
परवा मी घरात आवरा आवरी करत होते. तेव्हा मला एक बॉक्स दिसला. त्यात मला छान आठवणी सापडल्या. नंतर मला आठवले की आम्ही जेव्हा विल्मिंग्टन मधून हँडरसनविलला आलो तेव्हा हा बॉक्स मी तयार केला होता. हा बॉक्स आठवणींचा म्हणून तयार केला होता, जो मी कधीच फेकून देणार नाहीये. प्रत्येक गोष्टींकडे पाहत माझ्या सर्व आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला. त्यातली एक आठवण लिहीत आहे. ती आठवण म्हणजे
एकर्ड दुकानाची की जे नंतर राईट एड ने विकत घेतले होते. ही आठवण आहे २००३ सालातली. आम्ही क्लेम्सन मध्ये राहात होतो तेव्हा हे दुकान होते कॉलेज ऍव्हेन्यू रस्त्यावर वाहत्या वाहनांच्या एका चौकामध्ये. आमचे अपार्टमेंट या चौकाच्या बरेच बरेच आत चालत गेल्यानंतर होते. त्यानंतरचे अपार्टमेंट कॉलेज ऍव्हेन्युवरच रस्त्याला लागून होते. हे दुकान माझे एक वेळ घालवण्याचे ठिकाण होऊन गेले होते. इथे मी चालत जायचे यायचे. या दुकानाच्या बाजूला पोस्ट ऑफीस होते. या दुकानाच्या समोर कपडे धुलाईचे दुकान होते आणि बाजूला थाई दुकान होते. एकर्ड दुकानात गेले की तासभर कसा निघून जायचा कळायचेच नाही.
मुख्य म्हणजे येथे फोटो प्रिंट करून मिळायचे. छान छान ग्रीटींग बघायला मिळायची. दूध मिळायचे. इथे सौंदर्यप्रसाधने बघण्यात पण माझा छान वेळ जायचा. इथे औषधे तर मिळायचीच पण इतरही काही काही छोट्या गोष्टी बघण्यात वेळ जायचा. साध्या क्यॅमेराने फोटो काढून रीळ संपले की मी इथे यायचे आणि फोटो प्रिंट करायचे. त्यातले काही फोटो माहेरी आणि काही फोटो सासरी पोस्टाने पाठवायचे. या दुकानाच्या शेजारीच पोस्ट ऑफीस असल्याने फोटो भारतात पोस्टाने सहज पाठवता यायचे. शुभेच्छापत्रे पाहण्यात तर मी बराच वेळ घालवायचे. त्यातले एक छानसे वाढदिवसाचे शुभेच्छापत्र मी माझ्या भाचीला आणि पुतणीला पाठवायचे.
No comments:
Post a Comment