Friday, July 26, 2019

आम्ही दोघी मैत्रीणी

रोहिणीशुभदा
माझी आणि शुभदाची ४० वर्षानंतर भेट झाली !!! विश्वासच बसत नाही अजून. फेबुवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि शिवाय निरोपही लिहिला की मी रोहिणी घाटे-गोरे. आपण एकाच शाळेत होतो. आठवी नववी दहावी. अमेरिकेच्या दुपारी म्हणजे भारतातल्या मध्यरात्री मी तिला मैत्रिण विनंती पाठवली. विचार करत होते की ही फेबुवर अक्टिव्ह आहे की नाही?


आमच्या रात्री १० ला पाहिले तर शुभदा दिसली, निरोपही वाचला आणि दोन्ही कडून एकच प्रश्न फोन नं दे. मी म्हणाले तुझा फोन नं दे मी तुला फोन करते. हर्षवायू झाल्यावर आपण कसे मोठमोठ्यांने बोलतो ना तशी मी बोलत होते फोनवर. तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती. ती म्हणाली तुझा फोन झाल्यावर मी पहिला माझ्या आईला फोन करून सांगणार की रोहिणी सापडली. तिला काही आठवत होते मला काही आठवत होते. तासभर बोललो. नंतर झोप लागता लागेना. डोळ्यासमोर सगळे काही येत होते. परत परत येत होते. शाळा स्पष्ट दिसत होती. प्रत्येक वर्षीचे वेगवेगळे वर्ग दिसत होते. आम्ही दोघी पहिल्या बाकावर शेजारीशेजारी बसायचो.
मधल्या सुट्टीतले डबे आठवत होते. तिच्या डब्यातली कांद्याची चटणी आणि माझ्या डब्यातले बटाटेवडे आठवले. शाळेच फाटक आठवले.

फाटकातून घेतलेल्या चिंचा आठवल्या. काय काय मजा करायचो आम्ही. अमिताभ जयाला अमिया जमिया म्हणायचो. शुभदाचे अक्षर मला खूप आवडायचे. सुवाच्य अक्षर फाउंटन पेनने काढलेले. वह्या पुस्तके, दप्तर.
ती म्हणाली की मी दप्तर म्हणून हिंडालियमची पेटी आणायचे. मला आठवले आणि इतके काही छान वाटले. तिचे फेमस गाणे मेघा छाए आधी रात आणि माझे फेमस गाणे पिया बिना बासिया. दोघीही गायचो.काही वेळेला मधल्या सुट्टीत शिपायाला आम्ही काहीतरी कारणे सांगून मैदानावर जायचो आणि मग तिथून घरी जायचो. ती म्हणाली आपण दोघी ४० पैशात रस प्यायचो. शाळेत एकदा कँप होता तिथे शाळेत राहिलो होतो. सगळे वर्गशिक्षक आठवले. त्यातल्या एका जोडीला आम्ही राजकपूर नर्गिस म्हणायचो. दोघे शिक्षक नवरा बायको होते. बायको जीवशास्त्र आणि तिचा नवरा रसायनशास्त्र शिकवायचे.आम्ही दोघी आणि आमच्या मैत्रिणीही डेक्कन जिमखान्याला बसला बसायला यायच्या. खूप धावत धावत यायचो.बसला खूप मोठी रांग असायची. माझी बहिणही असायची. शुभदाचे युनिव्हरसिटीमधले घर अजूनही मला आठवते. तिथला निसर्गरम्य परिसर खूप छान होता. मी व माझी बहीण युनिव्हरसिटीमध्ये जायचो. मी शुभदाकडे आणि रंजना तिच्या मैत्रिणीकडे जायची. रंजना, तिची मैत्रिण ऋचा आणि त्यांचा एक मित्र हे योगायोगाने भेटले. गप्पांमध्ये मित्रमैत्रीणींचा विषय निघाला आणि यातूनच माझी आणि शुभदाची फेबुवर भेट झाली. या योगायोगाला काय म्हणाव?


शुभदाशी बोलणे झाल्यावर २ दिवस माझी अवस्था खूप वाईट होती. अर्थात चांगल्या अर्थाने. मी आणि शुभदा यांच्या जबरदस्त इच्छाशक्तिमुळेच ही भेट परमेश्वराने मैत्रिणींच्या मार्फत घडवून आणली. पूर्वीचे आठवत होते. डोळ्यासमोर दिसत होते पण त्या दिवसांमध्ये मागे कसे जाता येईल? डोक्याला खूप मोठा झटका बसल्यासारखे झाले आहे. आज मी पूर्ववत झाले. २ दिवस आठवणी डोक्यामध्ये नुसत्या पिंगा घालत होत्या. शुभदाचेही असेच झाले आहे. ती मला म्हणाली. मी संगळ्यांना वेड्यासारखी सांगत सुटली आहे रोहिणी मिळाली म्हणून ! ३ वर्ष (आठवी, नववी दहावी ) तर आम्ही दोघी पहिल्या बाकावर बसायचो. बहुतेक आम्ही ५ वी पासूनच होतो एकत्र. डोक्याला किती ताण द्यायचा ना? किती आठवायचं ना? ते सुद्धा ४० वर्षापूर्वीचे ! Rohini Gore
 शुभदाने मी पाठवलेली पत्रे अजुनही जपून ठेवली आहेत. किती छान ना !! 


2 comments:

आंबट-गोड said...

तुम्हा दोघींचीही फेमस गाणी माझी अतिशय आवडती आहेत!
छान वाटलं वाचून.
शाळेतल्या सारखी मैत्री पुन्हा होऊ शकत नाही!

rohinivinayak said...

अगदी खरे आहे तुझे म्हणणे. ही गाणी तुझीही आवडती आहेत हे वाचून खूप आनंद झाला !