Saturday, June 06, 2020

आईच्या आठवणी

आईच्या आठवणी - बरेच वेळा गप्पांमध्ये आई तिच्या आठवणी सांगते. पण आता मी ठरवले आहे. फोनवरून आई आठवणी सांगायला लागली की लगेच एक वही घ्यायची आणि एकीकडे भरभर लिहून काढायचे.

माझी आई तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगते. ती अलिबाग व पनवेल मध्ये राहिली आहे. आईला ८ भाऊ. पनवेल, अलिबाग आणि पुणे इथे आईचे भाऊ नोकरीनिमित्ताने राहिले. स्थिरस्थावर झाले. पनवेलला ३ वाडे होते. २ वाडे होते त्यांना खरे वाडा म्हणत. एक खरे वाडा होता तो गिरणीजवळ होता आणि दुसरा खरे वाडा होता तो तळ्याजवळ होता. अजून एक वाडा होता तो होता जाईल वाडा. आईच्या मैत्रिणी अनुक्रमे छबी वाळिंबे, काशी गोरे आणि मालू घांघूर्डे. जाईल वाड्यात खूप मोठा लाकडी झोपाळा होता. या सर्व मैत्रिणी आणि भानू वहिनी होत्या त्यांच्या दोन मुली होत्या. या सर्व जणी मिळून जाईल वाड्यात लाकडी झोपाळ्यावर बसायच्या आणि गाणी म्हणायच्या. गाणी म्हणजे हिंदी सिनेमातली हिंदी गाणी. विशेष करून राज कपूर नर्गिस ची गाणी.

सर्व जणी मिळून पिठलं भात आमटी भात करायच्या. आयस्क्रीम करायच्या. आयस्क्रीम खूप वेगळे होते हं हे ! एक मोठे पातेल , त्यात एक डबा, मग त्यात दूध, वेलची पावडर असे काय काय टाकून डब्याचे झाकण लावायच्या आणि तो डबा हाताने फिरवायच्या. पातेल आणि तो डबा यामध्ये बर्फ घालायच्या. काय काय करायच्या या मैत्रिणी ! पनवेल मध्ये रतन टॉकीज होते. तिथे या सर्व मैत्रिणी हिंदी पिक्चर पहायला जायच्या. जाईल वाड्यामध्ये ज्या भानू वहिनी होत्या त्यांचा भाऊ रतन टॉकीज मध्ये कॅशियर होता. त्याला काही तिकिटे बाजूला काढून ठेवायला सांगायच्या या मैत्रिणी ! आई सांगते की तिला तिचे भाऊ पिक्चर बघायला पैसे देत असत. त्यावेळेला तिकीट ४ आणे होते.

आई जेव्हा पुण्यात राहायची तेव्हा तिथे जोगेश्वरीच्या बोळात करकरे वाडा होता. प्रभात टॉकीजची मागची बाजू या वाड्याला लागून होती. तिथे करकरे यांची उषा आणि आई पिक्चर सुरू झाला की जाळीचा जो दरवाजा होता त्याला कान लावून गाणी ऐकायच्या. किती ती गाण्याची आवड ना ! पुण्यात शुभ कार्य झाले की जोगेश्वरीला पाया पडायला येत असत. तर त्या दोघी मैत्रिणी वाड्याच्या दिंडीत उभे राहून बघायच्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना , मुंज झालेल्या बटूला. कुतूहल म्हणून ! पनवेल ला एक मनोहर संगीत विद्यालय होते तिथे अप्प्पा मामाने म्हणजे आईच्या सर्वात मोठ्या भावाने आईला गाण्याच्या क्लास ला घातले होते. फी होती ५ रूपये फक्त !

आई सांगते तिच्या आईने म्हणजे माझ्या आजीला जेवण गरम गरम करून वाढायला खूप आवडायचे. आई व तिची एक वहिनी विहीरीवर धुणे धुवायला जायच्या. रहाटाने पाणी काढायला लागायचे. धुणे धुवून आले की आईला शाळेत जायचे असायचे. आईला आजी लगेच गरम गरम भात द्यायची. कढईत तेल टाकून चार चिकवड्या तळायची. त्यातच बटाट्याच्या काचऱ्या आणि त्या पानात वाढल्या की लगेच त्याच कढईत पिठलं करायची. आईचे सर्व आवडीचे करायची मग आई पण खूप खुश व्हायची. त्यावेळेला आई सांगते पनवेलला खूप पाऊस पडायचा. सतत धार असायची. अप्पा मामा आईचा सर्वात मोठा भाऊ धूतपापेश्वर कंपनीत होता. त्याला पण आजी गरम गरम जेवण वाढायची. तो कामावरून आला की त्याच्या पुरती ३ पोळ्यांची कणीक तिने ठेवलेली असायची. पहिला आमटी भात झाला की लगेच तव्यावरची गरम पोळी पानात वाढायची. आमटी भात पिठलं भात सर्वांच्याच आवडीचे होते. अप्पा मामा कंपनीत होता त्यावेळेला तो व त्याचे
मित्र दर शुक्रवारी बटाटेवडे आणून खायचे. प्रत्येकी २. त्यातला आठवणीने १ वडा तो आई साठी बांधून आणायचा.

एका भाजीवाली कडून आजी टोपली भर मावळी काकडी घ्यायची. त्यादिवशी सगळ्यांना खमंग काकडी असायची. आईचे वडील पूजा
खूप छान करायचे. आजी त्यांना पूजेची सर्व तयारी करून द्यायची. पूजा झाली की ते शंख वाजवायचे. आजोबा दत्तजयंती करायचे. त्यादिवशी अळीतली सर्व मंडळी जेवायला असत. आजी सर्व स्वयंपाक करायची. ही दत्तजयंती खरे वाड्यात व्हायची. सुंठवडा असायचा. पंचखाद्याचा नैवेद्य. दत्तजयंती आईचे आजोबा करायचे मग आईचे वडील , नंतर मामा व आता मामाचा मुलगा मुरलीधर दादा करतो.

आईचे ८ भाऊ पनवेल, मुंबई, व पुण्यात नोकरीनिमित्ताने राहिले. आजी जिथे राहील तिथे आई पण राहायची. साहजिकच आहे. जिथे आई तिथे मुलगी. आईच्या सतत स्थलांतरामुळे आईच्या शाळा बदलायच्या. त्यामुळे आईचे शिक्षण एके ठिकाणी झाले नाही. माझ्या आजीने सर्वांची बाळंतपणे केली. कितीतरी ! वाड्यामध्ये पण आजी सर्वांच्या मदतीला जायची. अशा एक ना अनेक आठवणी आईच्या बालपणाच्या !

देवधर आईचे माहेर ज्या वाड्यात होते तो होता खरे वाडा. माझ्या आईचे माहेरचे नाव रेवती व टोपण नाव बाबी. आई शेंडे फळ. आईला एक बहिण होऊन ती गेली. आई म्हणाली की मावशीच्या लग्नात ती केवळ ४ महिन्यांची होती. जेव्हा आईच्या मैत्रिणी एकत्र जमतात तेव्हा भरभरून गप्पा मारतात आणि आठवणी काढतात. Rohini Gore

No comments: