जेव्हा आमच्या अपार्टमेंट मध्ये आम्ही रहायला आलो तेव्हा मुख्य प्रश्न होता तो फोडणीचा. फोडणीला लागणारे साहित्य मोहरी, हिंग, हळद आमच्याकडे नव्हते ते मी प्रविणाकडून उसने आणले. ती म्हणाली आम्ही जेव्हा भारतीय दुकानात जाऊ तेव्हा तू मला तुला हव्या असणाऱ्या सामानाची यादी दे. तेव्हा मी अगदी मोजकीच यादी दिली होती. ती म्हणजे पोहे,
रवा, मोहरी, हिंग हळद. बाकीचे सर्व सामान सॅक अँड सेव्ह मधून आणले होते.
दूध, दही, साखर, भाज्या, टुथपेस्ट, ब्रश, कपडे धुण्याची पावडर, टी-बॅग्ज
वगैरे अनेक गोष्टी. सुरवातीचे काही दिवस संध्याकाळच्या खाण्याला काय करायचे
हा एक प्रश्नच होता. कारण की पोहे उपमे मी संध्याकाळच्या खाण्याला भारतात
असताना करायचे. सकाळच्या न्याहरीचा प्रश्न कधी आला नाही कारण की सकाळी
आम्हाला दूध पिण्याची सवय होती ती तशीच अजूनही कायम आहे. दूधामध्ये
कॉर्नफ्लेक्स किंवा बोर्नव्हिटा घालून दूध किंवा ड्राय फ्रुटसची पावडर
घालून दूध घेण्याची सवय असल्याने सकाळी न्याहरीचा प्रश्न सुटला होता.
दुपारी मी मैद्याच्या पोळ्या लाटत होते आणि लाँग ग्रेन राईसचा भात आणि
फ्रोजन बीनची भाजी करायचे.
सॅक अँड सेव्ह मधून संध्याकाळच्या
खाण्याला मल्टीग्रेन ब्रेड खायचो.सोबत कॉफी. तिथे आम्हाला साधे कप केक
दिसले. शिवाय बटाटा चिप्सच्या अनेक व्हराईटी दिसल्या. भाज्यांपैकी कोबी,
फ्लॉवर, वांगी, श्रावणघेवडा, सिमला मिरची अश्या भाज्या होत्या. पण त्या सतत
उपलब्ध नसायच्या. मग व्हरायटी म्हणून फ्रोजन बीन्स आणायला सुरवात केली.
ब्रेड बटरने जरी संध्याकाळच्या खाण्याचा प्रश्न सुटला असला तरी पोहे
उपम्यांची इतकी काही आठवण यायची की त्याने जास्तच भूक लागायची. ब्रेड,
अंडी, चीझ, आम्हाला दोघांनाही आवडत नाही आणि पचतही नाही.वडा
पाव, भेळ,, पाणीपुरी, इडली, डोसे, उतप्पा असे भारतात मिळणारे पदार्थ इथे
मिळत नसल्याने त्याचीही तीव्रतेने जाणीव व्हायची. आपली खूप उपासमार होत आहे
हे जाणवायचे. तसे तर भारतात असताना हे पदार्थ आपण काही रोजच्या रोज खात
नाही पण अजिबात दिसतही नाहीत आणि त्यामुळे मनात आणले तरी खायला मिळत
नाही हे इथे अमेरिकेत आल्यावर प्रकर्षाने जाणवले. डेंटन पासून डॅलसला
जाण्याकरता कारने तास लागायचा. एके दिवशी प्रविणा आणि नागा यांनी आम्हाला
त्यांच्याबरोबर भारतीय दुकानात नेले आणि आम्ही भली मोठी खरेदी केली. आमची
कार्ट पूर्ण भरून वाहत होती. ते पाहून ते दोघे हासायला लागले होते. आम्ही
सर्व काही घेतले. कणीक, तांदुळाचे पीठ, हरबरा डाळीचे पीठ, पोहे, रवा,
साबुदाणा, डाळीमध्ये तुरीची आणि मुगाची डाळ घेतली. लाल तिखट, हळद, मोहरी,
हिंग, धनेजिरे पूड हेही सर्व घेतले. त्यानंतर आमचे संध्याकाळचे खाणे सुरू
झाले. कणीक इतकी काही चांगली नव्हती. पण कणकेच्या पोळ्या इतकेच समाधान
होते. भारतीय भाज्याही घेतल्या होत्या. गवार, तोंडली, कारली, भेंडी, इ. इ.
सॅक अँड सेव्हला ५० सेंटला बटाट्याचे खूप तिखट चिप्स मिळायचे. ते
खाल्ल्याने समाधान व्हायचे. आयस्क्रीमच्या बादल्या मिळायच्या. आयस्क्रीमचे
सर्व प्रकारचे फ्लेवर्स मिळायचे. तेही आणायचो. सॅक अँड सेव्हला भाज्यांचा
मात्र बरेच वेळा खडखडाटच असायचा.
