाथवरून चालताना सर्व ऋतूमध्ये निरनिराळे क्षण अनुभवले आहेत. पावसात चालत जाताना, रखरखित उन्हात चालताना, बोचरे वार अंगावर घेताना, आणि शून्य डिग्री सेल्सियस मध्ये चालताना.हँडरसनविलच्या डाऊन टाऊनच्या रस्त्यावर ऍपल फेस्टीवल भरायचा. तेव्हा रस्त्यावर भरपूर विक्रेते, चालणारी माणसे, त्यात म्हातारी, तरुण व लहान मुले घोळक्याने चालायची. बरेच स्टॉल लावलेले असायचे. ही जत्रा खूप आवडून गेली आणि म्हणूनच या डाऊन टाऊनच्या रस्त्याची विशेष आठवण आहे.


कारने आम्ही लांबच्या प्रवासाला जायचो , गावातल्या गावात ग्रोसरी स्टोसर्स ला जायचो , समुद्रावर, तळ्यावर, नदीवर जायचो. या रस्त्यांच्या पण काही आठवणी आहेतच. महामार्गावरच्या काही आठवणी रस्ता चुकल्याच्या आहेत. तर काही वळणावळाच्या रस्त्यावर जाताना डोळ्यासमोर सूर्य येत होता. काही डोंगरघाटावरच्या उंचसखल रस्त्याच्या आहेत तर काही मैलो न मैल एकही झाड नाही. रसळसोट रस्ते .काही महामार्गांवर शुकशुकाट केव्हाही जा !


अमेरिकेत राहून १९ वर्षे झाली पण आमच्या गाठीभेटी रस्त्यांशी आल्या, माणसांशी नाहीत, अगदी नाही म्हणायला काही फ्रेंड सर्कल तातपुरत्या काळासाठी जमा झाले होते आणि तेही विद्यापीठातल्या दिवसात. डोळे मिटले की रस्ते दिसतात. काही वेळेला काही रस्त्यांची प्रखरतेने आठवण होते, डोळ्यासमोरून हालत नाहीत आणि खूप गलबलून येते ! ऋणानुबंधाच्या गाठीच म्हणायच्या !! Rohini Gore

Saturday, June 13, 2020

रस्ते (१)

ध्यानीमनी जे असे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात. अगदी खरे आहे ते ! गेल्या आठवड्यात मला कॉलेज ऍव्हेन्यू रस्ता दिसला होता. नुसता दिसला नाही तर मला बोलावत होता. स्वप्नामध्ये त्या रस्त्यातला गजबजलेला चौक मला स्पषटपणे दिसत होता.


आयुष्याला जशी सुरवात होते तशी आपली रस्त्याशी गाठ पडायला लागते. आधी शाळेत जाताना व नंतर क्रमाक्रमाने कॉलेज, नोकरी, राहते घर सोडून दुसऱ्या शहरात, किंवा दुसऱ्या देशात गेलो तर तेथील रस्ते, असे हे चक्र चालूच असते. यामध्ये काही रस्त्यांचे तर आपल्याशी एक नाते बनून जाते. नातेसंबंधासारखेच रस्त्यांशी गाठ पडणे, त्या रस्त्याचा सहवास घडणे, नातं जडणे आणि त्यात सुद्धा काही रस्त्यांशी घट्ट मैत्री तर काहींच्या नुसत्याच आठवणी बनून रहातात.


तर या रस्त्यांमध्ये काही रस्ते असे असतात की ज्यावर सदा न कदा धावणारी वाहने असतात तर काही रस्त्यांवर एकही चिटपाखरू नसते. काही रस्त्यांवर खड्डेच खड्डे तर काही रस्ते इस्त्री केलेल्या कपड्यांसारखे सदैव गुळगुळीत व फॅशनेबल असतात. काही रस्ते गल्लीबोळातून जातात त्यामुळे खूप घाई असेल आणि लवकर पोहोचायचे असेल तर हे गल्लीबोळातले शॉर्ट कट रस्ते किती उपयोगाचे असतात ना ! हे रस्ते म्हणजे पायवाटेने तयार झालेले रस्ते असतात आणि ओबडधोबड असतात. काही ठिकाणी फरशा तर काही ठिकाणी माती. काही दुकानांसोबतचे रस्ते, असे करत करत माणसाने बनवलेले हे शॉर्टकटचे रस्ते ! इच्छीत स्थळी काही मिनिटात पोहोचवतात. अशा रस्त्यांचे मला खूप कौतुक वाटते. काही रस्ते नेहमी दुभंगलेले असतात बिचारे. सतत खोदकाम चालू असते. या रस्त्यांनी मागच्या जन्मी कोणते पाप केले असेल कोण जाणे ! सतत आपला फावडे कुंदळांचा मारा ! जेव्हा बघावे तेव्हा चिखल माती, आजुबाजूला पाणी, वाहनांना अडथळा.



पुण्याला गणेश खिंड रस्ता हा असाच आठवणींचा बनून राहिला आहे. खिंडीच्या उजवीकडे चालत गेले तर या रस्त्यावरून कमला नेहरू पार्कपर्यंत हा रस्ता मे महिन्याच्या सुट्टीतला झाला होता. या रस्त्यांवरून शाळा कॉलेजमधल्या एप्रिल मे महिन्यांच्या सुट्टीत यावरून चालणे व्हायचे. खिंडीतून खाली उतरलो की डाव्या बाजूला समोरासमोर सिमेंटचे दोन कट्टे होते त्या कट्यावरून आम्ही त्या रस्त्यातल्या चौकाला सिक्स पेंशनर चौक असे नाव दिले होते. कमला नेहरू पार्कमध्ये चालत चालत त्या खिंडीतल्या रस्त्यावरून जायचो. डावीकडे बघितले तर त्या कट्ट्यावर ५-६ पेंशनर लोक येऊन बसलेले असायचे. खिंडीच्या डावीकडे चालत जाऊन चतुर्श्रींगिच्या देवीचे दर्शन घेऊन पुढे एका गणपतीचे देऊळ आहे तिथेही जायचो.


