Tuesday, April 08, 2025

खाणं-पिणं- लक्षात राहिलेलं

लक्षात राहिलेले पहिले खाणे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी (Prav Electrospark pvt. Ltd) दुपारच्या जेवणात खाल्लेला डबा. १९८३-८४ साली लागलेली माझी पहिली नोकरी. तिथे दुपारच्या जेवणात सर्व डिपार्टमेंटच्या मुली-बायका एकत्र येऊन डबा खायचो. हा डबा आम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसून खायचो. गोलाकार बसायच्या सर्व जणी आणि भाज्या-आमट्या-दही साखर-ताक हे सर्व डबे मधोमध ठेवायचो आणि पोळ्या आपापल्या खायच्या. प्रत्येक पोळीच्या घासाबरोबर इतरांनी आणलेली भाजी (कोरडी-पातळ) खायचो. आमच्या सगळ्यांचे चौरस जेवण होत असे. जेवणाच्या डब्यात पातळ-सुकी भाजी, दही साखर, चटणी, कोशिंबीर, माझे बाटलीतले ताक, दही भात, चटण्या, मोरंबे गुळंबे असे आलटून पालटून सर्वच खायला मिळायचे. जेवणानंतर खायला सुपारी-बडीशेपही काहीजणी आणायच्या. मी वरच्या मजल्यावर पर्चेस डिपार्टमेंटला होते तर खाली असलेले पर्सोनेल डिपार्टमेंट मध्ये माणिक ताई होती. तिनेच मला ही नोकरी सुचवली होती. या डिपार्टमेंटला दोघेच होते. माणिक ताई आणि अजून एक होता. ते बाहेरून खायला आणायचे म्हणजे इडली-डोसे बटाटेवडे. त्यावेळेला कंपनीत शिपाई होते. तो शिपाई मला सांगायचा तुम्हाला खाली बोलावले आहे. मला लगेच ते कळायचे. खाली जायचे खरी पण मनात धाकधूक. माणिक ताई म्हणायची अगं सावकाश खा. एखादी इडली, एखादा बटाटावडा खाऊन मी परत माझ्या जागेवर येऊन बसायचे.


डोंबिवलीत Avery India Ltd. मध्ये नोकरी लागली तेव्हा तर खाण्यापिण्याची खूपच धमाल केली. BM (Branch Manager ) आम्हाला कामे देऊन कधी एकदाचे बाहेर जातात असे आम्हाला होऊन जायचे. कंपनीतर्फे त्यांची कार काळ्या रंगाची होती. ते बाहेर पडले रे पडले आणि कार वळवून रस्त्याला लागले रे लागले की आम्हा तिघींना (मी दिप्ती लक्ष्मी) सामोश्याची भूक लागायची. भुकेने व्याकुळ व्हायचो अगदी. बापट आमच्यासाठी सामोसे घेऊन यायचे व चहाची ऑर्डर पण देऊन यायचे. गरमागरम सामोश्यांसोबत तळलेली मिरची आणि कच्चा कांदा असायचा. दुपारच्या जेवणाचा डबा ३ वाजता खायचो. मी असेच एकदा सुचवले होते की तिघींपैकी एकीनेच सर्वांचा डबा आणायचा. त्यात मी एकदा बटाटेवडे आणि साबुदाणा खिचडी आणली होती. दिप्तीने ओली भेळ करून आणली होती आणि लक्ष्मीने शेवई कढी. आमचे ऑफीस M.I.D.C मध्ये होते. ऑफीसच्या समोरच्या रस्त्यावरून फळ विक्रेते जायचे. एकदा १ किलो दाक्षे जेवणानंतर आम्ही तिघींनी फस्त केली होती. एकदा संत्रीही अशीच खाल्ली होती. घरी घेऊन घेण्यासाठी मी त्या विक्रेत्याकडून अनेक संत्री घेतली होती. ऑफीसमध्ये क्लायंट आले की देवधर नावाचे BM चहा बिस्कीटे किंवा कधी कधी cold drink मागवायचे. ते आमच्या करताही ऑर्डर करायचे. त्यात मी नेहमि Thumps up घ्यायचे. दिप्ती व लक्ष्मी mangola घ्यायच्या. krackjack (थोडी मीठी थोडी नमकीन) बिस्किटे मला खूप आवडायची. जेव्हा आमच्या Sales Representative ला बरेच कमिशन मिळायचे तेव्हा ते आम्हा तिघींनाही बाहेर उपाहारगृहात पार्टी द्यायचे. पंजाबी नान, नवरतन कुर्मा, टोमॅटो सूप, फ्राईड राईस, आईस्क्रीम असायचे. कोल्ड ड्रिंक पण आमच्या तिघींचे नेहमीचे ठरलेले घ्यायचो. शनिवारी हाफ डे असायचा. त्यानंतर आम्हा तिघींना घेऊन सर्व जण उपाहारगृहात पार्टी द्यायचे. डोंबिवलीत रस्त्यावर एक माणूस सॅंडविच बनवून द्यायचा. ब्रेडच्या बाजूच्या चकत्या काढायचा. एका ब्रेडवर अमूल बटर लावायचा तर एका ब्रेड वर चटणी. त्यावर उकडलेल्या बीटाचे व बटाट्याचे काप, लाल कांद्याचे काप, टोमॅटो व काकडीचे काप ठेवून धारदार सुरीने त्याचे ४ स्लाईस करायचा व त्यावर टोमॅटो केच अप घालायचा. खूपच चविष्ट होते हे सॅंडविच ! एक खाल्ले की तोंड खवळायचे व लगेच दुसरेही ऑर्डर करायचो.


जेव्हा मला हेंडरसनविल इंगल्स मध्ये नोकरी लागली तेव्हा पण खाण्यापिण्याची खूप चंगळ केली. तिथे मी दुपारच्या जेवणात आठवड्यातून एकदा Vegetable lo mein घ्यायचे किंवा कधी कधी सब वे स्टाईल सॅन्डविच मी स्वत: बनवून घ्यायचे. त्यात मी माझ्या आवडीचे सर्व घालायचे. 6 " Italian bread त्यावर मेयोनिज लावायचे. त्यावर चिरलेला लेट्युस, चीझ ( पेपर जॅक/ स्विस )काकडी,टोमॅटो सिमला मिरची, कांदा या सर्वांचे काप ठेवायचे. शिवाय किसलेले गाजर घालायचे. त्यावर हनी मस्टर्ड घालून तो रॅप करून घ्यायचे.सोबत डाएट कोक kettle पोटॅटो चिप्स घ्यायचे. जेव्हा मी ४ वाजता घरी जायला निघायचे तेव्हा chocolate croissant खायचे व नंतर स्टार बक्स ची कॉफी पिऊन निघाले की घरी चालत जायला मला ४५ मिनिटे लागायची. नंतर जेव्हा इंगल्स मध्ये आईस्क्रीम विक्रीला ठेवले ते खूपच छान होते. Gelato pumpkin ice-cream मला खूपच आवडून गेले. शिवाय काम करता करता एकीकडे आम्ही जे बनवायचो त्यात जे घटक घालायचो तेही खायचे. ( goldfish baby tomato, baby carrot, dried fruits.) बनाना व चॉकलेट पूडिंग बनवताना त्यात लागणारे घटक म्हणजे केळीचे काप, Oreo cookies chocolate syrup मध्ये बुडवून खायचे. तिथे काम करणाऱ्या सर्वजणी खायच्या. लपून छपून. काम करता करता कुणाचे लक्ष नाही ना ते पाहून पटकन एखादे तोंडात टाकायचो. किंवा कोल्ड रूम मध्ये जा ऊन खायचो. hot bar  मध्ये काही वेळेला fried okhra, french fries असायचे तेही खायचो. डेली सेक्शनला ज्या काम करणाऱ्या होत्या त्या सर्वजणी नॉन व्हेज पदार्थ खायच्या.  शिवाय आमच्या मागे फ्रुट बार साठी फळे कापली जायची ती पण खायचो. म्हणजे कलिंगड, टरबूज, अननस. काही वेळेला बेकरीतून ताजी बेक केलेली बिस्किटे टेस्ट साठी आम्हाला तिथली एक मुलगी घेऊन यायची. ताजी बिस्किटे खायला खूपच छान वाटायचे.


आम्हा दोघांना पिझ्झा जास्त आवडत नाहीच. आधी जेव्हा पिझ्झा खाल्ला तेव्हा तो घशाखाली नीट उतरला नव्हता. प्रत्येक घासागणिक चीझ येत होते. नंतर पिझ्झा आवडायला लागला. पिझ्झ्या सोबत ब्रेड स्टिक्स किंवा गार्लिक ब्रेड घेत होतो. प्यायला भरपूर कोकाकोला. लक्षात राहिलेला पिझ्झा होता हेंडरसनविल मधला . Flat Rock गावात एक इटालियन पिझ्झाचे उपाहारगृह होते. ते आम्हाला अचानक सापडले आणि त्या दिवशी पिझ्झा खाल्ला तेव्हा अगदी समाधान झाले होते. हेंडरसनविल मध्ये अपार्टमेंट बघण्यासाठी आलो होतो आणि खूप त्रास झाला होता. दुपारची वेळ. प्रचंड भूक लागली होती. हायवे ला लागलो आणि पिझ्झाचे हे उपहारगृह दिसले. इथले सलाड तर खूपच छान होते ( grated carrot, baby tomato, shredded lettuce, bell pepper, corn, cucumber slices, shredded cheese, bread crumbs ) आणि त्यावर dressing ( ranch, honey mustard, thousand island) आणि भरपूर टॉपिंग असलेला व्हेजिटेरियन पिझ्झा ( bell pepper, spinach, black olive, onion, tomato, pineapple, broccoli, mushroom ) अगदी वेळेवर मिळाला होता. इथली काउंटर वर जी बाई होती तिला आमच्या आवडीची पिझ्झावरची टॉपिंग्ज माहीत झाली होती. एकदा आम्ही मेक्सिकन उपाहारगृहात गेलो असता तिथे ती बाई पण आली होती. तिने हाय ! केले. तीचे खाणे झाल्यावर ती बिल देऊन निघून गेली. आम्ही बिल द्यायला गेलो तर तिथला माणूस म्हणाला तुमच्या बिलाची रक्कम त्या बाईने दिली आहे. तसेच परत एकदा ती बाई दिसली त्याच उपाहारगृहात तर आम्ही तिच्या बिलाची रक्कम दिली होती. विल्मिंग्टन मधले Mellow Mashroom उपाहारगृहातले hoagie असेच लक्षात राहिलेले. soft french bread मध्येavacodo, sour cream, thin slice roma tomato, avocodo cheese, घालतात.


आधी आम्ही पिझ्झा हट चे फॅन होतो. तिथे आधी सुरवातीला मध्यम आकाराचा पिझ्झा घ्यायचो. नंतर personal pizza घ्यायला लागलो. हा पिझ्झा एका छोट्या डिश मध्ये येतो. एरवी ८ स्लाईस असतात. पण या छोट्या डिश मध्ये ४ slice येतात. तिथल्या बायकांना पण आम्ही काय टॉपिंग घेतो ते माहिती झाले होते. Thin crust pizza म्हणजे भाकरी, hand tossed pizza म्हणजे पोळी, pan pizza म्हणजे थालिपीठ. मेक्सिकन फूड आम्हाला खूपच आवडते. सुरवातीला Nacho chips आणि सालसा देतात ते तर खूपच आवडते. आमची सगळ्यात आवडती डिश म्हणजे sizzling Fajita ! यामध्ये (4 tortillas, mexican rice, guacamole salad, shredded lettuce, sour cream ) तव्यावर थोडे तेल घालून सर्व भाज्या ( onion, bell pepper, tomato, broccoli , mushroom )परततात. आणून देताना भाजीमधून वाफा येत असतात. चुर्र असा आवाजही येत असतो. त्यावर आम्ही भरपूर मिरपूड, red चिली फ्लेक्स, मीठ घालतो. ही डीश म्हणजे आपली पोळी भाजी, कोशिंबीर, मसाले भातासारखीच वाटते आम्हाला. जेवल्याचे समाधान होते. तसेच hard tacos, soft tacos, chimichanga, या डिशेश पण आवडीच्या आहेत. soft tacos म्हणजे आपल्याकडचा बटाट्याचा पराठा. chimichanga is deep fried burrito


