Sunday, January 03, 2021

गाता रहे मेरा दिल !!

गाणं आवडत नाही, गायला किंवा ऐकायला आवडत नाही, असा विरळाच ! मला मात्र गाणं ऐकायला खूप आवडतं, नुस्त आवडत नाही तर गायला देखील आवडतं. माझ्या जोडीदारालाही आवडते गाणे आणि मुख्य म्हणजे आमच्या जोडीची एकत्रित आवड म्हणजे सिनेसंगीत. आता फरक इतकाच आहे की त्याला जुनी आणि संथ गतीची गाणी आवडतात आणि मला धडाकेबाज गाणी, म्हणजे असे की गाणं ऐकताना माझ्यात उत्साहाचा झरा वाहायला लागतो. गाणं धडकत फडकत कोणतेही असो, मला ते आवडतं. गाण्याच्या ओळीत किती सुंदर अर्थ दडलेले आहेत याच्याकडे माझे लक्ष जात नाही. याच्या उलट वि चे लक्ष गाण्याच्या बोलांमध्ये जास्त असते. आणि याचा परिणाम असा झाला की सुंदर सुंदर अर्थपूर्ण बोल असलेली गाणीच आता मला पटकन आठवतात. आठवणारच ना ! तीच तीच गाणीवि ने लावली की कान जातातच गाण्याकडे. पण तरीही मला माझी गाणी अत्यंत प्रिय आहेत. काही वेळा तर माझी गाणी मी एकटी असतानालावली तर मला त्यावर गिरक्या घेऊन घेऊन नाचावेसेही वाटते. तर अशी ही गाणी बजावणी प्रत्येकाच्या आयुष्यात थोडीफार का होईना डोकावतातच!
 
 
फ्लॅश बॅक मध्ये जाते आता. जावेच लागेल. दारावरची बेल वाजली आणि हा पहिला प्रश्न विचारला गेला विनायक गोरे आहेत का? . दारात २ मुले होती.हो आहेत ना ! मी म्हणाले. आम्ही जेवायला बसलो होतो दुपारचे. जेवण झाल्यावर लगेच या, अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला यावे लागेल असे त्या मुलांनी सांगितले. ईमर्जन्सी आली होती. आयाटीमध्ये अंताक्षरी चालू होती आणि त्यांना गाणी माहित असलेला चांगला जेयुडीजीई हवा होता. विनायकला पकडूनच नेले त्यांनी. विनायक घरी आल्यावर त्याला विचारले कशी झाली अंताक्षरी ! तो म्हणाला एवढी खास नव्हती, म्हणजे आमच्या वेळेला जी मजा आली होती, तो जो काही अटीतटीचा सामना झाला होता त्याची मजा औरच होती. विनायकने गाजलेली आठवण मला सांगितली. रेगे आणि गोरे विरूद्ध दोन मुली अंताक्षरी मध्ये गात होत्या. रेगे आणि गोरे खूप जुनी म्हणजे १९४०-१९५० सालातली फेमस गाणी न गाता वेगळीच गाणी गात होते. तिथे जमलेले सर्व "हे गाणे कोणते बुवा? " अशा आश्चर्यचकित मुद्रेने एकमेकांकडे पाहत होते. काही जण म्हणाले तुम्ही खोटी गाणी गात आहात. रेगे म्हणाला माझ्याकडे कॅसेटच्या थप्प्या आहेत. चला रूमवरऐकवतो गाणी ! प्रेक्षकातून आवाज आला. नको रे ! इथे ऐकतो तीच पुरे आहेत. " एक करेला तो दूसरा नीम" असेही अभिप्राय येत होते. वि च्या मित्राने त्याला नंतर सांगितले. म्हणजे असे की या दोघांना आवाज नाहीत ! गाणी मात्र शेकड्याने माहीती. आणि यांच्या विरूद्ध ज्या मुली होत्या त्या १९७०-८० सालातली फेमस गाणी गात होत्या. पुराने आणि नये नगमे असा अटीतटीचा सामना झाला होता. रेगे आणि गोरे यांनी नेमकेएक गाणे नवीन गायले आणि तिथेच एका मार्कासाठी त्यांचा पहिला नंबर चुकला.
 
 
फेमस गाणी न गायल्याने हे दोघे मित्र गाणं मध्येच सोडून द्यायचे आणि वेगळे अक्षर येईल असे बघायचे. म्हणजे विरूद्ध पार्टीची दिशाभूल करायचे म्हणजे असे की गाणं कोणत्या अक्षराने संपणार हे साधारण कळते ना, आणि त्या अक्षराचे गाणे आठवून ठेवतो गाणारा. मग त्याही मुली असेच मध्येच गाणे सोडून विरूद्ध पार्टीअवर जरा अवघड अक्षर येईल असे पाहायच्या. प्रत्येकाचीच गाण्याच्या आवडीची सुरवात होते ती रेडिओवरून ऐकलेल्या गाण्यांमधूनच. नंतर ती आवड वाढते ती दूरदर्शन मधल्या चित्रहार, रंगोली या कार्यक्रमातून, आणि गाण्यांच्या अनेकानेक स्पर्धेमधून, मग ती स्पर्धा मराठीतून असो अथवा हिंदीमधून. गाण्यांच्या आवडीच्या
कॅसेट ऐकणे किंवा सीड्या ऐकणे यापेक्षाही युट्युबवर हवी ती आणि हवी तितकी गाणी ऐकली, पाहिली. गाणी ऐकता ऐकता आणि पाहता पाहता आम्ही दोघं गाण्यांच्या महासागरात डुंबून गेलो. फेसबुकावर दोन गाण्यांचे ग्रूप्स आहेत त्यामध्ये आम्ही रोजच्या रोज युट्युबाच्या लिंका त्या ग्रुप्सच्या थीमनुसार टाकू लागलो. हा सिलसिला जवळजवळ ७ ते ८ वर्षे चालू होता. 
 
गीतसंगीत या ग्रूपवर तर आम्ही काही ठराविक लोकं थीमआली रे आली की पटापट त्यानुसार गाणी टाकायला लागलो. अर्थात आपण टाकलेले गाणे हे थीमनुसार अगदी चपखल बसले पाहिले आणि इतरांपेक्षा खूप वेगळेही झाले पाहिजे हा अट्टाहास सुरू झाला.रोजच्या रोज थीमा असायच्या या दोन ग्रुप्सवर ! एक ग्रुप आहे "संगीत के सितारे" आणि दुसरा "गीतसंगीत" काही वेळा थीम टाकल्या टाकल्याडोळ्यासमोर लगेचच गाणे तरळून जायचे आणि लिंक पोस्ट केली की नेमके आपण निवडलेले गाणे कुणी दुसरेच टाकून गेलेले असायचे म्हणजे परत दुसरे गाणे शोधणे आलेच. काही वेळेलानिवडलेल्या गाण्यापेक्षाही खूप चांगले गाणे निवडण्याची खटपट चालू व्हायची. काही वेळेला थीम मध्ये बसणारी ३ ते ४ गाणी डोक्यात असायची आणि कोणते टाकावे बरे? असे म्हणून उगाचच वेळ वाया जायचा आणि ती ठरवलेली गाणी पण काही वेळा इतरांनी टाकलेली असायची. नंतर ठरवले की चांगले गाणे सुचले की लगेच टाकून मोकळे व्हायचे. पण जेव्हा आपण ठरवलेल्या इतर गाण्यांपैकी एखादे गाणे कोणी टाकले तर खूपच हिट ! होऊन जायचे, म्हणजे बरेच लाईक मिळायचे.
 
 
किती विविध प्रकारच्या थीमा ! कधी गाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचे शब्द हवेत, तर कधी गाण्यात हिरो- हिरोईनचे प्रतिबिंब पाण्यात किंवा आरश्यात दिसले पाहिजे, तरकधी कृष्ण धवल तर कधी गाण्यात नाच पाहिजेत. एक थीम लक्षात राहिलेली ती म्हणजे एका गाण्यात हिरोईनने कमीतकमी ३ ते ४ वेळेला तरी साडी किंवा ड्रेस बदललेले पाहिजेत. मी आधी संगीत के सितारे या ग्रुपमध्ये नव्हते. मला आठवतयं मी केव्हा जॉईन झाले ते ! एक थीम
होती चोरी चोरी चुपके चुपके आणि अजून एक शब्द होता जोडीचा यापैकी २ तरी शब्द आले पाहिजेत. मी गाणे टाकले होते चोरी चोरी चुपके चुपके पलकोंके पीछेसे चुपके कह कयी सारी बतियाँ, अखियाँ हो अखियाँ....हे आपकी कसम मधले गाणे. गीताकार, संगीतकार, गायक, गायिका, द्वंद्व गीते, विरहगीते, लोरीगीते, बिदाई गीते, एक ना अनेक थीमा. आणि म्हणूनच सतत युट्युबवर गाणी बघितली जायची. जशी गाणी बघितली तशी मी गायली देखील अनेक गाणी. गुगल वर गाण्याचे बोल शोधायचे आणि गाणी म्हणायचीती रेकॉर्ड करायची असा उद्योग सूरू केला होता मी. ऑर्कुटच्या जमान्यात याहूवरची अंताक्षरी लक्षात राहिलेली. अर्थात त्यात थीमा नव्हत्या.
एका ग्रूपवर एकीने याहू मेसेंजरवर अमेरिकेतल्या प्रत्येकाच्या झोननुसार एक वेळ ठरवली होती आणि वारही ठरवला होता. त्यात गाणी गायली गेली. आणि आता मोहिनी अंताक्षरीवर गात आहे. गात आहे म्हणण्यापेक्षा गुणगुणणे हे म्हणणे जास्त योग्य होईल. मी गाणे अजिबात शिकलेली नाहीये पण पूर्वी बरीच गाणी पाठ होती. चालीतही म्हणता यायची. अजूनही चालीत गाणी म्हणता येतात पण गाणी पाठ नाहीत.
 