चालताना खूप उत्साह असायचा. त्यावेळेला गर्दी नव्हती. भरपूर वारे व शुद्ध हवा होती. काही वेळेला हनुमान टेकडीवर बसून खालच्या गजबजलेल्या रस्त्यांवर जात असलेल्या वाहनांकडे बघताना कसा व किती वेळ जायचा हे कळायचे सुद्धा नाही. वेळेचे भानच उरायचे नाही. वाहनांचे पिवळे लाल लाईट एकापाठोपाठ एक सुंदर दिसायचे जणू काही दिव्यांची माळ रस्ताभर पसरून ठेवली आहे. आईबाबांच्या घरासमोरचा जो रस्ता होता त्याच्याशी तर खूपच घट्ट नाते आहे. प्रत्येक घरी समोरच्या अंगणात पाण्याचा सडा घातला जायचाच, शिवाय घरासमोरच्या रस्त्यावरही वेगळा सडा घालायचे प्रत्येक जण ! त्यामुळे या टोकापासून ते त्या टोकापर्यंत रस्ता ओलाचिंब व्हायचा. त्यातूनही कोणी सडा घालायला विसरले असेल तर रस्त्याचा तो भाग कोरडा दिसायचा. या रस्त्यावरच सर्व घराची मिळून होळीपौर्णिमेला होळी पेटायची. आमचे घर त्या रस्त्याच्या टोकाला होते. तिथे हा रस्ता संपायचा. आम्ही जेव्हा शाळा कॉलेजात जायचो तेव्हा आई त्या रस्त्यावर येऊन आम्हाला टाटा करायला उभी रहायची. आम्ही दोघी बहिणी चालत चालत जाऊन रस्त्याच्या शेवटी पोहोचलो की तिथून आम्हाला उजव्या बाजूला वळायला लागायचे व तिथून पुढे बस स्टॉप होता. उजव्या बाजूला वळायच्या आधी आईला फायनल टाटा केला की मग आईला आम्ही दिसेनासे व्हायचो. आमच्याकडे कुणी पाहुणे आले की त्यांनाही टाटा बाय बाय करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उभे ! त्यांनाही आमच्या फायनल टाटा बद्दल माहीती झाले होते ! या रस्त्याबद्दल अजून एक खासियत अशी होती की रिक्शाचा, स्कूटरचा आवाज आला की कोणीतरी आले आहे असे आम्हाला घरातच कळायचे.


या रस्त्यावर सर्व विक्रेते यायचे. कुल्फीची गाडी घंटा वाजवत यायची. ढकलगाडीवरून बर्फाचा गोळा, शिवाय कांदेबटाटे वाले यायचे. सायकलवरून टोपल्यातून पेरू व हरबऱ्याच्या गड्ड्या सायकलीच्या मागच्या कॅरिअरला लावून विक्रेते यायचे. रोजच्या रोज बसने शाळा कॉलेजात जायचो तो रस्ताही असाच आठवणीतला. या रस्त्यावरून बस जेव्हा आत वळायची तेव्हा बसच्या खिडकीतून आमचे घर दिसायचे आणि तसेच जातानाही. या रस्त्यावर दोन स्टॉप होते. एक शेवटचा आणि एक मधला. शेवटच्या स्टॉपला बस लागलेली दिसायची. तीन बसेल होत्या त्यावेळेला. एक गोखले नगर ते डेक्कन ९० नंबर, एक होती ती मंडईला जाणारी ५८ नंबर आणि एक होती ती पुणे स्टेशनला जाणारी १४६ नंबर. आम्ही शक्यतोवर शेवटच्या बस स्टॉपला बसायला जायचो. लग्नानंतर रस्त्याची गाठ पडली ती आयायटीमध्ये. इथे खूपच चालणे व्हायचे. आम्हाला भाजी घेण्यासाठी आयायटी कॅॅपस मधून बाहेरच्या वाहत्या रस्त्यावर यायला लागायचे किराणामालाची यादी टाकायला आणि भाजी घ्यायला. तिथे एक लक्ष्मी नावाचे उपहारगृह होते. तिथे कुल्फी चांगली मिळायची.


आयायटीचे आवारच एकूण अवाढव्य आहे. त्यातला एक रस्ता मार्केट गेट म्हणून ओळखला जायचा. या रस्त्याने गेले आणि क्रॉस केला की थेट वाण्याचे दुकान लागायचे आणि त्याच लायनीमध्ये थोडे चालत गेले की तिथे भाजी मिळायची. हा रस्ता भाजी आणण्याकरता पयोगी पडायचा. विनायकचे लॅब मध्ये जाण्या येण्याकरता खूप चालणे होत असे. नंतर आयायटी ते घाटकोपर अशी एक बस सुरू झाली. त्या बसने मग आम्ही घाटकोपरला भाजी आणायला व वाण सामान आणण्यासाठी जात असू. त्यावेळेला बसने जाता येता थोडा उंचसखल पणा होता. आम्ही डोंबिवलीला जाण्यासाठी विक्रोळी स्टेशनवर रिक्षाने यायचो आणि लोकल पकडायचो. तसेच पुण्याला जाताना एक एक्सप्रेस रेल्वे विकोरळीला थांबायची अगदी थोड्यावेळारता असे पुसटते आठवते. आयायटीतून खाली उतरल्यावर कांजूरमार्ग आणि विकोळी ही स्टेशने आठवतात.


अमेरिकेतील क्लेम्सन या छोट्या टुमदार शहरामध्ये दोन रस्ते एकमेकांना छेदून जाणारे होते आणि खूप रहदारीचे होते. त्यातला कॉलेज ऍव्हेन्युचा रस्ता होता तो खूप छान होता. या रस्त्यावरून आम्ही दोघे चालत गेलो नाही असा एकही दिवस नाही. या रस्त्यावरून आम्ही बसने व कारनेही गेलो आहोत पण चालत जायला हा रस्ता खूपच रमणीय आहे. एक तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ आहेत. दुसरे म्हणजे हा रस्ता उंचसखल आहे त्यामुळे चालताना व्यायामही होते. दम लागला तर मध्ये बसायला बाकडीही आहेत. या रस्त्याच्या फूटपाथवरून चालताना रस्त्यावरून धावणारी वाहनेही दिसतात. चालणारी दिसतात. या रस्त्यावरून जो काही आनंद मिळायचा ना त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही !


आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर पडले की लगेचच एक फूटपाथ चालू व्हायचा तो थेट विद्यापीठात पोहोचायचा. फूटपाथच्या बाजूने वाहनांची वर्दळ असायची. या रस्त्यावरून चालणेही व्हायचे आणि नंतर कार घेतल्यावर कारने जाणेही होत असे. या रस्त्यावर क्लेम्सन मध्ये फिरणारी बसही असायची. घरातून निघताना शेंदरी व जांभळ्या एकत्रित रंगाची बस दिसली की बाहेर येऊन स्टॉपवर उभे रहायचे मी. ती बस पुढे जाऊन एका अपार्टमेंटला वळसा घालून यायची. हा जो वाहता रस्ता होता त्याच्या पुढच्या चौकात क्रॉस करून गेल्यानंतर कपडे धुण्याचे दुकान होते. तिथे आम्ही दोन मोठाल्या बॅगातून आठवड्याचे कपडे धुवून आणायचो. स्टुडियो अपार्टमेंट मध्ये धुण्याचे मशीन नव्हते. धुण्याच्या दुकानाच्या समोर एकार्ड होते. धुणे धुवून होईस्तोवर एकर्ड मध्ये जाऊन टाईमपास करायचो. हा जो वाहता रस्ता होता त्याच्या दुसऱ्या बाजूला आतमध्ये एक रस्ता लांबवर जायचा त्याच्या टोकाला एक अपार्टमेंट होते तिथे आम्ही ३ महिन्यांकरता राहिलो. घर ३ बेडरूमचे होते पण तिथे
विद्यार्थी राहत असत. आम्हाला कशीबशी यातली एक रूम ३ महिन्यांकरता मिळाली होती.


या जागेत जेव्हा रहायचो तेव्हा विनायक लॅब मध्ये सकाळी ८ ला जायचा तेर रात्री ८ वाजता यायचा. या आतल्या रस्त्यावरून बाहेर मुख्य रस्त्याला लागायला जवळ जवळ अर्था तास चालायला लागायचे. मग उजवीकडे वळून मोठ्या रस्ता क्रॉस करून एकार्ड मधून मी दुधाचे कॅन वाहून घरी आणायचे. सुरवातीला जेव्हा कार नसते तेव्हा असेच करावे लागते. एकार्डच्या बाजूला पोस्ट ऑफीस होते तिथे मी पत्र टाकायला जायचे. काही वेळा एकर्ड मध्ये ग्रीटींग बघायला जायचे. जेव्हा मला चर्च मध्ये नोकरी लागली तेव्हा कॉलेज ऍव्हेन्यूवरून मी सकाळी ७ ला चालत चर्च मध्ये जायचे. अर्धा तास लागायचा. थंडी मध्ये मायनस ५ अंश सेल्सियस मध्ये चालताना खूप छान वाटायचे. सर्व काही लपेटूनच निघायचे. अगदी हातमोजेही घालायचे. चालताना तोंड उघडले की तोंडातून वाफा यायच्या. सूर्याची कोवळी किरणे रस्त्यावर पडलेली असायची. रस्त्यावर चालणारे कोणीच नसायचे. फक्त मी एकटीच ! नंतर बसने व नंतर कारने या कॉलेज अव्हेन्युवर कितीतरी वेळा जाणे झाले आहे आणि त्यामुळेच हा रस्ता जास्त स्मरणात राहिला आहे.


या खूप दूरवर आत जाणाऱ्या रस्त्यावर रात्री चालताना खूप खूप भीती वाटायची. खूप घनदाट झाडी होती. काळाकुट्ट अंधार. रस्त्यावर एकच मिणमिणता दिवा. काजव्यांची पानातून सळसळ असायची. जेव्हा अपार्टमेंट कॉप्लेक्सचे दिवे दिसायचे तेव्हा हायसे वाटायचे. माझी एक मैत्रिण क्लेम्सन मध्येच दूरवरच्या डोंगरावर राहायची. त्या रस्त्यावरून मी आठवड्यातून एकदा तिच्या घरी जायचे. पूर्ण डोंगरावरचा हा रस्ता होता. आणि मैत्रिणीचे घर डोंगराच्या टोकाला होते. जाताना खूप दमछाक व्हायची पण येताना तितकेच चांगले वाटायचे. कारण की घसरण असायची. तिच्या घरी जाण्याकरता आधी बसने यायला लागायचे आणि स्टॉपवरून वरती चढायला सुरवात असायची.


ती पण इतक्या लांब एकटी मी पण खूप लांब घरी एकटी. आमच्या दोघींचे नवरे लॅब मध्ये १२ तास कामावर ! ती कंटाळून जायची तिचा मुलगा आणि ती माझी खूप वाट बघायचे. मुख्य वाहत्या रस्त्याला छेदून जाणारा अजून एक रस्ता होता. त्याच्या उजव्या बाजूला डॉलर जनरलचे दुकान होते. तिथे मी चालत जायचे. अर्थात बाजूला फूटपाथ होतेच. या रस्त्याच्या डाव्या बाजूने बरेच लांब गेले की बायलो दुकान लागायचे. एकदा आम्ही दोघे अगदी सुरवातीला ग्रोसरी आणण्यासाठी इतक्या लांबवर भर रस्त्याने जीव मुठीत धरून चालत जाऊन चालत आलो आहोत. हा एक खूप त्रासदायक अनुभव होता. अगदी जरूरीपुरत्याच भाज्या घेतल्या होत्या. जावेच लागले
होते. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या. बसेस शनिवार रविवार रात्री ८ वाजता होत्या. वेळापत्रकही होते. पण बस थांबा कुठे आहे ते माहीत नव्हते. नुकतेच क्लेम्सनला आलो होतो. मी ज्या मैत्रिणीकडे जायचे तिथे ८ दिवस राहिलो होतो आणि कशीबशी आम्हाला एक रूम ३ महिन्यांकरता मिळाली होती. त्यामुळेच या रस्त्याची आठवण कायम आहे.या कॉलेज ऍव्हेन्युवर रोज एकदा फिरायला म्हणून जायला चालणे व्हायचेच. शिवाय नोकरी वर चालत जाण्यासाठी व बसने जाण्यासाठी पण जाणे व्हायचे.


शिवाय शुक्रवारी रात्री ८ वाजता ग्रोसरी आणण्याकरता या रस्त्याच्या बस स्टॉप वर उभे रहायचो. क्लेम्सन मध्ये सर्व रस्ते उंच सखल त्यामुळे बसने जाताना रात्रीच्या वेळी बाहेरचा काळोख पाहण्यात पण मजा यायची. काही वेळ अंधार तर दुकाने जवळ आली की दिव्यांचा झगमगाट ! Rohini Gore.
क्रमश : ....

Saturday, June 06, 2020

आईच्या आठवणी

आईच्या आठवणी - बरेच वेळा गप्पांमध्ये आई तिच्या आठवणी सांगते. पण आता मी ठरवले आहे. फोनवरून आई आठवणी सांगायला लागली की लगेच एक वही घ्यायची आणि एकीकडे भरभर लिहून काढायचे.