एक मेक्सिकन जेवण लक्षात राहिलेलं म्हणजे आम्ही चायनिज टुर बरोबर फिरायला गेलो होतो. एके ठिकाणी रात्रीचे होटेल मध्ये पोहोचलो आणि जेवायला बाहेर पडायचे होते. टुर मधल्या माणसाने आम्हाला सांगितले होते की इथे एक उपाहारगृह आहे पण ते दिसता दिसेना. एक तर होटेल उंचावर होते. बसमधून जाताना आम्हाला waffle house दिसले आणि मेक्सिकन उपाहारगृहाची पाटी दिसत होती उंच एका खांबाला लावलेली. माझ्या मनात शंका. मेक्सिकन उपाहारगृह सापडले नाही तर आपण waffle house मध्ये काय खाणार आहोत? आम्ही या उपाहारगृहात कधीच गेलो नाही. जेवायला बाहेर पडलो. काळाकुट्ट अंधार. रस्त्यावर एखादाच मिणमिणता दिवा. चढावरून येता जाता कार जात होत्या. आम्ही उंचावर पाटी होती तिथपर्यंत पोहोचलो तर खाली अजून एक उतार होता. तो उतरून पुढे चालत गेलो तर समोरच उपाहारगृह होते. आत शिरलो आणि आम्हाला आवडणारे मेक्सिकन जेवण पोटभर जेवलो.


Singas famous pizza - NJ या उपाहारगृहात मिळणारा पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड असाच लक्षात राहील. इतका क्रिस्पी गार्लिक ब्रेड आम्ही प्रथमच खाल्ला. पिझ्झावर आपण सांगू ते टॉपिंग घालत नाही. ते ठरलेले आहे. (sweet onion, bell pepper, mushroom, spinach, broccoli) भरपूर घालतात. त्यामुळे हा पिझ्झा खूप आवडला.
सर्वात लक्षात राहिलेलं आवडतं खाणं म्हणजे शाळेत असताना आई बाबा, आम्ही दोघी बहिणी कमलानेहरू पार्क मध्ये जायचो. तिथे खूप खेळून झाले की आम्ही चौघे मस्त खादाडी करायचो. सर्वात आधी पाणीपुरी, नंतर शेव बटाटा पुरी, नंतर रगडा पॅटीस व सर्वात शेवटी मसाला पुरी !!! rohini gore - 8 April 2025

Wednesday, March 05, 2025

india trip 2024

यावर्षी आम्ही पहिल्यांदाच एअर इंडियाने प्रवास करणार होतो. ऑनलाईन कायक वेबसाईटवर तिकिटे शोधत होतो. त्या साईटने आम्हाला दुसऱ्या इंडियन इगल नावाच्या साईटवर नेले.  फ्लाईट बुक केली. या बुकींगचा पण खूप त्रास असतो ! शोधात कोणत्या विमानाने जायचे हे चाचपडावे लागते. जाताना येताना किती थांबे आहेत. थेट फ्लाईट असेल तर ती कोणती चांगली आहे हे सर्व पहावे लागते. अमेरिकेत आल्यापासून थेट फ्लाईट आमच्या नशिबी नव्हती. प्रवास खूपच कंटाळवाणा असायचा. इथल्या घरातून निघाल्यापासून ते भारतातल्या डोंबिवलीच्या घरात किंवा पुण्याच्या माहेरच्या/सासरच्या घरात पोहोचेपर्यंत  कमीतकमी २४ तास किंवा त्याहूनही अधिक तास लागतातच. २ थांबे असायचे ते म्हणजे अमेरिकेतला एक आणि युरोपमधला एक असे. न्युजर्सीमध्ये आलो तेव्हा २०२१ साली युनायटेड कंपनीची थेट फ्लाईट खूप सुखावून गेली होती. नेवार्क - मुंबई. अर्थात नंतर पुण्याला जाण्यासाठी ४ तास द्यावे लागले. ही फ्लाईट आता बंद केली आहे. १९२२ साली याच कंपनीची व्हाया झुरिच ते मुंबई अशी फ्लाईट होती आणि येताना व्हाया इंग्लड होती. यावर्षीच्या गुगल शोधात ही एक फ्लाईट होती पण येताना २ किंवा ३ थांबे दाखवत होते. एअर इंडियाची थेट फ्लाईट न्युयॉर्क वरून दाखवत होते पण तिथे उबरने पोहोचायला दीड तास लागत होता. नेवार्क वरून एक बघितली ती होती व्हाया दिल्ली - मुंब ई आणि नंतर केके ट्रॅव्हल टॅक्सीने ४ तासाचा पुण्याचा प्रवास. येताना मात्र मुंबई ते नेवार्क अशी थेट फ्लाईट होती. जाताना नेवार्क-दिल्ली (१३ तास)-दिल्ली ला २ तास थांबून दिल्ली मुंबई प्रवास २ तास आणि नंतर मुंबई पुणे टक्सीचा ४ तासांचा प्रवास होता. शिवाय दिल्लीला आम्हाला आमच्या चेक-इन बॅगा काढून परत सेक्युरिटीतून जावे लागणार होते. दिल्लीला ५२ अंश सेल्सिअस तापमान दाखवत होते. 


बुकींग करताना माझे नाव टंकीत करताना चूक झाली. मग परत इंडियन ईगल्स वेबसाईटवर चॅटिंग केले. तिथे २-३ वेगवेगळे सा ऊथ इंडियन बोलायला आले आणि त्यांनी सांगितले की नाव चुकले असेल तर ४०० डॉलर्स जास्तीचे भरावे लागतील. परत दुसऱ्या/तिसऱ्यांदा मी बोलले. त्यातला एक चांगला निघाला. त्याचे नाव सुहास. तो म्हणाला तुमच्या पासपोर्ट मधल्या तुमचे नाव लिहिलेल्या पानाचा फोटो काढून तो मला ईमेल करा. तसे मी केले. आणि त्याचा विनायकला फोन पण आला. या माणसाने आम्हाला खरोखरची मदत केली. चुकीच्या नाव बदलून त्याने काही डॉलर्स घेतले पण ते खरेखुरे होते. तो म्हणाला आम्हाला ही सर्व माहिती एअर इंडियाला कळवावी लागते. ते होइपर्यंत जीवात जीव नव्हता. गुगल शोधात तिकिटावर नाव चुकीचे असेल तर काय होउ शक्ते तेही वाचले. पण तरीही आयत्या वेळेला गोंधळ नको म्हणून आम्ही सुहासवर विश्वास ठेवला आणि आमचे काम थोडे उशिरा का होईना झाले. त्यात अजून एक छोटा गोंधळ आहे. तो म्हणजे माझे आधीचे तिकीट रद्द करून त्याच फ्लाईटचे परत बुकींग करायचे होते. तसे केले. आमची आता ईतिकिटे २ झाली होती. एक माझे नाव आणि दुसरे विनायकचे नाव. पण हरकत नाही. गोंधळ निकालात निघाला होता. आता एअर इंडियाची फ्लाईट कशी असते ते मी काही मैत्रिणींना विचारून घेतले. त्या म्हणाल्या जी स्क्रीन चालत नाही. सीटचे पट्टेही कधी लागत नाही तर कधी सीटचे हॅंडल तुटलेले असते. जेवण चांगले असते. गरम असते. इत्यादी इत्यादी. ही माहीती मिळून सुद्धा माझे मन शांत झाले नाही. मी युट्युबवर शोधले. तर तिथेही अजिबातच चांगला नाहीये एअर इंडियाचा प्रवास असे कळाले.

 

ठरल्यादिवशी प्रवास सुरू झाला. उबरचे बुकींग आधीच करून ठेवले होते. घरातली साफसफाई, पॅकींग, असे बरेच काही करून प्रवासाच्या आधीच दमलेले असताना प्रवासाला सुरवात होते. विमानात बसल्यावर हायसे वाटते. खुर्चीवर बसून सगळ्या अंगालाच रग लागते. अर्थात आम्ही अधुन मधून विमानात उभे रहातो. काहीजण असे करताना दिसतात. मात्र काही एकदा का खुर्चीत बसले की स्क्रीन चालू करून कानात बटणे अडकवून समोर जे दिसेल त्याचा आनंद घेतात किंवा खुर्ची थोडी मागे करून निवांत पहूडतात. आमच्या दोघांची ईतिकिटे वेगवेगळी असल्याने आमच्या सीटा पण एक मागे व एक पुढे होत्या. अर्थात सीटांचे बुकींग केले असते तर असे झाले नसते. आम्ही आमच्या सीटांवर बसलो. विनायकच्या शेजारी विनायक सारखाच एक उंच माणूस बसला होता. माझ्या शेजारी एक बाई बसली होती. आमच्या पुढच्या सीटांमधे एक रिकामी होती आणि उंच माणसाला पाय मोकळे करून बसायला ती छानच होती कारण की त्याही पुढे मोकळी जागा होती. तो माणूस म्हणाला काही हरकत नाही. मी बसेन पुढे. आमच्या शेजारच्या रांगेतल्या कडेच्या सीटवर एक बाई एका मुलीला घेऊन बसली होती. तिच्याकडे मूल असल्याने भरपूर सामान होते. त्या सामानातले काही ना काही सारखे पडत होते.  त्या बाईने आम्हाला विनंती केली की मी विनायकच्या सीटवर बसू का? म्हणजे मला मुलीला सांभाळायला बरे पडेल. आम्ही हो सांगितले. माझ्या शेजारची जी बाई होती ती त्या मुलीच्या आईच्या सीटवर बसली. विनायक माझ्या शेजारी बसला. विनायकची व त्या उंच माणसाची सीट जवळ जवळ रिकामी झाल्याने त्या बाईला एका सीटवर बसता आले व तिच्या शेजारी तिची मुलगी. सगळ्यांनीच समंजसपणा दाखवल्याने सर्वांनाच त्याचा फायदा झाला. सर्वांनी एकमेकांचे आभार मानले. ती छोटी मुलगी जी मागे बसली होती ती सीटवरून मला हात लावायची व मी मागे बघायचे. तिच्याशी खेळण्यात सर्वांचाच इतका छान वेळ गेला की दिल्लीपर्यंतचा १३ तासांचा प्रवास हा हा म्हणता सरला. आमच्या सीटच्या पुढ्यात असलेला स्क्रीन चालत नव्हता. सर्व विमानातच एखाद्याच्याच पुढ्यातले स्क्रीन चालत नव्हते. विमानातले जेवण आम्हाला दोघांना अजिबातच आवडले नाही. पनीरची भाजी होती. जेवण खूपच कमी होते. मी नेहमीच छोट्या अथवा लांबच्या प्रवासाला पोळी भाजी करून घेते त्यामुळे पोळी भाजीचा एक रोल मी विमानात बसण्या आधीच खाल्ला होता. विमान दुपारच्या १२ ला सुटणार होते. असा दुपारचा अति लांब पल्याचा प्रवास आम्ही पहिल्यांदाच करत होतो.