एके दिवशी प्रविणा आणि नागाने
आम्हाला सॅम्स क्लब मध्ये नेले. इथे सर्व काही घाऊक मिळते. त्यासाठी
वर्षाची ३० डॉलर्सची मेंबरशिप घ्यावी लागते. एकाकडे कार्ड असले तरी बाकी
काही जणांना त्यांच्याबरोबर जाता येते. तिथे आम्ही बासमती तांदुळ घेतले
होते. एका पूर्ण फॅमिलीसाठी हे दुकान चांगले आहे. नंतर पुढे आम्ही जेव्हा
क्लेम्सनला आलो तेव्हा प्रत्येकी १० डॉलर्स प्रमाणे आम्ही तिघात एक
मेंबरशिप घेतली होती. त्यामध्ये २ कार्डे आम्हाला दिली. एका कार्डावर
एकाचा फोटो तर दुसऱ्या कार्डावर दुसऱ्या फॅमिली मेंबरचा फोटो होता.
क्लेम्सन सोडल्यावर जेव्हा विल्मिंगटनला आलो तेव्हा आम्ही ३० डॉलर्स भरून
मेंबरशिप घेतली. या दुकानातून आम्ही बरेच काही आणतो की जे नेहमीच वापरात
असते. ते म्हणजे, बासमती तांदुळाचे पोते, साखर, मीठ, धुण्याचा डिटर्जंट,
भांडी घासायचे लिक्विड, फरशी पुसायचे ओले पेपर टावेल्स, फर्निचर
पुसण्यासाठीचे ओले टावेल्स, दाणे, साबण, हँड वॉशचे लिक्विड, ब्रश
केल्यानंतरचे खळखळून चूळ भरायचे लिक्विड, तूप करण्यासाठीचे बटर इ.
सॅम्स क्लब मध्ये महिन्या दोन महिन्यातून एकदा गेले तरी पुरते. बाकीचे इतर
सर्व सामान आणण्यासाठी वाल मार्ट मध्ये जातो. तिथे दर आठवड्याला दूध, दही,
ज्युस, भाज्या, कांदे बटाटे, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो काकडी, आणि
पिण्याचे पाणी, आणतो. सॅम्सला सुरवातीला भाज्याही आणायचो पण नंतर आणणे बंद
केले. फ्रोजन चिरलेल्या भाज्या मात्र मी कधीच आणल्या नाहीत. एक दोन वेळा
आणून बघितल्या पण आवडल्या नाहीत. आम्ही नेहमीच फ्रेश भाज्याच आणतो. भारतीय
दुकानात मात्र महिन्यातून एक वेळा जातो की जे सध्याच्या शहरापासून एका
तासाच्या अंतरावर आहे. त्या आधी विल्मिंग्टनला राहत असताना रॅले शहरातून
भारतीय किराणामाल आणायला लागायचा. त्याकरता येऊन जाऊन ५ तास जायचे. म्हणून
मग मी जास्तीचे सामान आणायला लागले. ते इतके जास्ती होत गेले की घरातच एक
दुकान बनले. नंतर आम्ही इतक्या लांब जाणे सोडून दिले. विल्मिंग्टनला राहत
असताना एक भारतीय दुकान सुरू झाले होते पण ते ६ महिन्यात बंद झाले. भारतीय
वस्ती कमी असल्याने ते म्हणाले की आमच्या दुकानात कोणीच येत नाही त्यामुळे
आमचे नुकसान व्हायला लागले होते म्हणून बंद केले. क्लेम्सनला असताना एकदा
मी आणि उमाने मिळून भारतीय किराणामालाची यादी ऑनलाईन ऑर्डर केली होती.
तेव्हा १०० डॉलर्सच्या वर बील झाले तर फ्री शिपिंग होते. मग माझी आणि तिची
मिळून साधारण १२० डॉलर्सचा किराणामाल आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता.
विल्मिंग्टनला राहत असताना भारतीय भाज्या खाण्याचे विसरून गेलो होतो.
अमेरिकन स्टोअर्स मधून त्याच त्याच भाज्या खाऊन खूपच कंटाळून गेलो होतो.
त्याच त्याच भाज्यांमध्येच थोडे बदल करून भाज्या करायचे. आता मात्र
राहत्या शहरापासून एका तासाच्या अंतरावर भारतीय दुकान असल्याने तोंडली,
गवार, भेंडी, कार्ली, घेवडा, दुधी भोपळा या भाज्या खाता येतात. शिवाय
बाकीचे सटर फटरही आणता येते. ग्लुकोज बिस्किटे, फरसाण, चुरमुरे,, खारी,
इ.इ. विल्मिंग्टनला आणि क्लेम्सनला एक थायी दुकान होते तिथे काहीवेळेला
भारतीय किराणामाल दिसायचा. पण क्वचित काही मिळायचे. त्याचेही अप्रुप
वाटायचे. तिथे काही वेळेला पार्लेजीची बिस्किटे दिसायची, तर काही वेळेला
उडदाचे पापड, तर काहीवेळेला टोमॅटो केचप , पोहे आणि रवाही दिसायचा. काही
फ्रोजन पराठे दिसायचे. अमेरिकेतल्या मोठ्या शहरातून अनेक भारतीय दुकाने आणि
उपहारगृह असतात. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना दूर दूर जायला लागत
नाही. अमेरिकेतल्या इतर ग्रोसरी स्टोअर्सची माहीती पुढील भागात.
क्रमश : ----