माझी आई तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते. ती अलिबाग व पनवेल मध्ये राहिली आहे. आईला ८ भाऊ. पनवेल, अलिबाग आणि पुणे इथे आईचे भाऊ नोकरीनिमित्ताने राहिले. स्थिरस्थावर झाले. पनवेलला ३ वाडे होते. २ वाडे होते त्यांना खरे वाडा म्हणत. एक खरे वाडा होता तो गिरणीजवळ होता आणि दुसरा खरे वाडा होता तो तळ्याजवळ होता. अजून एक वाडा होता तो होता जाईल वाडा. आईच्या मैत्रिणी अनुक्रमे छबी वाळिंबे, काशी गोरे आणि मालू घांघूर्डे. जाईल वाड्यात खूप मोठा लाकडी झोपाळा होता. या सर्व मैत्रिणी आणि भानू वहिनी होत्या त्यांच्या दोन मुली होत्या. या सर्व जणी मिळून जाईल वाड्यात लाकडी झोपाळ्यावर बसायच्या आणि गाणी म्हणायच्या. गाणी म्हणजे हिंदी सिनेमातली हिंदी गाणी. विशेष करून राज कपूर नर्गिस ची गाणी.

सर्व जणी मिळून पिठलं भात आमटी भात करायच्या. आयस्क्रीम करायच्या. आयस्क्रीम खूप वेगळे होते हं हे ! एक मोठे पातेल , त्यात एक डबा, मग त्यात दूध, वेलची पावडर असे काय काय टाकून डब्याचे झाकण लावायच्या आणि तो डबा हाताने फिरवायच्या. पातेल आणि तो डबा यामध्ये बर्फ घालायच्या. काय काय करायच्या या मैत्रिणी ! पनवेल मध्ये रतन टॉकीज होते. तिथे या सर्व मैत्रिणी हिंदी पिक्चर पहायला जायच्या. जाईल वाड्यामध्ये ज्या भानू वहिनी होत्या त्यांचा भाऊ रतन टॉकीज मध्ये कॅशियर होता. त्याला काही तिकिटे बाजूला काढून ठेवायला सांगायच्या या मैत्रिणी ! आई सांगते की तिला तिचे भाऊ पिक्चर बघायला पैसे देत असत. त्यावेळेला तिकीट ४ आणे होते.

आई जेव्हा पुण्यात राहायची तेव्हा तिथे जोगेश्वरीच्या बोळात करकरे वाडा होता. प्रभात टॉकीजची मागची बाजू या वाड्याला लागून होती. तिथे करकरे यांची उषा आणि आई पिक्चर सुरू झाला की जाळीचा जो दरवाजा होता त्याला कान लावून गाणी ऐकायच्या. किती ती गाण्याची आवड ना ! पुण्यात शुभ कार्य झाले की जोगेश्वरीला पाया पडायला येत असत. तर त्या दोघी मैत्रिणी वाड्याच्या दिंडीत उभे राहून बघायच्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना , मुंज झालेल्या बटूला. कुतूहल म्हणून ! पनवेल ला एक मनोहर संगीत विद्यालय होते तिथे अप्प्पा मामाने म्हणजे आईच्या सर्वात मोठ्या भावाने आईला गाण्याच्या क्लास ला घातले होते. फी होती ५ रूपये फक्त !

आई सांगते तिच्या आईने म्हणजे माझ्या आजीला जेवण गरम गरम करून वाढायला खूप आवडायचे. आई व तिची एक वहिनी विहीरीवर धुणे धुवायला जायच्या. रहाटाने पाणी काढायला लागायचे. धुणे धुवून आले की आईला शाळेत जायचे असायचे. आईला आजी लगेच गरम गरम भात द्यायची. कढईत तेल टाकून चार चिकवड्या तळायची. त्यातच बटाट्याच्या काचऱ्या आणि त्या पानात वाढल्या की लगेच त्याच कढईत पिठलं करायची. आईचे सर्व आवडीचे करायची मग आई पण खूप खुश व्हायची. त्यावेळेला आई सांगते पनवेलला खूप पाऊस पडायचा. सतत धार असायची. अप्पा मामा आईचा सर्वात मोठा भाऊ धूतपापेश्वर कंपनीत होता. त्याला पण आजी गरम गरम जेवण वाढायची. तो कामावरून आला की त्याच्या पुरती ३ पोळ्यांची कणीक तिने ठेवलेली असायची. पहिला आमटी भात झाला की लगेच तव्यावरची गरम पोळी पानात वाढायची. आमटी भात पिठलं भात सर्वांच्याच आवडीचे होते. अप्पा मामा कंपनीत होता त्यावेळेला तो व त्याचे
मित्र दर शुक्रवारी बटाटेवडे आणून खायचे. प्रत्येकी २. त्यातला आठवणीने १ वडा तो आई साठी बांधून आणायचा.

एका भाजीवाली कडून आजी टोपली भर मावळी काकडी घ्यायची. त्यादिवशी सगळ्यांना खमंग काकडी असायची. आईचे वडील पूजा
खूप छान करायचे. आजी त्यांना पूजेची सर्व तयारी करून द्यायची. पूजा झाली की ते शंख वाजवायचे. आजोबा दत्तजयंती करायचे. त्यादिवशी अळीतली सर्व मंडळी जेवायला असत. आजी सर्व स्वयंपाक करायची. ही दत्तजयंती खरे वाड्यात व्हायची. सुंठवडा असायचा. पंचखाद्याचा नैवेद्य. दत्तजयंती आईचे आजोबा करायचे मग आईचे वडील , नंतर मामा व आता मामाचा मुलगा मुरलीधर दादा करतो.

आईचे ८ भाऊ पनवेल, मुंबई, व पुण्यात नोकरीनिमित्ताने राहिले. आजी जिथे राहील तिथे आई पण राहायची. साहजिकच आहे. जिथे आई तिथे मुलगी. आईच्या सतत स्थलांतरामुळे आईच्या शाळा बदलायच्या. त्यामुळे आईचे शिक्षण एके ठिकाणी झाले नाही. माझ्या आजीने सर्वांची बाळंतपणे केली. कितीतरी ! वाड्यामध्ये पण आजी सर्वांच्या मदतीला जायची. अशा एक ना अनेक आठवणी आईच्या बालपणाच्या !

देवधर आईचे माहेर ज्या वाड्यात होते तो होता खरे वाडा. माझ्या आईचे माहेरचे नाव रेवती व टोपण नाव बाबी. आई शेंडे फळ. आईला एक बहिण होऊन ती गेली. आई म्हणाली की मावशीच्या लग्नात ती केवळ ४ महिन्यांची होती. जेव्हा आईच्या मैत्रिणी एकत्र जमतात तेव्हा भरभरून गप्पा मारतात आणि आठवणी काढतात. Rohini Gore

Saturday, May 09, 2020

९ मे २०२०

ठरवलं एक आणि झालं भलतच. साजूक तूप संपवण्याकरता गोडाचा शिरा केला. कोबीची भजी ठरवली होती पण बटाट्याची पटकन होतात म्हणून ती केली. काकडी संपवायची होती म्हणून खमंग काकडी केली. ठरवले होते वांग्याची भाजी (ती केली) मुग डाळीची खिचडी , कढी आणि भाजलेला पापड









 
रात्रीचा मेनु.


आजचा दिवस वेगळाच होता. एफबीच्या छंद समूहात गाणे गायची थीम होती. तिथे वेगवेगळ्या वयानुसार गट केले होते. त्यात मी दोन गाणी
आधीच रेकॉर्ड केलेली दिली. एक होते धुंदी कळ्यांना आणि दुसरे ओ सजना बरखा बहार आई. ओ सजना हे गाणे
२०१९ सालच्या भारत ट्रीप मधले होते. आज खूप टाईम पास केला. सेल्फी काढत बसले त्यात फोटोत बरेच इफेक्टस दिले. कृष्ण धवल असे काही काही.  आज ग्रोसरी  केली नाही, ती आता उद्या करू. आज खूप थंडी होती. अजूनही अमेरिकेतली थंडी पूर्णपणे गेलेली नाही.
 त्यात हा कोरोना आला. कालच आजचा सकाळचाही स्वयंपाक करून ठेवला होता त्यामुळे आजचा दिवस रिलॅक्स गेला.

Wednesday, May 06, 2020

भेट

दारावरची बेल वाजली
आणि ती लाजली

दार उघडताच दोघांची
नजरानजर झाली

कधी कुठे कसे विचारून झाले
त्यानंतर मोबाईल नंबर दिले घेतले गेले

गप्पांना नाही अंत उरला
आता निघायची वेळ झाली

ऑफीसात ती दोघे विचार करत बसली
इतक्या वर्षानंतर कशी काय भेट झाली?

मोबाइलवरचे नंबर खुणावते झाले दोघांना
मी का म्हणून आधी? विचार राहिला बाजूला

लॅपटॉपच्या स्क्रीनवर कामे सुरू झाली
आला का फोन? एक नजर खाली

मोबाईलचे आकडे फिरले दोन तीन वेळा
नेहमीच कसा एंगेज टोन आला नि गेला

थोडा वेळ गेला आणि वाजला रिंगटोने
आवाजात उठला दोघांच्या एकच हास्यकल्लोळ

मनात साठलेले बोलत ते राहिले
किती वेळ गेला भानच नाही उरले

Rohini Gore - 4th May, 2020

Thursday, April 23, 2020

२३ एप्रिल २०२०

सर्वांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा ! मी वाचनात खूप कच्ची आहे. 2019 साली मी किंडल विकत घेतले आणि मला खऱ्या अर्थाने वाचनाची गोडी लागली. वाचनाचा बराच पल्ला अजून मला गाठायचा आहे. पुस्तके आपले खरेखुरे सोबती. अमेझॉनकडून मराठी पुस्तके विकत घेतली आणि वाचली.


१. हेमांगी (दिवाळी अंक)
२. तीन चित्रकथा - ग. दि. माडगुळकर
३. गुजगोष्टी - दीपा देशमुख
४. वाटेवरल्या सावल्या - ग. दि. माडगुळकर
५. तीसरी घंटा - विजया वाड
६. डॉलर बहू - सुधा मूर्ती - अनुवाद - लीना सोहोनी
७. नाथ हा माझा - कांचन घाणेकर
८. रेशीमगाठी - कांचन घाणेकर
९. थोरली पाती - ग. दि. माडगुळकर
१०. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
११. फॉर हियर ऑर टु गो - अपर्णा वेलणकर
१२. तीन हजार टाके - सुधा मूर्ती - अनुवाद - लीना सोहोनी
१३. मध्य - मंगला गोडबोले
१४. कामेरू - श्री. ना पेंडसे
१५. टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट - अनुवाद लीना सोहोनी
१६. सोहळा - जयवंत दळवी
१७. हरवलेल्या वाटा - माधवी देसाई
१८. कांचनगंगा - माधवी देसाई
१९. भोकरवाडीच्या गोष्टी - द. मा. मिरासदार
२०. नॉट विदाऊट माय डॉटर - अनुवाद - लीना सोहोनी
२१. सोने आणि माती - ग. दि. माडगुळकर
२२. नीले उदास दीन - रॉय
२३. घर कौलारू - जयवंत दळवी
२४. चंदनी उदबती - ग. दि. माडगुळकर
२५. अंर्तबाह्य - रत्नाकर मतकरी
२६. हमसफर एव्हरेस्ट - नीरज मुसाफीर
२७. जावईबापूंच्या गोष्टी - द. मा. मिरासदार
२८. हसणावळ - द. मा. मिरासदार
२९. गुदगुल्या - द. मा. मिरासदार
३०. गोष्टीच गोष्टी - द. मा. मिरासदार


Monday, April 20, 2020

Clemson United Methodist Church

Clemson memory - 2003-2004 Clemson United Methodist church
क्लेम्सन युनायटेड मेथॉडिस्ट चर्च मध्ये मला अमेरिकेतली पहिली नोकरी J २ डिपेंडंट विसावर लागली. या व्हिसावर वर्क पर्मिट काढता येते. वर्क पर्मिट असल्याने चर्च मध्ये मला सकाळी ८ ते १२ अशी नोकरी मिळाली. चर्चमध्ये अमेरिकन्स प्रार्थनेसाठी येतात. काहीजण त्यांच्या मुलांना घेऊन येतात. त्या मुलांना सांभाळण्यासाठी चर्च मध्ये सोय केलेली असते. त्यावेळी आमच्याकडे कार नव्हती. इथेच नोकरी करणाऱ्या दोन इराणी बायका त्यांच्या कार मधून मला न्यायला आणि पोहोचवायला यायच्या. त्यांची नावे आठवत नाहीत. एकीकडे कार होती. तिच्या मैत्रिणीकडे कार नव्हती. तसे तर अर्धा तास चालण्याच्या अंतरावर हे चर्च होते. केम्सन या छोट्या शहरात विद्यापीठ होते आणि बस सेवाही चांगली होती. रविवारी बस सेवा नसल्याने मला चर्चमध्ये चालत जायला आणि यायलाही लागायचे. अर्थात नंतर कार घेतल्यावर विनायक मला सोडायला आणि आणायलाही यायचा. नंतर त्या दोघी इराणी बायका दुसऱ्या शहरात निघून गेल्या. नंतर मी जाता येता चालत जायचे. ही नोकरी खूपच छान होती. कधी कधी १ /२ मुलेच सांभाळायला असायची तर कधी कधी १० / १२ यायची. दोन खोल्यांमधून ही मुले सांभाळायला असायची. चर्चची मुख्य पदावर असलेली बाई अधून मधून चकरा मारायची आणि सर्व व्यवस्थीत आहे ना? असेही विचारायची. मुलांबरोबर आम्ही बायका पण तिथे ठेवलेल्या कुकीज आणि केक खायचो. 