 

दिल्लीत उतरलो तेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअस होते. आम्हाला आमच्या बॅगा काढून परत त्या दुसऱ्या बेल्ट वर ठेवायच्या होत्या. तसे आम्हाला माहीती होतेच. मधला वेळ साधारण ३ तासांचा होता. या तीन तासात आमच्या बॅगा काढून सेक्युरिटी चेकींग मधल्या रांगेत उभे राहून परत बॅगा दुसरीकडे टाकायच्या होत्या. एकूणच सर्व प्रवासांचे सामान अति म्हणजे अतीच होते ! बेल्टच्या बाजूला विमानतळावरची माणसे मदतीकरता असतात. ते विचारत होते काही मदत पाहिजे का म्हणून. आम्ही नाही सांगितले. पूर्ण  बेल्टच्या सभोवताली आमची बॅग शोधण्यासाठी फिरत होतो. एकीकडे घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. तिथल्या एका माणसाला सांगितले की आमच्या २ बॅगा आहेत. एक बॅग आम्हाला मिळाली आहे. बॅगेवरच्या स्टीकर मधला नंबर त्याने बघितला आणि सांगितले की मॅडम तुम्ही इथेच उभे रहा. मी तुम्हाला बॅग शोधून देतो.

आमच्या दोन्ही बॅगा आम्हाला मिळाल्या आणि आम्ही त्या दिल्ली मुंब ई प्रवासासाठीच्या बेल्टवर ढकलल्या. तिथली बाई निवांत गप्पा मारत होती. रांग खूपच मोठी होती. तिथले मदतनीस छान काम करत होते. कुणाची फ़्लाईट आधी आहे का ? विचारत होते. आम्ही सेक्युरिटीतून बाहेर पडलो आणि गेटवर येऊन थांबलो. नंतरच्या विमानात जेवण चांगले होते. २ तासांच्या प्रवासानंतर आम्ही मुंब ई विमानतळावर पोहोचलो. दुपारचे ४ वाजले होते. काहीतरी चुकल्यासारखे वाटले. कारण की आम्ही नेहमी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या अंधारात पोहोचतो. विमानतळावर टळटळीत उन होते. केके ट्रॅव्हलची कार आली आहे का नाही ते बघण्यासाठी विनायक इकडे तिकडे पहात होता. त्याला केकेचा ड्राईव्हर दिसला आणि परत मी जिथे उभी होते तिथे आला. मी सामानापाशी उभी होते. डॉलर्सचे रूपये रूपांतरीत करून घेतले. प्रचंड गरम होत होते. अमेरिकेतली थंडी संपत आली होती. मला वाटले की गरम हवेत जरा बरे वाटेल. मला इथली प्रचंड थंडी अजिबात आवडत नाही. कडेकोट बंदोबस्तात घरीच रहावे लागते. डिप्रेशन येते. हवा जरा बरी वाटली तर बाहेर जाते फिरायला, पण इतके होत नाही. केके टॅक्सीत बसलो. टॅक्सी आमच्यापुरतीच बुक केली होती यावेळी. कारण शेअरिंग मध्ये दुसऱ्यांचे विमान वेळेत आले नाही तर वाट पहावी लागते. मुं ब ई पुणे मधल्या फूड मॉलवर थांबलो. विनायक म्हणाला तुला वडा पाव खायचा आहे का? हो चालेल. मग त्याने त्याच्याकरता इडली सांबार व माझ्याकरता वडा पाव ची ऑर्डर दिली. वडा पाव खाताना आत्मा तृप्त होत होता. त्यावर मसाला चहा प्यायलो. हा मसाला चहा जेमतेम ४ घोट असतो इतका तो कप छोटा असतो. चहा प्यायल्याने चांगलीच तरतरी आली. वडा पावची चव जिभेवर चांगलीच रेंगाळली.


 

आईकडे गेल्यावर रंजनाने आम्हा दोघांना चहा करून दिला व जेवणही तिने करून आणले होते ते जेवलो. मी आईला म्हणाले आता खरीखुरी आज्जी दिसायला लागली तर विनायक म्हणाला आज्जी काय ! पणजी. ते खरेच होते. आमची वये आज्जीची झाली आहेत ते मी पार विसरून गेले होते. आई खूपच थकलेली वाटत होती. रंजना ३ आठवड्यांच्या सहलीला जाणार होती. त्या आधी बारश्यालाही जाणार होती. कामवाल्या मावशींचे मोतिबिंदुचे ऑपरेशन होते त्यामुळे त्याही येणार नव्हत्या. हे सर्व मला आधीच माहीती असल्याने पूर्ण कल्पना होती.  जरूरीचे फोन नंबर्स रंजनाकडून घेऊन ठेवले होते. आम्ही आल्यानंतर मावशी २ दिवसांनी रजेवर गेल्या. बदली बाई का नाही आली ते समजले नाही. अर्थात मनाची पूर्णपणे तयारी करून ठेवली होती. मी, विनु व आई, आमच्या तिघांचे रहाटगाडगे सुरू झाले. आईने मला कणेरी कशी करायची ते सांगून ठेवले होते. मी आईला म्हणाले की कणेरी रोजच घेते. सकाळी मी पोहे उपमे असे करीन. आईला बरेच वाटले. मला सकाळी खायची सवय नाहीये. मी व विनु दुधातून प्रोटीन पावडर मिक्स करून घेतो. प्रोटीन पावडचा डबा आम्ही सोबत आणला होता. मला तिकडचे दूध चालत नाही. विनायक अल्मोंड दूध पितो. त्यामुळे विनायक गरम पाण्यातून प्रोटीन पावडर घेत होता. मी व आई पोहे उपमे सकाळच्या नाश्त्याला खात होतो. विनायक सकाळचा केर काढत होता. मी दोन्ही वेळचा स्वयंपाक करून रात्री एकदाच सर्व भांडी घासत होते.