 
बरेच वेळा असे ठरवते की गाणी पाठ करून ती वरचेवर घरात गात राहायची. ओरिजिनल गाणे ऐकून तसेच्या तसे होत आहे का तेही बघायचे पण असे नुसते ठरवलेच जाते. २ कडव्यांची गाणी पाठ व्हायला हारकत नाही. मनावर घेतले पाहिजे. मी माझ्या आनंदाकरता गाते आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते गाता रहे मेरा दिल !!!
बरेच दिवसात गाण्यावर अजून एखादा लेख लिहावा असे मनात होते पण ते एका गोष्टीमुळे शक्य झाले. व्हॉटस ऍप ग्रुपवर मी एक स्पर्धा दुसऱ्या क्रमांकावर जिंकलेआणि या छोट्या आनंदात मला हा लेख लिहावासा वाटला. मोहिनी अंताक्षरी हा एक ग्रुप आहे. तिथे मोहिनी रोजच्या रोज वेगळ्या थिम्स देते,, मी पण काही थीमा तिला सुचवते. आपल्या वेळेनुसार आठवड्यातून किमान २ दिवस काही मिनिटे द्यावीत अशी तिच्य इच्छा आहे.आणि ती मला वाटते रास्त आहे. मोहिनी भारतीय वेळेनुसार सकाळी थीमजाहीर करते आणि भारतीय वेळेनुसार रात्री ११ ला अंताक्षरी बंद होते. जो तो आपापल्या वेळेनुसार या मोहिनी अंताक्षरीच्या कट्यावर येतो
थोडे विसावतो आणि गातो.
 
मी दुसऱ्या क्रमांकावर जिंकलेली थीम अशी होती की त्यात लाजणं मुरडणं सौंदर्याचे वर्णन, ज्या गाण्यात येईल ती गाणी किंवा नटी पडद्यावर साजश्रुंगार करताना दिसते अशी गाणी, अथवा गाण्यात एखाद्या अलंकाराचे नाव येईल अशी गाणी गायची होती.गाण्याचा २/४ ओळीचा मुखडाच गायचा होता. १ मिनिटापेक्षा कमी वेळात होणारा. भारतीय वेळेनुसार मोहिनीने सकाळी ७ ते १२ अशी स्पर्धेची वेळ ठेवली होती आणि ही स्पर्धा सरप्राईज होती. तशी तिने थोडी कल्पना दिली होती ३१ डिसेंअरला की उद्या मी एक सरप्राईज घेऊन येणार आहे आणि त्याकरता आम्ही सर्व उत्कुक होतो. जेव्हा स्पर्धा घोषित केली तेव्हा अमेरिकेत ९.३० वाजले होते. मला स्पर्धेची थीम खूपच आवडली
आणि मी एकेक करत ऑडिओ टाकत राहिले. १२ वाजता झोपून गेले. मला अजून स्पर्धेच्या वेळेनुसार अडीच तास शिल्लक होता पणझोपेच खोबरे होईल म्हणून झोपले आणि १ जानेवारी २०२१ ला सकाळी मला एक सुखद धक्का बसला.
 

 

4 comments:

Mohinee said...

मस्त...
धन्यवाद आपल्या ग्रुपचा इतका सुंदर संस्मरणीय उल्लेख केल्याबद्दल 😊☺️☺️

rohinivinayak said...

अनेक धन्यवाद मोहिनी ! तू चालू केलेल्या ग्रूप मध्ये तू छान छान थिमा देतेस त्यामुळे गाणी म्हणायला खूप उत्साह येतो. :)

SAVITA said...

छान लिहिलं आहेस नेहमीप्रमाणे

rohinivinayak said...

Thank you Savita !! :)