मुलांबरोबर आम्ही पण त्यांच्यात सामील होऊन खेळायचो. हे डे केअर नव्हे. मुलांना सांभाळायची चर्चने केलेली ही एक सोय होती. नंतर बुधवारी संध्याकाळी प्रार्थना सुरू झाली आणि मी बुधवारी संध्याकाळी ६ ते ८ जायला लागले. बुधवारी बस सेवा असल्याने मी बसने जा - ये करायचे. ८ ते १२ मध्ये थोडा थोडा वेळ मुले यायची. काहीजण ठराविक अंतराने यायचे. काम काहीच नाही. मुलांच्या सोबत त्यांना काही खायला द्यायचे असेल तर त्यांचे पालक आमच्याकडे त्यांच्या खाण्यापिण्याच्या पिशव्या देऊन जायचे. या नोकरी नंतर मला डे - केअर मध्ये नोकरी लागली. ही नोकरी सोमवार ते शुक्रवार १० ते ४ असायची. बॅप्तिस्त चर्च मध्ये डे केअर चालवायला दिले होते. चर्चमधल्य्य एका खोलीत एक बाई इंग्रजीचा वर्ग चालवायची. तिथे कोरियन, चिनी देशातल्या आया इंग्रजी शिकायला यायच्या. वर्क पर्मिट असल्याने त्यांच्या मुलांना सांभाळायला पण एक खोली ठेवली होती. तिथे आम्ही काही देशातल्या बायका होतो. मेथॉडिस्ट चर्च मध्ये मुलांना सांभाळायला इराणी, कोरियन ,चिनी तर काही युरोपियन बायका होत्या. अर्थात वर्क पर्मिट असलेल्या Rohini Gore








Sunday, April 19, 2020

Bonfire of Destiny (2)

मार्कची नोकराणी ऍड्रीनला सांगते की तुम्हाला तुमच्या नवऱ्याने बोलावले आहे. ऍड्रीन नवऱ्याच्या खोलीत जाते आणि विचारते काय मार्क?कशाला बोलावलेस? मार्क उठतो आणि एक सणसणीत तिच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो काय गं तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय का? मिळणार नाही ! ऍड्रीन म्हणते हो, मला तुझा कंटाळा आला आहे. तू अत्याचार करत आहेस माझ्यावर, आता मी सहन करणार नाही. मार्क म्हणतो तुझे नक्कीच कुठेतरी प्रेमप्रकरण चालू आहे, कोण आहे तो? तुला मी अजिबात घटस्फोट देणार नाहीये मी. कळलं तुला? हे संभाषण चालू असताना बाहेर ओरडण्याचा आवाज येतो म्हणून ती खिडकीतून बाहेर जाते तर तिची नोकराणी तिच्या मुलीला एका बग्गीमध्ये जबरदस्तीने बसवत असते. आणि कॅमलिन तिच्या ममाला हाका मारत असते. काय केलेस तू हे? मार्क, हा. तू मूलीला कोठे पाठवत आहेस? मार्क परत तिच्यावर जबरदस्ती करतो. केस ओढतो आणि सांगतो नीट ऐक. तुला चॅरिटी बाजारला जायचे आहेस. हे घे पैसे. तुला लागतील तेव्हढे पैसे खर्च कर आणि माझ्या बद्दल प्रचार कर. मला अध्यक्षपदी निवडणूकीला उभे रहायचे आहे. तयार हो आणि बाहेर ये. बग्गीवाला आपली वाट पाहत आहे. ती दोघे बाहेर येतात. बग्गीमध्ये बसतात आणि चॅरिटी बाजार भरलेला असतो त्या ठिकाणी येतात. त्याच वेळेला एका बग्गीतून रोझ आणि ऍलीस उतरतात. रोझ ही ऍलीसची नोकर असते. ऍलीस बाजार मध्ये जाते आणि रोझलातिचा नवरा म्हणजेच बग्गीवाला बोलावतो आणि म्हणतो बघ माझ्या हातात काय आहे? आणि तो तिला न्युयॉर्कची तिकिटे दाखवतो आणिम्हणतो तू ऍलीसला न्युयॉर्कला जाण्याविषयी सांग. ती म्हणते हो नक्की सांगेन आणि बाजार मध्ये प्रवेश करते.


बाजार मध्ये निरनिरळी माणसे बाया आणि मुले जमा झालेली असतात. तिथे जादुचे खेळ दाखवले जातात. शिवाय फोटो काढणे चालू असते.निरनिराळ्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. आणि मुख्य म्हणजे तिथे छोट्या पडद्यावर सिनेमा दाखवत असतात. तिथे छोटीमुले जमा होतात. या बाजार मध्ये ऍलिस, रोझ, ओडिट आणि तिचा मुलगाही असतो. त्याच वेळेला तिथे ऍड्रीन पण आलेली असते. रोझ, ऍलीस, ओडिट आणि तिचा मुलगा थॉमस हे सर्व एकत्र येऊन एकमेकींचे विचारपूस करत असतात. ओडिटच्या हातातली महागडी अंगठी ऍलीसला खूप आवडते. तितक्यात ओडिटचा मुलगा थॉमस हट्ट करायला लागतो, आई मला सिनेमा पहायचा आहे. मी रांगेत उभा राहू का? तर ऍलीस म्हणते तुला सिनेमा बघायचा आहे का थॉमस? चल ये माझ्याबरोबर. माझ्या वडिलांनी या सिनेमाचे सर्व सेटींग लावलेले आहे. रोझ आजुबाजूच्या वस्तू बघत असते आणि तिला एक जहाज खूपच आवडून जाते. तिला जहाज आवडलेले आहे ते ऍलीसच्या लक्षात येते आणि ती लगेचच तिच्याकरता ती जहाज विकत घेते.