 

दर २ दिवसांनी मी फरशी पुसून घेत होते. आईच्या कडचे वॉशिंग मशीन आहे त्याची नळी नळाला कशी लावायची ते मावशींकडून समजून घेतले होते. रंजनाने सर्वच्या सर्व सामान भरून ठेवले होते. कोणत्या डब्यात काय आहे ते आधी बघितले. थोड्याफार भाज्याही होत्या. दोन चार दिवसांनी भाज्या, फळे, लाल तिखट, गोडा मसाला, हळद, मोहरी, हिंग आणले.विनायकचे जेवण म्हणजे फक्त आमटी भात, भाजी, कोशिंबीर व सोबत दही ताक इतकेच आहे. नंतर एखादे फळ असते. आमच्या दोघींच्या पोळ्या करत होते. आईच्या इथली दुकाने माहीत झाल्याने संध्याकाळी मी काही ना काही तोंडात टाकायला आणायचे. आईला एक दोन वेळाच खालच्या बाकावर बसायला नेले होते. तिला आता खाली उतरून बाकावर बसण्याइतका उत्साह आणि उमेद राहिली नाहीये. एकटीने कुठेच जाता येत नाही.

आमच्या डोंबिवलीच्या घराच्या इमारतीची पुर्नबांधणी होत आहे म्हणून किती मजले झाले हे आम्हाला माहीत होते त्यामुळे धावती भेट झाली. अगदी भोज्याला शिवून येणे म्हणतात ना तसेच आम्ही केले कारण की आईची पूर्ण जबाबदारी आमच्या दोघांवर होती. आईच्या घराच्या जवळच रहाणाऱ्या जोशी बाईंकडे गेले. त्यांना २ दिवसाच्या एका वेळची डब्याची ऑर्डर दिली. दुपारच्या गाडीने आम्ही डोंबिवलीमध्ये रहाणाऱ्या अर्चानाकडे गेलो. तिने रात्रीचे जेवण छान केले होते. अप्पे, ३ प्रकारच्या चटण्या आणि नंतर दही भात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आमच्या घराचा तयार झालेला सांगाडा बघितला. अर्चनाने गेल्या गेल्या लिंबू सरबत प्यायला दिले. त्याने चांगलीच तरतरी आली. मे महिना असल्याने उकाडा होत होता आणि प्रवासाने दमणूक झाली होती म्हणून सरबत प्यायल्याने बरे वाटले. प्रवासात एके ठिकाणी गाडी थांबली होती चहा पाण्यासाठी. पाय पण मोकळे केले गेले. लिंबू सरबत प्यायला नंतर जेवणात तिने अप्पे आणि ३ प्रकारच्या चटण्या केल्या होत्या. नंतर दही भात होता. अर्चना नेहमीच असे छान छान पदार्थ करून मला आयते खायला देते. तिने मला ६० पूर्ण झाल्याबद्दल साडी घेतली. जांभळा रंग आणि त्याला नारिंगी रंगाचे काठ. शिवाय मला तिची एक साडी खूपच आवडली होती ती पण देवू केली. ती म्हणाली मी बरेच वेळा नेसली आहे. तुम्ही घेऊन जा. ही पोपटी रंगाची आणि त्याला गुलाबी काठ असलेली साडी मला प्रचंड आवडलेली आहे.

आम्ही दोघे व अर्चना असे तिघेही आमचे घर पहायला गेलो होतो. घरी आल्यावर जेवण व थोडी झोप काढली. दुपारचा चहा घेऊन जहागिरदार वहिनींकडे गेलो. तिथे वडे-सामोसे व चहा झाला. आयते बाहेरून आणलेले वडे सामोसे अमेरिकेत खूप मिस करते मी. त्यामुळे चविष्ट असे वडे-सामोसे खाल्ले. शिवाय जहागिरदार वहिनींनी मला आवडतात म्हणून पोहे केले होते. खूपच चविष्ट आणि आयते पोहे खाताना जीव सुखावून गेला.गप्पाही खूप झाल्या. अर्चनाकडे आलो आणि रात्री झोपून सकाळच्या ७ च्या गाडीने घरी १० पर्यंत हजर झालो. घरी आल्यावर ऑर्डर केलेला डबा होताच. शिवाय वरण भाताचा कूकरही लावला. एके दिवशी विनया ताईच्या घरी आईला घेऊन गेलो. पुण्यामध्ये तिने पूर्वीच घर घेतले होते. त्याची पुर्नबांधणी झाली होती. घर आवडले. आई-मी-विनया ताईच्या गप्पा झाल्या. तिने पोळी, सोलकढी, भरली तोंडली, ढोकळा आणि गोडाचा शिरा केला होता. दुपारी चहा घेऊन परत घरी आलो. एके दिवशी विनायक लिमये आईच्या घरी येणार होता व तिथून आम्ही होटेल मध्ये जाणार होतो पण भेट झाली नाही. दुपारीच पा ऊस पडायला सुरवात झाली व वीज गेली. आई रहाते तिथे वरच्या मजल्यावरून जिन्यातून खूप पाणी येत होते. कुठेतरी गळत होते. समोर रहाणाऱ्या बोधे बाईंचा नातू खाली आलेले पाणी खाली लोटत होता. त्याला मी मदत केली. आम्ही जरि बाहेर जाणार होतो तरी मी साबुदाणा भिजत घातला होता. कारण की पावसामुळे कुठे बाहेर जाता आले नाही तर घरीच साबुदाण्याची खिचडी करणार होते. लाईट येत-जात होते. लाईट नसल्याने नेटही नव्हते म्हणून मी आमच्या तात्पुरत्या घेतलेल्या फोन वरून विनायक लिमये ला फोन केला. तर तो म्हणाला आता भेटायला नको. नंतर भेटू परत कधीतरी. मग मी, विनु आणि आईसाठी खिचडी केली खायला रात्रीचे जेवण म्हणूनच. खूपच छान वाटले खिचडी खा ऊन. मेणबत्तीच्या प्रकाशात केलेली खिचडी, लाईट गेलेले, पा ऊस पडत राहिलेला असे वातावरणही छान होते.

 

अशीच एक पावसाळी भेट घडली. गोखले नगरला रहाणाऱ्या आईच्या मैत्रीणीकडे आईला मी व विनू घेऊन गेलो. आम्ही दोघी बहिणी व त्यांच्या तीन मुली व मुलगा आम्ही लहानपणी शाळेत असताना खूप एकत्र खेळलो. बाहेर जायचो. सिनेमा पहायचो. आम्ही निघणार आणी पावसाला सुरवात ! ओला बोलावली पण ती आली नाही म्हणून दुसरी बोलावली. ती पण येण्याची चिन्ह दिसेनात. मग त्या ओला टॅक्सी वाल्याचा फोन आला मी येत आहे म्हणून. खूप धो धो पा ऊस. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. लॉ कॉलेजच्या रस्त्यावर तर पूर आला होता. टॅक्सी वाल्याने आम्हाला सुखरूप पोहोचते केले. जोशी काकुंच्या अंगणात पण खूप पाणी साठले होते. त्यांचा मुलगा अमित, सुरेखा व उज्वला आईचा हात धरून तिला आत आणण्यासाठी लगेच आली. आम्ही आत गेलो तर त्यांच्याकडचेच लाईट फक्त होते. बाकी सर्व सोसायटीचे लाईट गेले होते. गोखले नगरच्या सर्व आठवणी निघाल्या आणि सगळ्यांनाच खूप ताजेतवाने वाटले. किती बोलू नि किती नाही असे सर्वांना झाले होते. त्यांना मी लिहिलेली २ पुस्तके दिली. अमितच्या बायकोने मुगाच्या डाळीची खिचडी केले होती. ती गरमागरम खात होतो. बीटाची कोशिंबीर, तळलेले पापड, व ताकही होते. नंतर त्यांच्या घरच्या बागेतले आंबे कापले. संध्याकाळी ६ ला पोहचलो ते गप्पांच्या नादात रात्रीचे ११ कधी वाजले ते कळालेच नाही ! लाईट होते पण नेट नव्हते त्यामुळे ओला टॅक्सी बोलावता आली नाही. अमित व उज्वला आमच्यासाठी रिक्शा पहायला बाहेर पडले व रिक्शेला घेऊनच आले. निघताना 

सर्व लहान मोट्यांच्या पाया पडले. मी अमितच्या बायकोला व त्यांच्या मुलीच्या हातात खा ऊसाठी पैसे ठेवले. रिक्श्यावाल्याने अगदी सावकाशीने आम्हाला सुरक्षित घरी आणले. आईला रिक्शात बसवायला सर्व बाहेर आली होती. अमितने व मी आईचा हात धरून तिला रिक्शापर्यंत आणले. घराच्या समोरच रिक्शा उभी होती. स्वाती व तिचे यजमानही आले होते. सर्वांनीच खूप गप्पा मारल्या. सर्वांनी आम्हाला टाटा बाय बाय निघताना केले. घरी आल्यावर पाऊस थांबला होता. गोखले नगरच्या आठवणीने मन प्रसन्न झाले होते. विनूने सुरेखाला आधी पाहिले होते कारण आमच्या साखरपुड्याला सुरेखाच फक्त आली होती. गप्पा मारता मारता उज्वल व विनुच्या गप्पाही रंगल्या कारण की त्या दोघांचे कॉलेज एकच होते ते म्हणजे फर्गुसन कॉलेज. उज्वला म्हणाली की त्यांच्यामुळे माझ्याही कॉलेजच्या आठवणींना उजाळा मिळाला. एकंदरीत आईची मैत्रिणी व आम्ही  लहानपणाच्या मैत्रिणी भेटून सर्व खूश झालो होतो. घरी आल्यावर आई कॉटवर आडवी झाली पण एका जागी पाय सोडून बसल्याने तिचे पाय व पोटऱ्या खूप दुखत होत्या. मला आईच्या पायांच्या व डोक्याच्या शिरा माहीत आहेत. त्यामुळे मी आईचे पाय तेल लावून चेपले तशी आईला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो तरी आम्ही दोघी गोखले नगरच मध्येच होतो.


मी दर भारतभेटीत गणपती किंवा देवीचे दर्शन घेते. यावर्षी मोदी गणपतीचे दर्शन घेतले. संध्या वहिनीला फोन केला आणि तिला सांगितले की मी मोदी गणपतीजवळ उभी आहे तू ये. तशी ती आली. ती मोदी गणपतीच्या समोरच्या सोसायटीमध्ये रहाते. ती आल्यावर आम्ही शॉर्टकटने लक्ष्मी रोडला आलो. मला गा ऊन घ्यायचे होते ते घेतले. मुख्य म्हणजे मला पुष्करिणी भेळेच्या दुकानात बसून भेळ खायची होती. ती खाल्ली आणि रिक्षाने आईच्या घरी मी व वहिनी आलो. ती म्हणाली मी तुझ्या सोबतीने आत्यांकडे येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या घरी आली. तिने मला तिच्या घरी बोलावले होते पण तिचे घर चवथ्या मजल्यावर आहे.  लिफ्ट नाही. मी म्हणले की अग मला नक्की आवडले असते तुझ्या घरी यायला पण इतके जिने चढून मला खूपच दम लागेल. तसाही मला भरभर चालले की दम लागतो. त्यामुळे येत नाही. आईकडे रहात असताना कोपऱ्यावरून भाजी आणायचे तेव्हा मी हळूहळू चालून सुद्धा मला दम लागायचा. आता भारतात असतानाच्या सर्व सवयी पार मोडून गेल्या आहेत. सुहास दादा त्याच्या घरी ये म्हणत होता. मेसेज करत होता. मी म्हणले तू ये. गोखले नगरला आम्ही गेलो होतो तेव्हा कदाचित येऊन गेला असेल. मग मीच म्हणले की तुम्हीच आईकडे जेवायला या. नेहमीचे अगदी साधेच जेवण केले होते मी. वरण भात, मटकीची उसळ, कोशिंबीर, आणि बटाटा भजी केली. गोड म्हणून श्रीखंडाचा पॅक घरी होताच. नयना वहिनी म्हणाली की तू पोळ्या करू नकोस. मी आणीन पोळ्या करून. एकत्र जेवलो आणि जेवता जेवताच जितक्या गप्पा मारल्या तितक्याच झाल्या. लगेचच नयना, सुहास दादा व अवधूत त्यांच्या घरी गेले. सर्वांना मी केलेले जेवण आवडले. नयनाने मला जेवण झाल्यावर आवरा आवरीत मदत केली. अशी त्यांची पण धावती भेट झाली.