ऍड्रीयन बऱ्याच वस्तू विकत घेते आणि ऍलीस ला म्हणते की चल मी जरा बाहेर जाऊन येते. ऍड्रीन ऍलीसची मावशी असते. आता रोझ ऍलीस आणि थॉमस एका छोट्या खोलीत सिनेमा पहायला येतात. थॉमस सिनेमा पाहून खूप खुश होतो. रोझ त्याला तिच्या मांडीवर बसून त्याचे लाड करते. विकत घेतलेले जहाज पण त्याच्या हातात देते. विचारते तुला आवडले का? ऍलीसचा बॉयफ्रेंड आता त्या सिनमागृहात येतो. ऍलीसला पाहिल्यावर म्हणतो मला वाटलेच होते तु इथे असशील. रोझ म्हणते तुम्ही दोघे बाहेर जाऊन गप्पा मारा. मी इथे थॉमसला घेऊन बसली आहे. सिनेमा पाहता पाहता एकदम कसलातरी आवाज येतो. बाजारमध्ये जमा झालेली सर्व माणसे एकमेकांकडे बघतात काय झाले? काय माहिती? आवाज आला ना कुठलातरी? हो ना. अश्या प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघतात. रोझला थोडा वेगळाच संशय येतो. जिथे प्रोजेक्टर असतो तिथे तिला थोडी आग लागली आहे का असे जाणवते. इकडे तिकडे बघते आणि थॉमसला घेऊनती विचारपूस करते. तिथली माणसे म्हणतात. काळजी करू नका. छोटी आग आहे. विझेलच. आमचे प्रयत्न चालू आहेत. प्रोजेक्टरच्याखोलीतले आजुबाजूचे पडदे लावतात.


रोझ एकाला विचारते ही कसली धावपळ आहे? काहीतरी घडत आहे हे तिला नक्की कळते. एक माणूस म्हणतो आग लागली आहे तुम्हीलवकर बाहेर पडा. हे ऐकल्यावर ती थॉमसला घेऊन बाहेर जाते आणि एका बाईकडे थॉमसला सोडते आणि म्हणते प्लीज या मुलाची काळजी घ्या हं. बाई म्हणते ठीक आहे ना सगळे? हो हो असे म्हणून रोझ भराभर बाजामध्ये जाते आणि ओडिट कुठे आहे का ते शोधते. तिला ओडिट दिसते. रोझ ओडिटला सांगते तुझा मुलाला मी आताच बाहेर एका बाईकडे सोडून आले. तो तिथे सुरक्षित आहे. तिला सांगते आग लागली आहे. विचारते ऍलीस कुठे आहे. आणि लगेचच ती रोझ ऍलीसला शोधायला जाते. ऍलीस दिसताक्षणी तीला सांगते. ऍलीस चल पटकन इथे आग लागली आहे. कर्णोपकर्णी आगेची बातमी सगळीकडे पसरते. आणि एकाच वेळी सगळ्यांची एकच धांदल उडते. जो तो बाहेर कसे पडता येईल या विचारात असतो. आग लागते. हळूहळू सर्व पेटत जाते. धक्काबुक्की, आपला जीव मुठीत घेऊन सर्व एकमेकांना रेटत पुढे जात असतात.


ओडिट थॉमसचे नाव घेऊन घाबरून जात असताना धक्काबुक्की होते. धक्काबुक्कीत ओडिट पडते आणि तिच्यावर पाय देऊन सर्व पळत असतात. तिथेच ती बेशुद्ध पडते.बाहेर जायला जो दरवाजा असतो तो पण रोलींग असतो. प्रत्येक जण एकमेकांवर आदळत असतात. आता तर आगीचा भडकाच उडतो. रोझ, ऍलीस, आणि तिचा प्रियकर (ज्युलिएन) एकमेकांना धरून जीव मुठीत घेऊन पुढे पुढे सरकत असतात. तितक्यात ऍलीस पडते. रोझ मागे वळून बघते आणि ज्युलिएनला म्हणते ऍलीस खाली पडलेली आहे. चल आपण जाऊन तिला घेऊन येऊ. ज्युलिएन रोझला ढकलतो आणि ती आगीत कोसळते. ऍलीस आधीच कोसळलेली असते. आजुबाजूला आगच आग ! ज्युलिएनने रोझला ढकललेले ऍलिस पाहते आणि बेशुद्ध पडते. ऍलीसला आगीतून व्हिक्टर वाचवतो. आग लागल्याची बातमी आतापर्यंत ऍलीसच्या आईवडिलांना समजते. जेव्हा ऍड्रियन बाजारच्या बाहेर जाते तेव्हा एक बग्गीवाला येऊन तिला पाहून ओरडतो मॅडम थांबा आणि आत बसा. आत तिचा प्रियकर (पत्रकार) बसलेला असतो. ती त्याला सांगते मी माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे. माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली आहे. हे माझ्या नवऱ्याचेच कारस्थान आहे. मला परत घरी जायचे नाही.बग्गीतून उतरून ऍड्रीयन बघते तर सगळीकडे हलकल्लोळ माजलेला असतो. आग बघून तिचे सर्व त्राण गळून जातात. ती एका फूटपाथ वर येऊन बसते. आग बरीचशी विझवली जाते. पत्रकार बघतो तर ऍड्रियन अशी फूटपाथवर का बसली आहे. तो तिला सांगतो की तू घरी जा. नवरा तुझी वाट पाहत असेल. तर ती त्याला सांगते की मी घरी जाणार नाही. तो राक्षस आहे. मला घटस्फोट घ्यायचा आहे. आणि माझ्या मुलीचा शोधही घ्यायचा आहे. तो तिला मदतीचे आश्वासन देतो आणि तिला त्याच्या घरी आणतो. Rohini Gore

क्रमशः ....

Tuesday, April 14, 2020

Bonfire of Destiny

Le Bazar de la Charité मूळ फ्रेंच सिरीज आहे. त्याचे इंग्रजी नामकरण केले आहे The Bonfire of Destiny.(Netflix) पॅरीस १८९७ मध्ये एक भीषण आग लागते. या सत्यघटनेला अनुसरून लिहिलेली कथा. एके ठिकाणी चॅरिटी बाजार भरलेला असतो आणि तिथे एका सिनेमाटोग्राफला आग लागते. ती सर्वत्र पसरते. त्यात बरेच जण मृत्युमुखी पडतात तर अनेक घायाळ होतात. यात बऱ्याच प्रमाणात जास्त बायकाच असतात. यातल्या ३ बायकांवर लिहिलेली ही कथा आहे.खूप सुंदर कथा आणि दिग्दर्शन. पहिल्या एपिसोड मध्ये आग लागलेली दाखवली आहे तिचे चित्रिकरण आणि त्या आगीत सापडलेली माणसे, बायका, त्यांची धडपड, अगतिकता दाखवलेली आहे.