विनयकडे गेलो होतो आईला घेऊन. भारतभेटीत एक दोन वेळा विनय आईकडे आला होता तेव्हा योगायोगाने विनय - विदुलाची भेट झाली होती. विनय पुण्यात रहायला आल्याने मी ठरवले होते की त्याच्याकडे जायचे म्हणून गेलो होतो. त्याने दुपारच्या जेवणाला दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस केले होते. नंतर थोडा वरण भात आणि छोट्या कपात आईस्क्रीम असा बेत होता. गाडगीळांनी त्यांच्या घरी बोलावले म्हणून गेलो. वृंदाने छान बेत केला होता जेवायचा. पुलाव, टोमॅटो सार, मेथीचे पराठे, मटकीची उसळ. नंतर गोड  म्हणून दुधी हलवा होता. मी, आई व विनु रात्रीच्या मराठी मालिका बघायचो. दुपारी मराठी सिनेमे पाहिले की जे आधी पाहिले नव्हते. आमच्या तिघांचे रूटीन छान बसले होते. आंबे खाल्ले. मी एक पेटी घेतली व आईनेही घेतली. त्यामुळे आंब्याच्या फोडी व एक दोन वेळा रस झाला. २०१२ च्या भारतभेटीत आंबे खाल्ले त्यानंतर २०२४ ला. १२ वर्षाने दोन वेळा हापुस आंबे खाणे झाले.

आईच्या समोर रहाणाऱ्या बोधे काकुंनी साडीवाल्याला बोलावले होते. आम्ही सगळे घरातच होतो. नंतर तो साडीवाला आमच्याकडे आला आणि मी दार उघडताच कश्या आहात रोहिणी ताई ? असे विचारले. मी म्हणले याला माझे नाव कसे माहीत? तर नंतर उलगडा झाला. हा साडीवाला दारोदारी जा ऊन साड्या विकतो. तो आमच्या डोंबिवली व अंधेरीच्या घरातही आला होता. मी एक साडी घेतली होती. आईने तर त्याच्याकडून बऱ्याच साड्या घेतल्या होत्या. आईने मला व रंजनला एकाच प्रकारच्या व रंग वेगवेगळे असलेल्या साड्या घेतल्या होत्या. ते आणि त्यांचा पार्टनर फक्टरीतून थेट साड्या विकतात. रेशम असलेल्या साड्या आणि त्यावर वेगवेगळे डिझाईन असतात. मला ६० पूर्ण झाली म्हणून आईने मला एक साडी घेतली. मी मलाच एक साडी घेतली. आई आता साडी नेसत नाही त्यामुळे मला आईला घेतली नाही. एक साडी तर मला इतकी आवडली होती की त्याचा रंग अजूनही माझ्या मनात रेंगाळत आहे. मी एक पिस्ता कलरची साडी मला आणि आईने अष्टगंध रंग असलेली मला अश्या दोन साड्यांची अचानकपणे खरेदी झाली ध्यानीमनी नसताना.



Thursday, February 13, 2025

१३ फेब्रुवारी २०२५

 

१३ फेब्रुवारी २०२५
या वर्षी दर आठवड्यात २ ते ३ इंच स्नो पडत आहे. कधी भुसभुशीत तर कधी खरखरीत. काही वेळा तापमान खूप कमी गेले की स्नो दगडाचा सारखा घट्ट होउन बसत आहे. तापमान बघून जर बोचरे वारे नसेल आणि चालणे झेपेल असे वाटले तर मी १ मैल चालून येते. थंडीत गोठायला झाले तरी मूड बदलून जातो. आजचा दिवस वेगळा होता म्हणून रोजनिशीत लिहावासा वाटत आहे. सकाळी उठले तर स्नो वितळत होता. काही ठिकाणी स्नो होता तर काही ठिकाणी त्याचे पाणी झाले होते. आज बरेच पक्षी होते मैदानावर. सर्व द्रुश्य स्वयंपाकघराला लागून असलेल्या खिडकीतूनच दिसत होते म्हणून आज मी थोड्या विडिओ क्लिप्स घेतल्या. इथे सीगल्स जास्त दिसत नाही पण आज थोडे दिसले. बदके, सीगल्स, चिमणा-चिमणी, कबुतरे, कावळे, खूप छोटे पक्षी दिसत होते आज. बाल्कनीतल्या कठड्यावर बसून खारू ताई बर्फ खात होती. कालचा उरलेला भात पक्षांना खायला घातला. पक्षी बर्फाचे गार पाणी पीत होते. बर्फातूनच काही मिळेल ते खात होते.
संध्याकाळी आकाशात सीगल्स पक्षांचे थवे दिसले. आज असे वाटत होते की वसंत ऋतूचे आगमन यावर्षी लवकर होईल. आज बरेच वर्षानंतर संध्याकाळी खायला कोरडी भेळ केली आणि रात्रिच्या जेवणाला मुग-तांदुळ खिचडी, भोपळ्याचे भरीत आणि पालकाची पीठ पेरून भाजी केली. आजचा दिवस जसा खास होता तसाच मागच्या वर्षीचा पण आजचा म्हणजे १३ फेब्रुवारीचा 2024 दिवस असाच स्नो डे होता. आज दुपारी रेडिओ वर किशोर कुमारची गाणी लागली होती. rohinigore