८ एपिसोड मध्ये ३ बायकांच्या जीवनात कसे चढ उतार होतात, २ प्रेमी जिवांची कशी ताटातूट होते आणि शेवटी ते कसे एकत्र येतात हे दाखवले आहे. खूनी नवऱ्यापासून सुटका आणि प्रेमाचा विश्वासघात दाखवला आहे. आगीतून वाचवणाऱ्या माणसाला कसा बळीचा बकरा बनवतात आणि नंतर त्याची फाशी कशी रद्द होते ते दाखवले आहे.यामध्ये इमोशन्स, रोमान्स, खोटारडेपणा इ. इ. दाखवले आहे. याचे थोडक्यात कथानक


Bonfire of Destiny - French series on Netflix - story telling - review, narration -
cast
Adrienne - wife of senator
Camille - daughter of Adrienne
Rose - maid of Alice
Alice - daughter of cinematographer
odette - Rich woman in Paris
other cast introduction i will write in next chapter.


जेंव्हा ओडिटची आई प्रेतागारात येते तेव्हा तिची नजर असते ती तिच्या मुलीच्या शोधासाठी ! आपली मुलगी इथे असू शकेल ही कल्पनाच तिला सहन होत नसते. प्रेतागारामध्ये जाण्याआधी ती हॉस्पिटलमध्ये जाऊन ओडिटचा शोध घेत असते. त्या हॉस्पिटल मध्ये रोझ एका कॉटवर पडून कण्हत असते. ओडिटच्या आईला रोझ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. रोझला पाहिल्यावर ओडिटची आई पटकन तिच्याजवळ जातेही पण तिला समजून चुकते की ही आपली मुलगी नाही! रोझचे निळे डोळे मात्र अगदी हुबेहूब तिच्या मुलीच्या डोळ्यासारखे असतात. निळे डोळे!



रोझचा चेहरा तिचे डोळे सोडून पूर्णपणे झाकलेला असतो. चेहऱ्याला सर्व बाजूने बँडेज बांधलेले असते. फक्त तिचे डोळे वाचलेले असतात. हातपाय, छातीचा काही भाग तीव्र प्रमाणात भाजलेला असतो. चेहऱ्याचा डावा भाग पूर्णपणे जळून चेहरा विद्रुप झालेला असतो. रोझच्या हातात न्युयॉर्कला जाण्यासाठी २ विमानाची तिकीटे असतात. रोझ ओडिटच्या आईला हेच सांगत असते, माझा नवरा कुठे दिसतो का? त्याला ही तिकीटे नेऊन दाखवा म्हणजे त्याला मी जिवंत आहे हे कळेल. ती ओडिटचा हात धरते आणि सांगत असते खरी, पण ही आपली मुलगी नाही हे कळल्यावर तिचा हात रोझच्या हातातून मोठ्या मुष्किलीने सोडवून घेते.


ओडिटची आई प्रेतागरामध्ये येते. इथेच कुठे आपली मुलगी दिसली की तिचे अंत्यदर्शन घ्यायचे असे मनात ठरवून सर्व प्रेतांपाशी जाउन बघते काही जण अर्धवट जळालेले तर तर काही जण पूर्ण जळून काळी ठिक्कर पडलेली असतात. काळीकुट्ट विद्रुप झालेली प्रेते बघून तिला आपण येथे बेशुद्ध पडू की काय असे वाटताच तिला दूरवर कुठेतरी एक हात लांब झालेला दिसतो. तिथे जाते आणि तिची खात्री पटते हीच आपली मुलगी! तिच्या हातात अंगठी असल्याने ती लगेचच ओळखते. ओक्साबोक्शी रडायला लागते. आपली मुलगी आता या जगात राहिलेली नाही हे सत्य पचवायलाच हवे हे तिला कळून चुकते. खूप रडल्यावर ती स्वतःला साव्वरते आणि आता पुढे काय? अश्या विचारात असताना तीला प्रश्नाचे उत्तर सापडते. घाईघाईने ओडिटच्या हातातली अंगठी काढून ती आपल्या ड्रेसच्या खिशात घालते. आजुबाजूला कोणी आपल्याला पाहत तर नाही याची खात्री करून ती लगोलग निघते आणि रोझ असते त्या ठिकाणी येऊन पोहोचते. रोझ बेशुद्ध अवस्थेत असते.



आजूबाजूला पाहते तर सर्वांची एकच धावपळ चाललेली असते. नर्सेस, डॉक्टर्स, हातात चार्ट घेऊन जखमी लोकांना तपासत असतात. काही जखमी लोकांचे नातेवाईक आपले इथे कोणी आहे का नाही ते बघायला आलेले असतात. तिथे एक पत्रकारही आलेला असतो. जितक्या शिताफीने ती ओडिटच्या हातातली अंगठी काढते तितक्याच शिताफीने ती अंगठी, आजूबाजूला कोणी बघत नाहीना ते पाहून रोझ च्या हातात घालते. तिच्या मनगटातले ब्रेसलेटही पटकन काढून ते खिशात घालते. ओडिट म्हणून धाय मोकलून रडायला लागते. तितक्यात तिथे नर्स येते आणि म्हणते रडू नका. आताच या बाईची शुद्ध हरपलेली आहे. ही तुमची कोण लागते असे नर्सने विचारताच ही माझी मुलगी असे सांगते. मी हिला माझ्या घरी घेऊन जाऊ का? असे नर्सला विनवल्यावर नर्स म्हणते हरकत नाही. नाहीतरी आम्हाला इथे एक कॉट रिकामी झालेली हवीच आहे. बरेच पेशंट आहेत. ओडिटची आई नर्सला सांगते मी पॅरीसमधली एक खूप मोठी श्रीमंत बाई आहे. मी माझ्या मुलीची काळजी घेईन आणि तिला आपल्या घरी घेऊन जाते. नर्स कडून मुलीला पेनकीलरचा डोस किती द्यायचा हे पण ती विचारून घेते.
रोझ आता ओडिटच्या आलिशान बंगल्यात येऊन पडलेली आहे. एका बेडरूम मध्ये रोझ बेशुद्ध अवस्थेत बराच वेळ पडून राहिल्यावर एका क्षणी तिला शुद्ध येते. हळूहळू डोळे उघडून पाहते आणि तिला कळून चुकते की आपण आपल्या घरी नाही. आपण एका दुसऱ्याच घरी आलो आहोत. आपल्याला आणले गेले आहे. खूप धडपड करत ती उठायचा प्रयत्न करते मात्र पण अतिवेदनेने ती परत भोवळ येऊन पडते. Rohini Gore
क्रमश : ....

Thursday, April 09, 2020

Old is gold